Bhartiyans

Menu

मुलांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनीच चोरले विद्यार्थ्यांचे मोबईल्स.

Date : 12 Nov 2016

Total View : 543

दिल्ली विद्यापीठाच्या आवारात होणार्या मोबईल्स च्या चोर्या रोखण्यासाठी पोलिसांनी एक अभिनव युक्ती वापरली.


सारांश

दिल्ली विद्यापीठाच्या परिसरात होणारया मोबाईल फोन्स च्या चोर्या रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एक अभिनव युक्ती वापरली. केवळ तोंडी सूचना देण्यापेक्षा केलेल्या या कृतीमुळे मुलांचे डोळे उघडायला मदत झाली.मौरीस नगर पोलिस स्टेशन च्या काही पोलिस अधिकार्यांनी हे अभिनव अभियान राबवले.सविस्तर बातमी

तुम्ही रस्त्यात उभे आहात....एक जण येतो....इमर्जन्सी कॉल करायला तुमचा फोन मागतो....तुम्ही काय कराल? 
अर्थातच माणुसकी म्हणून, ‘समोरची व्यक्ती अडचणीत आहे’ असं जाणवल्यावर तुम्ही तिला तुमचा फोन वापरू देताच.....
पण अशी माणुसकी दाखवणं दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या अंगाशी आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली विद्यापीठाच्या उत्तर विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन्स चोरीला जात आहेत.

एका ठराविक पद्धतीने या चोरया केल्या जात आहेत. नीटनेटके कपडे घातलेली विशीतली तरुण स्त्री एका पांढऱ्या ब्रिओ गाडीतून विद्यापीठ परिसरात येते.

ती तुम्हाला सांगते की तिच्या फोनची बॅटरी डाऊन आहे आणि तिला एक महत्वाचा फोन करायचा आहे.

ती स्त्री अडचणीत आहे असं समजून मुले तिला स्वत:चा फोन वापरू देतात आणि आता तो फोन घेऊन ती चक्क धूम’स्टाईल पळ काढते.

तिच्याबरोबर एक पुरुषही असतो जो गाडी चालवत असतो. गुरुवारी सकाळी या चोरट्यांनी पुन्हा एकदा SRCC ला भेट दिली आणि असाच फोन चोरून पळ काढला.

या अश्या चोर्यांपासून विद्यार्थ्याना सावध करण्यासाठी गुरुवारी दिल्ली पोलिसांनी एक अभिनव कार्यक्रम राबवला.

दोन साध्या कपड्यातील पोलिसांनी चोरट्यांच्याच पद्धतीने मुलांकडून फोन पळवले आणि अशा प्रकारे मोबाईल चोरीला जाऊ शकतात हे प्रत्यक्ष कृती करून मुलांना समजावले.

या क्रिएटीव्ह अभियाना अंतर्गत हेडकॉन्स्टेबल वीरेंदर सिंग आणि लेडी सबइन्स्पेक्टर गुरदीप कौर हे दोघे साध्या कपड्यांमध्ये एक खासगी गाडी घेऊन आले आणि कॉलेज जवळच्याच मेट्रो स्टेशन जवळ गाडी उभी करून तिथून चाललेल्या दोन विद्यार्थ्यांना त्यांनी एक तातडीचा कॉल करण्यासाठी फोन मागितला.

एका विद्यार्थिनीने त्यांना लगेच स्वत:चा मोबाईल फोन दिला आणि त्यांना काही कळायच्या आत ते दोघे पोलिस फोन घेऊन गाडीतून पसार झाले.

मुलांनी मदतीसाठी आरडाओरडा करताच मौरिसनगर पोलिस स्टेशनच्या पोलिस गणवेशातल्या हेडकॉन्स्टेबल नरेशकुमार यांनी त्यांच्या मोटारसायकल वरून गाडीचा पाठलाग केला. गाडी थांबवताच गुरदीप आणि वीरेंदर गाडीतून बाहेर उतरले.

दिव्या कुमारी,जिचा फोन त्यांनी घेतला होता ती त्यांच्यावर ओरडायला लागली,” तुम्ही माझा फोन घेऊन पळून जात होता “
यानंतर पोलिसांनी मुलांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली.

गुरदीप म्हणाल्या,”मी मौरीस नगर पोलिस स्टेशनची सबइन्स्पेक्टर आहे आणि अशा प्रकारच्या चोर्यांपासून विद्यार्थ्यांना सावध करण्यासाठी आम्ही हा सगळा खटाटोप केला आहे.

दुसर्याला मदत करताना देखील आपण हा विचार केला पाहिजे की ती मदत सत्कारणी होतेय की नाही. कोणीतरी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या फोनची बॅटरी डाऊन आहे आणि तुम्ही विश्वास ठेवता. ती व्यक्ती कार मध्ये आहे. तिच्याकडे कार चार्जर असायला हवा. तुम्ही लगेच तुमचा फोन दिला. आणि अशा प्रकारे चोर्या होत आहेत. सावधगिरी बाळगणे हे तुमचे कर्तव्य आहे.”

मौरीस नगर पोलिस स्टेशनच्या आरती शर्मा आणि सबइन्स्पेक्टर रामचंद्र हे देखील मुलांशी बोलले. रिक्षातून जात असताना बरेचदा मुलांच्या हातात त्यांचे फोन असतात आणि कानात इअर फोन्स.
अशा वेळी कोणीही सहजपणे फोन हिसकावून घेऊ शकतो.

रिक्षातून जाताना काय अथवा चालत असताना काय सगळ्यांनी आपापल्या वस्तू बॅगमध्ये ठेवल्या पाहिजेत आणि बॅग सुरक्षित अशी घट्ट पकडलीच पाहिजे.
म्हणजे ती सहजपणे कोणी खेचून घेऊ शकत नाही.

हल्लीचे फोन्स चोरणारे चोरटे तरुण आणि अस्खलित इंग्रजी बोलणारे आहेत त्यामुळे मुले सहजपणे त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांतून एखाद्या स्त्रीने जर फोन मागितला तर असे वाटते की खरच काही इमर्जन्सी असेल.

या अशा काही समाजकंटकांमुळे लोकांचा चांगुलपणावरचा विश्वास उडत चाललाय. यामुळे एखाद्याला खरच मदतीची गरज असताना देखील कोणी मदत करायला धजावणार नाही.

मौरीसनगर पोलिसांच्या या अभिनव अभियानामुळे विद्यार्थ्यांचे डोळे उघडायला मदत झाली आहे आणि आसपासच्या सर्वच लीकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे आणि पोलिसांना धन्यवाद सुद्धा दिले आहेत.


Team Bharatiyans 

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .