Bhartiyans

Menu

जादव पायेंग : एका जंगलाची निर्मिती आणि देखभाल करणारा अवलिया..!

Date : 17 Dec 2016

Total View : 399

एकीकडे लोक सिमेंट काँक्रीटची जंगले उभी करत असताना या अवलियाने 1360 एकर जमिनीवर चक्क एक वन तयार केलं. कोण हा अवलिया..! पाहुया..!


सारांश

WHEN THE SUN DON'T SHINE BRIGHTLY, THE CANDLE HAS TO BURN..! जादव पायेंगने हेच केले. १९७९ साली ब्रह्मपुत्रा नदीला प्रचंड पूर आला. सगळं वाहून नेलं. मात्र, जादव पायेंग या १६ वर्षांच्या मुलाने या बेटावर पुन्हा जंगल निर्माण करायचं ठरवलं. ३० वर्षे न चुकता तो त्याने रोवलेल्या रोपांना पाणी घालत होता. अथक प्रयत्नातून निर्माण झालं 1360 एकरवर ‘मुलई कथोनी’ जंगल.सविस्तर बातमी

हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती, फ़ुलराणी ही खेळत होती - बालकवींच्या ह्या पंक्ती एक हिरवं चित्र आपल्या डोळ्यासमोर रेखाटतात. एक सुंदर वनराई, हिरवीगार झाडे, सुंदर फुले, त्यामधून सळसळणारा वारा!! पण अशी वनराई आजकाल कमी होताना दिसतेय, माणसं सिमेंट काँक्रीटची जंगलं उभी करू लागली आहेत, पर्यावरणाचे तीनतेरा वाजलेत, परंतु त्यातच वनदेवता एका माणसाला प्रसन्न होते आणि 'तो' एकटा अक्ख एक वनच उभं करतो...

एप्रिल ..मे महिन्यात उन्हाने भाजून निघत असतो. तशातच 5 जून चा जागतिक पर्यावरण दिन जगभर जोरदार सेलिब्रेट होत असतो ...त्या दिवशी तरी आपण पर्यावरणाच्या समस्येचा विचार करतो ...आणि मग जाणवत ..".तात्काळ खूप काही करण्याची गरज आहे ...पण मी एकटा काय करू शकतो ?"
पर्यावरणाच्या कल्याणाचा विचार मागे टाकून आपण दैनंदिन कामात व्यग्र होतो पण जावेद असे करत नाही, म्हणूनच तो आपल्यापेक्षा वेगळा ठरतो .

WHEN THE SUN DON'T SHINE BRIGHTLY 
THE CANDLE HAS TO BURN..!

जादव पायेंगने हेच केले. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय असे कोणतेही पाठबळ नसताना केवळ प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर जंगल वसवणारा हा ‘FOREST MAN’

१९७९ साली ब्रह्मपुत्रा नदीला प्रचंड पूर आला. या पुरामुळे सगळं काही वाहून नेलं; इतकं की लहानशी बी रुजायला मातीदेखील उरली नाही. नजर जाईल तिथे फक्त रेती आणि खडक. शेकडो प्राणी, वनस्पती ब्रह्मपुत्रा नदीच्या विळख्यात सापडून वाहून गेले. उरले ते फक्त काही सरपटणारे प्राणी. हळूहळू पूर ओसरला, ऊन पडलं. पण सावलीचा कुठेच पत्ता नसल्यामुळे तिथे उरलेले जीव उन्हाने पोळून निघाले. सभोवतालची ही सगळी भीषण परिस्थिती पाहून आसाममधल्या जोरहट जिल्ह्यातल्या कोकिलामुख गावातल्या जादव पायेंग या १६ वर्षांच्या कोवळ्या मुलाने ठरवलं की, या बेटावर पुन्हा जंगल निर्माण करायचं.

दोनशे हेक्टर जमिनीवर एकहाती जंगल निर्माण करण्याचा हा विचार धाडसाचा तरी असू शकतो किंवा वेडगळपणाचा! जंगल तयार करण्यासाठी रोपटी मागायला जादव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे गेला, पण सगळ्यांनी त्याला मूर्खात काढलं. या ओसाड जागेवर बांबू जरी उगवला तरी खूप झालं, असा विचार करून कुणीतरी त्याला बांबूची रोपटी दिली. मग बांबूचं वन उभारण्याचा जणू ध्यासच जादवने घेतला.

भटकंती करून त्याने वालकोल, अर्जुन, इजर, गुलमोहोर, कोरोई, मोज, हिमोलू अशा विविध झाडांची रोपटी जमवली आणि तिथे लावली. लावलेली रोपटी जगावीत, म्हणून जादव एक-दोन नव्हे तर ३० र्वष न चुकता सकाळ-संध्याकाळ त्यांना नदीवरून आणून पाणी घालत असे.

खडकाळ मातीत लाल मुंग्या राहिल्या तर मातीचा दर्जा बदलतो. ती सुपीक होते असा गावक-यांचा अनुभव लक्षात घेऊन मुलईने आपल्या खेड्यातून लाल मुंग्या पकडून आणुन त्यांचं पुनर्वसन या बेटावर करायला सुरूवात केली. गावापासुन बेटावर पोचण्यासाठी आधी तीस किलोमिटरचा चिंचोळा रस्ता, नंतर होडीत बसुन तासभर केलेला प्रवास आणि त्याहीनंतर तब्बल सात आठ किलोमीटरचा पाई प्रवास या मुंग्यांना जवळ घेऊन करत असतांना त्यांनी घेतलेले अगणीत चावे त्याने कसे सहन केले असतील?

त्याच्या या प्रयत्नांमध्ये सरकार, गावातले लोक आणि कुटुंबानेही मदत नाकारली तरी तो थांबला नाही.

तब्बल 1360 एकर जमिनीवर वसवलेले हे " मुलई कथोनी " जंगल. बांबूच्या बनापासून सुरू झालेल्या या जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळण्याइतकी जैवविविधता आहे. ब्रम्हपुत्रा नदीच्या पात्राजवळ तब्बल तेराशे हेक्टर जमिनीवर तयार केलेल्या या एकमेवाद्वितीय मनुष्यनिर्मित अभयारण्यात आज चार वाघ, तीन एकिशगी गेंडे, शंभरेक हरणं, शेकडो माकडं, ससे आणि इतर प्राण्यांचं वास्तव्य आहे. कित्येक स्थलांतरित पक्षी इथे दरवर्षी येतात. जवळपास सव्वाशे जंगली हत्तींचा कळप इथे वर्षांतले सहा महिने वास्तव्याला असतो.गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच जंगलातील आपल्या जुन्या झोपडीत राहणारे जादव पायेंग निसर्ग राखण्याचं काम नि:स्वार्थीपणे करत आहेत.

बायको, दोन मुलं आणि एक मुलगी अशा आपल्या कुटुंबाचा चरितार्थ ते घरात पाळलेल्या गाई-म्हशीचं दूध विकून चालवतात. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाने ‘फॉरेस्ट मॅन ऑफ असम’ ही उपाधी देऊन सन्मानित केलं. 2015 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान केला .
DUGLAS मॅकमास्टर ने त्यांच्यावर केलेला विडिओ यु ट्यूब आहे.

जादव पायेंग यांनी कुठला शोध लावला नाही; पण प्रस्थापित व्यवस्थेला दूषणं न देता एकांडा माणूस काय करू शकतो, याचा त्यांनी दाखवून दिलेला वस्तुपाठ म्हणजे एक प्रकारे इनोव्हेशनच म्हटलं पाहिजे.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मधुरा दाते

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

The hindu