Bhartiyans

Menu

लाखो बहिणींना राखीनिमित्त ‘जीवन’दान देणारा भाऊ..!

Date : 16 Dec 2016

Total View : 414

राजेंद्र सिंह जी. यांनी राजस्थानातील लाखो स्त्रियांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून राखी पौर्णिमेच्या दिवशी अनोखे ‘जीवन’ दान दिले.


सारांश

मृत नद्या, नापीक जमीन, नाश पावणारे पशुधन आणि वन्यजीवन यांना संजीवनी देण्याचा प्रयत्न राजेंद्रसिंह यांनी केला. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी विज्ञान तंत्रज्ञाना आणि सामूहिक श्रमशक्ती याद्वारे ८६०० रेन वॉटर हार्वेस्टिंग टाक्या बांधून, १००० गावांना सुजलाम सुफलाम केले. ११५ हून अधिक नद्यांचे पुनरुज्जीवन केले. या कार्यासाठी २००१ साली राजेंद्रसिंहांना मॅगसेसे आणि २०१५ मध्ये स्टोकहोम वॉटर पुरस्काराने गौरवण्यात आले.सविस्तर बातमी

राखी पौर्णिमा आणि ‘भगीरथाचा वारस’ ठरलेल्या एका अनोख्या भावाचा आगळा-वेगळा ऋषीतुल्य जीवनप्रवास, 
#Bharatiyans

राखी-एक धागा. प्रेम देणारा, विश्वास देणारा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चिंतामुक्त राहण्याचा विश्वास देणारा.

स्त्री-मनाइतकेच नाजूक धाग्याचे हे बंध सामर्थ्यवान पुरुषाकडून केवळ हक्काच्या आधाराची अपेक्षा करतात.

आज असेच साजरे केले आहे एक अनोखे रक्षाबंधन एका भावाने...आपल्या हजारो-लाखो भगिनींसाठी...त्यांच्या पाण्याच्या एका थेंबासाठी आसुसलेल्या शुष्क मनात पाण्याची धो-धो गंगा आणून....

ज्यांच्या डोळ्यातले अश्रू देखील आटून गेले आहेत अशा हजारो स्त्रिया....पाण्याची म्हणजे जीवनाची आस लावून बसलेल्या, त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देणारा, जगण्याची उभारी देणारा हा भाऊ, भगिरथाचे वारस, राजेंद्र सिंह जी.

“पाणी म्हणजे जीवन हे शाळेत शिकताना घोकून घेतले होते पण पाणी म्हणजे राजकारण हा बदल केव्हा अन कसा होत गेला कळलंच नाही.

आता तर तज्ञ म्हणतात की तिसरं महायुद्ध होणार ते पाण्यावरूनच.”

पण एक भारतीय अवलिया असाही आहे जो जगात ‘भगीरथाचा वारस’ म्हणून ओळखला जातो...हजारो बहिणींना प्रिय होतो...

मृत नद्या, वांझ होत चाललेली जमीन, नाश पावणारे पशुधन आणि वन्यजीवन साऱ्या साऱ्यांनी संजीवनी देण्याचा वसा घेतलेले राजेंद्रसिंह, 
मेरठजवळील दौसा इथल्या जमीनदाराचा हा मुलगा.

आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या यांच्या आयुष्याने वेगळेच वळण घेतले राजस्थान विश्वविद्यालयात शिक्षण घेताना.

जवळपासच्या झोपड्यांना अचानक आग लागली. बचाव कार्यात सहभागी राजेन्द्रसिहांना त्या क्षणाला दारिद्र्य फार जवळून अनुभवायला मिळालं. आणि ‘मी’ चा प्रवास ‘आम्ही’ म्हणून सुरु झाला .

प्रापंचिक व्यवधाने सांभाळताना सरकारी सेवेत प्रकल्प अधिकरी झाले आणि संसार सुरु झाला.

पण राजस्थान.......जिवंतपणी मृत्यूशी गळाभेट झालेली माणसे तेथील रोगराई ... भूक सारी सारी संवेदनशील मनाला विलक्षण बोचणी देत होते.

दीर्घ विचारानंतर एका क्षणात निर्णय झाला.

