Bhartiyans

Menu

शुद्ध भाज्या हव्या आहेत? मग, ‘गुरुग्राम’ ला भेट द्या, व्हा ‘शहरी शेतकरी’!

Date : 27 Nov 2016

Total View : 222

शुद्ध भाजीपाला हवा आहे? भाजी स्वत: पिकवून पाहायची असेल आणि स्वत:ला शेती करायची असेल तर गुरुग्रामचा फलोत्पादन विभाग ही संधी तुम्हाला देतो आहे. तुम्ही होऊ शकता ‘शहरी शेतकरी’.


सारांश

अमेरिका, इंग्लंडमधील ‘कम्युनिटी गार्डन’ ही संकल्पना भारतामध्ये ही संकल्पना लोकप्रिय करण्याचा प्रयत्न गुरुग्राम फलोत्पादन विभाग करतो आहे. ज्यांना शेती करण्याची इच्छा आहे ; पण जमीन उपलब्ध नाही. अशा नागरिकांना गुरुग्रामचा फलोत्पादन विभाग भाडे तत्वावर जमिनीचे वाफे उपलब्ध करून देतो. बी- बियाणे, अवजारे इ.सविस्तर बातमी

*शुद्ध भाज्या हव्या आहेत? मग, ‘गुरुग्राम’ ला भेट द्या, व्हा ‘शहरी शेतकरी’!*

‘फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसंदीस अभ्यंतरी गर्व साचे.
क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूची शोधोनि पाहे.’

– असं समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकात म्हटलं आहे. ते खरं आहे. कारण क्रिया करण्यापेक्षा आपण वाचाळ बडबडच खूप करतो.

आज कोणत्याही बाबतीत शुद्धता राहिली नाही असं आपण म्हणतो. दूध, फळे, भाजीपाला किंवा इतर खाद्यपदार्थ घेताना हे विशेष जाणवतं.

पण, आपण स्वतः त्यासाठी काहीच कृती करत नाही. काही लोक घराच्या अंगणात आपली बागकामाची हौस भागवून घेतात. काही ‘किचन गार्डन’सारखे प्रयोग देखील करून पाहतात. पण, भाजीपाला कुठे आणि कसा पिकवतात हे अनेकांना माहीत नाही. इच्छा आणि तयारी असेल तर गुरुग्रामचा फलोत्पादन विभाग ही संधी तुम्हाला देतो आहे.

गुरुग्रामच्या फलोत्पादन विभागाने आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्लीच तुमच्या हातात ठेवली आहे. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये अनेक ठिकाणी ‘कम्युनिटी गार्डन’ म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन शेती करणे अथवा भाजीपाला पिकवणे ही संकल्पना लोकप्रिय आहे. आता भारतामध्ये ही संकल्पना लोकप्रिय करण्याचा प्रयत्न गुरुग्राम फलोत्पादन विभाग करतो आहे.

ज्यांना शेती करण्याची किंवा आपल्या गरजेपुरता भाजीपाला पिकवण्याची इच्छा आहे ; पण जमीन उपलब्ध नाही. अशा नागरिकांना गुरुग्रामचा फलोत्पादन विभाग भाडे तत्वावर जमिनीचे वाफे उपलब्ध करून देतो.

विभागाने भोंडशी येथे २७ एकर जमीन या प्रकल्पासाठी भाड्याने घेतली आहे. फलोत्पादन विभागाकडे अर्ज केल्यावर एक वर्षाकरता भाडेतत्त्वावर छोटे छोटे वाफे उपलब्ध करून दिले जातात. बी- बियाणे, बागकामाची अवजारे इ. साहित्य देखील विभागाकडून भाड्याने दिले जाते. टमाटे, वांगी, शेंगभाज्या, पडवळ, दोडक्यासारख्या वेली वरच्या भाज्या, कोबी, फ्लॉवर, मिरच्या इ. भाज्या तुम्ही येथे पिकवू शकतात.

यामुळे केवळ शुद्ध आणि सकस असा भाजीपाला मिळतो. एवढंच नाही, तर यामुळे आठवड्याच्या सुट्टीचे दिवस सत्कारणी लागतात. मुलांना देखील निसर्गाशी नाते जोडण्याची संधी मिळते. येथून जवळच गोशाळा आहे. तिथे गाय, बकरी यांचे दूध काढण्याचा अनुभव देखील घेता येईल आणि आपली जनावरे बाळगण्याची सोय देखील आहे. मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे मार्गदर्शनासाठी जास्त कर्मचारी नाहीत.

पण, आजच्या ‘टेक’ युगाशी जुळवून घेतल्यामुळे, अशा इच्छुक ‘शहरी शेतकऱ्यांसाठी’ व्हॉटअप ग्रुपद्वारे मार्गदर्शनाची सोय आहे. या सोयीमुळे, मातीचा कस, कोणत्या मोसमात कोणत्या भाज्यांची लागवड करायची, पाणी पुरवठा, खते / कीटक नाशके, इ. बाबतच्या शंकांचे निरसन व मार्गदर्शन केले जाते.

मुंबई, पुणे, नाशिकच्या काही नागरिकांनी येथे भाजीपाला आणि फळे पिकवण्याचे प्रयोग यशस्वी केले आहेत. शासनातर्फे उचलले गेलेले पाऊल म्हणून गुरुग्राम फलोत्पादन विभागाचे कौतुक करावे तितके थोडेच.

तुम्हालाही स्वत:साठीची भाजी स्वत: पिकवून पाहायची असेल, शेतकऱ्याच जीवन जगून पाहायचे असेल तर आजच गुरुग्रामच्या फलोत्पादन विभागाशी संपर्क साधा.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मृणाल काशीकर- खडक्कर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

Times of India