Bhartiyans

Menu

अवघ्या ८००० रुपयांच्या भांडवलातून ३०० कोटींची उलाढाल असलेला ‘बिबा’ ब्रँड निर्माण करणाऱ्या मीना बिंद्रा !

Date : 04 Jan 2017

Total View : 492

स्वतःच्या आवडीचे काम व्यवसाय म्हणून निवडले तर अशक्यही शक्य होते. मीना बिंद्राने ८००० रुपयांच्या भांडवलातून सलवार-कमीज तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आणि पहातापाहाता तो ३०० कोटीपर्यंत वृद्धिंगत केला.


सारांश

नोकरी म्हणजे ८ तासांचा व्यवसाय आणि व्यवसाय म्हणजे २४ तासांची नोकरी..! प्रत्येकाला व्यावसायिक, होण्याची प्रचंड इच्छा असते..! स्वत:चा ब्रँड निर्माण करायचा असतो. हे सगळं तरूण वयात जमेलही, पण वयाच्या चाळिशीनंतर हे जमेल..? मीना बिंद्राने हे करून दाखवलं...! ८००० रुपये भांडवल आणि ४० ड्रेस यापासून सुरू केलेला व्यवसाय मीना यांनी ९० दुकाने आणि ३०० कोटींची उलाढाल इथपर्यंत नेला..!सविस्तर बातमी

नोकरी म्हणजे ८ तासांचा व्यवसाय आणि व्यवसाय म्हणजे २४ तासांची नोकरी..! असं म्हणतात. नोकरी म्हटली की, वेळेची बंधने, मर्यादित उत्पन्न, वरिष्ठांचा दबाव हे सगळं आलंच.

याउलट व्यवसायात वेळेची बंधने नसतात. तुम्हीच मालक आणि तुम्हीच नोकर अशी स्थिती असते. उत्पन्न निश्चित नसतं. कधी ते खूप असतं तर कधी काहीच नाही. तरी पण प्रत्येकाला व्यावसायिक, उद्योजक होण्याची प्रचंड इच्छा असते..! का..? कारण, प्रत्येकालाच स्वत:साठी काम करायचं असतं. स्वत:चा एक ब्रँड निर्माण करायचा असतो.

अर्थात, हे प्रत्येकाला जमतंच असं नाही. त्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची, अनिश्चिततेला तोंड देण्याची तयारी हवी. पण हे सगळं वय वर्षे ४० नंतर जमेल..? चाळीशीत लोक स्थिरस्थावर होतात, तेव्हा ‘रिस्क’ घेणं जमेल..? मीना बिंद्राने हे करून दाखवलं...!

स्वतःच्या आवडीचे काम जर आपण व्यवसाय म्हणून निवडले तर अशक्यही शक्य होते. मीना बिंद्राने सलवार-कमीज तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आणि पहातापाहाता तो ३०० कोटीपर्यंत वृद्धिंगत केला. २ मुलांची आई असलेल्या मीनाने स्वतःच्या खर्चासाठी व्यवसाय सुरु केला आणि पुढे मुलांच्या मदतीने तो वाढवला.

एका सर्वसाधारण कुटुंबात मीनाचा जन्म झाला. मीना ही ६ भावडांमधील मुलगी. वडील ९ व्या वर्षीच देवाघरी गेले. पण, वडिलांनी व्यवसायातून बऱ्यापैकी तरतूद केल्यामुळे अडचण आली नाही. इतिहास हा विषय घेऊन BA झाल्यावर मीनाचे रीतसर लग्न झाले. नवरा इंडियन नेव्हीमध्ये होता. १९६५ मध्ये पहिल्या आणि १९७४ मध्ये दुसऱ्या मुलाचा जन्म झाला.

मीनाने पुढे २० वर्षे फक्त ‘अरे, संसार संसार’ केला. नोकरी साठी ‘मी’ नाही हे मला माहीत होते, असे मीना सांगतात. मग वेगळे काय करता येईल..? असा विचार तिच्या डोक्यात सुरू होता. त्यातूनच व्यवसायाची कल्पना सुचली.

