Bhartiyans

Menu

‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’, हा संदेश देणारी ‘स्वरूपा’..!

Date : 04 Jan 2017

Total View : 590

शिक्षणामुळे आयुष्याचा कायापालट होऊ शकतो. १५ रुपये मजुरीवर काम करणारी शेतमजूर ते एका नामांकित टेलीकम्युनिकेशन कंपनीची नोकरदार.... असा स्वरूपाचा प्रवास हेच पुन्हा एकदा सिद्ध करतो.


सारांश

घरची परिस्थिती अत्यंत बिकट.. उगवलेला दिवस ढकलण हे रोजचं आव्हान आणि हे आव्हान पेलण्यासाठी सोबतीला आहेत ते अपरंपार कष्ट आणि जिद्द....! शिक्षणाने आयुष्य बदलेल हा एक धागा पकडून जिने स्वत:च्या जीवनाचे ‘स्वरूप’ अंतर्बाह्य बदलवले ती ‘स्वरूपा’..! स्वरूपा, आंध्रप्रदेशमधील एका छोट्या खेड्यातील १२ वर्षांची मुलगी. तिने घरच्यांचा विरोध पत्करून शिक्षणाची कास धरली आणि तिने एका नामांकित टेलीकम्युनिकेशन कंपनीमध्ये नोकरी पटकाविली.सविस्तर बातमी

घरची परिस्थिती अत्यंत बिकट.. उगवलेला दिवस ढकलण हे रोजचं आव्हान आणि हे आव्हान पेलण्यासाठी सोबतीला आहेत ते अपरंपार कष्ट, स्वत:वरचा विश्वास आणि जिद्द....! शिक्षणाने आयुष्य बदलेल हा एक धागा पकडून जिने स्वत:च्या जीवनाचे ‘स्वरूप’ अंतर्बाह्य बदलवले ती ‘स्वरूपा’..!

स्वरूपा, आंध्रप्रदेशच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील चित्याला या छोट्याश्या खेड्यातील अवघ्या १२ वर्षांची शेतमजूर मुलगी. पण, तिने जिद्दीने स्वतःची परिस्थिती बदलवली आणि तिने एका नामांकित टेलीकम्युनिकेशन कंपनीमध्ये नोकरी पटकाविली. वाचूया, तिची संघर्षगाथा..!

आपल्या लहान मुलांना चुकूनही एक काटादेखील बोचू नये म्हणून आपण त्यांची किती काळजी घेतो. त्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी धडपड करतो. मात्र, आजही भारताच्या काही भागात अनेक घरात दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. उदरनिर्वाहासाठी घरातील लहान मुलांना काम करावं लागतंये.

स्वरूपाच्या वडिलांनी देखील तेच केलं. ते कर्जाच्या बोज्याखाली दबले होते. कमावणाऱ्या अधिकाधिक हातांची गरज होती. म्हणून त्यांनी आपल्या १२ वर्षांच्या मुलीला देखील कापसाच्या शेतात मजुरीला नेण्यास सुरुवात केली.

सकाळी ७ ते संध्याकाळी ७ असे पूर्ण १२ तास. उन-वारा-पावसात ही चिमुरडी केवळ १५ रुपयांच्या मजुरीसाठी राबायची. तिचे कामही अतिशय अवघड. कापसाच्या शेतात, कपाशीची कोणती फुले आता परागीभवनासाठी तयार झाली आहेत,  हे तपासायचे आणि त्याचे क्रोस ब्रीडिंग करायचे. हे तिचे काम.

हे काम वाटते तितके सोपे नाही. यात प्रत्येक झाड जवळून तपासावे लागते. त्यासाठी एकाग्रता हवी. या वेळी झाडावर फवारलेल्या औषधांचा, रासायनिक खतांचासुद्धा खूप त्रास होतो. त्यामुळे अनेक आजारांना देखील तोंड द्यावे लागते. तरीही, स्वरूपाला हे काम करणे भाग होते. कारण, तिच्या कामाचे २ वर्षांचे पैसे त्यांनी कर्ज म्हणून आगाऊ घेतले होते!

मात्र, असे होणारी स्वरूपा ही एकमेव मुलगी नाही. स्वरूपासारखीच अनेक लहान मुले या धोकादायक कामात गुंतली आहेत. याला अजून एक कारण म्हणजे ‘अंधश्रद्धा’. जर स्त्रियांऐवजी लहान मुलींनी हे काम केले तर कापसाचे पीक जास्त येते म्हणे! यामुळे शेतमालक आपल्या शेतमजुरांना छोट्या सहली, चॉकलेट्स, टीव्ही, इ.चे प्रलोभन दाखवून त्यांच्या लहान मुलींना मजुरीसाठी आणायला उद्युक्त करतात.

हे सर्व कमी म्हणूनच की काय स्वरूपाला तिचे आई-वडील शेत मालकांच्या घरी देखील कामासाठी पाठवत. लहानग्या स्वरूपाला या सर्वातून सुटका हवी होती. पण, इच्छा असून देखील तिला शाळेत जाता येत नव्हतं. पण, एक दिवस उजाडला.... जो ‘ति’चा होता.

एम. वेंकटरंगैय्या फाउंडेशन ही बालमजुरांचे पुनर्वसन करणारी सेवाभावी संस्था. या संस्थेचे कार्यकर्ते स्वरूपाच्या गावात देखील शाळाबाह्य मुलांची मोजणी करत होते. शाळेत न जाऊ शकणाऱ्या, काम करणाऱ्या मुलांसाठी ते रेसिडेन्शिअल ब्रिज कोर्स कॅंप गावोगावी चालवतात. त्यांना स्वरूपाची माहिती समजली. त्यांनी स्वरूपाला या शाळेत यायचे आवाहन केले.

स्वरूपाला यातून आशेचा किरण दिसला. तिने घरच्यांच्या परवानगीशिवाय या शाळेत प्रवेश घेतला. तिच्या वडिलांना ही गोष्ट कळताच त्यांनी कॅम्पच्या लोकांशी हुज्जत घातली. पण, एम.व्ही.एफ.चे कार्यकर्ते त्यांची समजूत घालण्यात यशस्वी झाले आणि स्वरूपाच्या शिक्षणाचा मार्ग खुला झाला.

भरपूर शिकायचं, ही जिद्द स्वरूपाला केवळ तिच्या कष्टमय जीवनापासून लांब घेऊन गेली असे नाही. तर, या शाळेच्या मदतीने तिने हळूहळू औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये देखील प्रवेश केला.

आज स्वरूपा तिच्या गावातील मुलींसाठी आदर्श ठरली आहे. तिचे आई-वडील देखील आता तिच्या या खडतर प्रवासाचे कौतुक करतात. त्यांना आपल्या मुलीचा अभिमान वाटतो. स्वरूपा आज एका नामांकित टेलीकम्युनिकेशन कंपनीमध्ये कार्यरत आहे.

शिक्षणामुळे आयुष्याचा कायापालट होऊ शकतो. हे स्वरूपाने पुन्हा एकदा सिद्ध केलं. १५ रुपये मजुरीवर काम करणारी शेतमजूर ते एका नामांकित टेलीकम्युनिकेशन कंपनीची नोकरदार.... असा स्वरूपाचा प्रवास आपल्याला पुन्हा एकदा हेच सांगतो, की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...!!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

मृणाल काशीकर- खडक्कर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य