Bhartiyans

Menu

तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं अभ्यासात विशेष लक्ष लागत नाहीये का?

Date : 12 Nov 2016

Total View : 483

तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं अभ्यासात विशेष लक्ष लागत नाहीये का? अभ्यासापेक्षा एखाद्या खेळात त्यांना जास्त इंटरेस्ट आहे का? पी गोपीचंद म्हणतो की, जर बाय एनी चान्स असं असेल तर अजिबात चिंता करू नका,


सारांश

पूर्ण विश्वासाने त्यांना हव्या त्या खेळात मनसोक्त खेळू द्या, आत्मविश्वासाने त्यांच्या मागे पहाडासारखे उभे राहा, कष्ट करायला त्यांना प्रोत्साहन द्या.... विश्वास ठेवा....तुम्ही तुमच्या घरातच एक पीव्ही सिंधू, साक्षी मलिक , दीपा कर्माकर किंवा एक पुल्लेला गोपीचंद, प्रकाश पदुकोण, विजय अमृतराज किंवा सचिन तसविस्तर बातमी

तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं अभ्यासात विशेष लक्ष लागत नाहीये का? 
अभ्यासापेक्षा एखाद्या खेळात त्यांना जास्त इंटरेस्ट आहे का?

पी गोपीचंद म्हणतो की, जर बाय एनी चान्स असं असेल तर अजिबात चिंता करू नका,

पूर्ण विश्वासाने त्यांना त्यांना हव्या त्या खेळात मनसोक्त खेळू द्या, आत्मविश्वासाने त्यांच्या मागे पहाडासारखे उभे राहा, कष्ट करायला त्यांना प्रोत्साहन द्या....
विश्वास ठेवा....तुम्ही तुमच्या घरातच एक पीव्ही सिंधू, साक्षी मलिक , दीपा कर्माकर किंवा एक पुल्लेला गोपीचंद, प्रकाश पदुकोण, विजय अमृतराज किंवा सचिन तेंडूलकर घडवत आहात....
हे सांगतोय भारताचा जगद्विख्यात बॅडमिंटन खेळाडू आणि यशस्वी कोच – पी गोपीचंद आणि पीव्ही सिंधूचे वडील पी.व्ही.रामन.
#Bharatiyans

साईना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू यांच्या सलग २ विश्व-स्तरीय स्पर्धांमध्ये दिमाखदार कामगिरीचा आणि तब्बल २ ऑलिम्पिक पदके मिळवण्याचा मेरुपर्वत उचलणारा भारतीय बॅडमिंटनचा प्रमुख प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद म्हणतो, की अभ्यासात फार चांगला नसल्यामुळे तो स्वतःला खूप नशीबवान समजतो आणि अपेक्षित असा निकाल न लागलेल्या एका IIT परीक्षेमुळेच त्याला आवडणाऱ्या बॅडमिंटन या खेळाकडे विशेष लक्ष देऊन त्याला एक यशस्वी खेळाडू होता आलं.

एखाद्या खेळात उत्तम कामगिरी नोंदवण्यासाठी पालकांकडून अतोनात कष्ट, बांधिलकी आणि त्याग यांसाठीचे पाठबळ आणि त्याचप्रमाणे नशीबाची देखील लागणारी साथ आवश्यक असते असे गोपी म्हणतो.

“माझा भाऊ आणि मी, आम्ही दोघेही खेळायचो. तो फार छान खेळायचा आणि आता मी स्वतःला नशीबवान समजतो की मी अभ्यासात तितका हुशार नव्हतो.” गोपी पुढे म्हणतो.

“तो एका राज्यस्तरीय स्पर्धेचा विजेता होता. त्याने IIT परीक्षा दिली होती आणि तो पास सुद्धा झाला होता आणि त्यामुळेच पुढे तो IIT ला गेला आणि त्याने खेळणं थांबवलं. त्याचवेळी मी सुद्धा अभियांत्रिकी परीक्षा दिली पण त्यात मी अनुत्तीर्ण झालो आणि म्हणूनच अभुअसच्य वाट्याला न जाता मी खेळात सातत्य ठेवलं आणि आज मी इथवर पोचलो आहे.

