Bhartiyans

Menu

मृतदेह फाडून तिने सांधले आयुष्य..! पोस्टमॉर्टेम करणारी एकमेव शेर-ए-दिल महिला शीतल चव्हाण..!

Date : 17 Dec 2016

Total View : 216

पोस्टमॉर्टेम क्षेत्रातील एकमेव महिला. २८ वर्षाची महाराष्ट्र कन्या शीतल चव्हाण करते पोस्टमॉर्टेम करून उदरनिर्वाह..!


सारांश

‘This Movie is not for the weak Hearted. Please be Aware.’ अशी सूचना या शेर-ए-दिल महिलेचे कहाणी वाचण्याआधी द्यावी लागेल. २८ वर्षाची महाराष्ट्र कन्या शीतल चव्हाण चक्क पोस्टमॉर्टेम करून उदरनिर्वाह करते..! तिची कहाणी अंगावर काटा उभे करते पण डोळ्यात पाणी येऊ देत नाही कारण शीतलने तिच्याडोळ्यात कधीही पाणी येऊ दिले नाही. तिच्या डोळ्यात आहे ती फक्त उमेद..!सविस्तर बातमी

“This Movie is not for the weak Hearted. Please be Aware.”
हॉरर फिल्म पाहताना आधी अशी सूचना झळकते स्क्रीनवर,
आयुष्य सांधायला स्त्रीसुलभ भावना बासनात गुंडाळून ठेवतं काय-काय करायला लागतं महिलांना? 
या सगळ्यांतून ही एक भारतीय महिला....
२८ वर्षाची ही शेरदिल महाराष्ट्र कन्या. 
पोस्टमॉर्टेम क्षेत्रातील एकमेव महिला...
हृदय आधी घट्ट करा आणि नंतरच आजच्या या आपल्या जाबाज दुर्गे’ला भेटा....
#Bharatiyans

ती ७/८ वर्षाची असताना काचा-पाणी खेळायला घेते,
आई म्हणते,"जपून ग, काच जाईल हातात." ,
ती ८/१० वर्षाची असताना गजरा गुंफू पाहते,
आई म्हणते," जरा जपून, सुई टोचेल." ,
ती १५/१६ वर्षाची असताना भाजी चिरू पाहते, 
आई म्हणते," जपून ग, हात विळीवर कापेल"

अशा तुम्ही, मी, आपण साऱ्या जणी. 
आई -आजीने डोळ्यात तेल घालून वाढवलेल्या. 
सकस अन्न, धडके कपडे आणि म्हणू तेवढ शिक्षण देऊन जगप्रवाहात सोडलेल्या.

आता भेटूया "शीतल रामनाथ चव्हाण"ला. 
वयाच्या आठव्या वर्षांपासून ती राहायची तिच्या पोस्टमॉर्टेम करणाऱ्या वडिलांबरोबर.

छिन्नी, हातोडा, चाकू,सूरी, ब्लेड हेच तिचे लहानपणापासूनचे खेळ. एकीकडे इतक्या लहानपणी शवविच्छेदन होताना पहात पहात मन आणि नजर दोन्ही मरून गेलं तिचं आणि मेलेली माणसे कमी धोकादायक असतात हे पटलं.

घरात ४ बहिणी, २ भाऊ, आई आणि अठरा विश्व दारिद्र्य. सगळे सोबतच राहायचे. त्यातच वडिलांचं निधन झालं. कमावता हात गेला. शीतल या सर्वात मोठी. तिच्याकडे घराचं कर्तेपण आलं. शिक्षण नाही. कुठलं कौशल्य नाही. पण, शवविच्छेदनात मात्र हात आणि डोळे एकदम तय्यार झालेले.

वडलांच्या माघारी पोटाची खळगी भरणार तरी कशी, कुटुंबाचा गाडा ओढणार तरी कसा ?

मग काय ? 
नाईलाजाने आता ठरलं शवविच्छेदनावरच उदरनिर्वाह करायचा.

आत्तापर्यंत वडलांसोबत अनेक शवविच्छेदनं केली होती मात्र आता यावरच जगायचं ठरवलं आणि तो प्रसंग समोर उभा राहिला.

स्वतंत्रपणे शविच्छेदनाचा पहिलाच प्रसंग.

वेदनेच्या आवेगाचे कढ आवरत तिने तोही क्षण यशस्वीपणे निभावला. आता दिलासा होता तो चरितार्थासाठी काम निश्चित झाल्याचा पण वेदना होती ती मनात नैसर्गिकरीत्या असलेल्या स्त्रीसुलभ संवेदनांची निर्घृण हत्या होत असण्याची.

