Bhartiyans

Menu

सैन्यदलाची मोहिनी घालणारे अद्भुत गाव - 'मिलिटरी माधवराम'

Date : 11 Nov 2016

Total View : 414

भारतातलं एक अक्ख गाव जिथे शब्दशः प्रत्येकजण भारतीय सैन्यदलात जाण्यासाठी, देशाची सेवा करण्यासाठी, देशासाठी हसत हसत आपले प्राण वेचण्यासाठी आतुर आहे.


सारांश

भारतातलं एक अक्ख गाव जिथे शब्दशः प्रत्येकजण भारतीय सैन्यदलात जाण्यासाठी, देशाची सेवा करण्यासाठी, देशासाठी हसत हसत आपले प्राण वेचण्यासाठी आतुर आहे.सविस्तर बातमी

तुमच्या घरातलं, तुमचं कुणी सख्ख, सैन्यात सीमेवर बंदूक घेवून, कणखर छातीने दहशतवाद्यांशी दोन हात करत, देशाची सेवा करतंय? 
बर तुमच्या आसपासच्या बिल्डींगमध्ये कुणी?
बर जवळच्या, जाऊदे दूरच्या नातलगांपैकी कुणी?
बर सोडा...अश्या एखाद्या सैनिकाला तुम्ही कधी प्रत्यक्ष भेटला आहात? 
अश्या सैनिकाच्या मातेला, पित्याला, भावाला, बहिणीला, आजीला, आजोबांना...कुणाला कधी तुम्ही भेटलाय प्रत्यक्ष?

चला मंडळी, आज तुम्हाला भारतातलं एक अक्ख असं गाव आम्ही दाखवतो जिथे शब्दशः प्रत्येकजण भारतीय सैन्यदलात जाण्यासाठी, देशाची सेवा करण्यासाठी, देशासाठी हसत हसत आपले प्राण वेचण्यासाठी आतुर आहे....

ते आहे भारतातल्या आंध्र प्रदेशातलं \\'मिलिटरी माधवराम\\'
#Bharatiyans

आंध्र प्रदेशाच्या राजधानीपासून १५० कि मी अंतरावर, पश्चिम गोदावरी तालुक्यात एक छोटंसं गाव आहे ज्याचं नाव \\'माधवराम\\' आहे.

खरंतर ह्या गावाचं नाव \\'मिलिटरी माधवराम\\' म्हणून प्रख्यात आहे कारण इथल्या रहिवाश्यांच्या भावनांशी अतूट नातं असलेलं हे नामकरण आहे.

इथले रहिवासी म्हणतात की अगदी १७ व्या शतकापासून निस्सीम देशभक्ती इथल्या ग्रामस्थांच्या नसानसांत सळसळत आहे. आत्ता ह्या क्षणी त्यांच्या गावातील १०९ जवान सैन्यदलात कार्यरत आहेत (त्यांतील ६५ जवान सीमेवर तर उरलेले जवान वेगवेगळ्या सैन्यात प्रशासकीय हुद्द्यांवर कार्यरत आहेत).

\\'मिलिटरी माधवराम\\' मधल्या सर्व गावकऱ्यांना ह्याचा निरातिशय अभिमान आहे.

६४ वर्षीय, भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झालेले श्री प्रत्ती सूर्यनारायण, ज्यांचा पुत्र नागा विजया मोहन सैन्यदलात कार्यरत आहे, ते म्हणतात, \\"ज्या ज्या वेळेस पाकिस्तानशी भारताचे युद्ध होईल, त्या वेळेस माझ्या मुलाने त्यात भाग घ्यावा आणि मला खात्री आहे की तो दिग्विजयी होऊनच परतेल कारण पाकिस्तानसारख्या बनेल प्रांताला धडा शिकवलाच पाहिजे. आमची ग्रामदेवता पोलेरम्मा थली नेहेमीच आमच्या सैनिक पुत्रांचे संरक्षण करेल.\\"

सूर्यनारायण यांना अतिशय गर्व वाटतो की त्यांचा एकुलता एक मुलगा आज देशसेवेत अखंड अग्रेसर आहे.

