Bhartiyans

Menu

रेस्टॉरंटमध्ये काम करणारी मुलगी ते सरपंच..! वयाच्या २१ व्या वर्षी झाली रेखा राणी सरपंच..!

Date : 21 Dec 2016

Total View : 132

चंदिगढच्या एका फास्ट फुड रेस्टॉरंटमध्ये काम करणारी रेखा राणी वयाच्या २१ व्या वर्षी चापला मोरी गावाची सरपंच म्हणून निवडून आली.


सारांश

कोणाच्या आयुष्याला केव्हा कलाटणी मिळेल हे सांगता येत नाही. तसंच काहीसं रेखा राणीबाबत घडलं. रेखा राणी. चंदिगढच्या एका फास्ट फुड रेस्टॉरंटमध्ये काम करणारी ही मुलगी. नुकतीच एका खेड्याची सरपंच म्हणून निवडून आली. तेही वयाच्या २१ व्या वर्षी..! एका दिवसात रेखाच्या जीवनाला कलाटणी मिळाली. तिच्या जीवनाचं ध्येय आणि जगण्याचं प्रयोजन बदललं.... हे कसं झालं असेल, तुम्ही स्वत:च वाचा..!सविस्तर बातमी

कोणाच्या आयुष्याला केव्हा कशी कलाटणी मिळेल सांगता येत नाही. 
आपण म्हणतो,”रात्रीत चित्र बदललं.” 
तसंच काहीसं रेखा राणीबाबत घडलं....तिच्या जीवनाचं ध्येय आणि जगण्याचं प्रयोजन बदललं...
चंदिगढच्या एका फास्ट फुड रेस्टॉरंटमध्ये काम करणारी ही मुलगी नुकतीच एका खेड्याची सरपंच म्हणून निवडून आली. 
तेही वयाच्या २१ व्या वर्षी..!
#Bharatiyans

बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या रेखा राणीने ‘दिनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास’ योजनेतून २ महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. त्यातूनच तिला चंदिगढमध्ये एका फास्ट फुड रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळाली. 
ग्राहाकांच्या ऑर्डर्स घेणं आणि त्यानुसार त्यांना खाद्यपदार्थ देणं हे काम ती करते.

पण गेला रविवार तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा दिवस ठरला. 
चापला मोरी या चंदिगढमधल्या एका खेड्याची सरपंच म्हणून ती निवडून आली. चापला मोरी आणि इतर दोन खेड्यांना मिळून एकच ग्रामपंचायत आहे.

रेखा तिच्या कुटुंबातील आणि तिच्या गावातील पहिलीच सरपंच आहे.

चापला मोरी गावाचे सरपंचपद यावेळी अनुसूचित जातींच्या महिलांसाठी राखीव होतं. शासनाच्या नियमानुसार कमीतकमी १२ वी पास असलेले उमेदवार या पदासाठी पात्र ठरणार होते.

रेखा सर्व नियमात बसत होती. शिवाय समाजकार्याची ओढ तिला होती. तिच्या कुटुंबाचा देखील पूर्ण पाठींबा होता. खरं तर तिचे वडील बन्सीलाल यांनीच तिला उमेदवारी अर्ज दाखल करायला प्रोत्साहन दिलं.

अर्ज दाखल झाल्यावर तिच्या कुटुंबाने जोरदार प्रचार सुरू केला. रेखाची प्रतिमा गावात चांगली असल्याने, तिच्याविषयी सर्वांना आदर असल्याने भरघोस मतांनी ती निवडून आली.

६१० मते मिळवून रेखाने तिची प्रतिस्पर्धी निर्मल हिचा २२० मतांनी पराभव केला.

रेखाचे वडील बन्सीलाल यांना आपल्या मुलीचा सार्थ अभिमान आहे. सर्व मुलींनी स्वावलंबी व्हावं, या मताचे ते आहेत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेत देखील त्यांचा सहभाग आहे.

रेखा राणीने खूप जबाबदारीने हे काम आता स्वीकारलं आहे.

तिच्या खेड्यातील मुलांना शिक्षणासाठी शेजारील गावात जावं लागतं. त्यामुळे बरेच पालक त्यांचं शिक्षण बंद करतात. 
हे प्रकार थांबवण्यासाठी, गावातील लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी ती प्रयत्न करणार आहे. 
तसंच स्वतःचही पदवीचं शिक्षण सुध्दा आता ती पूर्ण करणार आहे.

ग्रामीण भागातील मुली मागे राहतात, अशी आपल्यापैकी अनेकांची समजूत असते. 
पण, रेखाने ती खोडून काढली.

रेखाने एक सरपंच म्हणून आणि एक सजग ‘भारतीय’ म्हणून देशाची मान ताठ राहील असेच कार्य करावे, यासाठी तिला टीम भारतीयन्सकडून खूप खूप शुभेच्छा..!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

indian express