Bhartiyans

Menu

पालकांनी बांधला शाळेकडे जाणारा रस्ता ..

Date : 10 Nov 2016

Total View : 505

बाणेर ते बालेवाडी दरम्यान विबग्योर शाळेकडे जाणारा रस्ता पालकांनी श्रमदान करून बांधला.तब्बल ६ वर्ष हा रस्ता बांधण्याचं काम चालू होतं.


सारांश

तुमच्या मुलाच्या वा मुलीच्या रोजच्या शाळेच्या येण्या-जाण्याच्या मार्गात पावसाने शेकडो खड्डे पडलेत, पालिकेकडे सहा-सहा वर्षे पाठपुरावा करून कुणीच लक्ष देत नाहीये आणि अश्या वेळेला पालक निग्रहाने एकत्र येवून, श्रमदान करून रस्ता बांधून काढतात.पालकांची ही जिगरबाज सकारात्मक वृत्ती कौतुकास्पद आहेसविस्तर बातमी

तुमच्या मुलाच्या वा मुलीच्या रोजच्या शाळेच्या येण्या-जाण्याच्या मार्गात पावसाने शेकडो खड्डे पडलेत, 
या खड्यांतून विद्यार्थ्यांसकट सर्वांनाच गाड्यांवर जीव मुठीत घेऊन नरकयातना अनुभवत प्रवास करावा लागतोय, 
पालिकेकडे सहा-सहा वर्षे पाठपुरावा करून कुणीच लक्ष देत नाहीये आणि अश्या वेळेला पालक निग्रहाने एकत्र येवून, श्रमदान करून रस्ता बांधून काढतात.
मानलं या पालकांच्या या जिगरबाज सकारात्मक दृष्टीकोनाला....
#Bharatiyans

बाणेर आणि बालेवाडी ते मर्सिडीज बेन्झ शोरूम मागील विबग्योर शाळेपर्यंतचा रस्ता बांधायला साधारण किती वेळ लागू शकतो? एक वर्ष? दोन? तीन? 
नाही हा रस्ता बांधायला सहापेक्षा अधिक वर्ष लागली.

आणि शेवटी हा रस्ता बांधून झाला तो सुद्धा सरकारी प्रयत्नांनी नाही, तर विद्यार्थी, पालक, आणि स्थानिक रहिवासी यांच्या संयुक्त विद्यमाने.

हा रस्ता कुणी बांधायचा यात पुणे महानगरपालिका, सुस पंचायत आणि पुणे महानगर रस्ते प्राधिकरण यांच्यात तब्बल सहा वर्ष चाललेल्या वादात तिथले स्थानिक रहिवासी, शाळेचे विद्यार्थी व पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे रोज हाल व्हायचे.

दुचाकी चिखलात अडकणं, लहान अपघात होणं, चालताना त्रास होणं, इतकंच नव्हे शाळेच्या बसमधून जाताना मुलांची डोकी समोरच्या सीटवर आपटणे या नित्याच्या बाबी झाल्या होत्या.

या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक आणि स्थानिक नागरिकांनी महापालिका, विविध सरकारी संस्था, आमदार, खासदार, आणि अगदी पार केंद्र सरकार पर्यंत प्रयत्न केले, पण दुर्दैवानी कुणीही त्यांना दाद दिली नाही आणि त्यांचा त्रास सुरूच राहीला.

पावसाळ्यात सुद्धा ही परिस्थिती सुधारली नाहीच उलट अजूनच धोकादायक झाली.

शेवटी काय?
शाळेत जायला आमच्या मुलांना त्रास होतो ना, मग आपणच काहीतरी केलं पाहीजे या भावनेतून हे सगळे पालक शेवटी एके दिवशी एका व्हॉट्सॅप समूहाच्या माध्यमातून एकत्र आले.

विबग्योर शाळेच्या एका पालक महिलेने पुढाकार घेउन रस्त्याचे बांधकाम्/दुरुस्ती साठी लागणारा कच्चा माल जमवला आणि चक्क काही कामगारही गोळा केले. 
मग स्थानिक पुरुषही त्यात सामील झाले आणि आता हे सगळे कंबर कसून कामाला लागले.

सकाळी दहा वाजता काम सुरु होई आणि दुपारी उशीरापर्यंत चालत असे. बघता बघता बर्‍यापैकी समतल रस्ता तयारही झाला!