मीनाला रंगसंगतीचे उत्तम ज्ञान आहे. कोणाला आणि कोणत्या कपड्यावर कोणता रंग शोभून दिसेल हे तिला उत्तम कळतं. स्वतःच्या काही साड्या मीना यांनी ब्लॉक प्रिंट करून तयार केल्या होत्या आणि त्या सर्वाना आवडल्याही होत्या. यातून स्वतःच्या व्यवसायाची गणिते मांडवी असे त्यांना वाटू लागले.

मग नवऱ्याशी चर्चा करून भांडवल म्हणून तिने सिंडीकेट बँकेमधून ८००० रुपये घेतले. त्यातच त्यांची देवेश या होताकरू तरुणाशी ओळख झाली. देवेश हा उत्तम ब्लॉक प्रिंटींग करायचा. त्याच्याबरोबर काम करताना त्यांनी खूप वेगवेगळे प्रयोग केले.

आम्ही सकाळ ते रात्र केवळ काम करायचो असे मीना सांगतात. सर्वाना परवडतील आणि रोज वापरता येतील असे ४० सलवार कुडती त्यांनी स्वतःच्या घरात विकायला ठेवली आणि काय आश्चर्य, सर्व विकले गेले.

उत्तम संवादकौशल्य, कामावरील निष्ठा आणि रंगसंगतीतचे वेगळेपण यामुळे मीना ह्यांच्या व्यवसायाचा आलेख सतत उंचावतच राहिला. एका मोठ्या ऑर्डरसाठी बिलबुक छापायाचे होते. तेव्हा त्याला मीना यांनी BIBA (बिबा) हे नाव दिले. तेव्हापासून बिबा हा ब्रँड प्रसिद्ध झाला.

केवळ ३ हजार रुपयांचा फायदा आणि ४० सलवार कुडतीपासून सुरु झालेला हा प्रवास आज ६०-७० हजार सुट व ३०० कोटींची वार्षिक उलाढाल इथपर्यंत जाऊन पोहोचला आहे. मीना यांचा मोठा मुलगा स्वतःचे B.Com चे शिक्षण पूर्ण करून व्यवसायात आला. त्याने अतिशय पटकन व्यवसायातील खूप कंटाळवाणी कामे स्वतःकडे घेतली. जसे की कामगारांशी चर्चा, ऑर्डर घेणे, माल पोह्चवणे, लिखापढीची कामे इत्यादी.

मीना सांगतात की, आम्ही नवीन जागेत स्थलांतर झाल्यावर तर माझ्या मुलाने व्यव्यासायात अजूनच लक्ष घातले आणि मी पुन्हा माझ्या आवडत्या गोष्टीकडे वळू शकले. आम्ही जे तयार करत होतो, ते सगळंच विकलं जात होतं. त्यामुळे कधीच ‘टार्गेट’चा प्रश्न नव्हता.

१९९० च्या दरम्यान भारतामध्ये shoper stop सारख्या multi-city दुकानांची सुरवात झाली आणि त्याचा फायदा बिबाला झाला आणि १९९३ मध्ये ‘बिबा’ हा एक मोठा ब्रँड झाला. पण त्याचबरोबर मीना यांना व्यवसायात अतिशय सुसुत्रता आणावी लागली. व्यवसायाच्या दृष्टीने हा खूप मोठा टप्पा होता.

कामाचे नियोजन, योग्य नियंत्रण प्रणाली, गुणवत्ता धोरण यामुळे कंपनी आणि कंपनीचे टेलरही अधिक कार्यक्षम झाले. दोन शिफ्टमध्ये काम सुरु झाले. स्त्रियांचे कपडे शिवताना खूप अडचणी येतात. कपड्यांचे रंगसुद्धा जरी एकत्र ऑर्डर केली तरी वेगळे येतात. कामातील मर्यादा ओळखून मर्यादेबाहेर काम करणे हे व्यावसायिकाच्या दृष्टीने आव्हान असते. २००० साली ‘बिबा’ने एका महिन्यात ५००० उत्पादनाचा टप्पा पार केला. एकाच रंगसंगतीचे ड्रेस तयार करणे खूप अवघड असते. परंतु बिबाने त्यावरही मात केली.

