Bhartiyans

Menu

पोलादी मन,पोलादी मनगट..आधुनिक भारतातला एक दुर्गावतार

Date : 12 Nov 2016

Total View : 501

सोनितपूरच्या पोलिस महाअधीक्षक संजुक्ता पराशर यांनी बोडो बंडखोरांना नेस्तनाबूत केलं.एका तडफदार महिला IPS अधिकाऱ्याची स्फूर्तीदायक कहाणी


सारांश

आसाम मधील सोनितपूर जिल्ह्यातील तरुण आणि तडफदार IPS ऑफिसर संजुक्ता पराशर यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या केवळ १५ महिन्यांमध्येच उभ्या आसाम ला दहशतीच्या छायेत ठेवणाऱ्या बोडो बंडखोरांची अनेक ठाणी उध्वस्त केली.जवळपास १६ बंडखोराना कंठस्नान घातले तर १५० च्या वर बंडखोरांना नेस्तनाबूत केले. तरुणांचा आदर्श असणसविस्तर बातमी

 

 

 

तुम्ही एक भारतीय महिला आहात....विलक्षण खडतर कष्टप्रद अभ्यास करून तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तम मार्कांनी पास होता...IAS हे त्यातल्या त्यात सुखी केडर निवडण्याची तुम्हाला संधी असताना सुद्धा निव्वळ धाडसी स्वभाव म्हणून तुम्ही IPS ही कठीण सेवा स्वीकारता....

कार्यभार स्वीकारताच काही तासातंच तुम्हाला एका मोठ्या हिंसक कारवाईला सामोरे जावे लागते...तिथे तुम्ही यशस्वी होता...

आणि नंतर काही काळातच उभ्या आसामला दहशतीच्या छायेत ठेवणारे बोडो अतिरेकी AK-47 घेऊन बोडो अतिरेक्यांचा सामना करणाऱ्या तुम्हालाच घाबरतात... 
तुमचे नाव आहे डॉक्टर संजुक्ता पराशर....
#Bharatiyans

आसाममधील घनदाट जंगल….पहाटेची वेळ.....मुसळधार पाऊस....बोडो बंडखोरांच्या हिंसेचा उसळलेला उद्रेक.......

हे वर्णन कुठल्याही थरारपटातील नसून एका तडफदार महिला पोलिस अधिकाऱ्याच्या खडतर कारवाईच्या वेळेचे आहे.

आसाममधल्या सोनितपूर जिल्ह्यातील काही पोलिस अधिकारी बोडो बंडखोरांना नेस्तनाबूत करण्यासाठी निघाले आहेत. आसाममधले पोलीस कमांडोज आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातले काही अधिकारी मिळून हे गस्तीचं काम करत आहेत..

काहीकाळापूर्वी सोनीतपूर जिल्ह्य़ातील मालडंग या भागामध्ये काही बोडो बंडखोरांनी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात सैन्याचे १८ जवान मृत्युमुखी पडले होते.

त्यामुळे तेजपूरपासून केवळ ८० किलोमीटरवर असलेल्या या भागात गस्त घालणं अत्यावश्यक होतं. या कामाचं नेतृत्व करत होत्या सोनीतपूरच्या पोलीस महाअधीक्षक, संजुक्ता पराशर!

संजुक्ता पराशर, सोनीतपूरच्या पोलीस महाअधीक्षक, आय.पी.एस. ऑफिसर. प्रशिक्षण संपवल्यावर खरतरं एका पोलीस अधिकाऱ्याला काय आवडेल?

एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करावं, अजून जरा अनुभव घ्यावा आणि हळू हळू जबाबदाऱ्या वाढवत न्याव्यात.

पण संजुक्ता पराशर यांना मात्र वेगळ्याच गोष्टीला सामोरे जावे लागले.

