Bhartiyans

Menu

नोटाबंदी : माणुसकीचे दर्शन घडवणारा ‘हृदयस्पर्शी’ अनुभव

Date : 29 Nov 2016

Total View : 414

समजा तुमच्या घरात परवा लग्न आहे. अचानक बातमी येते, ‘उद्यापासून ५००-१००० च्या नोटा बंद, २ दिवसांनंतर केवळ २५०० रुपये मिळणार.’ काय कराल? चिंता करू नका, माणूसकी अजून जिवंत आहे.


सारांश

कोल्हापूर जिल्ह्याच्या बागल गावातील एका मुलीचं लग्न काही दिवसांवर आलेलं. अचानक नोटाबंदीची बातमी कानावर आली. वधूच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण नातलग, मित्र-मंडळी अगदी गावकरी अशा प्रत्येकाने बँक सुरू होताच रांगेत उभे राहून नोटा बदलून घेतल्या. लग्नासाठी शक्य तेवढी मदत प्रत्येकाने केली. शहसविस्तर बातमी

‘गौराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग..’, ‘नवरी आली...’ अशी गाणी एकीकडे सुरू होती.

घरात आनंद आणि उत्सह होता. दाराशी मांडव घातलेला, पाहुण्यांची गडबड असं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यातील बागल येथील एका कुटुंबात होतं.

या कुटुंबातील मुलगी सायली हिचं लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलं होतं. 
३ महिन्यांपूर्वीच कराडच्या मुलाशी सायलीचं लग्न ठरलं होतं.

लग्न तोंडावर आलेलं आणि एके दिवशी संध्याकाळी साधारण ८-८.३० च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू झालं.

टी.व्ही. सुरू असला तरी अगदी बघत बसायला कोणाला वेळ होता?

उडत-उडत नोटाबंदीची बातमी कानावर आली. 
उद्यापासून ५००-१००० च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या असून २ दिवसांनंतर बँकेतून केवळ २५०० रुपये काढता येणार आहेत.....

ही बातमी ऐकून सायलीच्या आईचा बांधच फुटला, वडील संभाजी यांना देखील काय करावे हे सुचेनासे झाले...

कारण जवळ जास्त रोकड नको म्हणून सुरक्षिततेसाठी जास्तीचे सगळे पैसे बँकेत जमा केलेले. 
जवळ थोडीच रक्कम ठेवलेली.

आता करायचं तरी काय? 
वधू सायली देखील कावरी-बावरी झाली.

मात्र, नातलग, मित्र-मंडळी अगदी गावकरीसुद्धा मदतीला धावून आले.

दोन दिवसांनी बँक सुरू होताच प्रत्येकाने जेव्हढा वेळ रांगेत उभं राहायला लागेल तितका वेळ उभं राहून नोटा बदलून घेतल्या. 
लग्नासाठी जेवढी आणि जशी मदत करण शक्य होतं ती-ती सर्व मदत प्रत्येकाने केली.

शहरामध्ये आपण एकटे राहणे, विभक्त कुटुंबपद्धतीचे कौतुक करतो. 
पण सायलीला मात्र गावातील लोकांनीच आधार दिला.

शेवटी, सायलीचा विवाह ठरलेल्या दिवशी निर्विघ्नपणे पार पडला.

मुलीचा लग्नसोहळा थाटामाटात करता आला नाही ही खंत सायलीच्या वडिलांना थोडी लागून राहिली. 
पण, लग्नात अडथळा आला नाही याचे त्यांना समाधान आहे.

सायलीच्या शब्दात सांगायचं, तर एकाच दिवसात आमचे सर्व नातेवाईक, मित्र-मंडळी, गावकरी यांच्याशी असलेली आमची नात्याची वीण पुन्हा एकदा घट्ट झाली.

खऱ्या अर्थाने मनोमिलन झालं. माणुसकीचे ‘हृदयस्पर्शी’ दर्शन झालं.

नोटाबंदीमुळे झालेल्या अडचणींचा पाढा वाचणाऱ्यानी एकदा ही ‘सत्यकथा’ वाचावी.

यातून माणुसकी कशाला म्हणतात आणि देशभक्ती कशाला म्हणतात हे प्रत्येकाला कळेल.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

Times of india