माझ्या मते तुम्हाला आपलं लक्ष पूर्णपणे खेळावर केंद्रित करणं गरजेचं असतं आणि कधी कधी नशीबवान सुद्धा असावं लागतं.” हा यशस्वी खेळाडू आणि जागतिक दर्जाचा बॅडमिंटन कोच पुढे सांगतो.

२००१ साली ‘ऑल इंग्लंड’ स्पर्धा जिंकून, अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय खेळाडू म्हणून नावाजलेल्या गोपीने त्यानंतर लवकरच निवृत्ती घेतली आणि स्वतःची एक बॅडमिंटन प्रशिक्षण संस्था सुरु केली.

ही प्रशिक्षण संस्था उभी करण्याची प्रक्रिया अजिबातच सोप्पी नव्हती. अनेक ठिकाणी आर्थिक मदतीशी निगडित बाबींमध्ये त्याला हात हलवत परत यावे लागले होते, कटू अशा नकाराचा वेळोवेळी सामना करावा लागत होता.

अशाच एका प्रसंगाविषयी बोलताना गोपीचंद म्हणतो, “काही वर्षांपूर्वी एका सार्वजनिक क्षेत्रातल्या ऑफिसमध्ये गेलो होतो. बॅडमिंटनला सहाय्य करण्याचं आश्वासन देऊन मला सलग तीन दिवस त्या ऑफिसच्या बाहेर बसून वाट पहायला लावली त्यांनी.

पण सलग तीन दिवस, सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० पर्यंत वाट बघितल्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मला येऊन सांगितलं की, एक जागतिक दर्जाचा खेळ बनण्याची बॅडमिंटनची क्षमता नाही.”


“कोणाकडे तरी जाऊन प्रायोजकत्व मागण्याचा तो माझा शेवटचा दिवस होता. त्या रात्री मी घरी गेलो आणि माझे आई-बाबा आणि बायकोच्या सहमाताने आमचं राहतं घर गहाण ठेवलं आणि त्यातूनच माझी प्रशिक्षण संस्था सुरू झाली.” IIFCL तर्फे आयोजित एका सत्कार समारंभात बोलताना गोपीचंद म्हणाले, “

हैदराबादमध्ये प्रशिक्षण संस्था सुरु झाल्यापासून गेल्या १२ वर्षात गोपीचंदने भारताला २ ऑलिम्पिक पदाकविजेते खेळाडू मिळवून दिले आहेत आणि याबद्दल तो म्हणतो की त्याला कधीचं असं वाटलं नव्हतं की इतक्या कमी कालावधीत भारताला बॅडमिंटनमधील ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचं त्यांचं स्वप्न एवढ्या लवकर पूर्ण होईल.

गोपीचंद सांगतो की ,”२००४ साली २५ तरुणांना सोबत घेऊन मी माझी संस्था सुरु केली. ८ वर्षांची सिंधू ही माझ्याकडे शिकायला असणारी सर्वात लहान खेळाडू होती तर १५ वर्षीय पी.कश्यप हा सर्वात मोठा होता.

जेव्हा मी प्रशिक्षणाला सुरुवात केली तेव्हा माझ्यासमोर एकच ध्येय होतं की माझ्या याच खेळाडूंमधून एक दिवस भारताला ऑलिम्पिक पदक मिळेल. पण इतक्या लवकर, २०१२ मधेच आणि नंतर लगेचंच २०१६ ला सुद्धा आपल्याला बॅडमिंटनमधलं ऑलिम्पिक पदक मिळेल अस मला अजिबातच वाटलं नव्हतं.”

“मला वाटतं की मी आता या सगळ्यातून निवृत्त व्हावं कारण आता माझी सगळी ध्येयं, सगळी उद्दिष्ट साध्य झालीयेत,” एका निवांत क्षणी गोपीचंद म्हणतो.

गोपीचंद असंसुद्धा सांगतो की काही जणांनी त्यांना वाईट वर्तणूक दिली असली तरी ज्यांनी त्यांना पदोपदी सहाय्य केले अशा इतर अनेक लोकांचा तो शतशः ऋणी आहे आणि अश्या चांगल्या लोकांची संख्या खूप जास्त आहे.