त्यांना आसाममधल्याच, म्हणजे जवळपास त्यांच्या घरच्याच माकूम भागातच पहिलं थेट पोस्टिंग मिळालं आणि काही तासांतच त्यांना इथे बोडो हिंसाचाराशी सामना करावा लागला.

१५ महिन्यांमध्येच त्यांनी बोडो बंडखोरांची अनेक महत्त्वाची ठाणी उद्ध्वस्त करून यात जवळपास १६ बंडखोरांना कंठस्नान घातले, तेव्हापासून आजपर्यंत जवळपास १५० बोडो बंडखोरांना नेस्तनाबूत करण्यात त्यांना यश आलं आहे. आजपावेतो शेकडो टन दारुगोळा आणि अगणित हत्यारे त्यांनी जप्त केली आहेत.

भारताला खरं तर महिला आय.पी.एस. अधिकारी नवीन नाहीत. पण संजुक्ता पराशर काही सर्वसाधारण आय.पी.एस. अधिकारी नक्कीच नाही!

उभ्या आसाम ला दहशतीच्या छायेत ठेवणारे बोडो अतिरेकी केवळ एकाच नावाला घाबरतात...ते म्हणजे संजुक्ता पराशर....
२००६ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाने आयोजित केलेल्या परीक्षेत ८५ वा क्रमांक मिळवत संजुक्ता पराशर आय.पी.एस. अधिकारी झाल्या.

लहानपणी लखीमपूर येथे राहत असलेलं हे पूर्ण कुटुंब गुवाहाटी येथे नोकरीसाठी राहायला आलं. त्यांची आई, मीना देवी या आसाम आरोग्य मंडळात काम करायच्या आणि त्यांचे वडील दुलालचंद्र बरुआ हे जलसंपदा खात्यामध्ये प्रमुख अभियंता होते.

त्यामुळे संजुक्ता यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण गुवाहाटीच्या होली चाइल्ड स्कूलमधून पूर्ण झालं. शाळेत असल्यापासूनच त्यां सर्व प्रकारच्या खेळांमध्ये निष्णात होत्या.

खेळाबरोबरच अनेक वैयक्तिक स्पर्धामध्येही त्या उत्साहाने भाग घेत असत. लहानपणी मित्र-मैत्रिणींबरोबर वेगवेगळे प्रकल्प केल्यामुळे त्यांना सर्वाना एकत्र घेऊन काम करायची आवड निर्माण झाली आणि इथूनच त्यांच्यात नेतृत्वाचे गुण वाढीस लागले.

दिल्लीच्या इंद्रप्रस्थ महाविद्यालयामधून पराशर यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे दिल्लीच्या सुप्रसिद्ध जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधून त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयामध्ये आपलं पदव्युत्तर शिक्षण घेतलं. इथूनच त्यांनी अमेरिका आणि आशिया यांच्यातील संबंध याविषयावर एम.फिल. ही पदवीदेखील प्राप्त केली.

२००४ साली सुप्रसिद्ध ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये काम करत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला आणि २००६ साली देशभरातून ८५ वा क्रमांक मिळवून आपल्या कामाची सुरुवात केली.

त्यांचा एकंदर क्रमांक बघता आय.ए.एस. च्या केडर मध्ये त्यांना सहज जाता आलं असतं आणि तिथे त्या सध्याच्या तुलनेत आरामात आयुष्य घालवू शकल्या असत्या.

पण या आधुनिक दुर्गेने खडतर प्रवासाची ही भारतीय पोलीस सेवाच पसंत केली.

२००८ साली आपलं ट्रेनिंग संपवल्यावर त्यांना त्यांच्या होम स्टेट म्हणजे आसाममधल्या माकूम भागात असिस्टंट कमांडन्ट म्हणून पहिलं पोस्टिंग मिळालं. पोस्टिंगच्या काही तासांतच त्यांना पोलीस सेवेमध्ये काय काम करावं लागू शकतं याची झलक दाखवणारी घटना घडली.

