Bhartiyans

Menu

पहिली भारतीय अपंग महिला एव्हरेस्टवीर अरुणिमा सिन्हा.

Date : 18 Dec 2016

Total View : 850

गुंडांनी धावत्या रेल्वेतून खाली फेकल्याने जिचा उजवा पाय अर्धा तुटला, ती मुलगी भारताचे सर्वोच्च चढणारी एव्हरेस्टवीर झाली. विश्वास बसत नाही ना..! म्हणूनच वाचा ‘अरूणिमा सिन्हा’ नावाच्या वादळाचा झंझावाती प्रवास.


सारांश

आयुष्यात स्थिरस्थावर होऊन संसाराचे स्वप्न रंगवणाऱ्या ‘ति’ला एका काळरात्री गुंडांनी धावत्या ट्रेनमधून खाली फेकलं. तिच्या पायावरून रेल्वे गेल्याने उजवा पाय तुटला. पण ती हरली नाही...खचली नाही...ती जिद्दीने पेटून उठली. तिने निश्चय केला. उभं राहण्याचा...चालण्याचा आणि पराकोटीचे परिश्रम करून एव्हरेस्ट चढून जाण्याचा...! खरोखर, ती तिचे ध्येय मिळवण्यात यशस्वी झाली. पहिली भारतीय अपंग महिला एव्हरेस्टवीर झाली. ‘ति’चं नाव आहे अरुणिमा सिन्हा.सविस्तर बातमी

आयुष्यात स्थिरस्थावर होऊन घरदार, संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या ‘ति’ला एका काळरात्री गुंडांनी भरधाव ट्रेनमधून फेकून दिलं... उजवा पाय तुटला... पण ती हरली नाही... ती जिद्दीने पेटून उठली... तिने निश्चय केला... उभं राहण्याचा... पराकोटीचे परिश्रम करून एव्हरेस्ट चढून जाण्याचा... भारतीय आणि जगभरातल्या महिलांसमोर एक आदर्श ठेवण्याचा....!
आज भेटूया आपल्या दुसऱ्या भारतीय दुर्गेला... 
पहिल्या भारतीय अपंग महिला एव्हरेस्टविरांगनेला..... अरुणिमा सिन्हाला..! 
#Bharatiyans

भांडवल कोणकोणत्या स्वरूपात असतं? 
पैसा..सोनं-नाणं....जमीन....शिक्षण...इत्यादी

पण तिच्याकडे तर यातलं काही काही नव्हतं.... जमेस होते खूप सारे नकार..नियतीने,  समाजाने,  निसर्गाने दिलेले नकार.

मग तिने त्याचेच भांडवल केलं पण सकारात्मक रीतीने आणि ती भारतीय अपंग मुलगी चढून गेली एव्हरेस्ट.

अरुणिमा ४ वर्षाची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. सगळे कुटुंबीय उत्तरप्रदेशमधील आंबेडकरनगरमध्ये राहायला आले.

घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यात वेगवेगळ्या आजारपणाने उभ्या कुटुंबालाच घेरलेलं.

राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल आणि फुटबॉल खेळाडू असणाऱ्या अरुणिमाला ११ एप्रिल २०११ ची काळरात्र अजूनही जशीच्या तशी आठवते.

पद्मावती एक्सप्रेस मधून अरुणिमा रात्री दिल्लीला निघाली होती,  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची परीक्षा द्यायला.  डब्यात ती एकटीच होती....!

रायबरेलीजवळ काही गुंड डब्यात घुसले. त्यांची एकमेकांत थट्टा-मस्करी सुरू असताना त्यांचे लक्ष डब्यात एकट्याच असलेल्या अरुणिमाकडे गेलं. आयती संधी साधून तिच्या जवळ येऊन ते तिला त्रास देऊ लागले आणि नंतर तर त्यांनी अरुणिमाच्या गळ्यातली सोन्याची चेन ओढायला सुरुवात केली.

प्लेयर असल्याने मजबूत शरीरयष्टी असलेल्या अरुणिमाने खूप झटापट केली, त्या आडदांडांना विरोध करायचा कडाडून प्रयत्न अरुणिमाने केला.

तिला त्या सोन्याचा मोह नव्हता. पण, घरच्या बिकट परिस्तिथीत अडीअडचणीच्या काळात कदाचित आवश्यकता पडलीच तर मदतीला येऊ शकणारा तो शेवटचा आर्थिक आधार त्या नराधम गुंडांकडे जात होता.