ते म्हणतात, आज जरी त्याला आपले प्राण गमवावे लागले तरीही आपल्या मातृभूमीसाठी त्याने प्राणाहुती दिल्याचा आम्हा सर्वांना अभिमानच असेल.

मागील आठवडयात उरीमध्ये जो पाकिस्तानी हल्ला झाला आणि ज्यात आपल्या १८ जवानांना प्राण गमवावे लागले, तेथून निव्वळ १८ कि मी अंतरावरच मोहनचे पोस्टींग झाले आहे.

सूर्यनारायणाच्या पत्नी, मोहनच्या आईने, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सीमेवर लढत असलेल्या मोहनविषयी बोलताना म्हणतात, \\"सर्व जवानांचे मोबाइल फोन त्यांच्या अधिकारी लोकांनी ताब्यात घेण्यापूर्वी मी त्याच्याशी बोललेआणि त्याला धैर्य आणि आपल्या देशासाठी सीमेवर तू लढत असल्याचा अभिमान कायम ठेव असंच सांगितलं.\\"

त्या माऊलीच्या बोलण्यात निव्वळ देशाभिमान आणि कर्तव्याची भावनाच होती, तिथे भीतीसाठी किंचितही थाराच नव्हता.

६३ वर्षीय बल्लम वीराई, जे आज खरंतर भारतीय सेनेतून निवृत्त झालेत पण त्यांचा आत्मा आजही एका सैनिकाचाच आहे. 
आजही आपल्या सैन्यासाठी सर्वोतपरी मदत करण्यासाठी ते धडपडत असतात.

ते म्हणतात, \\"मला सध्याच्या युद्धांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची एवढी जाण नाही परंतु आम्ही सैन्यदलाची चाकरी-सेवा आजही करू शकतो. शस्त्रास्त्रांच्या सूची सांभाळणे किंवा त्या सुरक्षित ठेवणे, वाहतूकीसाठी मदत पुरविणे, आणि युद्धभूमीपर्यंत आवश्यक गोष्टींचा पुरवठा करणे ही सगळीच कामे आम्ही सहज करू शकतो.\\"

श्री वीराई सध्या \\'मिलिटरी माधवराम\\' इथल्या ताडपल्लेगुडम परिसरात ११८० सदस्य असलेल्या Ex-Servicemen Association’चा कार्यभाग कार्यकारी प्रमुख म्हणून काम सांभाळतात.

ह्या गावातील १५०० कुटुंबांमधून एक तरी (आणि काही कुटुंबांतून तर तीन-तीन सदस्य) सैन्यदलात कुठल्या ना कुठल्या पदावर आज कार्यरत आहेत. आणि त्याहून अधिक सेवानिवृत्त अधिकारीही त्यांच्या मदतीला असतात.

माधवराम मधील ही अनोखी संस्कृती आणि देशाप्रती असलेला ह्या लोकांचा सेवाभाव समाजामध्ये विशेष लक्षणीय ठरला आहे.

ह्या गावाचे नामकरण अधिकृतरित्या \\'मिलिटरी माधवराम\\' करण्याचे सत्कार्य संरक्षण मंत्री श्री मनोहर पर्रीकरांच्या हस्ते येत्या डिसेंबर महिन्यात त्या वेळी होईल ज्या वेळी ह्या गावात एका आत्यंतिक महत्वाच्या प्रशिक्षण संस्थेचा पाय उभारला जाईल.

संरक्षण मंत्रालयाने BDL (Bharat Dynamics Ltd) ह्या कंपनीला माधवराम गावात अधिकृत आणि सर्व पद्धतीने सुसज्ज अशी एक सैनिकी प्रशिक्षण संस्था उभारण्याचे काम सोपविले आहे.

ह्यामुळे लोकांचा सहभाग आणि भरतीची प्रक्रिया औपचारिकपणे पार पडता येईल. जे आपल्या सैन्यदलात सामील व्हायचं स्वप्न उराशी बाळगून आहेत अश्या या आणि आसपासच्या गावांतल्या सर्वच तरुणांसाठी ही संस्था हे एक अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेलं आणि आता एक पूर्णत्वास आलेलं असं स्वप्नंच असेल.