पण शेवटी भावना आणि व्यवहार यात नेहमीप्रमाणेच दाहक वास्तव जिंकले.

आणि प्रपंचासाठी आता ती झाली व्यावसाईक "शवविच्छेदक".

दिवस रात्र वेळेची पर्वा ना करता शीतल पोसमॉर्टेम करायला जाते कारण सख्या लहान भाऊ आणि बहिणींना शिकवून त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्याचा तिने ध्यास घेतला आहे. घरातल्या प्रत्येकाला काहीतरी साध्य करायचं आहे त्यासाठी शीतल हा त्यांचा एकमेव आधार आहे.

आज भोर मधल्या सरकारी दवाखान्यात ती शवविच्छेदनाचे काम करते आणि त्याचबरोबर स्वीपर’चे काम सुद्धा करते.

तब्बल १५००च्या वर पोस्टमॉर्टेम तिने केली आहेत आजपर्यंत. मांढरदेवी यात्रा दुर्घटना, भाटघर धरणात होडी उलटून झालेल्या अपघातातील मृतदेहांचे पोस्टमॉर्टेम शीतलने केलंय.

शीतल सांगते," लहानपणापासून सदोदीत वडलांसोबत प्रेतांच्या बरोबरच राहिल्याने भीती मारून गेलीये माझ्या मनातली या सगळ्या बद्दलची. भूत, पिशाच्च या कल्पना तर हास्यास्पद वाटतात. 
मात्र प्रेताची दुर्गंधी मला जिवंतपणी मरणयातना देते. काही वेळा मृतदेहाची अवस्था फार वाईट असते. जेवणाच्या ताटावर बसले की भडभडून उलटी होते. थोडा वेळ शांत बसते आणि काही वेळाने पुन्हा चाकोरी सुरु करते. पोस्टमॉर्टेम साठी कॉल येतो आणि मी शांतपणे घराबाहेर पडते."

तिच्या करपलेल्या मनानेही एकदा हाय खाल्ली जेव्हा एका लहानग्या अर्भकाचे पोस्टमॉर्टेम करण्याची वेळ तिच्यावर आली तेव्हा. 
जन्मदात्रीनेच नकोसे म्हणून जंगलात फेकलेले 2-3 दिवसांचे अर्भक. कुत्र्यांनी कुरतडलेलं. 
त्याच क्षणी तिने नियतीला तळतळाट दिले. 
याहून वाईट कुणाच्या नशिबात काय लिहू शकते नियती?

नवऱ्यानं जाळून मारलेली बायको, इस्टेटीसाठी खून करून पुरलेले प्रेत अशी कैक पोस्टमॉर्टेम......शीतलचा माणुसकीवरचा विश्वास उडून गेलाय.

“पुरलेलं प्रेत कुजत जातं. जंगली जनावर ते उकरून जगासमोर आणतात. या कुजलेल्या देहाचे पोस्टमॉर्टेम सर्वात कठीण असल्याचं शीतल सांगते .

“सार्वजनिक दुर्घटनेबद्दल काय बोलणार? प्रेतांचे ढीग लागतात. रात्रंदिवस एक करून ते ढीग हातावेगळे करायचे असतात. वेळेला जवळ मृतदेहाचे नातेवाईक नसतील तर पदरमोड करून पॅकिंगचं कापड आणावं लागत. कवटी फोडायला फार ताकद लागते. जळालेले मृतदेह फाडणे तर फार आव्हान असतं. पोस्टमॉर्टेम नंतर बॉडी पॅक करून पांढऱ्या कपड्यात गुंडाळून पहाण्यायोग्य वा अंत्यसंसकारयोग्य करण्याचे काम सुद्धा मीच करते "
थंड शब्दात शीतल सांगत असते.

चरितार्थ चालू झाला आहे. मात्र या कामाने शीतलच्या व्यक्तिमत्वात सुन्न करणारा बदल झाला आहे. तिला आता रडू येता येतच नाही. परकं जाउदे अगदी नजीकचं कोणी गेलं तरी हिचे डोळे काही ओले होतं नाहीत.

"आता मीच एक चालतं बोलतं प्रेत होईन अस वाटतंय." नाजूक चणीच्या, मऊ आणि पातळ आवाजाच्या शीतलचे हे शब्द क्षणाकरिता का होईना हृदयाची धडधड थांबवतात.

२८ वर्षाची ही शेरदिल महाराष्ट्र कन्या. पोस्टमॉर्टेम क्षेत्रातील एकमेव महिला. तिच्या घट्ट हृदयाला आणि आव्हानात्मक कर्तुत्वाला टीम भारतीयन्सचा सलाम.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मधुरा दाते

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य