पोस्टिंग झाल्याच्या दोन तासांच्या आत त्यांना उदालगुरीला तातडीने पोहोचण्याचा आदेश आला. त्या वेळी तिथे बांगलादेशी घुसखोर आणि बोडो बंडखोर यांच्यात हिंसक संघर्ष सुरू झाला.

पोस्टिंगच्या शब्दशः पहिल्याच दिवशी त्यांना हिंसाचाराच्या वास्तवाशी सामना करावा लागला.

‘मी याच भागातली असले तरी अशा प्रकारचा हिंसाचार माझ्यासाठी नवा होता. केवळ एखादा माणूस एका जमातीत जन्माला आला आहे म्हणून त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं हे लक्षात आलं.” पराशर सांगतात. 
या हिंसक जमावाला त्यांनी आणि त्यांच्या टीमने धिटाईने आवर घातला.

संजुक्ता म्हणतात की फक्त अतिरेकी हल्ल्यांमुळेच धोकादायक नाही, तर इथलं घनदाट जंगल, वन्यप्राणी,तसेच इथले रस्ते, यामुळेही इथे काम करणं जोखमीचं आहे.

गस्तीच्या वेळी अनेकदा, त्यांना आणि त्यांच्या टीमला हत्तींच्या कळपाशी सामना करावा लागला आहे. अशा वेळी स्थिती जैसे थे असते. तो कळप तिथून हलेपर्यंत रात्रीच्या काळोखात त्या जंगलात कित्येक तास काढावे लागतात. उन्हाळ्यात घामाने हैराण व्हायला होते तर पावसाळ्यात ४-५ फूट पाण्यातून सततचा प्रवास करावा लागतो.

२००८ साली त्यांचा विवाह पुरू गुप्त यांच्याशी झाला. पुरू हे चिरांग जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. मुलाची काळजी घेण्यासाठी त्यांची आई सध्या त्यांच्याबरोबर सोनीतपूरला राहते. कामाच्या आवाक्यामुळे आपण कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही, अशी खंत त्या व्यक्त करतात.

त्यांची आणि त्यांच्या पतीची भेटही अनेकदा दोन-दोन महिन्यांनी होते. एक स्त्री म्हणून हे काम अवघड वाटतं का, असं विचारल्यावर त्या म्हणतात ‘‘एकदा का तुम्ही सव्‍‌र्हिसेसमध्ये रुजू झालात की तुमच्याकडे एक महिला किंवा पुरुष असं बघितलं जात नाही.

संजुक्ता पराशर स्वतः फार तरल स्वभावाच्या असून केवळ असामाजिक तत्वांनी मला घाबरले पाहिजे असे त्यांचे ठाम म्हणे आहे.
तरुणांचा आदर्श ठरलेल्या संजुक्ता यांच्या आजच्या तरुणाईकडून खूप अपेक्षा आहेत

व्यवस्थेच्या आतमध्ये राहूनच व्यवस्था बदलता येते, बाहेर राहून फक्त टीका करता येते, असंही त्या म्हणतात. भारताच्या प्रशासकीय सेवांमध्ये चांगल्या, विचार करणाऱ्या, कर्तबगार अधिकाऱ्यांची गरज आहे.

तुम्हाला खऱ्या अर्थानी तुमची हुशारी,तुमच्यातलं सामथ्र्य पणाला लावायचं असेल तर स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवांमध्ये रुजू होण्याचं आवाहन त्या कायम करतात.

काम करताना आजपावेतो त्यांना National Democratic Front of Bodoland (NDFB) कडून अनेक वेळा धमक्या मिळाल्या आहेत पण या सगळ्यांमुळे त्यांच्या धडाकेबाज कामावर काहीच फरक पाडत नाही.

दुर्जनाचा संहार करणाऱ्या या आजच्या युगातील कालीमातेला, दुर्गेला Team Bharatiyans चा प्रणाम.


Team Bharatiyans

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

---