Bhartiyans

Menu

मृत्युशी हस्तांदोलन करून आलेला ‘स्वप्नील’ देतो आहे इतरांना जगण्याचे बळ

Date : 21 Dec 2016

Total View : 356

झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा विचार करणारा निराश मुलगा ते वयाच्या २५ व्या वर्षी फोर्ब मार्शलच्या बदल घडविणाऱ्या व्यावसायिकांच्या यादीत नाव झळकलेल्या स्वप्नील तिवारीचा झंझावाती प्रवास, जाणून घेउया!


सारांश

चित्रपटासारखे कथानक जीवनात अनुभवणारा कोण हा स्वप्नील..? एके काळी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा विचार करणारा निराश मुलगा ते वयाच्या २५ व्या वर्षी फोर्ब मार्शलच्या यशस्वी आणि बदल घडविणाऱ्या व्यावसायिकांच्या यादीत स्वत:चे नाव झळकवणारा कोण हा स्वप्नील..? चला, जाणून घेउया, ‘मरणासाठी जन्म माझा’ असे म्हणत १५० हताश लोकांना जगण्याची नवी दिशा आणि प्रेरणा देणाऱ्या स्वप्नीलविषयी..!सविस्तर बातमी

तुम्ही मृत्युला पाहिलंय? जवळून थेट? आणि त्यावर विजय मिळवून सुपर-डूपर यशस्वी झालेला माणूस पाहिलाय?

स्वप्नीलने, आपल्या आजच्या कथेच्या या सुपर-नायकाने या मृत्युला अनेकदा जवळून पाहिलं आहे . 
इतकं जवळून, की ‘मृत्यू’च त्याचा ‘दोस्त’ झाला.

चित्रपटासारखे कथानक जीवनात अनुभवणारा कोण हा स्वप्नील..?

एके काळी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा विचार करणारा निराश मुलगा ते वयाच्या २५ व्या वर्षी फोर्ब मासिकाच्या यशस्वी आणि बदल घडविणाऱ्या व्यावसायिकांच्या यादीत स्वत:चे नाव झळकवणारा कोण हा स्वप्नील..? 
चला, जाणून घेउया,

‘मरणासाठी जन्म माझा’ असे म्हणत १५० हताश लोकांना जगण्याची नवी प्रेरणा देणाऱ्या स्वप्नीलविषयी..!
स्वप्नीलला लिहिण्या-वाचण्यात अडचणी येत असल्याने त्याचे अभ्यासात फारसं लक्ष नव्हतं. 
त्यातच तो १३ वर्षांचा असताना त्याच्या वडीलांचे निधन झाले. 
स्वप्नील या धक्क्याने अधिकच खचला.

त्याला झोपेच्या गोळ्या घ्यायची सवय लागली. मृत्यू जवळचा वाटू लागला.

पण, एक दिवस मनात विचार आला की, माझे हात, पाय काम करत आहेत, श्वास चालू आहे, माझ्या शरीराला जगायचे आहे, मग असं असताना त्याला मारण्याचा अधिकार मला कोणी दिला?

आता मात्र स्वतःला एक संधी द्यायची, असं त्यानं ठरवलं.

त्या दिवसानंतर मात्र स्वप्नीलमध्ये आमुलाग्र बदल झाला. त्याने शिक्षणात लक्ष घातलं. मेहनत करून तो एम.बी.ए. झाला. 
पुढे बँक ऑफ इंडिया आणि अगदी रिझर्व बँकेत सुद्धा त्याने नोकरी केली.

पण नोकरीत त्याचं मन रमत नव्हतं. काहीतरी वेगळं करायची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. 
मग त्याने आदिवासी कला जोपासण्याच्या दृष्टीने सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम सुरु केला.

एके दिवशी एका आदिवासी पाड्यावरून आलेल्या एका फोनने मात्र त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली..!

कोणाचा होता तो फोन..?

आदिवासी वस्तीतून एका छोट्या मुलीने स्वप्नीलला फोन केला होता आणि ती सांगत होती, की ‘तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. घराची अवस्था अतिशय बिकट आहे. गावाचा प्रमुख रोज रात्री आईला घेऊन जातो आणि सकाळी आणून सोडतो.’ 
या फोनने तो विचारात बुडाला.

या मुलीला काय आणि कशी मदत करावी हे त्याला सुचत नव्हतं. मुलीचा आवाज मात्र कानात घुमत होता आणि जाणवत होती ती फक्त स्वतःची असहाय्यता.

"असे अनेक प्रश्न या आदिवासींना भेडसावत असतील. मी प्रत्येकाला सहाय्य नाही करू शकत. पण प्रयत्न करू शकतो ना." या विचाराने स्वप्नील अंतर्बाह्य बदलला.

त्याने नोकरी सोडली आणि तो थेट ‘मधुबनी’ नावाच्या आदिवासी पाड्यात आला त्या कुटुंबाची सुटका करायला.

अगदी नक्षलवाद्यांकडून मिळणाऱ्या धमकी, त्यांनी स्वप्नीलचे केलेलं अपहरण आणि त्याला केलेली अमानुष मारहाण हे सगळ त्याने सहन केलं.

स्वप्नीलने किती त्रास सहन केला असेल हे त्याच्या शरीरावरच्या नक्षलवाद्यांच्या मारहाणीच्या वळांवरूनच लक्षात येतं होतं. 
पण, तो घाबरला नाही.

