Bhartiyans

Menu

कोंढव्यातील ‘जीवन’दाता : सलीम मुल्ला...!

Date : 04 Jan 2017

Total View : 377

पुण्याच्या कोंढवा गावातील मिठानगरमध्ये ११ वर्षे टँकरने पाणीपुरवठा होत होता. गावातील मोठी विहीर दुर्लक्ष झाल्याने बुजली गेली होती. येथील सलीम मुल्ला यांनी ती विहीर स्वच्छ केली. ते ‘जीवन’दाता झाले.


सारांश

‘पाणी’ या शब्दाची व्याख्या करता येत नाही. कारण ‘जीवना’ला व्याख्येत कसं बसवणार? पण, आज ‘पाणी’ सुद्धा विकत घेऊन प्यावं लागतंये. आजही अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पुण्याच्या मिठानगरमध्ये ११ वर्षे टँकरने पाणीपुरवठा होत होता. पण, येथील सलीम मुल्ला यांनी ती विहीर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. त्यांना गावाने साथ दिली आणि ही विहीर पुन्हा ‘जीवन’दायिनी झाली.सविस्तर बातमी

पाणी...... या शब्दाची व्याख्या व्याख्या करता येत नाही. कारण ‘जीवना’ला व्याख्येत कसं बसवणार? मानवाला जगण्यासाठी जसा श्वास आवश्यक असतो तसंच पाणी..! पण, भारताला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे उलटली तरी अजूनही आपण अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत गरजांसाठी झगडतो आहोत..!

या मागे वाढती लोकसंख्या, प्रशासनाची उदासीनता, नागरिकांची नासधूस करण्याची वृत्ती.... अशी अनेक कारणे आहेत. आजही अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे..! ‘पाणी’ सुद्धा विकत घेउन प्यावं लागतंये... यामुळे टँकरवाले पैशाने गब्बर होताये आणि सामान्य होरपळताये...! पुण्यातल्या कोंढवा गावात हाच प्रकार अनेक वर्षांपासून सुरू होता. पण, सलीमने भन्नाट उपाययोजना केली आणि तो ठरला कोंढवा गावाचा ‘जीवनदाता’...!!

पुण्यातील कोंढवा गावात पाण्याचा प्रश्न गंभीर होता. १९९० पर्यंत तिथे एक विहीर होती त्यामुळे लोकांना मुबलक पाणी पुरवठा होत होता. १९९९ मध्ये कोंढवा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आल्यानंतर त्या विहारीकडे लोकांचे दुर्लक्ष झाले आणि दुर्लक्षित जागेचे जे होते तेच या विहिरीचे झाले – कचराकुंडी! हळूहळू पाणी आटत, विहीर पूर्ण बुजली गेली. त्यामुळे गेली ११ वर्षे, सर्व्हे नंबर ४२, जवाहर गंज, कोंढवा खुर्दमधील मिठानगरमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

जिथे समस्या असते तिथे नक्कीच कोणीतरी एखादा देवदूत, मसीहा असतो असं लहानपणी परीकथेत वाचलेलं होतं. त्याचाच प्रत्यय येथे पुन्हा एकदा आला. इथल्या देवदूताचं नाव आहे– सलीम मुल्ला! सलीम मुळचा सांगलीमधील विटा गावाचा. १९९० मध्ये तो पुण्यात आला. तेव्हापासून तो कोंढव्यातच राहतो आहे. लग्नाचे मंडप सुशोभीकरणाचा त्याचा व्यवसाय आहे.

सलीम सांगतो, की १९८४ ते १९९० या काळात कोंढव्यातील ही विहीर वापरात होती. मात्र, हळूहळू तीकॅं वापरा कमी होता गेला आणि २०१० ते २०१६ या काळात या विहारीचे रुपांतर कचराकुंडीत झाले. विहीर पूर्णपणे बुजली गेली. सलीमने पुणे महानगर पालिकेच्या वानवड प्रभाग कार्यालयात लेखी अर्ज देखील दिले. त्या अर्जावर सलीमला चालढकल करणारी उत्तरे मिळाली.

पण, सलीम हार मानून शांत बसणाऱ्यातला नव्हता. त्याला लोकांचे पाण्यासाठी होणारे हाल बघवत नव्हते. शेवटी सलीमने निर्णय घेतला स्वत: विहीर स्वच्छ करण्याचा! विहीर स्वच्छ करणे हे एखादी खोली स्वच्छ करण्याइतपत सोपे काम नक्कीच नव्हते. त्याला अनेकांच्या साथीची गरज होती. सलीमने याविषयी जनजागृती करायला सुरुवात केली.  

गावातील छोटे व्यावसायिक, नोकरदार वर्ग आणि कष्ट करून रोजंदारीवर जगणारे कामगार असे सगळे एकत्र आले. वर्गणी गोळा केली आणि ६ जुन २०१६ - रमजानच्या पवित्र महिन्याच्या पहिला दिवस या दिवसापासून ही सगळी यंत्रणा कामाला लागली. साधारण ८ ते १० माणसे रोज काम करत होती. ३ जुलै २०१६ पर्यंत साधारण ७५ ट्रक गाळ विहारीतून काढला गेला. विहीर साधारण ५५ फूट खोल झाली आणि ईदच्या दिवसापासून ही विहीर पुन्हा सर्वांसाठी जीवनदायीनी झाली.

सलीम म्हणाला, ‘हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन असे सर्व जाती-धर्माचे लोक या कामासाठी एकत्र आले. मी यशस्वी झालो कारण सर्व लोक माझ्यासोबत होते. माझ्या यशाचे श्रेय गावातील सर्वांना जाते.’ 

या सर्व लोकांनी एकत्र येवून, ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीचा प्रत्यय आणून दिला.  शासन करेल, हे सरकारी काम आहे, असे म्हणत वाट न बघता आपणही जबाबदारीने जर आपलेच प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आलो तर अनेक प्रश्न सोपे होतील. हे नक्की!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

प्रचिती तलाठी-गांधी

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य