Bhartiyans

Menu

शोध पारंपरिक भारतीय कलांचा : भाग २ - टेराकोटा कला

Date : 10 Dec 2016

Total View : 877

आपल्याला काळी-चिकण आणि शाडू हे मातीचे तीनच प्रकार माहीत असतात. पण अशीच ‘टेराकोटा’ नावाची एक माती असते. तिच्यापासूनही भांडी, मूर्त्या, दागिने तयार करतात... कसे? कुठे? चला, जाणून घेऊया..!


सारांश

आपण सगळ्यांनीच लहानपणी मातीची फळे, पणत्या, दिवा, विविध प्राणी असे जे आकार सुचतील ते तयार करण्याची मजा नक्कीच अनुभवली असणार..! आपल्याला काळी-चिकण आणि शाडू हे मातीचे तीनच प्रकार माहीत असतात. पण अशीच ‘टेराकोटा’ नावाची एक माती असते. तिच्यापासूनही भांडी, मूर्त्या, दागिने तयार करतात. टेराकोटाचा उल्लेख सिंसविस्तर बातमी

आपण सगळ्यांनीच लहानपणी मातीची फळे, गाडीचं चाक, पणत्या, दिवा, विविध प्राणी असे जे आकार सुचतील ते तयार करण्याची मजा नक्कीच अनुभवली असणार..!

आपल्याला काळी-चिकण आणि शाडू हे मातीचे तीनच प्रकार माहीत असतात.

पण अशीच ‘टेराकोटा’ नावाची एक माती असते. तिच्यापासूनही उत्तम भांडी, मूर्ती आणि दागिने तयार करतात...

कसे? आणि कुठे? चला जाणून घेऊया..!

शाळेत कार्यानुभव हा माझा अत्यंत आवडता विषय होता. कार्यानुभवमध्ये विविध वस्तू तयार करण्याची गंमत वाटायची. आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी मातीची फळे, गाडीचं चाक, पणत्या, दिवा, विविध प्राणी असे जे आकार सुचतील ते तयार करण्याची मजा नक्कीच अनुभवली असणार..!

शाळा संपून पुढे महाविद्यालयात बी.एफ.ए. ला आल्यावर शाडू मातीचे विविध आकार बनविण्याचा योग आला. याच अभ्यासक्रमात असताना माझी एका नव्या मातीची म्हणजे ‘टेराकोटा’ची ओळख झाली.

टेराकोटाची शिल्पे, भांडी, वस्तू यांचा उल्लेख सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती यांचा अभ्यास करताना त्यात आला होता. त्यामुळे टेराकोटाबद्दल कुतूहल आधीपासूनच होतं. पुढे टेराकोटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मी सहजासहजी न मिळणारी टेराकोटाची माती खास मागवून घेतली आणि अभ्यास सुरु केला.

सतत हाताळाल्यावर समजलं, की टेराकोटाची माती भिजवल्यावर तिला हवा तो आकार देता येतो कारण या मातीच्या कणांमध्ये चिकटपणा अधिक असतो. त्यामुळे ती हवी तशी आकारबद्ध होते. या मातीची वस्तू तयार झाल्यावर ती भाजली, की तिच्यावरील चमक नाहीशी होते. तिला लाल रंग प्राप्त होतो आणि ती टिकाऊ होते.

सौंदर्यशास्त्रानुसार प्रत्येक कला ही दुसऱ्या कलेवर अवलंबून असते. त्यानुसार टेराकोटा कला ही कुंभारकलेशी संबंधित आहे. जेव्हा हडप्पा, सिंधू संस्कृतीचे उत्खनन झाले त्यावेळेस मिळालेल्या असंख्य वस्तुंमध्ये टेराकोटाची शिल्पे, भांडी, वस्तू, खेळणी अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचा समावेश त्यात होता. विशेष म्हणजे, त्या काळी टेराकोटा मातीच्या विटा व कौले यांचा उपयोग घरबांधणीसाठी केला जायाचा, असेही उत्तखननातून स्पष्ट झाले आहे.

परंपरा आणि संस्कृतीचा वारसा असलेल्या टेराकोटाच्या अनेक कलाकृती व वस्तू आजही विविध प्रांतात तयार केल्या जातात आणि वापरल्या जातात. पश्चिम बंगालमधील कलाकार मातीला साच्यातून किंवा हाताने विविध आकार देतात, वस्तू तयार झाली की ती भट्टीत भाजतात.

टेराकोटा मातीचा मूळ लाल रंग जाऊ नये म्हणून भट्टीचा धूर बाहेर सोडला जातो. मात्र, जर वस्तूला काळा रंग द्यायचा असेल तर हवा आतच कोंडली जाते. महाराष्ट्रात जसे लाल आणि काळे माठ तयार होतात, तशीच ही पद्धत आहे.

पण येथे नैसर्गिक लाल रंग नसून गेरूने रंगविले जाते. टेराकोटा मातीची वस्तू भाजल्याने त्यावरील चकाकी नाहीशी होते; त्यामुळे जर ती वस्तू शोभेसाठी, अलंकार म्हणून वापरली जाणार असेल तर त्यावर कृत्रिमरित्या चकाकी आणली जाते.

भारतात विविध ठिकाणी ही कला वेगवेगळ्या स्वरूपात आढळते. गुजरातमधील थानगढ, कच्छ येथील मुर्शिदाबाद, बिरभूमी, हुगली येथील टेराकोटा कलाकृती प्रसिद्ध आहेत. तसेच हरियाणा, पंजाब, लुधियाना येथील फुलपात्रे, दिवे, खेळणी तसेच मंदिरात केलेला टेराकोटा कलाकृतींचा वापर हे भारताच्या समृद्ध कला परंपरेची साक्ष देतात.

