Bhartiyans

Menu

प्लास्टिकमधून डांबर निर्मिती करून २० हजार कि.मी. लांबीचे रस्ते बांधणारा ‘प्लास्टिक मॅन’!

Date : 02 Dec 2016

Total View : 131

भारतात रस्ते आणि प्लास्टिक हे दोन्ही विषय कायम टिकेचे धनी राहिले आहेत. यावर उपाय म्हणून एका मदुराईच्या एका ७० वर्षीय शिक्षकाने प्लास्टिकपासून डांबरनिर्मिती करून रस्ते बांधणीचा यशस्वी प्रयोग केला.


सारांश

तामिळनाडूच्या मदुराई येथील थीयागराजर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक ७० वर्षीय राजगोपाल वासुदेवन यांनी प्लास्टिकपासून डांबर तयार करून त्याचा उपयोग रस्ते बांधण्यासाठी केला. त्यांनी असे २० हजार कि.मी. लांबीचे रस्ते बांधले आहेत. महत्त्वाचे म्हणजे नेहमीच्या रस्त्यांपेक्षा हे रस्ते दुप्पट टिकाऊ आहसविस्तर बातमी

प्लास्टिकमधून डांबर निर्मिती करून २० हजार कि.मी. लांबीचे रस्ते बांधणारा भारताचा ‘प्लास्टिक मॅन’!

भारतात रस्ते आणि प्लास्टिक हे दोन्ही विषय कायम टिकेचे धनी राहिले आहेत. यावर उपाय म्हणून एका शिक्षकाने प्लास्टिकपासून डांबरनिर्मिती करून रस्ते बांधणीचा यशस्वी प्रयोग केला.

तामिळनाडूच्या मदुराई येथील थीयागराजर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इ.सी.ए. विभागाचे डीन आणि रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेले ७० वर्षीय ‘तरुण’ राजगोपाल वासुदेवन यांनी हा प्रयोग केला.

राजगोपाल यांनी प्लास्टिकपासून डांबर तयार करून त्याचा उपयोग रस्ते बांधण्यासाठी केला. त्यांनी असे २० हजार कि.मी. लांबीचे रस्ते बांधले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे नेहमीच्या रस्त्यांपेक्षा हे रस्ते दुप्पट टिकाऊ आहेत.

या प्रयोगामुळे प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या विवंचनेत असलेल्या नगरपालिकेला त्यांनी आशेचा किरण दाखवला.

वासुदेवन यांनी २००१ मध्ये या प्रयोगाला सुरुवात केली. आता ते ‘प्लास्टिक मॅन’ म्हणून ओळखले जातात. याविषयी अनेक अभियंत्यांना ते प्रशिक्षण देतात.

या तंत्रज्ञानाचं पेटंट त्यांच्याकडे असलं तरी तंत्रज्ञान वापरण्याचा परवाना ते विनामूल्य देतात.

साधारण १२ दशलक्ष टन एवढा प्लास्टिकचा वापर होतो. त्यातला अर्धा भाग हा पिशव्या, कप्स, थर्माकोल, फोम यासाठी वापरला जातो. वापरुन झाले, की ही उत्पादने आपण फेकून देतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा साठतो. या कचऱ्याचे विघटन होत नसल्याने प्रदूषण होते.

मात्र, ही प्लास्टिक उत्पादने सहजपणे रस्ता, ब्लॉक, कौले बनवण्यासाठी वापरली जाऊ शकतात आणि त्याचा पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. केवळ पीव्हीसीचा उपयोग यात करता येत नाही. असे वासुदेवन यांनी सांगितले आहे.

हे तंत्रज्ञान कसे काम करते? 
प्लास्टिकचे १.६ ते २.५. एम.एम. असे बारीक तुकडे केले जातात. ग्रेनाईट दगड सुमारे १७० अंश सेल्सिअसपर्यंत तापवला जातो. प्लास्टिकचे तुकडे या गरम दगडावर टाकले की ते वितळून ३० सेकंदात त्याचा एक थर तयार होतो. मग १६० अंश सेल्सिअसला तापवलेले ‘बिटूमेन’ खनिज त्यात घालतात आणि हे मिश्रण रस्ते बांधण्यासाठी वापरतात.

हे तंत्रज्ञान ग्रामीण भागातील रस्त्यांपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत कोणत्याही रस्त्यांसाठी वापरले जाऊ शकते. एक टन प्लास्टिक कचऱ्याचा असा वापर केला, की पारंपारिक पद्धतीमुळे डांबर तयार करताना जो ३ टन कार्बन डायऑक्साईड वातावरणात पसरायचा ते आपण थांबवू शकतो.

३.७५ मीटर रुंदीचा आणि १ कि.मी. लांबीचा रस्ता तयार करण्यासाठी १ टन प्लास्टिक म्हणजे जवळपास १० लाख प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात आणि १ टन बिटूमेन वाचते.

एक टन बिटूमेनची किंमत ५० ते ६० हजार इतकी असते. त्यातुलनेत १ टन प्लास्टिकची किंमत फक्त ५ ते ६ हजार आहे.

हे तंत्रज्ञान आता महाराष्ट्र, गोवा, हिमाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांमध्ये देखील वापरले जाणार आहे. प्लास्टिक-डांबराचे रस्ते पारंपारिक रस्त्यांच्या तुलनेत जास्त टिकतात.

मदुराईमधील काही रस्त्यांना गेल्या ५ वर्षात दुरुस्तीची गरज भासलेली नाही.

आज आपल्या देशाला त्या साधनांचा उपयोग करून समस्या सोडवणाऱ्या राजगोपाल वासुदेवन यांसारख्या कल्पक आणि देशप्रेमी कर्तुत्ववान मनुष्यबळाची विलक्षण गरज आहे.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मृणाल क्षीरसागर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

Business Standard