Bhartiyans

Menu

हा ‘न्हावी’ आहे चक्क बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, रोल्स रॉईस घोस्टसारख्या 27 अलिशान गाड्यांचा मालक !

Date : 31 Dec 2016

Total View : 188

कोणीही एका रात्रीत श्रीमंत होत नसतं. त्यामागे असतात कठोर परिश्रम, शिस्त, नम्रता, जिद्द , इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा. बंगळूर येथे स्थायिक असलेले ४२ वर्षीय रमेश बाबू आपल्याला हेच सांगतात.


सारांश

रविवारच्या दिवशी आज सुट्टीचा दिवस मस्तपैकी कटिंग करू, असं म्हणून तुम्ही न्हाव्याकडे जाता आणि तो न्हावी अलिशान रोल्स रॉईस घोस्ट कारमधून येतो. तुम्ही अवाक.... तेवढ्यात तो तुमच्या केसांवर पाणी मारतो आणि नम्रपणे विचारतो.. ‘साहेब, कटिंग कशी करू...?’ हे सगळं विश्वास न बसणारं आहे की नाही..? पण असाही न्हावी आहे. वाचूया बंगळूरच्या रमेश बाबू नावाच्या न्हाव्याची ही यशोगाथा !सविस्तर बातमी

रविवारचा दिवस….सुट्टीचा दिवस... 
मस्तपैकी कटिंग करूया असं म्हणून तुम्ही स्कूटर काढता, न्हाव्याकडे जाता आणि तो न्हावी मात्र महागड्या, अलिशान अशा रोल्स रॉईस घोस्टमधून येतो...

तुम्ही अवाक होऊन पहातच राहता तेवढ्यात तो तुमच्या केसांवर पाणी मारतो.. तुम्ही भानावर येता... तो नम्रपणे विचारतो.... “साहेब, कटिंग कशी करू...?”

हे सगळं विश्वास न बसणारं आहे की नाही..? 
पण आहे. असाही न्हावी आहे आणि तो बंगळूरला असतो.

कष्ट आणि प्रामाणिकपणा हेच आपल्या यशाचे गुपित असं म्हणणाऱ्या रमेश बाबू यांची यशोगाथा वाचल्यावर मात्र यावर विश्वास बसतो..!

हा ‘न्हावी’ आहे चक्क बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, रोल्स रॉईस घोस्टसारख्या 27 अलिशान गाड्यांचा मालक !

कोणीही एका रात्रीत श्रीमंत होत नसतं. त्यामागे असतात कठोर परिश्रम, शिस्त, नम्रता, जिद्द , इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा. 
बंगळूर येथे स्थायिक असलेले ४२ वर्षीय रमेश बाबू आपल्याला हेच सांगतात.

रमेश यांचा न्हाव्याचा व्यवसाय वडिलोपार्जित आहे. पण त्यांनी तो खूप मोठा केला. इतरही व्यवसाय त्यांनी सुरू केले.

रमेश यांचे वडील न्हावीच होते. रमेश ७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यामुळे साहजिकच त्यांच्या आईवर मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी पडली.

त्या माउलीने न डगमगता मुलांचे पालनपोषण केले. त्यांना शिक्षण दिले. त्यासाठी प्रसंगी कित्येक घरात स्वयंपाकाची कामे केली. तेव्हा दुकान नाममात्र भाड्यावर द्यावे लागले.

कळत्या वयात रमेशला वाटायचं की आपण शिकण्यापेक्षा आईला मदत करावी. पण, आईने त्यांना शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.

रमेश १२ वी नंतर इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा झाले. तेव्हाही दुकानाचे भाडे खूप कमी येत होते. त्यांनी निश्चय केला, की आपण हे वडिलोपार्जित दुकान सांभाळायचे. रमेश मन लावून काम करू लागले. त्यांचे कष्ट फलदायी ठरले आणि दुकान छान चालायला लागले.

हळूहळू पैसे साठवून रमेशने स्वत:ची पहिली गाडी ‘मारुती ओम्नी’ विकत घेतली. पण, तिचा फारसा उपयोग होत नसून ती केवळ दारात पडून आहे हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी ती गाडी भाड्याने दिली.

त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळू लागला. म्हणून रमेशने अजून एक गाडी विकत घेउन ती देखील भाड्याने दिली. असे करत करत रमेशने तब्बल ७ गाड्या घेतल्या आणि त्यातून ‘टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी’ सुरु केली. हे सगळं करत असताना त्याने आपले चालक आणि ग्राहक यांची प्रचंड काळजी घेतली. त्यांच्यावर कटाक्षाने लक्ष ठेवले. ग्राहकाचे समाधान हेच आपल्या कंपनीचे सूत्र असल्याचे रमेश सांगतात.

आज रमेशकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, रोल्स रॉईस घोस्टसारख्या 27 अलिशान गाड्या आहेत. 
मात्र, त्याची पहिली ‘मारुती ओम्नी’ त्याने आजही जपून ठेवली आहे.

हे सगळं वाचून रमेश आता ऐशोआरामात राहत असेल असं आपल्याला वाटतं पण नाही. रमेश आजही तेवढेच काम करतात. ते सकाळी ८ ते १० दुकान सांभाळतात. तिथून पुढे दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवसायाकडे लक्ष देतात. पुन्हा ४ ते ७ दुकान आणि ७ ते ८:३० उद्योग... अशी त्यांची दिनचर्या आहे.

लेडीज हेअर कट शिकण्यासाठी रमेश सिंगापुरला जाऊन आले. तसेच त्यांनी जर्मनीचा दौराही केला. आपल्या दोन्ही मुलांनाही ते उद्योगाचे धडे देणार आहेत. कोणी जर एखाद्या क्लबचे सभासदत्व घेण्यास आग्रह धरला तर रमेश सांगतात, की माझ्याकडे वेळच नाही..!

‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रमेश..!!

स्वत: जवळ एवढे वैभव असून देखील रमेश अतिशय नम्र आहे. ते अगदी रविवारीसुद्धा दुकानात जातीने हजर असतात. कारण त्या दिवशी गर्दी जास्त असते ना. ते अजूनही पूर्वीचे दिवस विसरलेले नाहीत.

ट्रॅव्हल्स उद्योगात कधी दंड भरावा लागला तर ते भरायला रमेश स्वतः जातात. पण, चालकाच्या पगारातून ते पैसे कापून घेतात.

हे कशासाठी? तर चालकाच्या चुकीमुळे ग्राहकांना जो त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला याला जबाबदार कोण? चालकच ना..! त्यांना धडा मिळावा यासाठी !

यशस्वी होण्यासाठी कष्ट आणि प्रामाणिकपणा हे दोन गुण महत्वाचे असतात आणि हीच आपल्या यशाची गुरूकिल्ली असल्याचे रमेश सांगतात.

रमेशची हीच गुरूकिल्ली आपणही वापरूया मित्रांनो, 
कदाचित याच किल्लीने आपल्याही यशाचे कुलूप उघडेल...!
धन्यवाद..!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

राखी कुलकर्णी

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

अच्छी खबर