Bhartiyans

Menu

तिमिरातुन तेजाकडे : भाग – ५ आधी एक शिकारी आणि आता ५०० मुलांचा पालनकर्ता, शिक्षक !

Date : 27 Dec 2016

Total View : 442

मतीन भोसले या एका फासेपारधी समाजातील शिक्षकाच्या मनात याच समाजातील मुलांसाठी काहीतरी करण्याका विचार आला आणि ५०० मुलांची आश्रमशाळा त्यांनी सुरू केली. शिकारी असलेल्या भोसले यांनी हे कसं केलं?


सारांश

सिग्नलवर भीक मागणारी, फुले विकणारी मुले पाहतो किंवा ‘अल्पवयीन चोरट्यांना पकडले’ अशा बातम्या आपण वाचतो तेव्हा या मुलांसाठी आपल्या मनात काय येतं ? कीव किंवा ‘अरे, यांचे आई-वडीलच असे असतात, यांचा काय दोष?’ इतकंच ! पण, यांना शिकवावं हा विचार येत नाही. मतीन भोसले या फासेपारधी समाजातील शिक्षकाच्या मनात हा विचार आला आणि त्याने ५०० मुलांची आश्रमशाळा सुरू केली.सविस्तर बातमी

आपण गाडीने कुठे तरी जात असताना सिग्नल लागतो... आपण थांबतो...

लगेचच भीक मागणारी, फुले विकणारी, गाडी पुसणारी मुले येतात. तेव्हा....किंवा ‘अल्पवयीन चोरट्यांना पकडले’ अशा बातम्या आपण वाचतो तेव्हा...या मुलांसाठी आपल्या मनात काय येतं..?

कीव, दया किंवा ‘अरे, यांचे आई-वडीलच असे असतात, यांचा काय दोष यात..’ असे विचार इतकंच....!

पण, या मुलांना बोटाला धरून शिकवावं हा विचार आपल्या मनात सहसा येत नाही. मतीन भोसले या फासेपारधी समाजातील शिक्षकाच्या मनात हा विचार आला.

त्याने एक, दोन नाही तर बघता बघता ५०० मुलांची आश्रमशाळा सुरू केली... 
मुळचे शिकारी असलेले भोसले ५०० मुलांचे पालक कसे झाले...? चला बघुया..!

आधी एक शिकारी आणि आता ५०० मुलांचा पालनकर्ता, शिक्षक !

फासेपारधींवर आजही आपल्या समाजाचा तेवढाच राग आणि संशय आहे. कुठे काहीही छोटा-मोठा गुन्हा घडला की संशयाची सुई आधी त्यांच्याकडे वळते.

पिढ्यांपासूनचे अज्ञान, दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, शहरीकरण यांच्याशी फारसा संबंध नसलेला असा हा समाज. रान डुक्कर, नीलगायी, पक्षी यांची शिकार करणे हा त्यांचा पारंपरिक उद्योग आणि मुख्य व्यवसाय.

आता सरकारने शिकारीवर निर्बंध घातल्यावर कचरा, प्लास्टिक गोळा करणे, रेल्वे स्टेशनवर भीक मागणे, कटलरीच्या वस्तू विकणे, प्रसंगी भुरट्या चोऱ्या करणे, मारामारी करणे यातच या मुलांचं आयुष्य जातं.

आई वडील व्यसनी, अशिक्षित, पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करणारे ते या मुलांवर काय आणि कसे संस्कार करणार? 'देवाची कृपा' म्हणून जन्माला आलेला अजून एक कमावणारा हात इतकीच काय त्याची ओळख !

अशीच ओळख घेउन एका फासेपारधी कुटुंबात जन्मला आलेले मतीन भोसले. पण त्यांनी स्वत:ला वेगळी ओळख प्राप्त करून दिली. भोसले यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा या गावी झाला.

जन्माला येतानाच फासेपारध्याचा शिक्का आणि गरिबी त्यांनी बरोबर आणली होती. वडील शिकार करायचे. रोज शिकार मिळायचीच असं नाही.

गावाबाहेर त्यांचे झोपडे, गावात येण्याची बंदी.... गावात लग्न असेल तेव्हा उरलेलं, फेकलेल्या पत्रावळीवरील अन्न खाऊन दिवस काढायाचे निघायचे. अनेक वेळा उपाशीच झोपत असे. कधी कधी वडील एखाद्याच्या शेतातून कणीस तोडून आणायचे.

अशातच एक दिवस एका शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीवरून वडील, आजोबा आणि इतर नातेवाईकांना अटक झाली होती. पाच-सहा महिने तुरुंगात होते सर्वजण. तिथून बाहेर पडल्यावर भोसले यांच्या वडिलांनी त्यांना शाळेत घातले.

भोसले यांना शिक्षणाची फार आवड नव्हती. ते देखील शिकारीत रमत. रडतखडत कसे तरी ते आठवी पर्यंत आले. नंतर, समज आली आणि मग मात्र मतीन यांना अभ्यासाची गोडी लागली. दहावीत ५५% मिळवून ते पास झाले.

बारावीनंतर सी.आर.एफमध्ये नोकरी लागली पण तिथेही त्यांचे मन रमले नाही. अमरावतीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाल्यावर त्यांनी बी.ए आणि बी.एडपर्यंतच शिक्षण घेतलं.