एकटीच मुलगी इतका पराकोटीचा विरोध करते आहे असं लक्षात आल्यावर इगो दुखावल्या गेलेल्या त्या रानटी क्रूरकर्मांनी चालत्या आणि गाडीतून अरुणिमाला रात्रीच्या अंधारात रुळावर फेकून दिलं.

“त्यांनी मला वेग पकडलेल्या गाडीतून बाहेर ढकलून दिलं. मला हलताच येत नव्हतं, मला आठवतंय विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रेनला माझ्याच दिशेने वेगाने येताना मी पाहिलं. त्याही अवस्थेत सगळी शारीरिक आणि मानसिक शक्ती एकवटून मी उठायचा प्रयत्न केला. पण मला हलताच येत नव्हतं आणि त्यातच ती धडधडत आलेली ट्रेन माझ्या पायावरून गेली. माझा गुडघ्याखालचा उजवा पाय तुटून बाजूला पडला. रक्ताळलेली मी तशीच तब्बल सात तास तिथेच त्याच रुळावर तशीच बेशुद्धावस्थेत पडून होते. आजूबाजूला असलेले उंदीर घुशी माझ्या शरीरभर झालेल्या जखमांच्या रक्ताच्या वासाने माझे अवयव कुरतडत होते.” अरुणिमा सांगते.

तिला कुणीतरी कधीतरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, उजवा पाय तुटलेला आणि ओटीपोटात भीषण जखमा झालेल्या अवस्थेत.

तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना तिचा उजवा पाय कापून टाकावा लागला.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कॉमपेंसेशन म्हणून तिला २५ हजार रुपये देऊ केले, नंतर या विषयावर देशभर उठलेल्या गदारोळामुळे त्यावेळचे केंद्रीय मंत्री अजय माखन यांनी या राष्ट्रीय खेळाडूला अजून २० हजार रुपये दिले.

यानंतर उपचारासाठी तिला दिल्लीत ‘एम्स’मध्ये आणलं गेलं. पुढल्या चार महिन्यात पराकोटीचा विकनेस आलेल्या अरुणिमाला तिथे कृत्रिम उजवा पाय बसवण्यात आला.

एम्समध्ये तिच्या या गलितगात्र परिस्थितीवर उपचार सुरु असताना तिने पडल्या पडल्याच वेळ घालवण्यासाठी म्हणून समोर टीव्हीवर सुरु असलेले क्रिकेटीअर युवराज सिंगचे कर्करोगावर मात केलेले काही कार्यक्रम पहिले.

आणि तेव्हाच जातिवंत खेळाडू असलेल्या अरुणिमाने सुद्धा मनाशी ठाम निश्चय केला, रडत खुडत अजिब्बात जगायचं नाही तर उभ्या जगाला आश्चर्य वाटेल आणि आपल्यासारख्याच हजारो लाखो तरुणींना जगण्याची नवी उमेद आणि ध्येय देईल असं काहीतरी वेगळ काहीतरी अद्वितीय असं करून दाखवायचं.

कृत्रिम पायाच्या परंतु विलक्षण कणखर मनाच्या साहाय्याने तिने दिवसा-ढवळ्याच उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिलं.... उंचीचा मानदंड असलेलं हिमालयातलं एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं.

“युवराज सिंग जर करू शकतो तर मी का करू शकणार नाही, मी विचार केला.”  अरुणिमा आत्मविश्वासाने सांगते.

तिथून बाहेर पडल्यावर उत्तर काशीच्या ‘नेहरू माउंटेनिअरिंग संस्थे’मध्ये केलेल्या बेसिक कोर्समध्ये तिने छान कामगिरी नोंदवली. आणि इथेच तिच्या भावाने, ओमप्रकाशने तिच्या कृत्रिम पायाने सुद्धा हिमालय चढण्याची एक अदभूत प्रेरणा तिच्या मनात निर्माण केली.

बडोद्याच्या रामकृष्ण मिशनने,  दैवदुर्लभ आत्मविश्वास आणि खडतर कष्ट करण्याची तयारी दाखवलेल्या अरुणिमाच्या माउंट एव्हरेस्ट मोहिमेचा आर्थिक भार उचलण्याचे मान्य केले.

