Bhartiyans

Menu

पर्यावरण रक्षणासाठी प्रत्यक्ष पित्याला २५००/- दंड होईल एव्हढ धारिष्ट्य दाखवू शकाल ?

Date : 12 Nov 2016

Total View : 222

स्वतःच्या वडलांनी पर्यावरणाला हानी पोहोचेल असं काम केलं आणि समजावून सांगून सुद्धा त्यांनी वागणं नाही बदलले म्हणून मुलीने त्यांची तक्रार शासकीय अधिकाऱ्यांकडे केली. पर्यावरण रक्षणाच्या कायद्याचे उल्लंघन


सारांश

कापणीनंतर राहिलेल्या पिकाचे खुंट जाळून टाकले जातात या पद्धतीने जमिनीची धूप होते, पोषक द्रव्ये नष्ट होतात अन त्याही पेक्षा पर्यावरणाचा नाश होतो. शेतात तण जाळल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला सुद्धा हानी पोचते ती वेगळीच. श्वासाचे, दम्याचे विकार होण्याचा धोका वाढतो. हरियाणातील एका मुलीने आपल्या वडिलांनासविस्तर बातमी

तुमच्या स्वतःच्या वडलांनी पर्यावरणाला हानी पोहोचेल असं एखाद काम जाणून-बुजून केलं तर तुम्ही काय कराल? समजावून सांगून सुद्धा त्यांनी तुमचं म्हणण नाही ऐकल, आता ? आता शेवटी तुम्ही त्यांची शासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार कराल ? जैवसंरक्षणासाठी, पर्यावरण रक्षणासाठी प्रत्यक्ष पित्याला २५००/- दंड होईल एव्हढ धारिष्ट्य दाखवू शकाल ?
#Bharatiyans

पृथीवरील पर्यावरणाचा सर्वात महत्वाचा घटक मानव. आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याने जग पादाक्रांत केलं खरं पण प्रगतीच्या नावाखाली विकास साधताना पर्यावरणाकडे मात्र त्याचं अक्षम्य दुर्लक्ष्य झालं.

प्रदूषणामुळे झालेली हानी अपरिमित आहे आणि ती थांबवली पाहिजे नाहीतर जगाचा नाश होईल हे शास्त्रज्ञांना आता कळून चुकलंय. पर्यावरणाचं संवर्धन व्हावं यासाठी सर्व स्तरावर अनेक पावले गेल्या काही वर्षात उचलली गेली. त्यातलंच महत्वाचे पाऊल होतं ते शालेय शिक्षणातच पर्यावरण या विषयाचा समावेश करणे.

लहान वयात जर याची जाणीव झाली तर मोठ्या वयात निसर्गाचे संवर्धन करणारे सुजाण नागरिक तयार होतील, त्यांच्या सहकार्याने पृथ्वीचा होणारा ऱ्हास थांबायला मदत होईल हा हेतू यामागे होता.

तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा ही माहिती व्याख्यानांद्वारे, प्रदर्शनाद्वारे आता पोचवली जात आहे आणि त्याचे चांगले पडसाद सुद्धा उमटत आहेत. अनेक स्तरातून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रसंगी घराच्या लोकांचा विरोध पत्करून सुद्धा तरुण, शिक्षित पिढी या कार्यात आपला हातभार लावते आहे.

याचंच एक कौतुकास्पद पण धाडसी असे जिवंत उदाहरण आहे ते म्हणजे हरयाणातील सोनाली शेवकंद हीचे.

हरयाणात तांदूळ पिकवल्यानंतर, कापणीनंतर राहिलेल्या धान्याचे खुंट जाळून टाकले जातात. ही पद्धत सोयीस्कर, स्वस्त तसच जमिनीत वाढणारे तण आणि कीटकांचा नाश करणारी म्हणून शेतकऱ्यांच्यात लोकप्रिय.

पण या पद्धतीने जमिनीची धूप होते, पोषक द्रव्ये नष्ट होतात अन त्याही पेक्षा पर्यावरणाचा नाश होतो. शेतात तण जाळल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला सुद्धा हानी पोचते ती वेगळीच. श्वासाचे, दम्याचे विकार होण्याचा धोका वाढतो.

