Bhartiyans

Menu

स्वत:ला अपंगत्व आले तरी न खचता शेकडो अपंगांना रोजगार मिळवून देणाऱ्या डॉ. नसीमा !

Date : 18 Dec 2016

Total View : 476

वयाच्या सोळाव्या वर्षी स्टेजवर ती नाचत असताना अचानक स्टेज कोसळल्याने तिला अपंगत्व आलं. तिचं जागतिक दर्जाची नृत्यांगना होण्याचं स्वप्न भंगलं. पण, तिने आपल्या कार्यातून शेकडो अपंगांना रोजगार मिळवून दिला.


सारांश

वयाच्या सोळाव्या वर्षी स्टेजवर नाचत असताना अचानक स्टेज कोसळल्याने तिला अपंगत्व आलं. तिचं जागतिक दर्जाची नृत्यांगना होण्याचं स्वप्न भंगलं. पण, ती हरली नाही. आजपर्यंत ७० लाखांची वैद्यकीय मदत आणि ४८ लाख रुपयांची आवश्यक साधने अपंगांना उपलब्ध करून देणाऱ्या या दुर्गेचे नाव आहे डॉ. नसीमा हुरझूक. तब्बल ७०० अपंग मुलांना रोजगार मिळवून देईल असा काजू उद्योग त्या सुरु करत आहेत.सविस्तर बातमी

लहानपणापासूनच जागतिक दर्जाची नृत्यांगना होण्याचं स्वप्न होतं आपल्या आजच्या या ‘दुर्गे’चं....
पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात १६व्या वर्षी स्टेजवर बेधुंद नाचली ही परी....आणि...
स्टेज कोसळलं...कमरेखालचं अर्धे शरीर लुळपांगळ झालं...
पण....कोण म्हणतं अपंगत्व म्हणजे सगळ संपतं ?
आज भेटूया कोल्हापूरच्या डॉ. नसीमा हुरझूक यांना.... 
#Bharatiyans

नियतीने तिच्या कपाळी एका खुर्चीला खिळून राहण्याचे दान टाकले..मग तिने स्वतःच स्वतःला पंख लावले....स्वकर्तृत्वाचे..तेजस्वी आकांक्षांचे आणि आता ती आभाळभर झेपावू लागली..तेव्हापासून ते अगदी आजपावेतो....

डॉ. नसीमा हुरझूक. जन्म 2 सप्टेंबर 1950.

जागतिक दर्जाची नृत्यांगना होण्याचे स्वप्न अगदी बालपणापासूनच ती पाहायची. भर दिवस उघड्या डोळ्यांनी पाहिलेले हे स्वप्न पुरे करण्यासाठी दिवसरात्र मेहनत सुद्धा घ्यायची.

तिचं हे नाचण घरी पसंत नव्हतं म्हणून सुरवातीला मस्त मार बसायचा तिला. पण घरकाम, अभ्यास आणि इतर सर्व आघाड्या ती नीट मन लावून कष्टाने सांभाळायची.

त्यामुळे मग हळूहळू घरच्यांचा विरोध मावळला. आता काय? नसीमाला आकाश ठेंगण वाटू लागलं. आता खुलेआम कार्यक्रमात भाग घेता येणार होता म्हणजे नसीमाला स्वर्ग जणू २ बोटांवर आला होता.

पहिला सार्वजनिक कार्यक्रम ठरला आणि त्यासाठी जि’तोड, कसून प्रॅक्टिस केली तिने. विशेष महत्वाचे म्हणजे मुळात तिच्या नाचण्यालाच विरोध असणारे तिचे सगळे कुटुंबीय या कार्यक्रमाला येणार होते. या जगावेगळ्या कलेतलं तिनं संपादन केलेलं तिचं प्राविण्य अनुभवायला....तिचं कौतुक करायला...

आणि ‘तो’ दिवस उगवला. ज्या क्षणाची तिने आजपर्यंत आयुष्भर वाट पहिली होती, जे स्वप्न तिने उराशी जोपासलं होतं, ज्यासाठी अपर कष्ट-मेहेनत घेतली होती, तो क्षण आला.

नसीमा स्टेजवर आली, आणि आपल्या कलेचं सादरीकरण करायला तिने सुरुवात केली, प्रेक्षकवर्ग धुंद झाला, नृत्य ऐन भरात होते आणि काय होतंय ते कळायच्या आधीचं कडाडकन आवाज करत धाडकन स्टेज कोसळलं.

नसीमा जिवंत राहिली खरी हेच तिचं नशीब. राहीली पण कशी???

कमरेखालचं अर्धे शरीर लुळपांगळ झालं होतं. स्टेज वरून कोसळताना पाठीच्या मणक्याला इतका जबरदस्त मार बसला होता की शब्दशः पाठीचा कणा मोडून पडला होता या परीचा.

जागतिक दर्जाची नृत्यांगना व्हायचं होतं या १६ वर्षाच्या फुलपाखराला. पण आता तिच्या स्वप्नांवर हा दैवाचा असा भीषण आघात झाला होता की या एका आघाताने आता तिला स्वतःच स्वतःला कुणा दुसऱ्याच्या आधाराशिवाय साधं कुशीवर पण वळता येत नव्हतं.