आता माउंट एव्हरेस्ट चढून जाणाऱ्या पहिल्याच भारतीय महिला बचेंद्री पाल यांना अरुणिमाने फोनवर संपर्क केला.  आपली सगळी कहाणी सांगितली आणि स्वतःच्या तुटलेल्या पण कृत्रिम पाय बसवलेल्या अवस्थेत सुद्धा, पाल यांच्याप्रमाणेच एव्हरेस्ट सर करण्याचे तिचे उत्तुंग स्वप्न सुद्धा सांगितले. 
तिची ती सगळी कहाणी ऐकून आणि तिच्या आवाजाताला तो वज्रनिश्चय प्रत्यक्ष अनुभवून बचेंद्र पाल या भारतीय विक्रमवीर महिलेने अरुणिमाचे शिष्यत्व मान्य केले.

आणि आता मात्र अरुणिमाला पंख फुटल्यासारखे वाटू लागले....
पक्क्या निर्धाराने आता अरुणिमाचा ध्येयवेडा सराव सुरु झाला....

एक एक पाऊल चालण्यापासून....हळूहळू टेकडी....पर्वतरांगा....असा दुर्दम्य इच्छाशक्तीचा या दुर्गेचा प्रवास सुरु झाला....

आयुष्यात घडत असलेल्या या सगळ्याच, विचारही करता येणार नाही अश्या, आघातांनी अरुणीमा आतापावेतो थकली होती, थकत होती.....दमली होती, दमत होती....कोसळली होती, कोसळत होती...

पण हरली नव्हती-हरत नव्हती-हरणार तर मुळीच नव्हती....

आणि एक एप्रिल २०१३ रोजी सुरवात झाली एव्हरेस्ट’च्या उत्तुंग शिखराकडे प्रवासाची....

भीषण दैवी आघाताने संपलेल्या एका महिला खेळाडूच्या करिअरची ही कहाणी होती...

परंतु भारतीय नारी-शक्तीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची, एका भारतीय नारीने पाहिलेल्या स्वप्नांची आणि त्यासाठी अपरिमित कष्ट सोसून कृत्रिम पायावर ठामपणे उभे राहून केलेल्या अरुणीमाची ही तेजोनिधी तपश्चर्या होती....

जगातल्या महिलांच्या समोर पराकोटीची परीक्षा पाहणारी ही एका भारतीय महिलेची परिसीमा होती ही...

माथ्यावर चमकता सूर्य.... औषधोपचाराने काहीसे क्षीण झालेले शरीर...... अपुरा पडणारा श्वास पण एकच दुर्दम्य आस..एव्हरेस्ट...एव्हरेस्ट...आणि फक्त एव्हरेस्ट....

"दैवाच्या आघाताने मी मोडून पडणार नाही..... मी उभी राहणार.... प्रचंड इच्छाशक्तीने उभी राहणार....आत्मविश्वासाने उभी राहणार...हजारो-लाखोंना ध्येय मिळावे आणि प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा लढण्याचे मनोबल आणि स्वप्न मिळावे म्हणून मी काही झालं तरी एव्हरेस्ट सर करणार...." अरुणिमाने ठरवलंच होतं.

आणि तो दिवस उजाडला......तब्बल ५२ दिवसांची मोहीम यशस्वी झाली...

२१ मे रोजी अरुणिमाने एव्हरेस्ट वर तिरंगा फडकावला आणि आता तिला नवी, उत्तुंग ओळख मिळाली.

ती म्हणजे पहिली भारतीय अपंग महिला एव्हरेस्टवीर अरुणिमा सिन्हा.

एव्हरेस्टवर पोचल्या पोचल्या तिथे भारताचा तिरंगा रोवल्या रोवल्या अरुणीमाने एका कापडात गुंडाळून स्वतःसोबत तिथे नेलेला एक कागद तिथे बर्फात खोचून ठेवला...

त्या कागदावर तिने लिहिले होते, 
“माझ्या आयुष्यभर मला प्रेरणा देणाऱ्या भगवान शंकरांना आणि स्वामी विवेकानंदांना माझ्याकडून ही मानवंदना आहे.”

अरुणिमाला तिच्या या ध्येयवेड्या प्रवासासाठी २०१५ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

लाखो करोडो भारतीयांना प्रेरणादायी ठरणाऱ्या या आधुनिक दुर्गेला,  अरुणिमाला ‘टीम भारतीयन्स’चा मानाचा मुजरा....!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मधुरा दाते

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य