या सगळ्यामुळेच हरयाणा राज्य पर्यावरण नियंत्रक मंडळाने यावर बंदी आणली आहे. तरीही याकडे दुर्लक्ष करून शेतकरी मोठ्या प्रमाणावर खुंट जाळून टाकणे हीच पद्धत अनुसरतात.

सोनालीचे वडील सुद्धा या शेतकऱयांपैकीच एक शेतकरी. 
सोनाली ही नरवाना मधील कन्या विद्यालयात दहावीत शिकते. या पद्धतीमुळे पर्यावरणाची कशी हानी होते ते वर्तमानपत्रात येणाऱ्या लेखामुळे तिला माहित होतं.

आपल्या वडिलांनी ही पद्धत अनुसरू नये म्हणून तिने वडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण मुलीच्या बोलण्याकडे तिच्या वडिलांनी, समशेर शेवकंद यांनी काही लक्ष दिलं नाही.

तेव्हा मात्र न घाबरता तिने अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना सर्व सत्य परिस्थिती सांगितली. त्यांनी पडताळा करून सोनालीचे वडील श्री. समशेर यांना २५०० रुपयाचा दंड केला.

\\"माझ्या वडिलांना माझा खूप राग आला. मी तुमच्यासाठी केवढे काही करतो आणि तू हे असं केलंस”, असं जेव्हा त्यांनी मला विचारले तेव्हा मला सुद्धा एक क्षण वाईट वाटलं.

मी काही चुक तर केली नाहीना असंही मनात आलं.

पण सगळ्या लोकांनी माझं कौतुक केलं. मी बरोबरच वागले याची आधीही खात्री होती मला आणि आताही खात्री आहेच मला. 
वडिलांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे पण आधी त्यांना मी सर्वपरीने समजावून सांगून सुद्धा त्यांनी माझं म्हणण समजून घेण दूर ऐकूनही घेतलं नाही, त्यांना कधीनाकधी आपली चूक समजेल हा सुद्धा मला विश्वास आहे.\\" सोनाली म्हणते.

वडिलांचा राग मात्र थोड्याच दिवसात निवळला. शेवटी आपल्या कृत्याचे काय आणि किती वाईट परिणाम होऊ शकतील हे त्यांना जाणवले. 
त्यांना स्वतःला दमा आहे. ते स्वतः या दम्याने आजारी होते तेव्हा मंडईत माल विकण्यासाठी त्यांच्या ७४ वर्षाच्या वडिलांना जावे लागले.

\\"माझ्याच मुलीने माझी तक्रार केली हे समजल्यावर सुरुवातीला राग आला मला पण आता मला माझी चूक समजली आहे. माझ्यासारख्या अनेकांना श्वासाचा, अस्थम्याचा त्रास आहे. पर्यावरण संवर्धनासाठी या अशा प्रथा बंद झाल्या पाहिजेत हे मला पटले आहे\\" असे सोनालीचे बाबा म्हणतात.

हरयाणातील जींद तालुक्यात राहणाऱ्या अवघ्या सोळा वर्षाच्या सोनालीच्या या धैर्याची हरयाणा राज्य पर्यावरण नियंत्रक मंडळाने सुद्धा दखल घेतली आणि तिच्या या कामगिरीसाठी तिला ११००० रुपयांचे बक्षीस सुद्धा जाहीर केलं.

शेवटी पर्यावरण संवर्धन करणाऱ्यांची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. 
हे बक्षीस इतर मुलांना, शेतकऱ्यांना आणि तरुणांना सुद्धा प्रेरित करेल हे नक्कीच .

हरयाणातल्या सोनाली शेवकंद या १६ वर्षीय तरुणीचे या धाडसाबद्दल ‘टीम भारतीयन्स’तर्फे मन:पूर्वक अभिनंदन , पर्यावरण रक्षणाबद्दल इतकी जागरुकता बाळगल्याबद्दल आणि कायद्यासमोर कुणी मोठा नाही आणि कुणी छोटा नाही हे जगाला दाखवून देण्याचे धाडस केल्याबद्दल....

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

प्रिया प्रभुदेसाई

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

हिंदुस्थान टाईम्स