उत्तर प्रदेशातील टेराकोटा कला नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. आजमगढमध्ये फुले, पाने व भौमितिक आकारांसाठी तर लखनऊ येथे चमकदार अलंकरणासाठी टेराकोटा प्रसिद्ध आहे. गोरखपूर येथील टेराकोटा कलाकृती प्राणी आणि विविध आकारांसाठी प्रसिद्ध आहे. येथे घोडे, हत्ती, उंट, महावत, गणेश, बुद्धमूर्ती, घोडागाडी, उंटगाडी, लॅम्पशेड, झुंबर असे विविध आकार तयार केले जातात.

राजस्थान टेराकोटा कलाकृतीसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. देव-देवतांच्या मूर्ती, मातीची खेळणी बनविण्याचे काम येथे पिढयानपिढ्या सुरू आहे. नाथद्वाराजवळच असलेले मोलेला हे गाव टेराकोटाचे प्रमुख केंद्र मानले जाते. येथील कुंभार मातीमध्ये गाढवाचे शेण मिसळून त्यापासून मूर्ती तयार करतात व त्या अति जास्त तापमानात भाजून नंतर रंगवून कलाकृती तयार करतात.

टेराकोटा माती ही अतिचिकट असल्याने पुरातन काळापासून आजही अनेक आदिवासी जमातीत या मातीपासून बनवलेले दागिने वापरले जातात.

गेल्या उन्हाळयात मी देखील उत्साहाने टेराकोटाचे दागिने बनविण्याचे ठरवलं आणि ज्वेलरी तयार करताना जी साधनसामुग्री हवी असते ती सर्व बाजारातून आणली. माती मात्र मला मागवावी लागली. त्यातून बनवलेल्या काही दागिन्यांची विक्री देखील झाली. मी गंमत म्हणून केलेला छोटासा व्यवसाय हा दक्षिण भारत ते बंगालपर्यंत हजारो स्त्रियांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. हे माझ्या गावीही नव्हतं.

टेराकोटाचे व्यावसायिकरित्या विकले जाणारे सर्व दागिने हाताने तयार केलेले असतात. त्यामध्ये काळानुसार कमालीचा बदल होत आला आहे. जुन्या आणि नवीन डिझाईनचे मिश्रण करून या दागिन्यांची विक्री केली जाते. एक दागिना तयार करायला साधारण 8 दिवस तरी लागतात. 100 ते 4000 रुपायांपर्यंत या दागिन्यांची किंमत असते.

विविध आकार आणि डिझाईनमध्ये उपलब्ध असलेल्या टेराकोटाच्या दागिन्यांपैकी विविध रंगातील कानातले, पेंडंट, हार, टेम्पल ज्वेलरी, बांगड्या यांना टेराकोटाची विशेष पसंती असते.

भारतात आजही असा मोठा स्त्रीवर्ग आहे ज्यांना रोजगार नाही. अनेकांना नोकरी करण्यास मनाई असते. आजही अनेक स्त्रिया अशिक्षित आहेत. त्यांना कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी लागते पण रोजगार नसल्याने त्या निराश होतात. अशा सर्वांनी हैद्राबादच्या हेमा बालकृष्णन यांचा आदर्श ठेवावा असं मला वाटतं.

हेमा बालकृष्णन या ‘कलर डी अर्थ’च्या संस्थापिका. 2003 साली त्यांनी आपल्या छंदाला व्यवसायाचं रूप दिलं. आज संपूर्ण भारत व भारताबाहेरील देशात त्यांच्या व्यवसायाचा बोलबाला असून त्यांना टेराकोटा ज्वेलरी व्यवसायासाठी अनेक पुरस्कारांनी भारत सरकारने सन्मानित केलं आहे.

छोट्या स्वरूपात सुरु केलेल्या हेमा यांच्या टेराकोटा ज्वेलरीच्या व्यवसायाने आज 200 ते 300 महिलांना रोजगार प्राप्त करून दिला आहे. हेमा बालकृष्णन स्वत: उच्चशिक्षित आणि प्रगल्भ विचारांच्या आहेत. केवळ 2 स्त्रियांपासून सुरुवात झालेल्या या व्यवसायाने आज ही कला शिकून तयार झालेले अनेक कारागीर तयार केले. त्या सर्वाना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिलं. नवी दिल्ली येथील संस्कृती फाऊंडेशनने टेराकोटा वस्तुंचे स्वतंत्र संग्रहालय निर्माण केले आहे.

तेव्हा, मित्रांनो, तुम्ही देखील प्रयत्न करा टेराकोटा मातीपासून काही वस्तू तयार करण्याचा आणि विश्वास ठेवा नक्की जमेल तुम्हाला या गोष्टी करायला.

या वस्तू करा, त्या वस्तू पहा आणि आवडल्यास बिनधास्त खरेदी सुद्धा करा..!

असं म्हणतात की या कला माणसाला स्ट्रेस पासून मुक्ती देतात, 
चला तर मग स्ट्रेस मुक्त होवुया आणि भारतीय कलांचा आनंद घेता घेता कुटुंब आणि सोबत देश ही घडवूया....

पुन्हा भेटूया इथेच भारतीयन्स’च्या या सदरात एका नवीन कलेच्या माहितीसह....लवकरच

धन्यवाद..!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

टीम भारतीयन्स

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य