Bhartiyans

Menu

हैद्राबादच्या रस्त्यांवरील ११३५ खड्डे बुजवणारे ‘रिटायर्ड बट नॉट टायर्ड’ आजोबा..!

Date : 21 Dec 2016

Total View : 170

निवृत्तीनंतर स्वत:च्या खर्चाने आणि स्वत: मेहनत करून हैद्राबादच्या रस्त्यांवरील ११३५ खड्डे बुजवणारे हैद्राबादचे गंगाधर टिळक कान्तम.


सारांश

खड्डे.... हा शब्द उच्चारला तरी गाडी खड्ड्यातून जाताना होतो तसा त्रास होतो की नाही? खड्डे बुजवण्याची जबाबदारी पालिकेची म्हणून असं म्हणून आपण हात वर करून चिडचिड करत असतो. पण, रेल्वेमधून अभियंता म्हणून निवृत्त झालेले हैद्राबादचे गंगाधर टिळक कान्तम यांनी निवृत्तीनंतर स्वत: खड्डे बुजवायला सुरुवात केली आणि पहाता पहाता त्यांनी ११३५ खड्डे बुजवले....! वाचूया, त्यांची कहाणी..!सविस्तर बातमी

तुम्ही कुठेतरी गडबडीने गाडी काढून निघता... तुमची गाडी तुम्हाला न दिसलेल्या खड्यात जोरदार आदळते...तुमच्या पाठीचे मणके गचकून ढील्ले होतात, तुम्ही मनातल्या मनात शिव्या मोजता आणि...
..........आणि तुम्ही पुढे निघून जाता...

हे जे आपण पुढे निघून जातो ना त्यामुळेच वर्षानुवर्षे हे खड्डे असेच राहतात, 
शेकडो जणांचे जीव घेतात आणि हजारो जणांना कायमस्वरूपी पाठीचे आजार मागे लावतात....

पण, हैद्राबादच्या गंगाधर टिळक कान्तम यांनी निवृत्तीनंतर नुसती चिडचिड न करता, कुणाच्याही मदतीची अपेक्षा न करता स्वतःच्या खिशाला चाट लावून स्वत:च हे खड्डे बुजवायला सुरुवात केली...

पुढे काय झालं, तुम्ही स्वत:च वाचा...!

हैद्राबादच्या रस्त्यांवरील ११३५ खड्डे बुजवणारे ‘रिटायर्ड बट नॉट टायर्ड’ आजोबा..!

निवृत्ती.... थांबण्याची वेळ..आणि आरामदायी आयुष्याची सुरुवात.

पण, कार्यमग्न आणि कृतीशील व्यक्तींना हे थांबणं नको वाटतं. मग यातूनच नवनवीन संकल्पना निवृत्ती व्यक्तींकडून राबवल्या जातात. कोणी स्वत:च्या छंदाला वेळ देतं तर कोणी समाजकार्य करतं.

हैदराबादचे गंगाधर टिळक यांनी असंच समाजकार्य केलं. 
पण केवळ कोणत्यातरी संस्थेला निधी देऊन नाही. तर, स्वत:च्या श्रमदानातून !

रेल्वेमधून अभियंता म्हणून निवृत्त झालेले गंगाधर यांनी चक्क हैद्राबादच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवाण्याचं काम सुरू केलं आणि पहाता पहाता त्यांनी ११३५ खड्डे बुजवले....! 
वाचूया, त्यांची कहाणी..!

आपल्यापैकी अनेक जण रोज सकाळी नोकरीवर जातात आणि संध्याकाळी घरी परततात. अनेक वर्ष हे चक्र सुरू असतं आणि अचानक तो दिवस येतो..! निवृत्तीचा...!

उद्यापासून आपण यातून बाहेर पडणार, निवृत्त होणार ही जाणीव होते. मोकळा वेळ कसा घालवायचा असे प्रश्न निर्माण होतात. 
आणि याच प्रश्नावर हैद्राबादचे ज्येष्ठ नागरिक गंगाधर टिळक कान्तम यांनी आपल्या सर्वांच्याच डोळ्यांत अंजन घालणारं उत्तर शोधून काढलं..!

गंगाधर यांनी स्वत:च्या खर्चाने, स्वत: मेहनत करून हैद्राबादच्या रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे बुजवायचं ठरवलं. पेन्शनचा उपयोग ते या कामासाठी करतात. रेल्वेमधून अभियंता म्हणून निवृत्त झालेले गंगाधर 
 यांनी आतापर्यंत ११३५ खड्डे बुजले आहेत.

गंगाधर सांगतात,‘मी सकाळी ६ वाजता उठतो.त्यानंतर कारमध्ये सिमेंट, डांबर इतर आवश्यक साधने 
घेऊन बाहेर पडतो. जिथे खड्डा दिसेल तिथे ‘काम सुरु’ असा फलक लावतो आणि तो खड्डा बुजतो. सुरुवातीला मला असं वाटलं की, मी एकटा शेकडो खड्डे कसे बुजु शकतो? 
पण मी निर्धाराने सुरुवात केली. प्रत्येक आठवड्यात मला सुमारे ६ ते ८ हजार रुपयांचं बांधकाम साहित्य आणि इंधन लागतं. 
पण, हे सर्व मी आवड म्हणून करतो.

हा विचार गंगाधर यांना एका प्रसंगातून सुचला. 
एकदा गंगाधर कामावरून घरी परतत असताना त्यांची कार एका खड्ड्यातून गेली आणि जवळच खेळत असलेल्या लहान मुलांच्या अंगावर चिखल उडाला ! 
गाडीचे काही भाग देखील खराब झाले. त्यांना याचं वाईट वाटलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला.

सुरुवातीला त्यांच्या पत्नीला काळजीपोटी हा निर्णय मान्य नव्हता, पण मुलाने समजावल्यानंतर त्या तयार झाल्या. गंगाधर यांच्या मुलाने त्यांना आर्थिक व तांत्रिक मदतही केली.

त्यांचे काम पाहून २०१२ पासून हैद्राबाद पालिकेने त्यांना बांधकाम सामानाचा खर्च द्यायला सुरुवात केली. काही विद्यार्थी देखील मदतीला आले. गंगाधर स्वत:हून कोणाची मदत मागत नाहीत. जे मदतीचा हात पुढे करतात. त्यांचे स्वागतच असते.

स्वयंप्रेरणा आणि श्रमदान हेच गंगाधर याच्या कामाचे रहस्य आहे. 
कितीतरी जणांच्या आनंदात त्यांचा आनंद सामावला आहे.

हे वाचून आपणही असे काही करू शकतो का? 
याचा विचार सुरू झाला ना... मग तसा विचार करा आणि लगेच कामाला सुरुवात करा.

कारण, शुभस्य शीघ्रम !

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

टीम भारतीयन्स

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

lokmarg