नक्षलवादी त्याचा छळ करून बाहेर गेले की, स्वप्नील नक्षलवाद्यांच्या मुलांनाच शिकवायचा आणि तिथल्या महिलांना स्वच्छतेचे धडे द्यायचा.

हळूहळू बदल होऊ लागला. नक्षलवाद्यांना कळून चुकलं, की त्यांनी एका चांगल्या माणसाचं अकारण अपहरण केलं आहे.

शेवटी नक्षलवाद्यांनी त्याची त्यातून सुटका केली. आता रानटी नक्षलवादी सुद्धा त्याला स्वीकारायला लागले होते.

आज त्यातीलच एक नक्षलवादी स्वतःची चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करतो आहे. स्वतःच्या मुलांना शिक्षण देतो आहे.

स्वप्नीलने त्या वस्तीतल्या सोडवलेल्या मुलीला आणि तिच्या आईला दिल्लीला आणलं. त्यांची ‘मधुबनी’ कलाच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे, याची जाणीव त्यांना करून दिली. त्यांना ते काम करायला प्रवृत्त केलं.

२०११ मध्ये त्याने स्वतःची ‘नेक्ड कलर्स’ नावाची कंपनी सुरु केली. कंपनीचा मूळ उद्देश आदिवासी चित्रकला लोकांपर्यत पोहोचवणे आणि त्याचा फायदा आदिवासी बांधवाना करून देणे हा होता.

स्वप्नीलने कंपनीला होणाऱ्या नफ्याचे ३ भाग केले. एक भाग आदिवासी कलाकाराला, एक भाग कंपनी चालवण्यासाठी आणि एक भाग अनाथ मुलांसाठी.

मधुबनी, तंजावर आणि गौंड आदिवासी लोकांच्या चित्रकलेला लोकांच्या समोर आणल्यावर त्याला अजून काहीतरी वेगळे करायची इच्छा होती. त्याला आदिवासी पाड्यातील नक्षलवादींचा हस्तक्षेप मोडून काढायचा होता. आदिवासींना मूळ प्रवाहात आणायाचे होते. त्यामुळे एका आदिवासी वस्तीत जाऊन स्वतः संशोधन करण्याचे त्याने ठरवले.

अवघड काम करायचे हाच माझा मूलधर्म असल्यामुळे मी हे ठरवले असे स्वप्नील सांगतो.

त्याच्या २३ व्या वर्षी तो प्रथम आदिवासी पाड्यात गेला. तेथील खूप वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी घेऊन दिल्लीला परत आला. महिलांची सुरक्षा करणाऱ्या एका यंत्राची निर्मिती करण्यास त्याने सुरुवात केली आणि ‘द पिंक व्हिसल प्रोजेक्ट’ हे यंत्र आकारास आले.

हे महिलांच्या मनगटावरील असे ब्रेसलेट होतं की ज्यावरील बटन दाबले, की २ इंच चाकू बाहेर येईल आणि तो समोरच्यावर वार करेल.

या यंत्रांचा नमुना तयार असून त्याला व्यावसायिक पातळीवरील व्यवस्थापन आणि विक्रीची सध्या गरज आहे.

असे विविध विषयावर काम करत असतानाच स्वप्नील दिल्लीच्या वेश्यावस्तीतील महिलांसाठी काम करू लागला. तो या महिलांना वागणुकीचे मानसशास्त्र, सकारात्मक विचार करण्याच्या पद्धती यांची शिकवण देतो आहे.

स्वप्नीलने आतापर्यंत १५० लोकांचे प्राण वाचवले आहेत, मानसिक उदासीनतेमुळे ज्यांनी मरणाला जवळ करण्याच्या विचार केला त्यांना स्वप्नीलने सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा देऊन जगण्याचा नवा मार्ग दाखवला आहे.

त्याच्या या अमोघ कार्यामुळेच वयाच्या २५ व्या वर्षी त्याची फोर्ब मासिकाच्या यशस्वी आणि बदल घडविणाऱ्या व्यावसायिकांच्या यादीत वर्णी लागली.

सध्या तो बिल आणि मलिंदा गेट्स यांच्या एचआयव्हीला प्रतिबंध घालण्यावर काम करणाऱ्या संस्थेसाठी काम करतो आहे.

यासाठी त्याने स्वत:च्या एचआयव्ही आणि एसटीडीसाठी तोंडावाटे घेता येणाऱ्या गर्भ निबंधक औषधाची निर्मिती केली आहे.

त्याच्या कामाची दखल अनेक संस्था घेत आहेत. अनेक ठिकाणी व्याखानांसाठी त्याला बोलावलं जातं.

महत्वाचं म्हणजे ज्या शाळेने त्याच्यातील वाचन-लिखाणाच्या कमतरतेमुळे त्याला प्रवेश नाकारला होता. त्याच शाळेने त्याला व्याख्यानासाठी बोलवले होते.

‘जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय काय’ असं माझ्या बाबतीत होऊ नये. मी गेल्यावरही लोकांनी मला माझ्या कामासाठी लक्षात ठेवावे, हीच आपल्या जीवनाची प्रेरणा असल्याचे स्वप्नील सांगतो.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

motivateme.in