Bhartiyans

Menu

वर्तमानपत्र विक्रेती ते आय. आय. टी. पदवीधर

Date : 29 Nov 2016

Total View : 424

ही कोणतीही काल्पनिक कथा किंवा आख्यायिका नाही. ही आहे सत्यकथा ध्येय वेड्या शिवांगीची. कानपूरच्या शिवांगीने परिश्रमाचा आणि यशाचा ध्यास घेतला आणि वृत्तपत्र विक्रेती शिवांगी झाली आय. आय. टी. पदवीधर.


सारांश

यशाची चव सहज चाखता येत नाही. त्यासाठी सर्वस्व विसरून मेहनत करावी लागते. ही सत्यकथा आहे. ध्येयवेड्या शिवांगीची. शिवांगी ही कानपूरपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या डेहा गावातील एका सामान्य कुटुंबातील मुलगी. तिचे वडील वृत्तपत्र आणि मासिक विक्रेते. पण परिश्रमाचा आणि यशाचा ध्यास शिवांगीने घेतला आणि वृत्सविस्तर बातमी

असे जगावे छाताडावर, आव्हानाचे लावून अत्तर.
नजरेमध्ये नजर रोखूनी आयुष्याला द्यावे उत्तर..!

असे ज्येष्ठ कवी विं.दा. करंदीकर यांनी म्हटले आहे. खरंच, यशाची चव सहज चाखता येत नाही. त्यासाठी रात्रंदिवस एक करावा लागतो. सर्वस्व विसरून मेहनत करावी लागते. कष्टाला पर्याय नाही, ही खूणगाठ मनाशी पक्की करावी लागते. परिश्रमाचा आणि यशाचा ध्यास घ्यावा लागतो. असाच ध्यास घेतला कानपूरच्या शिवांगीने आणि वृत्तपत्र विक्रेती शिवांगी झाली आय. आय. टी. पदवीधर..!

ही कोणतीही काल्पनिक कथा किंवा आख्यायिका नाही. ही आहे सत्यकथा ध्येय वेड्या शिवांगीची. शिवांगी ही कानपूरपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या डेहा या गावातील एका सामान्य कुटुंबातील मुलगी. तिचे वडील वृत्तपत्र आणि मासिक विक्रेते. घरची परिस्थिती बेताची त्यामुळे शाळा आणि अभ्यासातून वेळ मिळाला की वडिलांना मदत करणे हे शिवांगीचे काम. वडील कामासाठी बाहेर गावी गेले की दुकानाची जवाबदारी शिवांगीच सांभाळायची.

तिची शाळा देखील खूप सोयीसुविधा असणारी नव्हती. तर साधी सरकारी शाळा. त्याच शाळेत तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. आता पुढे काय? हा प्रश्न निर्माण झाला. शिवांगीला आयआयटीमध्ये शिक्षण घ्यायची इच्छा होती. तिथे प्रवेश मिळवण्यासाठी कोचिंग क्लास लावणं गरजेचं होतं. पण क्लासची फी भरायला पैसे कुठून आणणार?

या विवंचनेत असताना एक दिवस तिला ‘सुपर ३०’ या कार्यक्रमाची माहिती मिळाली. आनंद कुमार नावाचे गणितज्ज्ञ बिहारमध्ये या कार्यक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पण इंजिनियर होण्याची इच्छा असलेल्या मुलांना आयआयटीच्या पात्रता परीक्षेसाठी मार्गदर्शन करतात. त्यांना सर्व मदत करतात. हे शिवांगीला कळलं. तिने तातडीने आनंद कुमार यांना भेटून सर्व माहिती घेतली. आनंद यांनी तिला मार्गदर्शन केले. शिवांगीची मेहनत फळास आली आणि अखेर तिला आयआयटी रुरकी येथे प्रेवश मिळाला.

या परीक्षेची तयारी करताना शिवांगी जणू आनंद यांच्या कुटुंबाची सभासदच झाली होती. त्यांच्या आईची तब्येत ठीक नसेल तर तिची देखभाल करायची. घर, दुकान आणि अभ्यास असं सगळं सांभाळायची. शिवांगीला जेव्हा रुरकी येथे प्रवेश मिळाला, तेव्हा सगळ्यांचेच डोळे आनंदाश्रूनी भरून आले होते. पण नुसताच प्रवेश मिळून काम भागणार नव्हते. तर मेहनत करणं आणि लवकर नोकरी मिळवणं तिच्यासाठी महत्त्वाचं होतं. शिवांगीने जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले.

आज इंजिनीअर शिवांगीला उत्तम नोकरी आहे. ज्यावेळी ही बातमी आनंद कुमार यांच्या आईला कळली त्यावेळी त्या म्हणाल्या, मी जेव्हा संघर्ष करून पुढे आलेल्या मुलींबद्दल वाचते, त्यावेळी खरच त्यांच्या जिद्दीला सलाम ठोकावासा वाटतो.

मुलगाच हवा असा ज्यांचा आग्रह असतो ना, त्यांच्या डोळ्यात अशा मुली जळजळीत अंजन घालतात.

शिवांगीने तिचे स्वप्न सत्यात उतरवले आणि आपल्या आई-बाबांना त्यांनी न पाहिलेले स्वप्न दाखवले. म्हणूनच शिवांगीचे वडील तिच्याविषयी इतकच म्हणतात की, 'स्वप्न सगळेच बघतात. काहींची स्वप्ने पूर्ण होतात, काहींची होत नाही. पण मी कधी इतके मोठे स्वप्न बघितलेच नव्हते. शिवांगीने ते आम्हाला सत्यात साकार करून दाखवले.'

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

प्रचिती तलाठी-गांधी

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

The indian express