Bhartiyans

Menu

’दृष्टी’ महत्वाची का ‘दृष्टीकोन’...?

Date : 16 Dec 2016

Total View : 370

समाजाने नाकारलेला जन्मांध ते उद्योग-विश्वाने ज्याच्यासाठी ‘रेड कारपेट’ अंथरले अशा ५० कोटींच्या कंपनीचा मालक. केवळ २४ वर्षांच्या कालावधीत हा झंझावात घडवणारा श्रीकांत....!


सारांश

Vision Is Mandatory, Eyesight Is Optional !! प्रचंड विचार करायला लावणारं हे वाक्य प्रत्यक्षात जगला तो श्रीकांत बोल्ला....! आंध्र प्रदेशातील मच्छलीपटनम जवळचं सिथाराम पूरम हे श्रीकांतच गाव. आंधळ्या श्रीकांतने प्रचंड मेहनत करून दहावीत ९०% आणि बारावीत ९८% गुण मिळवले. पुढे हाच श्रीकांत अमेरिकेच्या MIT विद्यापीठाचा अंध आणि सर्वाधिक गुण मिळवणारा पहिलाच विद्यार्थी ठरला.सविस्तर बातमी

समाजाने नाकारलेला जन्मांध ते उद्योग-विश्वाने ज्याच्यासाठी ‘रेड कारपेट’ अंथरले अशा ५० कोटींच्या कंपनीचा मालक. केवळ २४ वर्षांच्या कालावधीत हा झंझावात घडवणारा श्रीकांत....!
 

Vision Is Mandatory- Eyesight Is Optional !!

प्रचंड विचार करायला लावणारं हे वाक्य प्रत्यक्षात जगला तो श्रीकांत. श्रीकांत बोल्ला....! आंध्र प्रदेशातील मच्छलीपटनम जवळचं सिथाराम पूरम हे श्रीकांतच जन्मगाव. 
 

जन्मांध श्रीकांत घरादारावर भार आहे हे सगळ्यांनी श्रीकांतच्या आई-वडलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला.

पण त्या जोडप्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. जगाच्या दृष्टीने बिनकामाच्या अशा या मुलाला वडिलां शेतीच्या कामाला नेले. पण अंधत्वामुळे श्रीकांतला तेही जमेना. मग त्याला शाळेत घातलं.

आंधळ्या श्रीकांतच्या दृष्टीने शाळा हे सुद्धा एक मोठ दिव्यच होतं. रोज ५ किलोमीटर चालत जायचं, शाळेत शेवटच्या बाकावर बसायचं, मुलांकडून मस्करी, अवहेलना सहन करायची आणि अजून खूप काही...
पण एवढे असूनही शाळेत श्रीकांत क्रिकेट खेळायचा आणि चेससुद्धा खूप छान खेळायचा.

सगळीकडे नकार मिळणे हे जणू त्याला परिचयाचे झाले होते. मात्र, या सगळ्यावर मात करूनही श्रीकांत ९०% गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाला.

इतके छान गुण मिळवून देखील विज्ञान शाखा प्रवेशाचा हक्कसुद्धा श्रीकांतला न्याय-व्यवस्थेशी आणि प्रशासनाशी झगडून मिळवावा लागला. तोही त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर, म्हणजेच अंध असल्याने पुढील उच्च शिक्षण घेताना त्याला कुठलीही सवलत मिळणार नाही हे स्पष्ट झाले होते.

‘डोळे नाहीत पण कान आहेत’ हा विचार करून श्रीकांतने एका मित्र-मार्गदर्शकाच्या मदतीने सर्व पुस्तके ऑडियो स्वरूपात तयार केली. खडतर परिस्थितीतही परिश्रमाने मात करत आणि जिद्दीने अभ्यास करत बारावीलासुद्धा त्याने ९८% चा सुपर सिक्स मारला.

आणि.... इथे मात्र त्याला हादरवून सोडणारा मोठा नकार मिळाला. 
आयआयटीमध्ये जाण्याची त्याची इच्छा होती. पण अंध असल्याने या गुणी विद्यार्थ्याला प्रवेश द्यायला आयआयटीने नकार दिला.

स्पर्धात्मक परीक्षांत त्याला भारतात हा नकार मिळाला तेव्हा अमेरिकेतल्या (Massachusetts Institute of Technology) MIT विद्यापीठाने या अंध परंतु विलक्षण गुणी, प्रामाणिक आणि कष्टाळू विद्यार्थ्याला मदतीचा हात दिला.