शिक्षणाने आयुष्य बदलू शकते, हे त्यांना कळालं. परंतु, नोकरी करणारा माणूस फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो. फक्त त्याचेच आयुष्य बदलू शकते.

पण, मग आपल्यासारख्या अनेक फासेपारध्यांचे आयुष्य बदलायला हवे त्यांना मानाने, कष्ट करून जगता यावे यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या विचाराने त्यांना भंडावून सोडले आणि त्यातूनच जन्म झाला 'प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमा’चा.

या मुलांसाठी भोसले यांनी काय नाही केले? शिक्षण आणि राहण्याच्या व्यवस्थेसाठी 'भीक मांगो' अभियान सुरू करण्यापासून ते प्रशासकीय यंत्रणा आणि थेट राष्ट्रपती यांच्यापर्यंत सर्वांकडे मदतीसाठी हात पसरले. पण पदरी निराशेशिवाय काहीही येत नसे. या आंदोलनामुळे त्यांना व त्यांच्या बरोबरच्या मुलांना, कार्यकर्त्यांना अटक देखील करण्यात आली.

पण, भोसले हरले नाही. खचले नाही. जेलमध्येच त्यांनी शाळेचे उदघाटन केले. नंतर या मुलांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. जेलमध्ये उपोषण सुरु झाले. त्यामुळे त्यांची तब्बेत खराब झाल्याने त्यांना सोडण्यात आले.

बाहेर आल्यावरही आंदोलन चालू ठेवत समाजाच्या सर्व घटकांशी लढा देत त्यांनी एकट्याने ही खिंड लढवली आणि आकाराला आली 'प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा'.

मंगरूळ चव्हाळ्यात अगदी मुख्य रस्त्याच्या बाजूलाच एका हॉलमध्ये ही शाळा भरते. तिथेच एका कोपऱ्यात अन्न शिजवले जाते. शिकणे, खाणे आणि झोपणे हे सारे एकाच हॉलमध्ये होते.

रात्री हॉलमध्ये मुंगी शिरायलाही जागा राहत नाही. स्वत: मतीन सर अनेक मुलांसह बाहेर व्हरांडय़ात झोपतात. आठवडय़ाला दोन क्विंटलच्या वर धान्य लागते. तेल, मीठ-मिरची, भाजीपाला हे वेगळे.

मदत मिळते पण ती फार तोकडी पडते. त्यामुळे सर्वांनी उपाशी झोपण्याची सवय करून घेतली आहे, नव्हे ती त्यांना लागलीच आहे. शिक्षणासोबतची ही लढाई आता अंगभर कपडे, राहायला निवारा आणि पोटभर अन्न यासाठी देखील सुरू आहे. कारण रिकाम्या पोटी ही मुले शिकणार कशी?

कचरा, भंगार गोळा करणारी, भीक मागणारी, शिकार करणारी, पाकीटमारी करणारी ही सर्व मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या मदतीला १०-१५ कार्यकर्ते आहेत. वय वर्षे ५ ते १६ या वयोगटातील ही मुले येथेच शिकतात आणि राहतात.

यातील लहान मुलांना अंघोळ घालण्यापासून कपडे बदलण्यापर्यंत अशी त्यांची सर्व कामे करावी लागतात. एक पैसा एवढेही मानधन न घेता नऊ शिक्षक या मुलांना शिकवितात. यांपैकी तीन शिक्षक फासेपारधी समाजातलेच आहेत.

त्यामुळे त्यांच्या बोलीभाषेतून ते मुलांना शिकवू शकतात. याची मुलांना देखील मदत होते. या मुलांसाठी वाहून घेतलेल्या या शिक्षकांना द्यायला मतीनकडे मात्र एक पैसाही नाही. जिथे पोट भरण्याची भ्रांत तिथे पगार काय देणार?

सध्या या शाळेत ५०० विद्यार्थी आहेत. मात्र, या शाळेला मान्यता मिळत नाहीये. या आश्रमशाळेला मान्यता मिळावी म्हणून मतीन यांनी जिल्हाधिकाऱ्यापासून मंत्र्यांर्पयत सर्वांची भेट घेतली. पण, आश्वासनाशिवाय त्यांच्या हाती काहीही पडले नाही.

या शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन 22 विद्यार्थ्यांची एक बॅच बाहेर पडली आहे. यातल्या काहींना लष्करात जायचे आहे. दोघेजण आयपीएसची तयारी करत आहेत. दोघांना पोलीस व्हायचे आहे. फासेपारधी ते देशरक्षक होण्याचे स्वप्ने बघणाऱ्या या मुलांचा हा प्रवास.... ज्याला आपण केवळ ‘परिवर्तन’ आणि ‘जिद्द’ हेच नाव देऊ शकतो.

मतीन भोसले यांचा प्रवास येथेच थांबलेला नाही. 
पण, हा प्रवास असाच सुरू रहावा यासाठी त्यांना गरज आहे ती आपल्या सर्वांच्या ओंजळभर मदतीची.

‘भारतीयनस्य’च्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या सदरातून मी आपल्या सर्वाना मदतीचे आवाहन करते. आपण कोणत्याही स्वरूपाचे काम किंवा मदत करू इच्छित असाल तर ०९९२३३६५११७ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा https://www.facebook.com/548049045284715/info या फेसबुक पेजवर संपर्क साधावा ही विनंती .

धन्यवाद !

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

वैशाली सागर - देवकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य