नोकरीचा राजीनामा देऊन हा भगीरथाचा सुपुत्र खेड्याकडे निघाला .
पाणी, ज्यामुळे राजस्थानचा वर्तमान असह्य व त्याहूनही भविष्य भीषण होते अश्या वास्तववादी विषयावर सखोल काम चालू झाले .

विज्ञान तंत्रज्ञानाला समूह सहयोगाची सामुहीक श्रमशक्तीची जोड देत राजेन्द्रसिह्जींनी आधी ‘मने’ बांधली आणि त्यातून नंतर ‘जोहड’ बांधले. 
राजस्थानात पाणी प्रश्नावर गेली २० वर्षे सातत्याने कार्यरत राजून राजेन्द्रसिहांनी, ८६०० जोहडां’च्या रेन वॉटर हार्वेस्टिंग टाक्या बांधून, १००० खेड्यांना - पाड्यांना सुजलाम सुफलाम केले आहे .

नदीजोड प्रकल्प ही त्यांची महात्वाकांशी योजना आहे आणि सुमारे ११५ हून अधिक नद्यांचे पुनरुज्जीवन यामार्फत त्यांनी केले आहे. 
हे वाचतोय इतक्या हे सहज शक्य नक्कीच झाले नाही.

"लोककल्याणाची भाषा बोलणारा हा तरुण अतिरेकी तर नाही ना?" सामान्यांच्या अशा प्रश्नांना राजेंद्रसिंहांनां नेहेमीच तोंड दयावे लागले.

तत्कालीन राजकारण्यांना राजेंद्रसिंहांची लोकप्रियता सलू लागल्याने त्यांनीही विरोध सुरु केला होता. प्रशासनकर्ते, सरकारी धोरणकर्ते यांनी नकाराचा सूर लावून धरला होता.

पण राजेंद्रसिंहांची जिद्द, नियोजन, कल्पकता, मने जोडण्याची भावुकता आणि हे सगळेच या साऱ्यालाच सहजपणे पुरून उरले.

समूहशक्ती संघटनांसाठी २००१ साली राजेंद्रसिंहांना मॅगसेसे अवॉर्ड मिळाले. २०१५ मध्ये सर्वोच्च प्रतिष्ठेचा स्टोकहोम वॉटर पुरस्कार मिळाला. तेव्हा नक्कीच त्या पुरस्कारालाही सन्मानित झाल्यासारखे वाटले असेल.

"50 people who could save the planet" या गार्डियन वृत्तपत्राने केलेल्या यादीत राजेंद्रसिंहांचे नाव झळकते आहे.

मात्र "पूर्वी खूप लांब कोसांवर हिंडून पाणी आणताना अर्धा दिवस आणि निम्मा जीव जायचा. आता मात्र चहाचे आधण उकळेस्तोवर पाणी भरून होते" हे राजस्थानातील स्त्रीचे आणि खऱ्या अर्थाने एका बहिणीचे वाक्य हा त्यांच्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे.

आतापावेतो "जलबिरादरी"या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून देशभरात तब्बल २४,००० जोहाड बांधले गेले आहेत. "’संत (सज्जन शक्ती), समाज आणि सरकार’ एकत्र येवून ‘नदी, नीर आणि नारी’ चा यथोचित सन्मान झाला तर नवी सृष्टी निर्माण होऊ शकते" हे अदभूत सत्य आता जलबिरादरीने स्वतःच्या कामातून सिद्ध केले आहे.

ऋषीमुनी काय फक्त पौराणिक कथांमध्ये असतात का?

पाण्यासाठी खडतर तपश्चर्या करणारा, देशाला समूहश्रमशक्तीचा मंत्र देणारा, पुनरुज्जीवनाचे तंत्र देणारा , ‘नदी-नारी’ च्या प्रतिष्ठेसाठी यज्ञ करणारा आणि त्या यज्ञात स्वतःच्या कौटुंबिक सुखांची आहुती देणारा हा भारतीय "पाणीवाला बाबा".

याला आपण या आधुनिक युगातील ऋषी म्हणूया ना ?

आज राखी पौर्णिमेच्या दिवशी या आगळ्या वेगळ्या भावाला...राजेंद्र सिंहजींना आणि त्यांच्या कर्तुत्ववान कामाला ‘टीम भारतीयन्स’चा सलाम..!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मधुरा दाते

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य