Bhartiyans

Menu

गाव करी ते राव काय करी..! ‘पारनोटे’ गावाचा केला गावकऱ्यांनीच कायापालट..!

Date : 04 Jan 2017

Total View : 562

जेमतेम १०० घरे असलेल्या पारानोटे ग्रामस्थांनी कोणताही विशेष सरकारी निधी आणि प्रशासकीय मदत यांच्याशिवाय गावाचा कायापालट करायचं ठरवलं आणि त्यात ते यशस्वी झाले..!


सारांश

गाव करी ते राव काय करी..! अशी आपल्याकडे एक म्हण आहे. जेमतेम १०० घरे असलेल्या पारानोटे ग्रामस्थांनी कोणताही विशेष सरकारी निधी आणि प्रशासकीय मदत यांच्याशिवाय गावाचा कायापालट करायचं ठरवलं आणि त्यात ते यशस्वी झाले..! इतकंच नाही तर गावाला २०१३-१४ चा बारा लाख रुपयांचा निर्मल ग्राम पुरस्कार देखील प्राप्त झाला. चला, तर वाचूया, या निर्मल ग्रामाची यशस्वी ‘ग्रामगीता’..!सविस्तर बातमी

गाव करी ते राव काय करी..! अशी आपल्याकडे एक म्हण आहे. म्हणजेच गावाने जर ठरवले तर ते काहीही करू शकतात. जेमतेम १०० घरे असलेल्या पारानोटे ग्रामस्थांनी देखील आपल्या गावाचा कायापालट करायचं ठरवलं आणि त्यात ते यशस्वी झाले..!

इतकंच नाही तर गावाला २०१३-१४ चा बारा लाख रुपयांचा निर्मल ग्राम पुरस्कार देखील प्राप्त झाला. चला, तर वाचूया, या निर्मल ग्रामाची यशस्वी ‘ग्रामगीता’..!

दोड़ा जिल्ह्यातील साधारण १०० उंबऱ्यांच पारनोटे गाव. या गावाने सरकार, प्रशासन यांच्या मदतीशिवाय समस्या सोडवून एका स्वयंपूर्ण गावाचा आदर्श निर्माण केला. या गावात ग्रामीण जीवनाचं खरं वैभव पहायला मिळतं. इंटरनेट, लॅंडलाईन अशा सर्व आधुनिक सोयींनी परिपूर्ण असलेल्या या गावाचा साक्षरता दर १००% आहे, तर गुन्हेगारी दर ०% आहे. नागरिक स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय जागरूक असल्याने कोणीही उघड्यावर शौचास जात नाही.

पारानोटे ग्रामस्थ हंसराज मनहस सांगतात, "चार दशकांपूर्वी गावाची परिस्थिती पूर्णपणे उलटी आणि किळसवाणी होती. स्वच्छतेच्या बाबतीत लोकांमध्ये जागरूकता नव्हती. गावात शौचालये नसल्याने गावकरी उघड्यावर शौचास जायचे. त्यामुळे मलेरिया आणि इतर साथीच्या रोगांचे थैमान होते. बालमृत्यूचे प्रमाण देखील खूप होते.

मात्र, हळूहळू गावकऱ्यांना त्यांची चूक कळत गेली. सार्वजनिक, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य याबाबतीत एका स्थानिक समाजसेवी संस्थेने पुढाकार घेतला आणि प्रबोधन करण्यास सुरुवात केली. गावकरी देखील या कार्यात सहभागी होत गेले. प्रयत्नांती आमचं गाव स्वच्छ, सुंदर आणि हागणदारीमुक्त झालं. आता गावात घरटी एक शौचालय आहे.’’

गावाच्या प्रत्येक भागात महिला व पुरुषवर्गाचं संघटन उभं झालं आहे. दोन आठवड्यातून एकदा त्यांची बैठक असते. कार्यकर्त्याना त्यांची कामे विभागून दिली जातात. अपरिहार्य कारणांशिवाय या बैठकांना गैरहजर राहाणाऱ्याला ५० रुपये दंड आकारला जातो. या गावाला अक्रोड उत्पादनाचे हब बनवून आणखी एक मैलाचा दगड तयार करण्याचे येथील ग्रामस्थांचे स्वप्न आहे. 

गावाचे सरपंच डॉ. विमल मनहस म्हणतात, की आमच्या गावाला कोणताही विशेष सरकारी निधी मिळालेला नाही. मनरेगा आणि इतर सरकारी योजनांतून आलेल्या गंगाजळीचा स्थानिकांच्या मदतीने वापर करून आम्ही आमच्या योजना राबविल्या. आमच्या गावात स्वच्छ पिण्यायोग्य पाणी, भूमिगत सांडपाणी व्यवस्थापन व  निचरा अशा सोयीसुविधा प्रत्येक घरात केल्या आहेत.

गावाला २०१३-१४ चा 'निर्मल ग्राम पुरस्कार' प्राप्त झाला आहे. या पुरस्कारा अंतर्गत गावासाठी बारा लाख रुपये जाहीर झाले. त्यातील सहा लाख गावाला मिळाले असून उरलेली रक्कम मिळणे बाकी आहे. सहकारी तत्वावर दुग्धविकास केल्याने आसपासच्या गावांत आम्ही दूग्धोत्पादनात देखील अग्रेसर आहोत. आमच्याकडे शेतीशी पूरक असलेले कुक्कुटपालन, खत उत्पादन, रेनवॉटर हार्वेसटिंग यांचाही विकास झाला आहे."

आता या गावाची अर्थव्यवस्था पारंपारिक शेतीकडून अधिक बाजारमूल्य असलेल्या अक्रोड, केशर यांच्या उत्पादनाडे वळते आहे. यामुळे गावाचा महसूल वाढण्यास मदत होईल.

मात्र, किश्ट्वर-प्रेमनगर या राष्ट्रीय महामार्गापासून फक्त २ किमीवर असलेले हे गाव आजही रस्त्याने जोडलेले नाही. लोकनियुक्त प्रतिनिधींकडून आश्वासनांशिवाय काहीच पदरात पडत नाही, हीच ग्रामस्थांची तक्रार आहे.

याविषयी गावातील वकील बलसिंग मानस म्हणतात, "या गावात अनेक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, पोलीस अधिकारी आणि न्यायाधीशही झाले. तरीही हे गाव दुर्लक्षित आणि मुख्य प्रवाहातून बाजुला राहिले आहे. आमच्याकडे सरकारी शाळा असल्याने शिक्षणाची सोय असली तरी आरोग्य आणि दळणवळण या बाबतीत मागे पडतो आहोत."

या गावाची स्वतःची खास वैशिष्टये त्याच्या निसर्गरम्यतेला साज चढवतात. हे गाव तंटामुक्त असल्याने कोणताही कलह येथे परस्पर सामंजस्याने सोडविला जातो.

एकूणच काय तर, 'संघटन में शक्ती हैं' हे पुन्हा एकदा या गावाने पटवून दिलं. केवळ परिस्थितीच्या तक्रारी न करता स्वत:चे 'श्रमदान' आणि 'समयदान' यांच्या बळावर संपूर्ण देशाला संघटन शक्तीचा एक उत्तम आदर्श घालून देणाऱ्या या गावास ‘भारतीयन्स’चा सलाम!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

टीम भारतीयन्स

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य