Bhartiyans

Menu

उच्चशिक्षित असूनही, गलेलट्ठ पगाराच्या नोकरीमागे न लागता, वंचित मुलांना स्वत:चा ‘परिवार’ देणारे विनायक लोहानी

Date : 26 Nov 2016

Total View : 121

IIT, IIM मधून उच्चशिक्षण घेतल्यावरही, गलेलट्ठ पगाराच्या नोकरीमागे न लागता, विवेकानंदांचा आदर्श घेऊन समाजोपयोगी काम करण्याच्या प्रेरणेतून विनायक लोहोनी यांनी साकारली समाजाने नाकारलेल्या मुलांसाठीची सगळ


सारांश

रामकृष्ण मिशनची दीक्षा घेतलेल्या विनायक लोहानी यांनी त्याग, सेवा, भक्ती हे गुण स्वामी विवेकानंदांकडून घेतले आणि काम सुरू केलं. या प्रेरणेतूनच समाजाने नाकारलेल्या मुलांसाठीची सगळ्यात मोठी निवासी शाळा ‘परिवार’ हीची मुहूर्तमेढ रोवली गेली. २००३ साली ३ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या संस्थेत आज ५५ विद्यसविस्तर बातमी

IIT, IIM मधून उच्चशिक्षण घेतल्यावर, गलेलट्ठ पगाराच्या नोकरीमागे न लागता, विवेकानंदांच्या प्रेरणेतून महत्वाचं समाजोपयोगी काम करावं म्हणून, समाजाने नाकारलेल्या मुलांसाठी सगळ्यात मोठी निवासी शाळा पूर्व-भारतात सुरु करण्याचा वेडेपणा आजच्या जगात सुद्धा कुणी करू शकतो यावर तुम्ही विश्वास ठेवाल का ?
आज भेटूया अश्याच एका अवलिया भारतीयाला , विनायक लोहानी यांना....
#Bharatiyans

शिक्षणामुळे जगाकडे पहायचा दृष्टीकोन बदलतो असं म्हणतात. उच्चशिक्षण हे केवळ आपल्या प्रगतीची शिडी म्हणून वापरणारे लाखो आहेत...

तसेच, त्या उंचीवरून जग थोडं वेगळ दिसल्यामुळे आपल्या बदललेल्या दृष्टीने जग पाहून सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करणारेसुद्धा आहेत! अशाच एका वेगळ्या व्यक्तीची..२०१४ मध्ये ‘युथस्टोरी’ मध्ये ‘सामाजिक उद्योजक’ म्हणून समावेश करण्यात आलेल्या ‘विनायक लोहानी’ यांची ही अशी आहे ओळख..

आय.आय.टी., आय. आय. एम. मधून उच्चशिक्षण घेतल्यावर गलेलट्ठ पगाराची नोकरीच्या मागे न लागता, काहीतरी समाजोपयोगी काम करावं ही अंतर्मनाची साद श्री. विनायक लोहानीना स्वस्थ बसू देइना. केवळ आपली प्रगती हे त्यांचे ध्येय कधीच नव्हते.

या वेगळ्या वाटेवर चालण्याच्या विचारातूनच पूर्व भारतातील गरीब आणि गरजू मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी निवासी शाळेची सुरुवात झाली.

विनायक लोहानी यांचा जन्म १९७८ सालचा. मध्य प्रदेशातील भोपाळ मधील. पुढे आय. आय. टी. खरगपूर मध्ये त्यांनी मायनिंग इंजिनिअरिंग मध्ये बी. टेक. डिग्री घेतली. पुढे आय. आय. एम. कोलकाता मधून एम. बी. ए. केलं. एम. बी. ए. च्या शेवटी जेंव्हा कॅम्पस प्लेस्मेंट होतात, तेंव्हा त्या प्रक्रीयेमध्ये सहभागी न होणारे (याला वेडेपणाच म्हंटलं असेल बाकीच्यांनी) विनायक हे आय. आय. एम. कोलकाता च्या इतिहासामधील एकमेव विद्यार्थी होते!

द टेलेग्राफ ला दिलेल्या मुलाखतीत विनायकजी म्हणाले, “मला काहीतरी वेगळ पण सामाजिक काम करायचं होतं. कॉर्पोरेट करीअर मध्ये विशेष रस नव्हता.” त्यानंतर विनायकजींनी सामाजिक उपक्रमांबद्दल लिहायला सुरुवात केली, आणि हळूहळू सामाजिक स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करण्यासही सुरुवात केली.
स्वामी विवेकानंद हे त्यांचे प्रेरणास्थान!

त्याबद्दल विनायकजी म्हणतात, “मला समाजामध्ये बदल घडवून आणणाऱ्या लोकांकडून नेहेमीच प्रेरणा मिळते. त्यागवृत्ती, सेवाभाव, भक्तीभाव, हे सारं स्वामी विवेकानंदांमध्ये होतं. मी रामकृष्ण मिशन मधून दीक्षा घेतली. त्यांच्या अनुयायांबरोबर राहिलो. मदर तेरेसा यांच्या कामाचाही माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला होता. मला माझ्या मूळ गावी परत येण्यामध्ये काही रस वाटेना. कोलकाताच्याच विचारात माझं मन गुंतलं होतं.” याप्रेरणेतूनच ‘परिवार’ ही संस्था उभी राहिली.

