Bhartiyans

Menu

फुडीझम : थंडी स्पेशल ‘बाजरे की खिचडी’

Date : 11 Dec 2016

Total View : 500

आज आपण पाहणार आहोत एक साधा सोपा पण अतिशय पौष्टिक, सात्विक राजस्थानी पदार्थ ‘बाजरे की खिचडी’..!


सारांश

आपण पाहणार आहोत एक साधा पण अतिशय पौष्टिक राजस्थानी पदार्थ ‘बाजरे की खिचडी’..! बाजरीमधून भरपूर कॅल्शिअम मिळतं. थंडीच्या दिवसांत बाजरी प्रकृतीला उष्णता म्हणजेच शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा देते. बाजरी आहारात वापरल्याने बद्धकोष्ठता(constipation), मूळव्याध (piles), अनिद्रा(insomnia) सारखे आजार आटोक्यात ठसविस्तर बातमी

नमस्कार मैत्रांनो,
आज अजून एक राजस्थानी डिश तयार करुया आणि टेस्ट सुद्धा. या मस्त थंडीत.. एक साधी सोपी पण अतिशय पौष्टिक आणि सात्विक अशी राजस्थानी स्वादिष्ट डिश ‘बाजरे की खिचडी’

आपण गेल्या वेळी ‘राजस्थानी बदाम हलवा’ची रेसिपी पाहिली तेव्हा हे पाहिलं, की राजस्थानचं हवामान किती विपरित आणि टोकाचं असतं ते. दिवसा जीवघेणा उकाडा आणि रात्री हाडं गोठवून टाकणारी थंडी.
 

अशा विपरीत हवामानात देखील तिथे मारवाडी बांधव पाय रोवून उभे आहेत. चिकाटीने राजस्थानसारख्या खडतर प्रदेशातसुद्धा त्यांनी कष्टाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

भारतातल्या या एका अतिशय कष्टाळू पण कदाचित म्हणूनच भरभराटीचे आयुष्य जगणाऱ्या मारवाडी समाजाचे राहणीमान, जीवनशैली, नृत्य, गाणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार. हे सारंच कसं वेगळं आणि छान आहे.

म्हटलं तर राजेशाही, म्हटलं तर साधं, सात्विक आणि जाणून घेतलं तर अत्यंत रोचक आणि स्वादिष्ट,
म्हणूनंच असेल, त्यांचे पदार्थ देखील अनोखे असले तरी आपल्या आवाक्यातले वाटतात, थेट मनाला भिडतात आणि जीभेवाटे मनावर अधिराज्य गाजवतात.

आणि खर सांगते, या मारवाडी लोकांचे पदार्थ सुद्धा त्यांच्या सारखेच साधे, सरळ पण आहारमूल्यांनी रसरसलेले असतात.

या लोकांचे राहणीमान आणि आहार विषयक पद्धती पाहताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे, राजस्थानी आपल्या अन्नात सढळपणे तेल, तूप, दूध, ताक, दही याचा वापर करतात.

त्यांचे कित्येक पदार्थ तर पाणी अजिबात न वापरता तूप, दुधातच शिजवलेले असतात .

ह्याची दोन कारणे असावीत. 
एकतर तूप, दूध, दही हे सारेच दुग्धजन्य पदार्थ तिथल्या अतिउष्ण वातावरणात थंडावा देणारे.

म्हणजेच प्रखर उन्हाच्या दुष्परिणामांपासून त्यांच्या शारीरिक सिस्टिमला संरक्षण मिळतं आणि दुसरं म्हणजे दूध, ताक वापरल्याने अन्न शिजवताना पाण्याचा कमीत कमी वापर केला जातो. 
राजस्थानातील पाण्याची कमतरता तर सर्वांनाच माहित आहे .

तर अशाप्रकारे भिन्न वातावरणात तग धरण्यासाठी मनुष्य प्राणी आपली जीवनशैली 
कशी बदलतो हे जाणून घेणं हे फारच उद्बोधक आहे .

