Bhartiyans

Menu

हिंदूंचे सण साजरे करणारं जयपूरचं मुस्लिम कुटुंब. हिंदू-मुस्लिम नव्हे, हे तर ‘भारतीय’ !

Date : 03 Dec 2016

Total View : 179

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.... ही प्रतिज्ञा जयपुरच्या खिश्ती या मुस्लिम कुटुंबाने मात्र होळी, दिवाळीसारखे हिंदूचे सण साजरे करून प्रत्यक्ष कृतीत उतरवली आहे.


सारांश

जयपूरमधील चुरू येथील खिश्ती कुटुंबीय मीठी ईद, बकरी ईद या सणांबरोबरीने होळी, दिवाळीसारखे हिंदूचे सण उत्साहाने साजरे करतात. या कुटुंबातील थोरली सून दिप्ती ही हिंदू आहे. लग्नानंतर हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या प्रथांचं पालन ती करते. तिच्या सासूबाई रेहाना रियाझ यांचा तिला पाठिंबा आहे. तसेच धाकसविस्तर बातमी

एक परंपरागत मुस्लीम कुटुंब हिंदूंचे सण साजरं करतं ,
मनापासून आनंद देत-घेत साजरं करतं ,
हेच आहे भारतीयत्व,
थ्री चिअर्स फॉर ‘भारतीयन्स’...

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशातल्या समृद्धतेने आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.’ अशी प्रतिज्ञा आपण शाळेत म्हटलेली असते. पुस्तकाच्या पहिल्या पानावर वाचलेली असते. पण काही वर्षे रोज ज्या प्रतिज्ञेची उजळणी केली, ती आपण अंमलात आणतो का?

जात-धर्म-पंथ-वर्ण हे भेद विसरून बंधुभावाने राहतो का?
दुर्दैवाने, एकोपा, एकात्मता आज खूप कमी ठिकाणी दिसतो.

जयपुरच्या खिश्ती या मुस्लिम कुटुंबाने मात्र ही एकात्मता जोपासलीये..!

भारताची प्रतिज्ञा आपल्या कृतीत उतरवणारं खिश्ती कुटुंब जयपूरमधील चुरू येथील शिव कॉलनीत राहतं. खिश्ती  कुटुंबीय मीठी ईद, बकरी ईद या सणांबरोबरीने होळी, दिवाळीसारखे हिंदूचे सण देखील तितक्याच आनंदाने आणि  उत्साहाने साजरे करतात.

या कुटुंबातील थोरली सून दिप्ती ही हिंदू आहे. लग्नानंतर हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या प्रथांचं पालन ती करते. आधुनिक विचारांच्या असलेल्या तिच्या सासूबाई रेहाना रियाझ यांचा या गोष्टीला पूर्णत: पाठिंबा आहे. इतकंच नाही,  तर केवळ दीड महिन्यापूर्वी  लग्न होऊन घरात आलेली धाकटी सून अंजुमन हिने देखील तिच्या मोठ्या जावेचा आदर्श घेउन यावर्षी करवाचौथचं व्रत पतीसाठी केलं होतं.

नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावे यासाठी महिला करवा चौथचे व्रत करतात.
अंजुमनने दिप्तीच्या बरोबरीने सकाळपासून उपवास करून विधिवत हे व्रत निष्ठेने पूर्ण केले.
रात्री चंद्रदर्शन करून व्रताची सांगता केली. अंजुमनचे पती जीशान हे नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असतात. म्हणून, चंद्रदर्शन झाल्यावर अंजुमन व्हिडीओ कॉलद्वारे त्यांच्याशी बोलली आणि तिने व्रत पूर्ण केलं.

याबद्दल अंजुमन आणि दिप्तीला त्यांच्या सासू  रेहाना यांनी कधीही अडवले नाही. उलट त्या म्हणतात की, ‘माझ्या दोन्ही सुना या माझी मुले हसन आणि जीशानसाठी व्रत करतात. मी त्यांची आभारी आहे.’ त्यामुळे अशा आधुनिक विचारांचे सासर मिळाले हे माझे भाग्य, अशा शब्दात दिप्तीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

खिश्ती कुटुंबाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जेव्हा आपल्यापैकी प्रत्येकजण मी हिंदू... मी मुस्लिम..मी ख्रिश्चन.. असे न सांगता मी ‘भारतीय’ असल्याचे ठासून सांगेल तेव्हा प्रतिज्ञेचा खरा अर्थ आपल्याला उमगला, असे म्हणता येईल...!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

    

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

इंडिया टाईम्स