या पालक महिलेने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितलं, “आम्ही हे आमच्या मुलांसाठी केलं. त्यांच्या रोजच्या हालपेष्टा आम्हाला पाहवत नव्हत्या. आमच्या वाहनांचं सुद्धा नुकसान होत होतं. आमच्यापैकी अनेक जण त्यांच्या दुचाकी बर्‍याच लांब लावून ठेवायचे आणि या खराब रस्त्यावरुन चालत शाळेत जायचे. हे आम्ही किती दिवस सहन करणार?\\"

या उपक्रमात सहभागी होणारे पालक निश्चितच या फलिताबाबत अभिमानी आहेत.

एक पालक महिला जया चंद्रा म्हणाल्या, \\"समाजासाठी काही करण्याची तळमळ असल्याशिवाय असे धाडसी पाऊल उचलणे अवघड आहे. आमचं हे काम या गोष्टीचं उदाहरण आहे की एक छोटं पाऊलही एका मोठ्या चळवळीला जन्म देऊ शकतं. जेव्हा मुलं सकाळी बदललेला रस्ता बघतील तेव्हा त्यांना त्यांच्या आईवडिलांचा अभिमान वाटेल.\\"

अजून या रस्त्याचं काही काम बाकी आहे.

जरी जनसहभागातून तयार होत असलेला हा रस्ता या समस्येचे एक तात्पुरते समाधान असले तरी किमान हा पावसाळा आरामात निभावून निघेल अशी पालकांना आशा आहे.

आपल्या या कामाचा अभिमान व्यक्त करतानाच पालकांचा महानगरपालिकेवरचा संताप अजूनही कमी झालेला नाही.

“लहान मुलं आणि जेष्ठ नागरीक यांना पालिकेच्या प्राधान्यक्रमात शेवटचं स्थान आहे. रस्त्याचं काम न करण्यामागे पैसे कमी असणे हे एक कारण देणार्‍या पालिकेकडे सुस्थितीत असलेले रस्ते खोदून त्यांचे काँक्रीटीकरण करायला कोट्यावधी रुपये कुठून येतात?” असा रास्त प्रश्न हे पालक विचारत आहेत.

एकीकडे विद्येचं माहेरघर म्हणून मिरवणार्‍या पुण्यात पालिकेला विद्यार्थ्यांना यायला जायला एक साधा छोटासा रस्ता बनवून देता येऊ नये ही लज्जासद गोष्ट असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

स्थानिक रहिवासी सपना भार्गवा या संतापाला वाट करुन देताना म्हणाल्या की \\"हे काम म्हणजे निर्लज्ज आणि अकार्यक्षम सरकारी यंत्रणां मारलेली एक चपराक आहे. याने कदाचित सरकारला जाग येईल\\".

आशिष भार्गवा यांच्या मते आता पुणे महानगरपालिका, सुस पंचायत आणि पुणे महानगर रस्ते प्राधिकरण यांनी एकत्र येऊन रस्त्याची जबाबदारी वाटून घ्यावी आणि आम्ही केलेल्या कामावर पुढे काम करुन जनतेला एक उत्तम प्रतीचा रस्ता तयार करुन द्यावा.

भारतीय हो, 
पुण्यातल्या या पालकांचे व स्थानिक रहिवाशांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी या रस्त्याचं काम हातात घेणं आणि ते पूर्णत्वाला नेण्याची धमक असणं हे खरंच येरागबाळ्याचे काम नोहे.

पण सरकारी यंत्रणांची अकार्यक्षमता, भ्रष्टाचार ही एक बाब झाली. पण आपला देश खंडप्राय आहे शब्द कमी पडेल इतका मोठा आहे.

सगळीकडे सरकार पुरं पडू शकत नाही. जगण्याच्या रहाटगाड्यात वेळ काढणं हे महाकठीण काम आहे हे मान्य, मात्र तरीही वेळ काढून ज्याप्रमाणे या नागरिकांनी श्रमदानाद्वारे हे काम केलं तसं थोडंफार आपणही करु शकतो का याचा प्रत्येक पुणेकराने व सर्व भारतीय नागरिकांनी विचार करावा.

इमारतीसमोर रस्त्यावर एखादा खड्डा दिसला तर पालिकेने तो दुरुस्त करण्याची वाट न बघता आपणच काही करुन तो बुजवला तर? 
बघा विचार करुन.

या शाळेच्या पालकांच्या जिगरबाज साकारात्माक वृत्तीला ‘टीम भारतीयन्स’चा मानाचा मुजरा.


**’टीम भारतीयन्स**

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

मंदार जोशी

टीम भारतीयन्स