Bhartiyans

Menu

‘सोच बदलो, देश बदलेगा’ हे आपल्या कृतीतून सिद्ध करणारी आय.आय.टी.ची विद्यार्थिनी सलोनी मेहता!

Date : 31 Dec 2016

Total View : 174

‘सोच बदलो, देश बदलेगा’ हे भारत सरकारच्या बदल घडवण्याच्या मोहिमेचे ब्रीदवाक्य आहे आणि ते किती प्रभावी आहे, हे सलोनी मेहता, या आय.आय.टी.पवई, मुंबईच्या विद्यार्थिनीने आपल्या कृतीतून दाखवून दिलं.


सारांश

अभ्यासाचा एक भाग म्हणून पवईच्या आय.आय.टी. कॅम्पस समोरील स्काय-वॉकचा वापर कोणी का करत नाही, याचा शोध सलोनीने घेतला. मात्र, त्यामागची कारणे समजल्यानंतर तिने आपले मित्र-मैत्रिणी, शिक्षक, नागरिक आणि बी.एम.सी. यांच्या मदतीने याच स्कायवॉकचा कायापालट केला. नियमित स्वच्छता, पुरेसा उजेड, सुशोभीकरण आणि गैरप्रकारांना आळा यामुळे या ओस पडून असलेल्या स्कायवॉकचा लोक आता नियमित वापर करत आहेत.सविस्तर बातमी

‘सोच बदलो, देश बदलेगा’ हे आपल्या कृतीतून सिद्ध करणारी आय.आय.टी.ची विद्यार्थिनी सलोनी मेहता!

‘सोच बदलो, देश बदलेगा’ हे भारत सरकारच्या बदल घडवण्याच्या मोहिमेचे ब्रीदवाक्य आहे आणि ते किती प्रभावी आहे, हे सलोनी मेहता, या आय.आय.टी.पवई, मुंबईच्या विद्यार्थिनीने आपल्या कृतीतून दाखवून दिलं.

मुंबईमधील ‘स्काय वॉक’ हे दिसायला अत्यंत देखणे आहेत. मात्र, त्यांची योग्य देखभाल न झाल्यास गैरवापर देखील होतो. अनेक मोठ्या पुलांखाली, फ्लायओव्हर्सच्या खालील मोकळ्या जागेत हळूहळू अनधिकृत गोष्टी सुरु होतात.

असाच एक स्काय–वॉक आय.आय.टी.,पवई समोर होता. ज्याची योग्य देखभाल न झाल्याने आणि दुरुपयोग होऊ लागल्याने, त्याचा कोणी वापर करेनासं झालं. कोट्यवधींच्या निधीचा चुराडा झाला पण जनतेला त्याचा उपयोग नाही.

सलोनी मेहता या विद्यार्थिनीच्या ते लक्षात आलं. सलोनी आय.आय.टी.पवई मध्ये ‘इंडस्ट्रीअल डिजाईन’ या विषयात पदाव्यूतर पदवीचे शिक्षण घेते आहे. बिहेवियर चेंज या विषयात प्रोजेक्ट करताना, आय.आय.टी. कॅम्पस समोरील स्काय–वॉकचा वापर का होत नाही यावर अभ्यास करायची संधी तिला मिळाली.

आय.आय.टी. समोरील रस्ता हा प्रचंड रहदारीचा आहे. तेथे पायी चालणाऱ्या लोकांना रस्ता ओलांडणे आणि चालणे सोयीचे व्हावे, म्हणून बृहन्मुम्बई पालिकेने एक स्काय-वॉक बांधला. पण, लोक त्याचा वापर न करता, जीव धोक्यात घालून, रस्ता ओलांडतात. यामुळे अपघातही होतात.

सलोनीने याबाबत काही नागरिकांशी चर्चा केल्यावर तिच्या असं लक्षात आलं, की यामागे काही कारणे आहेत. स्काय-वॉक अत्यंत अस्वच्छ स्थितीत असतो, तिथे पुरेसा उजेड नसतो, काही लोक तिथे जुगार खेळतात, दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात, घाण वास येतो, महिलांना सुरक्षित वाटत नाही अशा अनेक कारणांमुळे स्काय-वॉक चा वापर होत नाही.

सलोनीने यावर काम करण्याचे ठरवले. तिने स्काय-वॉकचा ‘मेकओव्हर’ करायचे ठरवले. हे सोपे काम नव्हते. तिने यासाठी आय.आय.टी. कम्युनिटीची मदत घेतली. सर्वांनी मिळून हा स्काय–वॉक पुन्हा वापरात येण्यासाठी प्रयत्न करूया अशी विनंती केली. आय.आय.टी. कम्युनिटी बरोबरच तिने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी पोस्टर्स लावले. यामुळे काही नागरिक देखील या उपक्रमात सहभागी झाले.

इतकेच नाही, तर तिने यासाठी पालिकेला देखील मदतीचे आवाहन केले. त्यामुळे पालिकेने आवश्यक तिथे दुरुस्ती केली, लाईट बसवले. त्यानंतर सलोनी आणि तिच्या ग्रुपने मेकओव्हर चे काम हाती घेतले. २३ ऑक्टोबरला या कामाला सुरुवात झाली.

सलोनी आणि तिच्या मित्रमैत्रिणीनी काही रक्कम गोळा केली, आणि त्यातून ब्रश, रंग, इ. सामान आणले. त्यानंतर आय.आय.टी.चे ३५ विध्यार्थी, शिक्षक, आणि काही स्थानिक लोक या स्काय–वॉक सुशोभिकरणाच्या कामात गढून गेले. यामध्ये १० वर्षांचा एक चिमुरडा, इयत्ता ९ वीतील एक विद्यार्थिनी आणि आय.आय.टी. १९६९ च्या बेचमधील एक माजी विद्यार्थी देखील सहभागी झाले.

सलोनी आणि या सर्वांनी मिळून स्काय-वॉकच्या पायऱ्या, त्याखालील भिंती अतिशय सुंदर रंगवल्या. याचा सकारात्मक परिणाम झाला. लोक या स्काय-वॉकचा हळूहळू वापर करू लागले. रोजच्या रहदारीमुळे आता तिथे जो कचरा होतो, तो नियमितपणे पालिका साफ करते. नियमित रहदारीमुळे इथे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसला. 
मात्र, अजूनही काही लोक मध्यरात्रीनंतर मद्यपान करून कचरा करतात. हे प्रकार थांबावे यासाठी सलोनीचे प्रयत्न सुरु आहेत.

सलोनी म्हणते, ‘लोकांमध्ये जागृती केली, की त्यांची मानसिकता बदलेल आणि मग ते स्वत:च स्वच्छता राखतील.’ याकरिता, तिने ‘आप भी ध्यान रखिये’ अशा आशयाची पत्रके वाटली आणि सर्वांना आवाहन केले आहे, की या स्काय-वॉकचा जास्तीत जास्त वापर करून अपघात टाळूया.’

सलोनी सारखा विचार प्रत्येकाने केला तर आपल्या आजूबाजूच्या गैरसोयी या सोयींमध्ये नक्कीच बदलता येतील! या सलोनीच्या बाबतीत असे म्हणता येईल, की...

‘हौसले बुलंद हो तो हकीम की तरह होते है, हर तकलीफ को ताकद में बदल देते है!’

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मृणाल काशीकर- खडक्कर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

इंडिया मंत्रा