Bhartiyans

Menu

काश्मिरची ब्रुसली तजमुल इस्लाम

Date : 03 Jan 2017

Total View : 352

काश्मीर खोऱ्यातील तजमुल इस्लाम नावाच्या ८ वर्षाच्या मुलीने इटली येथे झालेल्या वर्ल्ड किकबॉक्सिंग स्पर्धेत (जागतिक मुष्टीयुद्ध) सब ज्युनिअर गटात भारताचे प्रतिनिधित्व करत देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं.


सारांश

काश्मीर खोऱ्यातील तजमुल इस्लाम नावाच्या ८ वर्षाच्या मुलीने इटली येथे झालेल्या वर्ल्ड किकबॉक्सिंग स्पर्धेत (जागतिक मुष्टीयुद्ध) सब ज्युनिअर गटात भारताचे प्रतिनिधित्व करत देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या तजमुलचे वडील ड्रायव्हर आहेत. तिला प्रशिक्षक फैजल अली दर यांचं मार्गदर्शन लाभलं. मुलभूत सुविधांचाही अभाव असताना यश मिळवणाऱ्या काश्मीरच्या तजमुल नावाच्या या छोट्या ब्रूसलीची ही प्रेरणादायी कहाणी.सविस्तर बातमी

काश्मीर...पृथ्वीवरचा स्वर्ग...! अद्वितीय नैसर्गिक सौंदर्याने नटलेले नंदनवन..! हिमालयाच्या कुशीत वसलेल हे खोरं आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे.

पण गेल्या काही वर्षात काश्मिरच्या या रंगबेरंगी इंद्रधनुष्यात दहशतवादाचा काळा रंग मिसळला गेला... दहशतवादी हल्ले, गोळीबार, स्फोट, जनप्रक्षोभ, आंदोलने, संचारबंदी यामुळे काश्मिर खोरे अक्षरशः धुमसते आहे..!

या गदारोळात जिथे जीवनमान विस्कळीत झाले; तिथे शिक्षण, प्रगती, विकास, कला, खेळ यांकडे येथील मुलांचे लक्ष कसे असणार..?

पण, संकटे आली की, होतकरू आणि खरा माणूस त्यातून तावून सुलाखून बाहेर पडतो आणि पुन्हा सोन्यासारखा चकाकतो असं म्हणतात, अगदी तसंच झालं.

तजमुल इस्लाम ही काश्मिरची ८ वर्षांची चिमुरडी. 
या अशांततेच्या वातावरणात राहूनसुद्धा तिने देशाला काय मिळवून दिलं. तुम्ही स्वत:च वाचा..!

तजमुल इस्लाम या काश्मिरच्या ८ वर्षाच्या चिमुरडीने वर्ल्ड किकबॉक्सिंग स्पर्धेत (जागतिक मुष्टीयुद्ध) भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. इटलीतील अंड्रिया या शहरात झालेल्या या स्पर्धेत तजमुलने भारताचे प्रतिनिधत्व केलं. तिने सब ज्युनिअर गटात अमेरिकेच्या प्रतिस्पर्धीला हरवून विजय मिळवला. 
या स्पर्धेत तब्बल ९० देश सहभागी झाले होते.

तजमुलचा हा विजय आपल्याला खूप काही सांगून जातो. 
श्रीनगरपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बंदीपुरा जिल्ह्यातील टार्कपुरा या गावात तजमुल राहते. आर्मी गुडविल स्कूल मध्ये दुसरीत शिकणाऱ्या तजमुलला प्रशिक्षक फैसल अली डार यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांच्यामुळेच ती हे यश मिळवू शकली.

तजमुल केवळ ५ वर्षांची असताना तिचे वडील गुलाम मोहम्मद लोन तिला प्रशिक्षक फैजल अली दर यांच्याकडे घेऊन गेले. या छोट्याश्या मुलीमध्ये जात्याच असलेला वेग आणि आक्रमकता फैजल यांनी हेरली आणि तिला प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. बंदिपुरा स्टेडियमच्या मागील बाजूस ते मुलांना मार्शल आर्टस शिकवतात. 
तजमुलचे २ भाऊ आणि २ बहिणी देखील दर यांच्या अकादमीत मार्शल आर्ट्स शिकतात.

एका बांधकाम कंपनीमध्ये ड्रायव्हर असलेले गुलाम लोन हे आपल्या मुलांना संपूर्णरीत्या पाठिंबा देतात. ते मुलांना कोणतीही कमी भासू देत नाहीत. जानेवारी २०१६ च्या सुरवातीला हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जम्मू आणि काश्मीर वुशू स्पर्धेत’ तजमुल हिने सुवर्णपदक जिंकलं.

त्यानंतर किकबॉक्सिंगच्या पदार्पणातच तिने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलं. यामुळेच तिला इटली येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचे देखील तिने सोने केले.

जिथे मुलभूत सुविधांचा देखील अभाव आहे, तिथली ही एक छोटीशी मुलगी क्रीडाक्षेत्रात जगाच्या नकाशावर आपली आणि आपल्या देशाची मोहोर उमटवायला निघाली आहे. 
तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी टीम भारतियन्सकडून खूप शुभेच्छा....!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

 

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

फर्स्टपोस्ट