तर आज आपण पाहणार आहोत एक साधा सोपा पण अतिशय पौष्टिक, सात्विक राजस्थानी पदार्थ 
"बाजरे की खिचडी"

बाजरीचे गूणधर्म तर आपण सगळे जाणतोच. 
बाजरी मध्ये उत्कृष्ट प्रतीचं कॅल्शिअम मिळतं आणि बाजरी प्रकृतीला उष्ण, म्हणजेच थंडीच्या या गारठलेल्या दिवसांत शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा देते.

या सोबतच बाजरीत उत्तम औषधी गुणधर्म आणि मोठया प्रमाणात डाएटरी फायबर्स असतात. म्हणून बाजरी नियमितपणे आहारात वापरल्याने बद्धकोष्ठता(constipation), मूळव्याध (piles), अनिद्रा(insomnia) सारखे आजार बऱ्याच प्रमाणात आटोक्यात ठेवता येतात.

इतर कोणतीही खिचडी शिजवताना आपण त्यात तांदळाचा वापर करतो पण राजस्थानात मात्र ही खिचडी, बाजरी आणि मूग डाळ वापरून केली जाते.

बाजरी मुळे शरीराला उष्णता मिळते आणि याच वेळी मूग डाळ मात्र पचनसंस्थेवरचा भार हलका करते. 
तांदूळ नसल्याने डायबेटिक किंवा वजन कमी करणाऱ्यांसाठी देखील हा एक परिपूर्ण आहार ठरतो हे विशेष.

तर पाहूया आजचा आपला हा बहुरंगी , बहुढंगी राजस्थानी मारवाडी पदार्थ

"बाजरे की खिचडी"

**साहित्य**

बाजरी - १ वाटी (५-६ तास पाण्यात भिजवून ठेवावी)
मूग डाळ - १ वाटी (छीलका आवडत असल्यास ती वापरली तरी चालू शकतं)
आलं, हिरवी मिरची आणि जिरे यांची एकत्रीत केलेली पेस्ट - २ टेबलस्पून 
हळद - १/४ टीस्पून 
हिंग – थोडं (खडे हिंग असल्यास उत्तम, चवीला छान लागतं)
मीठ – चवीपुरतं 
तेल - २ टेबलस्पून
पाणी – ६ वाट्या

**कृती**

मुगडाळ स्वच्छ धुवून घ्यावी. 
बाजरी भिजवलेलं पाणी देखील निथळून घ्यावं. 
जाड बुडाच्या भांड्यात मंद अग्नीवर तेल तापवून आधी त्यात हिंग टाकावा. 
एक-दोन मिनिटांनंतर आलं, मिरची, जिरं यांची आपण करून तयार ठेवलेली पेस्ट टाकून हे मिश्रण जरा परतावं. 
खमंग वास सुटला की आता त्यावर मुगडाळ आणि बाजरी टाकून ५ / १० मिनिटे चांगलं खरपूस परतून घ्यावं. 
मीठ, हळद आणि तिप्पट पाणी (६ वाट्या) टाकून ते भांड कुकर मध्ये ठेवावं. 
२/३ शिट्ट्या आल्या की आता गॅस बारीक करावा आणि त्यावर हे चांगल २०/२५ मिनिटे ठेवून द्यावं. 
बाजरी शिजायला जरा जास्त वेळ लागतो.

आता ही झाली आपली मस्त, अस्सल मारवाडी डिश तयार.

ही डिश वाढताना ताटात खाली किंचित तूप घाला आता वर गरमागरम खिचडी वाढा आणि पुन्हा वर भरपूर तूप घाला.

पापड, लोणचं, दही-रायता यांपैकी जे आवडेल त्याबरोबर खिचडीचा आस्वाद आता तुम्ही घेऊ शकता.

करा लवकरच ही डिश आणि नक्की सांगा कशी झाली ते!

भरपूर खा ! पौष्टिक खा ! भरपूर व्यायाम करा ! शरीर कमवा ! राष्ट्र बलवान करा !

चला, तर मग! 
आता पॉझिटिव्हिटी वाढवण्याची सुरुवात करूया आपल्या पासून आणि आपल्या पोटापासून...
भारतीयन्स'च्या फुडीझम'पासून...

कारण,
घर पॉझिटिव्ह तर देश पॉझिटिव्ह !

धन्यवाद !

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

नयना पिकळे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य