मरण हवं होतं आता तिला या दु:स्वप्नातून सुटका करून घ्यायला पण ते मिळवता येईल इतकी सुद्धा हालचाल करण अशक्य झालं होतं.किती ही केविलवाणी अवस्था.

पण देव नेहेमीच , कधीच, कुणालाच निव्वळ दु:ख देत नाही त्यासोबत नेहेमीच तो धैर्य सुद्धा देत असतो, सोबत-साथीदार पाठवत असतो, स्वतःवर विश्वास ठेवलात आणि थंड डोक्याने सहनशीलता वाढवलीत तर या सगळ्यातून तुम्हाला यशस्वी सुद्धा तोच करत असतो.

एक देवदूत आयुष्यात आला तिच्या आणि पुन्हा एक विलक्षण स्वप्नसाखळी सुरु झाली.
बाबुकाका तिच्यासारखेच अपंग गृहस्थ. त्यांनी नसीमला उचलून पैसाअडका अजिबातच नाही दिला पण मुबलक दिले ते कणखर, सुस्पष्ट आणि धैर्यशील विचार, दिली वास्तवातील सद्यस्थिती स्वीकारून त्यातच निर्माण करावयाची नवीन कालसुसंगत स्वप्नं, दिलं तिच्या स्वतःच्या जगण्याचं प्रयोजन ठरवण्याची एक नवीन निधडी दृष्टी.

"मरत नाहीस ना मग जेवढी जगणार आहेस तेवढे दिवस सशक्त जग. तुझे हजारो भाऊ आणि बहिणी आजमितीस अपंगत्वाचा शाप भोगताहेत. त्यांच्यासाठी जग, त्यांच्या डोळ्यात तुझी स्वप्न फुलवं, त्यांच्या आयुष्यात नवीन रंग भर आणि त्यांच्या सोबत जागून तुझे आणि त्यांचे सुद्धा हात बळकट करं." देवदूत म्हणून तिच्या आयुष्यात आलेले बाबुकाका नासिमाला म्हणाले.

आता दिशा ठरली, मार्ग निश्चित झाला, कार्यक्रम मनात तयार झाला, आयुष्याचे ध्येय ठरले... आपल्यासारख्याच आपल्या आजूबाजूला असलेल्या शेकडो-हजारो अपंगांचे पुनर्वसन आणि त्यासाठी स्वतःच स्वतःचे करायचं समृद्ध जीवन.

नसीमादीदी आता बघत होत्या रस्त्यात रांगत किंवा घसटत जाण्याऱ्या अपंगांना, जे कोणाची कीव आणि दयेवर जगात होते, जीवन कंठत होते.

त्यांना आपुलकीची वागणूक मिळायला हवी आणि त्यासाठी त्यांना शस्त्रक्रिया वा उपचार करून उभे करणे गरजेचे होतं. त्यातून ४८ विद्यर्थ्यांना "कॅलिपर" देण्याची कल्पना पुढे आली. त्यासाठी लागणारया ९०,००० रुपयांची देणगी जी संस्था देणार होती त्यांनी काही तात्विक मतभेदामुळे ऐनवेळी तोंडावर सपशेल नकार दिला.

पण नसीमादीदी हरल्या नाहीत, डगमगल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या विविध सेवाभावी संस्थांच्या संपर्कांतून निर्माण केलेल्या जिवाभावाच्या नात्यांना हा प्रश्न सांगितला. मदतीचे हात पुढे झाले आणि आता स्थापन झाली "हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅप्ड". आणि या संस्थेच्या विश्वस्तांनी आता कर्ज काढून या ४८ मुलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे केले .

अनपेक्षितपणे आलेल्या या संकटातून एक उदयोग उभा राहिला. नसीमादिदींनी स्व-बळावर निर्माण केलेली एक विलक्षण महत्वाकांक्षी योजना. अपंगांनी अपंगांसाठीच कृत्रिम साधनं तयार करायची ही ती योजना.

त्वरित जून १९९३मध्ये “अपंगार्थ व्यवसाय प्रशिक्षण केंद्रा”ची स्थापना झाली. नसीमादिदींनी निर्माण केलेल्या आणि विकसित करून दिलेल्या प्रामाणिक आणि अभ्यासू कार्यपद्धतीमुळे दरवर्षी अक्षरशः लाखो रुपयांची साधने या संस्थेमार्फत पुरवली जात असतं. आणि आता तर २०१२ सालपासून महाराष्ट्र शासनाने या संस्थेने तयार केलेली अनेकानेक उत्पादने घेण्यासाठी या संस्थेवर आणि या संस्थेच्या या उत्पादनांवर शिक्कामोर्तब सुद्धा केले आहे.

अशाच विदारक अनुभवातून टक्के-टोणपे खात, धडपडत पुन्हा उभं रहात या संस्थेने उत्कर्षाचा पुढला टप्पा गाठला तेव्हा जेव्हा शासकीय अपंग बालगृहात नससीमादिदींच्या देखत दोन्ही हात नसलेल्या बालकाला प्रवेश नाकारण्यात आला.