इथेच असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील तरुण तरुणी जेवणाच्या वेळेत आपापल्या ग्रूपमध्ये उरीच्या दुर्दैवी हल्ल्याविषयी आणि भारतीय सेनेच्या युद्ध नीतीबद्दल चर्चा करत होते.

या वेळी वाय. चैतन्य आणि त्याचा मित्र व्ही. नागाबाबू म्हणाले, \\"आम्ही वर्तमानपत्र आणि दूरदर्शनवर दाखविली जाणारी प्रत्येक बातमी बघतो, वाचतो. पण भारतीय सैन्याबद्दल आणि पाकिस्तानबद्दल आमचे खरे माहिती-स्रोत हे गावातील आणि घरातील आमचे मोठे लोकच आहेत.\\"

हे दोघेही पुढल्या वर्षी १८ वर्षीय होण्याची वाट बघत आहेत म्हणजे त्यांना सैन्यदलासाठी अर्ज करता येईल.

त्यांच्याच वर्गमैत्रिणी व्ही. दुर्गा भवानी आणि सी. संतोषी देखील सैन्यात दाखल होण्यासाठी उत्सुक आहेत.

त्या मुली विचारतात, \\"काका, आपले वायुदल आता महिलांना देखील युद्ध विमान चालविण्यास परवानगी देतंय मग भारतीय सेना आता महिलांना युद्ध भूमीवर पोस्टिंग देतील का याबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकाल का?\\"

या गावातले स्थानिक विद्यार्थी तीन-तीन वेळा सुद्धा सैन्यदलात सामील होण्यासाठी प्रयत्न करत असतात. पान आता या विद्यार्थ्यांची या संस्थेमुळे खूपच सोय होऊ घातली आहे. ११ करोड रुपयांमध्ये यांच्याच गावात उभारली जात असलेली ही सैन्यात दाखल होण्याचे प्रशिक्षण संस्था ह्या सर्व मुलांसाठी एक मोठ्ठा आशेचा किरण बनणार आहे.

वेकालापल्ली हुडुपुलम्मा खूप निराश झाल्या ज्यावेळेस त्यांच्या मुलाचा, गणेशचा, सैन्यात भरती होण्याचा पहिला प्रयत्न एप्रिल महिन्यात फसला.

त्या म्हणतात, \\"गणेश आता काकीनाडा येथे प्रशिक्षणासाठी गेला आहे आणि ४ ऑक्टोबर रोजी तो पुन्हा सैन्यदलासाठीच्या प्रवेश परीक्षेला बसेल. 
मी आमच्या देवीला ह्या वेळेस त्याला पास कर म्हणून साकडंच घातलं आहे.\\"

पोलरामा देवीचं मंदिर इथे एक तीर्थक्षेत्र मानले जाते. इथल्या रहिवाश्यांनी श्रद्धा आहे की युद्धभूमीवर जाण्यापूर्वी देवीचं दर्शन आम्ही घेतो आणि म्हणूनच तीच आमचं संरक्षण करते. एप्रिल महिन्यात येणाऱ्या \\'उगाडी\\' ह्या तेलगू नववर्षी गावकरी देवीचा मोठ्ठा उत्सव साजरा करतात.

सैन्यदलात असणारे अधिकारी ह्या पावन दिवशी उत्सवात भाग घेऊन देवीविषयीची कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त करतात.

आपल्या भारतभूमीसाठी प्राणार्पण म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने ह्या गावकऱ्यांना कळले आहे. खरंच प्रत्येक राज्यातील किमान पाच गावांनी जरी हा आदर्श घेतला तरी आपलं सैन्यदल सक्षमपणे आणि तटस्थपणे अखंड कार्यरत राहू शकेल !!

ह्या सर्व मातांना, कुटुंबियांना आणि सैनिकांना Team Bharatiyans’चे शतःकोटी प्रणाम !! 
जय हिंद !!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य