MITने दिलेल्या या संधीचे श्रीकांतने स्वकर्तुत्वाने अक्षरशः सोने केले. MIT विद्यापीठाचा अंध असणारा आणि सर्वाधिक गुण मिळवणारा श्रीकांत हा २०१२ मधला पहिलाच विद्यार्थी ठरला.

अभ्यासात घवघवीत यश मिळाल्यावर अमेरिकेमध्ये श्रीकांतला साहजिकच घसघशीत पगाराची नोकरी मिळाली. पण ती नाकारून श्रीकांत पुन्हा त्याची मायभूमी असलेल्या भारतात परतला आणि त्याने स्वतःचा कारखाना उभारला.

‘नोकरी करण्यापेक्षा आणि नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारा होणे चांगले.’ असे श्रीकांत म्हणतो.

भारतात परतल्यावर अल्पावधीतच कोट्यवधी रुपये मिळवून देऊ शकतील अशी उत्पादने त्याने नाकारली आणि पर्यावरण पूरक उत्पादनांची निवड केली.

नैसर्गिक पानांपासून आणि रिसायकलेबल कागद यांच्या सहाय्याने डिस्पोझेबल कंझ्युमर पाकेजिंग सोल्युशन्सची निर्मिती त्याने केली.

आज त्याच्या कारखान्यात एकूण ४५० कामगार काम करत आहेत. त्यातले किमान ६०% तर चक्क अपंग आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या भागात श्रीकांतचा व्यवसाय जोरदार प्रगती करतो आहे. तो उत्पादनांचे विक्रम करतोय.

चेन्नईपासून ५५ किलोमीटर अंतरावर श्री सिटी येथे आता श्रीकांतचा नवीन कारखाना उदयास येत असून येथील सर्व कामे सौर उर्जेवर केली जाणार आहेत.

कामावरील निष्ठा, ठाम निश्चय, उत्तम प्रशासन कौशल्य, धंदेवाईक नसणे आणि सहकार्यांचा गुणात्मक विकास साधत, त्यांना सामावून घेत घेत प्रचंड कष्ट करण्याची मानसिकता हे श्रीकांतचे गुण आणि हेच त्याचं मुख्य भांडवल.

या भांडवलाची PRICE नव्हे तर VALUE ओळखून रतन टाटा यांनी त्याच्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे हे कौतुकास्पद आहे.

श्रीमंती कधीच पैशांतून येत नाही तर ती समाधान देण्यातून येते. या विचारांच्या श्रीकांतला वार्षिक रुपये २,००,००० मिळवणारे त्याचे आई-वडील सर्वाधिक श्रीमंत वाटतात.

करण प्राप्त परिस्थितून मार्ग काढत जिद्दीने उभे राहण्याचे भांडवल याच मातापित्यांनी श्रीकांतला दिले आहे.

‘सिग्नलवर उभ्या असलेल्या भिकाऱ्याला हात बाहेर काढून एक रुपयाचे नाणे देणे ही अनुकंपा असू शकत नाही. तर , माझ्यामते एखाद्या गरजूला जगण्याचा मार्ग दाखवणे, हा मार्ग कसा सहजपणे सर करायचा हे त्याला समजावून देणे आणि त्याला जगण्याला प्रोत्साहित करून एक सुखी जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हीच अनुकंपा आहे.’ असे श्रीकांत म्हणतो.

आता सांगा...’दृष्टी’ महत्वाची का ‘दृष्टीकोन”.

जन्मतःच अंध असण्याचा शाप सकारात्मक विचारांनी पुसून टाकून, आवश्यक तेव्हा अपरंपार कष्ट करून, ध्येयाधीष्ठीत जीवनक्रम अवलंबवत देशातल्या तरुणांना अढळ अशा दीपस्तंभासारखे नेतृत्व देणाऱ्या श्रीकांतला, त्याच्या ध्येयाप्रती पोहोचण्यासाठी मदतीचे पूल उभारणाऱ्या त्याच्या मित्रांना, अध्यापकांना,
आणि असा कर्तुत्ववान पुत्र जन्माला घालून त्याच्यावर माणुसकीचे आणि देशभक्तीचे गाढ संस्कार करणाऱ्या श्रीकांतच्या आई-वडलांना ‘टीम भारतीयन्स’ चा मानाचा मुजरा.....!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मधुरा दाते

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

इंडियाटाईम्स