Bhartiyans

Menu

अंध आणि ऍसिड अटॅकमुळे उध्वस्त झालेल्या मुली, या ट्रॅव्हल एजन्सी मधून घडवतात जगाची सफर

Date : 12 Nov 2016

Total View : 141

प्रवास कंपनी


सारांश

प्रवास कंपनीसविस्तर बातमी

तुमच्या कुटुंबाच्या सुट्टीतल्या ट्रीपच्या नियोजनासाठी तुम्ही दार उघडून एका ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयात प्रवेश करता आणि तुमचे पाय जागच्या जागी थिजतात.....
समोर तुम्हाला दिसतात काही अंध आणि काही ऍसीड अटॅकमुळे चेहरा विद्रूप झालेल्या मुली....
तुम्ही त्यांच्यासमोर बसता...स्थिरावता...संभाषण सुरु करता...आणि नंतर मात्र अर्ध्या-एक तासात समाधानाने उठता...
....निव्वळ एक छान आकर्षक पॅकेजच घेऊन नव्हे तर एका सामाजिक जाणीवेतून सुरु झालेल्या आणि एका विलक्षण यशस्वी अश्या त्या ट्रॅव्हल कंपनीतून खूप सारी एनर्जी घेऊन.....
#bharatiyans

दिवाळीचे दिवस, वर्षाचा हा मोठा आणि महत्वाचा सण. दिव्यांच्या रोषणाईने सारे शहर लखलखत होतं, विक्रेत्यांची गडबड आणि खरेदीदारांची झुंबड यामुळे शहरातील रस्ते गर्दीने फुललेले होते. लोकांच्या चेहेऱ्यावर खरेदीचा आनंद ओसंडून वाहत होता.

कार्पोरेट विश्वातील लोकांसाठी सुद्धा हा तसा महत्वाचा सण, भेटी देण्याचा आणि संबंध वाढवण्याचा, आपल्या कस्टमर्सना बांधून ठेवण्याचा. 
गेल्या वर्षी याच दिवसात कॉर्पोरेट ट्रेनर आकाश भारद्वाज खरेदीसाठी बाहेर पडले.

दुकाने, त्यात मांडलेल्या वस्तू न्याहाळताना त्यांची नजर अचानकच एका फुगे विकणाऱ्या मुलीवर पडली. कडेवरच्या लहान मुलाला सांभाळण्याची कसरत करत ती फुगे विकत होती.

तिला मदत म्हणून जेव्हा ते फुगे विकत घ्यायला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तिची नजर फार अधू आहे, जवळजवळ आंधळीच म्हणा ना. 
त्यात चेहेऱ्यावर भाजल्याचा एक मोठा डागही होता, ज्यामुळे तिचा मूळचा रेखीव चेहेरा सुद्धा विद्रुप झाला होता.

चौकशी केल्यावर आकाशना समजलं की कौटुंबिक वैमनस्यातून चिडून, सूड म्हणून तिच्याच शेजाऱ्याने तिच्या चेहेऱ्यावर ऍसिड फेकून तो विद्रुप केला होता आणि नंतर हा कुरूप चेहेरा नकोसा झाला म्हणून तिच्या नवऱ्याने, त्यांच्या लहान मुलासकट तिला रस्त्यावर काढले.

बर, दुर्दैवाचे दशावतार इथेच संपले नव्हते तिचे. एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून चांगली नोकरी होती पण या प्रसंगानंतर तीही गमवावी लागली.

\"हे काम करण्यापेक्षा कुठे नोकरी का करत नाहीस?\" भारद्वाज यांनी तिला विचारलं, \"हा चेहेरा पाहायला नको म्हणून मला माझ्याच घरातून हाकलून दिलं, मला कोण नोकरी देणार? \" ती म्हणाली.

तिच्या त्या हताश उत्तराने त्यांच्या मनात तिच्याविषयी कणव निर्माण झाली. पण आता मात्र भारद्वाज तिथेच थांबले नाहीत. या आणि अशा परिस्थितीत असलेल्या सर्वांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे या विचारांमधून दोन कंपन्यांची निर्मिती त्यांनी केली.

प्रवास कंपनी \"खास\" आणि कुरिअर कंपनी \"खास उपहार\". अवघे ३१ वर्षांचे असताना आकाश भारद्वाज यांनी हे धाडस केलं.

या दोन्ही कंपन्या अंध स्त्रियांकडून आणि ऍसिड अपघातात ज्यांचा चेहेरा विद्रुप झाला आहे अश्यांकडून चालवल्या जातात. त्यांना या कंपनीत नोकरी देण्याचा भारद्वाज यांचा मानस स्पष्ट आहे की ज्यायोगे समाजाकडून नाकारल्या गेलेल्या या स्त्रिया ताठ मानेने, एक चांगले आयुष्य जगू शकतील.

आकाश यांच्यासाठी एक चांगली नोकरी सोडून या दोन कंपन्या स्थापित करणे हा निर्णय अजिबात सोपा नव्हता. पैशाची अडचण होतीच, लोन मिळायची सुद्धा मारामार होती.

पण आलेल्या संकटाने ते डगमगले नाहीत, त्यांनी स्वतःची बाईक विकली, आकाश यांच्या पत्नीनेही या उपक्रमाला पूर्ण कष्टाने साथ दिली. तिचे दागिने गहाण टाकून, पैशाची जमवाजमव करून त्यांनी सहा महिन्यापूर्वी या दोन कंपन्या सुरु केल्या.

आज पाच अंध मुलीं-- कमलेश , अर्चना , दीप्ती , प्रेम आणि निर्मल या आता या कंपन्यांमुळे आपल्या पायावर उभ्या आहेत.

गिऱ्हाईकांच्या भेटीचे नियोजन करणे, प्रवासाविषयक प्रेझेन्टेशन करणे, व्यवहार बघणे इतकेच नव्हे तर गरज असल्यास ग्रुप-बरोबर नियोजित स्थळी जाणे असे प्रवास कंपनीचे सारे काम याच मुली करतात.

भेट वस्तू तयार करणे आणि ते योग्य स्थळी पोचवणे ही सुद्धा कामे आता कंपनीत सुरु झाली आहेत.

एखाद्याची वाईट परिस्थिती पाहून आपण हळहळतो पण केवळ अनुकंपा न करता या दुर्दैवी स्त्रियांना मदतीचा हात देण्याचे महत्वाचे कार्य आकाश भारद्वाज यांनी या उपक्रमाच्या द्वारे केले आहे.

आकाश भारद्वाज, स्वतःची सुस्थितीतली नोकरी सोडण्याचे विलक्षण धैर्य दाखवतं, समाजातल्या समाजानेच तिरस्कार करून झिडकारलेल्या पिडीत महिलांना मदतीचा हात आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या या तुमच्या या उपक्रमाचे टीम भारतीयन्स’ला विलक्षण कौतुक वाटते आहे.

आपण सर्वांनी सुद्धा असा दृष्टीकोन ठेवला तर आपल्या समाजात अश्या महिलांना मिळणारी वर्तणूक निश्चित सुधारेल असा विश्वास आम्हाला वाटतो.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

प्रिया प्रभुदेसाई

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

इंडिया टाईम्स