यावर सुद्धा मात करत नसीमादिदींनी आता "घरोंदा" हे वसतिगृह उभं करायचा चांग बांधला आणि कालांतराने ते स्वप्न सुद्धा आकाराला आलं.

आज तब्बल २० वर्षाचं झालं आहे ‘घरोंदा’.

नसीमादिदींनी कल्पकतेने एक निर्णय घेतला होता २० वर्षांपूर्वी.

‘घरोंदा’चं उद्घाटन करायला नसीमादिदींनी कुणा धनिकाला अथवा राजकीय पुढार्याला नाही बोलावलं. 
याचं उदघाटन त्यांनी घडवून आणलं त्यांनी "शासनाने प्रवेश नाकारलेल्या, दोन्ही हात नसलेल्या त्या बालकाच्या पायाने फीत सोडून”.

पुढे हाच मुलगा संस्थेचा पहिला सदस्य झाला. हा दोन्ही हात नसलेला मुलगा आज पायाने कॉम्पुटर ऑपरेट करून उत्कृष्ट नोकरी करतो आहे, काखेत बॅट धरून उत्कृष्ट क्रिकेट खेळतो आहे.

या वसतिगृहाचा आजवर ४००० हून अधिक मुलांनी आधार घेतला आहे. पराकोटीचे अपंगत्व असलेली व्यक्ती देखील नसीमादिदींच्या या स्वाधारात स्वावलंबनाने राहू शकते अशी याची स्वयंपूर्ण रचना केली आहे.

यानंतर नसीमादिदींनी संस्थेची स्वतंत्र शाळा हे नवं आव्हान स्वीकारलं. त्यासाठी ५ वर्ष नेटाने झगडून शासनाकडून जागा मिळवली. शासन ऐकत नाही हे पाहून सर्व अपंग मुलांना घेऊन त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिला तेव्हा कुठे ही जागा आणि या शाळेची परवानगी त्यांना शासनाकडून मिळाली.

आणि नंतर उभं राहिलं, बालवाडी ते दहावी, असं समर्थ विद्यामंदिर.

आज "हेल्पर्स फॉर हॅंडीकॅप्ड" मध्ये ३२५ अपंग मुले कार्यरत आहेत. या सगळ्याची त्यांची छान व्यावसायिक उलाढाल आहे.

आजपर्यंत या अपंग मुलांना त्यांनी ७० एक लाखांची वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे, ४८ एक लाख रुपयांची अपंगांना आवश्यक असणारी साधने उपलब्ध करून दिली आहेत, २ कोटी रुपयांची शैक्षणीक मदत आणि वसतीगृह सुविधा साधारण ६ कोटींच्या घरात, व्यवसाय प्रशिक्षण साधारण सव्वा तीन कोटींचे आणि या सगळ्यासाठी साधारण ९ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा त्यांनी विविध मार्गांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.

६५ वर्षांच्या नसीमादिदी आजही तरुणाला लाजवेल अश्या कार्यरत आहेत. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अश्या दोन ठिकाणी त्यांचे उद्योग सुरु आहेत. काजू उद्योगात तब्बल ७०० अपंग मुलांना रोजगार मिळवून देईल असा एक प्लांट या महिन्यात नसीमादिदी सिंधुदुर्गात सुरु करत आहेत.

या मुलांना नुसतेच शस्त्रक्रियेने हातपाय देणे वा पर्यायी कृत्रिम साधने देणे यापेक्षाही मोठे काम दीदींनी केले आहे आणि ते म्हणजे या अपंग मुलांचे मन त्यांनी कणखर बनवलं, त्यांनी या मुला-मुलींना त्याचं आयुष्य स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कर्तुत्वाने कुणाच्याशी आधाराशिवाय जगायला शिकवलं, फुलवायला शिकवलं.

हे सगळ करताना यात त्यांच्यासमोर खूप संकट आली, शासनाकडून आली, प्रशासनाकडून आली, समाजाकडून कधीकधी पराकोटीचा विरोध झाला, पण या सगळ्यांवर आत्मविश्वासाने मात करत नसीमादिदी लढाऊ वृत्तीने यशस्वी झाल्या .

आजही अशा मुलांना जेव्हा त्यांचे स्वतःचे जन्मदाते पालक सुद्धा नाकारतात, तेव्हा दीदी त्यांना जवळ घेतात, आनंदाने त्यांना आसरा, आधार देतात आणि आपले मानून या सगळ्याच मुलांना एक ताकतवान पुनर्जन्म देतात, या मुलांना "दिव्यांग" बनवतात.

यासाठी नसीमादिदीना कैक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र एका समारंभामध्ये पाय नसलेल्या एका बालकाने प्रेमातिशयाने मारलेली गळामिठी हा त्यांचा सर्वोच्च पुरस्कार आहे असे त्या मानतात आणि कदाचित हीच त्यांची या सगळ्यामागची जाज्वल्य प्रेरणा आहे.

या कोल्हापूरच्या भारतीय दुर्गे’ला आम्हा ‘टीम भारतीयन्स’चा सादर प्रणाम.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मधुरा दाते

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

vikipidiya