‘परिवार’ या आश्रमाची मुहूर्तमेढ २००३ मध्ये रोवली गेली.

विनायकजीनी प्रस्ताव तयार केले, अनेक लोकांची भेट घेतली, पण कोणी मदतीसाठी हात पुढे केला नाही. कारण, त्यांच्या एकट्याच्या या सदिछेसाठी मदत करण्यास कोणी तयार नव्हते.

जेंव्हा कुठूनही आर्थिक मदत मिळेना, तेंव्हा त्यांनी त्यांच्या एम. बी. ए. च्या लेक्चर्स व ट्युशन मधून येणाऱ्या तुटपुंज्या पगारातून ठाकूरपूर येथे जागा भाड्याने घेतली. तीन मुलांपासून त्यांच्या उपक्रमाची सुरुवात झाली.

विनायकजी म्हणतात, “अक्षरशः हाता – तोंडाची गाठ असे. दुसरे दिवशीच्या जेवणाची कशी सोय होईल याची शाश्वती नसे. मला जे काही उत्पन्न मिळत होतं, ते सर्व मी खर्च करत होतो. माझी आई, ही माझी पहिली देणगीदार होती.” 
पुढील सहा महिन्यात मुलांची संख्या ३ वरून ५५ झाली.

एका आय. आय. एम. च्या पदवीधराने विनायकजींच्या इ- मेल मधून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यामुळे छोट्याश्या खोलीत सुरु झालेल्या शाळेचा प्रवास ठाकूरपूर मधेच दोन एकराच्या जागेमधील प्रशस्त इमारती पर्यंत पोहोचला.

आज ‘परिवार’ संस्था २० एकर जागेवर पसरली, बहरली आहे; इतकेच नव्हे तर पूर्व भारतातील सर्वात मोठी मोफत निवासी शिक्षण संस्था आहे. फार कमी लोकांना कदाचित याची माहिती असेल.

‘परिवार’ मध्ये शेकडो मुले- मुली राहतात. विनायकजींच्या प्रोत्साहनामुळे, प्रयत्नांमुळे त्यांना शिक्षणाची दारं खुली झाली व आयुष्यात चांगला बदल घडून आला. आज त्यापैकी काहीं विद्यार्थ्यानी डिग्री पर्यंत मजल गाठली आहे.

“आमच्यासोबत उत्साही स्वयंसेवकांची फौज आहे. त्यातील बरेच जण आमचे देणगीदार आहेत, ज्यांनी केवळ देणगी नं देता आमच्या कामाची प्रसिद्धी देखील केली”.

आज ‘परिवार’ संस्थेचे दोन कॅम्पस आहेत. इथे ४- १० वयोगटातील मुला मुलीना प्रवेश दिला जातो. ‘परिवार आश्रम’ मध्ये मुले, व ‘परिवार शारदा तीर्थ’ मध्ये मुली अशी विभागणी केलेली आहे.

प्रत्येक विभागामध्ये डोर्मीटरीज आहेत. शिवाय, लायब्ररी, कॉम्पुटर रूम्स, जेवणाचे हॉल, विविध खेळाच्या सुविधा देखील आहेत. ‘परिवार’ संस्थेची १० वी पर्यंतची ‘अमर भारत विद्यापीठ’ ही स्वतःची शाळा सुद्धा आहे, जी ‘परिवार आश्रम’ कॅम्पस मध्ये आहे.

“शिक्षण संपले की पालक मुलांना घर सोडायला सांगतात का? नाही ना? मग, त्याप्रमाणेच आम्हीही शिक्षण झाल्यावर मुलांना इथून जायला सांगत नाही. मोठी मुले लहान मुलांना अभ्यासात मदत करतात, शिकवतात; त्यातून मिळणाऱ्या मोबाद्ल्यामध्ये (पॉकेटमनी) पुढील शिक्षणासाठी योग्य तयारी झाली, की मग ते येथून बाहेर पडतात.”

खरंच, आई –वडिलांच्या मायेने, केवळ निवासी शाळा नं राहता शेकडो मुलांना खराच परिवार इथे मिळाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

श्री विनायक लोहानी यांना त्यांच्या या कार्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात राष्ट्रपतींच्या हस्ते ‘चाईल्ड वेल्फेअर अवार्ड’, संस्कृती पुरस्कार, CNN- IBN तर्फे दिला जाणारा ‘यंग इंडिअन लीडर’ पुरस्कार, कर्मवीर पुरस्कार अशा व अनेक इतर मानसन्मानांचा समावेश आहे.

तसेच, आजमितीला विनायकजी लहान मुले व शिक्षण यांच्याशी निगडीत विविध सरकारी समित्यांचे मार्गदर्शक म्हणून देखील कार्यरत आहेत.

‘वेगळी वाट निवडतानाही समाजोपयोगी काम करा’ असा संदेशच श्री विनायक लोहानी यांनी स्वतःच्या कामामधून आजच्या पिढीला दिला आहे असं म्हणणे संयुक्तिक ठरेल.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मृणाल काशीकर- खडक्कर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य