Bhartiyans

Menu

शिक्षणाचा ‘प्रकाश’ पेरणारा ‘सूर्य’....!

Date : 04 Jan 2017

Total View : 448

सूर्यप्रकाश यांनी वंचित मुलांना शिक्षण मिळावे यासाठी “प्रयोग”(PRAYOG – Professional Alliance for Youth Growth) हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या ग्रंथालयाचा उपयोग आज १२ खेड्यातील चारशेहून अधिक विद्यार्थ्यांना होतो आहे.


सारांश

‘शिक्षण हे असे एकच शस्त्र आहे, ज्यामुळे जग बदलता येते.’ असं नेल्सेन मंडेला यांनी म्हटले आहे. सूर्यप्रकाश यांनी हेच शस्त्र हाती घेतले. सहा आकडी पगाराची नोकरी सोडून ते आज गरीब-वंचित मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत. त्यासाठी त्यांनी ‘प्रयोग’ (PRAYOG – Professional Alliance for Youth Growth) हा कार्यक्रम हाती घेतला. त्यांच्या ग्रंथालयाचा उपयोग आज १२ खेड्यातील चारशेहून अधिक विद्यार्थ्यांना होतो आहे.सविस्तर बातमी

‘शिक्षण हे असे एकच शस्त्र आहे, ज्यामुळे जग बदलता येते.’ असं नेल्सेन मंडेला यांनी म्हटले आहे. आजही आपल्या देशात सुमारे २ लाखांपेक्षा अधिक शाळा असलेल्या शहरातूनही अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. खेड्यामध्ये परिस्थिती अजूनच भीषण आहे.

शिक्षणक्षेत्रात आज फक्त ‘पुस्तकी’ ज्ञान देणारे अनेक गुरु आहेत. पण तळमळीने शिकवणारे मात्र अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहेत. सूर्यप्रकाश राय हे त्यांपैकीच एक. सहा आकडी पगाराची नोकरी मिळता असताना देखील ती सोडून ते आज गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी काम करत आहेत. बिहारमधील मुलांसाठी ‘मसीहा’ ठरलेल्या सुर्यप्रकाश राय यांची कथा नक्कीच चिंतनीय आणि प्रेरणादायी आहे.

सर्वसामान्य माणूस किती असामान्य काम करून जातो याची जाणीव सूर्यप्रकाश यांच्याकडे पाहून होते. समाजातील वंचित मुलांना पायाभूत सुविधा, शैक्षणिक साहित्य, आरोग्य, शिक्षण इत्यादी उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी ‘प्रयोग’ (PRAYOG – Professional Alliance for Youth Growth) हा कार्यक्रम हाती घेतला आहे.

लोकांचा शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन व्हावा यासाठी त्यांनी बिहारच्या एका खेड्यात वाचनसंस्कृती निर्माण केली. शिक्षणातील जातीय भेद, खालच्या जातीतील लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या प्रथा मोडीत काढण्यास सुरुवात केली. सूर्यप्रकाश यांनी गोपालगंज, बिहार येथे निर्माण केलेल्या ग्रंथालयाचा उपयोग आज १२ खेड्यातील चारशेहून अधिक विद्यार्थ्यांना होतो आहे.

सूर्यप्रकाश यांच्या ‘प्रयोग’ची सुरवात कशी झाली, हे ऐकण्यासारखे आहे. विजयकुमार चौहान हा एक १५ वर्षांचा मुलगा आपले पोट भरण्यासाठी बिहारहून लुधियाना येथे गेला होता. परंतु तिथे कमाई होईना म्हणून त्याने परत मुळ गावी येण्याचा निर्णय घेतला. गावी येऊन त्याने आपले राहिलेले शिक्षण पूर्ण केले आणि त्याबरोबरच इतर मुलांना देखील तो शिक्षणासाठी प्रवृत्त करू लागला.

एकदा या विजयची भेट सूर्यप्रकाश यांच्याशी झाली. सूर्यप्रकाश खेड्यातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतच होते. त्यांना विजयमध्ये एका चमक दिसली आणि ‘विजय’ हा ‘प्रयोग’शी जोडला गेला. तो आता ‘प्रयोग’चा चा आधारस्तंभच झाला आहे. विजय स्वतः शिक्षणाविषयी नवीन नवीन प्रयोग करत असतो. मुलांना वेळ देणे, विविध शैक्षणिक प्रयोग, स्पर्धा, खेळ घेऊन सतत मुलांना प्रोस्ताहन देत असतो.

सूर्यप्रकाश सांगतात, मला समाजासाठी काहीतरी करायची इच्छा होती. पण मी शिक्षणाशिवाय दुसरं काय करणार? म्हणून हा ‘प्रयोग’ केला. ‘प्रयोग’मध्ये विविध शैक्षणिक प्रयोग-प्रकल्प तयार केले जातात. ‘प्रयोग’चे तत्वज्ञान हे आहे, की जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर चर्चा करण्यात आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा काम करा. प्रयोग करून बघा. मुलांना विचार करायला प्रवृत्त करायचे. त्यांच्या वर्तणुकीत बदल होऊन त्यांच्यातील मदत करण्याची वृत्ती वाढीस लागावी, हा सूर्यप्रकाश यांचा उद्देश आहे.