“आपल्या सरकारमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांनी आम्हा खेळाडूंना अगदी वाईट वागणूक दिलीये पण काही असे देखील चांगले लोक या सगळ्याच यंत्रणेत नक्कीच आहेत की ज्यांनी आम्हाला फार मनापासून सहाय्य केलं आहे,” गोपीचंद सांगतो.

“राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार किंवा पद्म भूषण’करिता मी कुठल्याच प्रकारचा अर्ज केला नव्हता पण तरीदेखील काही अधिकाऱ्यांना असे वाटले की मला या पुरस्कारांनी गौरवण्यात यावं. खर सांगतो, अशा काही अधिकाऱ्यांमुळेच प्रोत्साहन मिळतं आणि खेळ-क्षेत्रातली अशी चांगली कामगिरी करणं शक्य होतं.” तो पुढे सांगतो.

“देवाने माझ्यावर आयुष्यभर खूप दया केली आहे. जेव्हा जेव्हा मला काही अडचण आलेली आहे, तेव्हा तेव्हा त्याने माझ्या मदतीला कोणालातरी पाठवंलेल आहे,” गोपीचंद नम्रपणे सांगतो.

दरम्यान, सिंधूचे वडील पी.व्ही.रामन म्हणतात की आम्ही आमच्या मुलीला खेळामध्ये करियर करण्याचं स्वातंत्र्य दिलं म्हणून जे लोक आधी आम्हाला निंदायचे तेच लोक आता सिंधूने पार पडलेल्या कामगिरीचे आणि आमच्या त्यागाचे भरभरून कौतुक करत आहेत.

रामन यांनी PTI ला सांगितलं की, ”जेव्हा सिंधू कधी पहाटे ४ ला किंवा कधी कधी ५ वाजता सराव करायला निघायची तेव्हा मी चालायला म्हणून बाहेर पडायचो. अनेक लोक भेटले की म्हणायचे की तुम्ही कशाला एवढे कष्ट घेताय आणि का एवढं सगळ सहन करताय. पण आता तेच लोक आम्हाला मुद्दामून भेटून भेटून सांगतात की आम्हाला तुमच्या मुलीचा अभिमान वाटतो आहे.”

“जोपर्यंत आपण काही त्याग करत नाही किंवा अपार कष्ट घेत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या कामाचं अपेक्षित फळ मिळत नाही. सिंधूने याच गोष्टी केल्या आणि तिला त्याच फार सुखदायी असं फळ मिळालं आहे, ”रामन पुढे सांगतात.

त्यांनी केलेल्या त्यागाविषयी विचारलं असता, रामन म्हणाले की “पालक म्हणून आमचं कर्तव्य आहेच आणि त्याहीपेक्षा आम्ही दोघेही खेळाडू असल्यामुळे, एका खेळाडूच्या आयुष्यातलं खेळाचं महत्व आम्हाला चांगलच माहित आहे आणि त्याचप्रमाणे याचा देखील अंदाज आम्हाला होताच की या अश्या जागतिक स्तरावर पोचण्यासाठी एखाद्या खेळाडूला किती कष्ट आणि ते ही सातत्याने घ्यावे लागतात, म्हणून आम्ही आमच्या मुलीला ती गोष्ट साध्य करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य केले ज्याची ती हक्कदार आहे.”

शेवटी रामन सांगतात की, “आपल्या मुलांवर कोणत्याही गोष्टीचं दडपण न टाकता पालकांनी मनापासून आपल्या मुलांना, त्यांना हव्या त्या क्षेत्रात कामगिरी करण्यास प्रोत्साहन द्यावं आणि सहाय्य करावं म्हणजे आपली मुलं देखील आपापल्या क्षेत्रात सर्वतोपरी कष्ट घेऊन, सर्वोच्च त्याग करून पालकांनी घेतलेल्या मेहनतीचं चीज करतील.

माझ्या मुलीने माझ्यासाठी, आमच्यासाठी , तिच्या गुरुसाठी आणि देशासाठी तेच केलं आहे.”

धन्य तो गुरु, धन्य ते मातापिता आणि धन्य ती शिष्या...

या सर्वांनाच ‘टीम भारतीयन्स’चा मानाचा मुजरा.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .