Bhartiyans

Menu

फुडीझम : राजस्थानी कचोरी

Date : 31 Dec 2016

Total View : 453

कचोरीशिवाय राजस्थानी थाळी अपूर्णच. वेगवेगळ्या प्रकारचे सारण भरून कचोऱ्या करणं ही राजस्थानची खासियत. मुंग दाल की कचोरी, प्याज की कचोरी आणि मावे की कचोरी या राजस्थानी कचोऱ्या प्रसिद्ध आहेत.


सारांश

राजस्थानची अजून एक खासियत म्हणजे कचोरी. राजस्थानी थाळी शाही कचोरीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे सारण भरून कचोऱ्या करणं ही राजस्थानची खासियत. मुंग दाल की कचोरी, प्याज की कचोरी आणि मावे की कचोरी या राजस्थानी कचोऱ्या प्रसिद्ध आहेत. कचोरी म्हणजे चहा, कॉफी बरोबरचे ‘परफेक्ट स्नॅक’. पण एखाद्या खास प्रसंगी जेवणात कचोरीचा समावेश करून तुम्ही जेवणाची लज्जत नक्कीच वाढवू शकता....!सविस्तर बातमी

नमस्कार मंडळी,

आज Bharatiyans फुडीझममध्ये बघुया आबालवृद्धांना आवडणारी एक भन्नाट राजस्थानी डिश, जी खूप सहजपणे तुम्ही घरीसुद्धा करू शकता अशी ‘राजस्थानी कचोरी’ !

आपण या आधी ‘बदाम का हलवा’ आणि ‘बाजरे की खिचडी’ हे पदार्थ पाहिले आणि अक्षरशः ते जगलो आपण येथे भारतीयन्समध्ये. माझी खात्री आहे, की हे दोन्ही पदार्थ तुम्ही नक्कीच केले असतील आणि त्याचा सहकुटुंब आस्वादही घेतला असणारच!

खरंतर ताज्या भाज्या, फळफळावळ यांचा अभाव असूनही राजस्थानची खाद्यसंस्कृती एवढी समृद्ध आहे, की आपण वर्षभर जरी रोज एक राजस्थानी पदार्थ करायचा असं ठरवलं तरी दिवस कमी पडतील पण पदार्थ मात्र नवनवीन दिसतीलच..!

भारतीयन्स’च्या फुडीझम या खाद्ययात्रेतून आपण भारताच्या विविध प्रांतात फेरफटका मारणार आहोत आणि भारतातील या खाद्य विविधेतेचा आनंद लुटणार आहोत. अर्थातच यामुळे आपला देखील आहार अधिकाधिक समृद्ध होईल.

राजस्थानी पदार्थाविषयीचा हा आपला शेवटचा आठवडा आहे. इतर काही प्रदेश झाल्यावर आपण पुन्हा राजस्थानकडे वळू..!

तर, आज पाहूया काही प्रचंड लोकप्रिय असलेल्या राजस्थानी कचोऱ्यांची कृती. राजस्थानच्या या शाही कचोऱ्याशिवाय राजस्थानी थाळी अपूर्ण आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सारण भरून कचोऱ्या करणं ही राजस्थानची खासियत.

राजस्थानात तीन प्रकारच्या कचोऱ्या प्रसिद्ध आहेत. १) मुंग दाल की कचोरी २) प्याज की कचोरी ३) मावे की कचोरी. या तीनही कचोऱ्या करायला थोड्या किचकट आहेत पण खूप अवघड आणि अशक्य मात्र नक्कीच नाही.

कचोरी म्हणजे चहा, कॉफी बरोबरचे ‘परफेक्ट स्नॅक’. पण एखाद्या खास प्रसंगी जेवणात कचोरीचा समावेश करून तुम्ही जेवणाची लज्जत नक्कीच वाढवू शकता....! ‘मावे की कचोरी’ हे तर येथे खास प्रसंगी बनवले जाणारे पक्वान्न आहे. 
तुम्हीही करून पहाच एकदा या वेगवेगळ्या प्रकारच्या कचोऱ्या. नक्कीच कचोऱ्या आणि राजस्थान दोघांच्या प्रेमात पडाल.

चला तर मग घेऊया आस्वाद या लज्जतदार पदार्थाचा..!

सर्वात महत्वाचं आणि अत्यंत सोयीचं म्हणजे या तीनही कचोऱ्यांसाठी लागणारी पारी एकच आहे .... 
--------------------------------------------------------------------
कचोरीच्या पारीचे साहित्य :

३ कप - मैदा 
६ टेबल स्पून - तेल 
मीठ चवीला

कृती -

मैदा आणि मीठ एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून पुरीला मळतो तसे जरा घट्ट पीठ मळून घ्या आणि आता या पिठाचे सारख्या आकाराचे १२ गोळे करून ओलसर फडक्यात झाकून ठेवा. 
--------------------------------------------------------------------
१) मूग डाळीची कचोरी :

सारणाचे साहित्य :- 
१/२ कप - मूग डाळ ( ४/५ तास भिजवा )
१ टीस्पून - जिरे 
१ टीस्पून - बडीशेप 
१ टेबलस्पून - धने 
१ टीस्पून - मिरची पावडर 
१/४ टीस्पून - हळद 
१ टीस्पून - गरम मसाला 
१/२ टीस्पून - आमचूर 
३ टेबलस्पून - तेल 
मीठ चवीला 
तेल - कचोरी तळण्यासाठी