सूर्यप्रकाश यांनी जेव्हा ग्रंथालय सुरु केले तेव्हा ते एका मोकळ्या जागेत होते. ५ मुले या संख्येने सुरु झालेले ग्रंथालय वर्षाच्या आत नियमित येणारे ४०० विद्यार्थी यावर जाऊन पोहोचले आहे. जातीय व्यवस्थेविरुद्ध तसेच पालकांचा दृष्टीकोन बदलवणे आवश्यक होते. ग्रंथालयाने मुख्यत्वे ते काम केले. विविध जाती-धर्मातील मुले एकत्र येऊन चर्चा करू लागली, त्यासाठी ग्रंथालयाचा उपयोग करू लागली.

छोट्याश्या गावातील शैक्षणिक क्रांतीच्या यशाचा हे ग्रंथालय हा पाया होता. ग्रंथालायात नानाविध पुस्तके, मासिके, द्वैमासिके, साप्ताहिके, वर्तमानपत्रे आणि भरपूर ग्रंथ व इतर साहित्य विद्यार्थ्यांना वाचायला मिळतात.

 

‘मधल्या काळात आम्ही ५ विद्यार्थ्यांना ‘परिवर्तन’ या संस्थेत ४-५ दिवसांसाठी घेऊन गेलो. तिथे ही मुले योग, नृत्य, चित्रकला यात रमली. त्यामुळे त्यांना एक वेगळा आत्मविश्वास मिळाला. त्यातून अनेक मुले आमच्याशी जोडली गेली’, असे सूर्यप्रकाश सांगतात.

स्वतःचे विचार मांडणे, वादविवादात सहभागी होणे, समाजामध्ये ठाम भूमिका घेणे असे बदल मुलांमध्ये करण्याचे काम ‘प्रयोग’ची टीम करते आहे. सर्वात मोठा प्रश्न हा अखंडित वीज पुरवठा आणि शिक्षण हाच होता. त्याविषयी बोलताना ‘सर्व अशिक्षित गावकरी, पालक यांच्या शिक्षणाला प्राधान्य देणे हे नाही तर परिस्थिती बदलवणे हे आमचे काम होते” असे सूर्यप्रकाश सांगतात.

अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी सूर्यप्रकाश ह्यांनी ‘प्रकाश-अप्रकाशीत मनासाठी’ (‘Light an Ignited Mind’) असा एक प्रोजेक्ट सुरु केला. सुमारे २०० सोलर दिवे अवघे रु. ४५० प्रत्येकी या किंमतीत उपलब्ध करून दिला. त्याला ‘मिलाप’ हे सुंदर नाव दिले. सोलर दिवे घेण्यासाठी पैसे उभे करणे गरजेचे होते. त्यासाठी हा एक प्रयत्न. फक्त १२ दिवसात सूर्यप्रकाश यांनी निधी संकलनाचे मोठे काम केले.

समाजातील ज्या काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांना सामाजिक ऋण मान्य असते आणि ते समाजासाठी काही करू इच्छितात अशाच लोकांनी साकारलेला सोलरचा प्रकल्प हा रात्रशाळेसाठी उपयोगी आला. अनेक विद्यार्थीमित्र प्रयोगच्या कार्यकर्त्यांबरोबर रात्री अभ्यास करू लागले.

गावातील काही हुशार विद्यार्थी हेरून त्यांना ४-५ लहान गटातील मुलांना अभ्यासापुरती दत्तक घ्यावयास, ही कल्पना सुचली. यामुळे मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळू लागले. प्रयोगने स्वतःला Prajnopaya Foundation, a Massachusetts Institute of Technology यासारख्या विदेशी संस्थेस संलग्न करून घेतले आहे. दोन्ही संस्थेचा उद्देश ‘जागतिक साक्षरता’ हा आहे. ३ ते ८ वयोगटातील १०० मुले आज टॅब्लेटद्वारे प्रशिक्षण घेत आहेत.

सूर्यप्रकाश हे कौतुकास पात्र आहेत. कारण केवळ चर्चा करण्यात आणि योग्य वेळेची वाट पाहण्यात वेळ वाया न घालवता त्यांनी स्वत: काम सुरु केले. ‘प्रयोग’ केला..! स्वतःच्या एखाद्या वेगळ्या कल्पेनेवर काम सुरु करा असे सूर्यप्रकाश नेहमी म्हणतात. अनेक मुलांनी याप्रकारे काम सुरु केले आहे आणि त्याचे फायदे त्यांना मिळता आहेत. हे सूर्यप्रकाश ह्यांचे यश आहे.

ग्रंथालय सुरु करण्याची एक कल्पना गावातील अनेक विद्यार्थांना आशेचा किरण देणारी ठरली. तुमच्याही मनात अशीच एखादी कल्पना असेल तर बिनधास्त तिच्यावर काम करा. परिणामांची चिंता न करता प्रयोग करा..! कदाचित तुम्ही देखील कोणालातरी ‘प्रकाश’ देणारे ‘सूर्य’ होऊ शकाल....!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

 

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य