मीना म्हणतात, की व्यवसायात मागणी तसा पुरवठा हाच मंत्र असतो. पण, आमच्याकडे मागणी जास्त असल्याने व्यवस्थित पुरवठा करणे हे जोखमीचे काम होते. आम्ही आमच्या टेलर्सला विनंती केली की, तुम्ही जास्तीचे कारागीर ठेवा. त्यामुळे आमचे टेलर्सही आमच्याबरोबर मोठे होत गेले. तयार सलवार कुडती ही कल्पना तेव्हा नविनच होती. त्यामुळे ‘बिबा’ला कधीही कोणाकडे जावे लागले नाही उलट लोकच शोधत येत होते.

Shoper stop आणि Pantaloon सारख्या नवीनच आलेल्या मोठ्या दुकानात बिबाला विशेष मागणी होती. अजून एक मोठा टप्पा मीना यांच्या आयुष्यात आला तो म्हणजे त्यांचा धाकटा मुलगा सिद्धार्थ जेव्हा एम.बी.ए. करून व्यवसायात आला तेव्हा.

सिद्धार्थचे असे ध्येय होते, की २००४ साली बिबाचे रिटेल outlet सुरु व्हावे आणि त्याने ते करून दाखवले. तोपर्यंत ‘बिबा’ हा २५ कोटींचा व्यवसाय करणारा मोठा ब्रँड झाला होता. २००४ साली Orbit आणि CR2 सारख्या मोठ्या मॉल्समध्ये त्याने स्वत:ची रिटेल दुकाने सुरू केली.

त्यानंतर बिबा ने विविध मॉल्समध्ये दुकाने घेण्यास सुरवात केली. उत्तम प्रतिसाद मिळत गेला. भरपूर ग्राहक जोडले गेले. २००४ नंतर बिबाने मागे वळून पाहिलेच नाही. किशोर बियाणी हे व्यवसायात १०% भागीदार झाले. २०१० साली मीनाच्या मोठ्या मुलाने स्वतःचा Seven East म्हणून नवीन ब्रान्ड तयार केला. मार्च २०१२ ला बिबाचा महसूल ३०० कोटी झाला होता. ‘बिबा’ची ९० दुकाने स्थापन झाली होती.

योग्य किंमत, उत्तम दर्जा आणि वेळेत वितरणाची हमी ही व्यवसायाची गुणसूत्रे मीना पाळतात. विशेष म्हणजे, हे सगळे करताना त्यांनी घराकडे दुर्लक्ष केले नाही. नवऱ्याची बदली दिल्लीला झाल्यावर त्यांनी मुंबई-दिल्ली असा प्रवास करून संसार केला.

त्या म्हणतात, प्रत्येक स्त्रीच्या मनात कायम आधी कुटुंब आणि मग व्यवसाय असतो. पुरुषाचे तसे नसते त्यांच्या दृष्टीने कुटुंब महत्वाचे असते. पण त्याची काळजी घ्यायला आपली बायको आहे. ही जाणीव त्याला असल्याने तो फक्त करिअरवर लक्ष केंद्रित करू शकतो.

मुंबईमध्ये घर घेणे ही अशक्य कोटीताली गोष्ट आहे. मीना यांच्या नवऱ्याची बदली मुंबईबाहेर झाली तेव्हा त्यांना नेव्हीचे घर सोडणे गरजेचे होते. तेव्हा मीना स्वतःच्या कमाईतून घर घेऊ शकल्या. एखाद्या स्त्रीने घर घेणे तेसुद्धा स्वतःच्या कमाईतून ही आजही खूप मोठी गोष्ट आहे.

स्वतःच्या प्राकृतिक स्वास्थ्यासाठी मीना योग, प्राणायाम, चालणे, पोहणे यावर भर देतात. निसर्गदत्त महाराज यांचे ‘I am that’  नावाचे पुस्तक त्यांनी अनेक वेळा वाचले आणि स्वतःमधील बदल अनुभवत गेल्या. शांत, यशस्वी आणि उत्तम व्यक्ती बनण्यास या पुस्तकाने त्यांना खूप मदत केली.

सरतेशेवटी, मीना बिंद्रा या आपल्या कर्तृत्वातून हेच सिद्ध करतात, की महिलांनी स्वतःच्या आवडीच्या व महिलांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा अथवा सेवेचा व्यवसाय म्हणून विचार करावा. ‘मला हे जमणार नाही’, असे कधीच मनात आणू नये. सातत्याने एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केला तर यश हमखास मिळतेच.

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य