कृती :
कच्चं जिरं, बडीशेप आणि धणे मिक्सरमधून भरडून घ्यावे म्हणजे जाडसर पूड करा. 
मूग डाळ पण मिक्सरमधून जाडसर वाटा. 
कढईत तेल गरम करून त्यात भरडलेले जिरे, बडीशेप आणि धणे घाला. 
मग जाडसर वाटलेली मुगडाळ, लाल तिखट, हळद, गरम मसाला, आमचूर, मीठ हे सगळ याच क्रमाने घाला. 
साधारण १०/१५ मिनिटे तेलात वर-खाली करून नीट परता. 
खमंग वास आला की गॅस बंद करून सारण बाजूला काढून ठेवा. 
आता वरील पिठाच्या जाडसर परंतु हळुवार हातांनी एकावेळी ४ छोट्या पुऱ्या लाटा. 
सारण समप्रमाणात या पुऱ्यांवर ठेवा. 
पुरयांच्या सर्व बाजूच्या कडा एकत्र करून पुरीचा गोळा तयार करा. 
आता हा गोळा परत लहान पुरीच्या आकाराचा लाटा. 
अशाप्रकारे सर्व कचोऱ्या बनवून घ्या. 
कढईत तेल गरम करून कचोऱ्या टाका. 
लक्षात ठेवून मंद गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत या कचोऱ्या तळा. 
जितक्या मंद अग्नीवर तळाल तितक्या कचोऱ्या छान व खुसखुशीत होतात . 
-------------------------------------------------------------------
2) प्याज की कचोरी

सारणाचे साहित्य :

१ कप - बारीक चिरलेला कांदा 
१ टीस्पून - बडीशेप 
१ टीस्पून - धणे -जिरे पावडर 
१ टीस्पून - बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 
२ टेबलस्पून - बारीक चिरलेली कोथिंबीर 
१ टेबलस्पून - तेल 
मीठ चवीला

कृती : 
कढईत तेल गरम करून त्यात भरडलेली बडीशेप टाका.
त्यावर बारीक चिरलेला कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत परता. 
त्यात धणे - जिरे पावडर, बारीक चिरलेल्या मिरच्या, मीठ घाला. 
सारण नीट मिक्स करून गॅस बंद करा. वर कोथिंबीर घाला आणि हलवून सगळ मिश्रण एकत्र करून घ्या. 
परत एकदा सर्व नीट मिक्स करून घ्या. 
मुंग की कचोरी प्रमाणेच एकावेळी फक्त ४ पुऱ्या लाटून सारण भरून तेलात खुसखुशीत तळा.

या झाल्या की लगेच पुढच्या घ्या.
-----------------------------------------------------------------

३) मावा कचोरी 
सारणाचे साहित्य :
१/२ कप - फ्रेश क्रिम (दुधावरची जाड मलई)
१/२ कप - इन्स्टंट मिल्क पावडर

१/४ कप - (बदाम, काजू, बेदाणे, अक्रोड, पिस्ता) 
१/२ टीस्पून - वेलची पावडर 
१ टेबलस्पून - काळे तीळ (पांढरे तीळ सुद्धा चालतात) 
३ टेबलस्पून - साखर 
तळण्यासाठी तूप

कृती :
कढईत क्रीम आणि मिल्क पावडर एकत्र करून मंद गॅसवर जरा गरम करावं. 
त्यात चुरडलेला सुका मेवा, वेलची पावडर आणि साखर घालून नीट मिक्स करा. 
या कचोऱ्या देखील मुंग आणि प्याज कचोऱ्यांसारख्याच बनवा. 
पण तळताना मात्र या शक्य असल्यास शुद्ध तुपात तळा. 
तुपात तळलेल्या कचोऱ्यांच्या स्वाद काही वेगळाच असतो.

साखरेचा पाक :
१ कप साखर 
१/२ कप पाणी 
चिमूटभर वेलची पावडर 
८/१० केशराच्या काड्या 
साखर आणि पाणी एकत्र करून गॅस वर उकळू द्या. 
जरासे चिकट होईपर्यंत गरम करा. 
त्यात वेलची पावडर आणि केशर टाका.

मावे की कचोरी सर्व्ह करताना वरून थोडा साखरेचा पाक घाला.

आता मैत्रांनो एक काम मात्र नक्की करा,

या कचोऱ्या भन्नाट होतात पण याचं एक पथ्य आहे ते ध्यानात ठेवा. आवश्यक असणारं सगळ साहित्य आधी तयार ठेवा आणि जसं लागेल तसं वापरा.

आणखी एक महत्वाचं म्हणजे इतकी झकास डिश तुम्ही घरी करणार असाल तर आधी घरातल्या सगळ्या सदस्यांना आणि मित्र मंडळींना सांगा, एकत्र बोलवा आणि गप्पा सुरु झाल्या की या कचोऱ्या करायला घ्या. गप्पा रंगात आल्या की या गरमागरम कचोऱ्या त्यांच्यासमोर आणून ठेवा....! मग बघा ते कसे चकित होतील आणि केवळ चकितच नाही तर कचोरी खाऊन तृप्त होतील..!

तेव्हा, दोस्तांनो, भरपेट खा....भरपेट जगा....! पुन्हा भेटूया नवीन पदार्थासह येथेच फुडीझममध्ये..!

धन्यवाद..!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

नयना पिकळे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य