Bhartiyans

Menu

शुभम जगलान : दुधवाल्याचा मुलगा झाला गोल्फचा विश्वविजेता...!

Date : 04 Jan 2017

Total View : 396

हरियाणामधील इस्रान गावातील एका सामान्य कुटुंबातील अवघ्या १२ वर्षांचा मुलगा शुभम जगलान गोल्फचा कनिष्ठ गटातील विश्वविजेता झाला. आतापर्यंत १०० हून अधिक विजय त्याच्या नावावर जमा झाले आहेत.


सारांश

६ वर्षे वय असताना एखादा खेळ शिकायला सुरवात करण आणि पुढील ६ वर्षात त्यात प्राविण्य मिळवणं, हे अवघड काम केलं ‘शुभम जगलान’ने. हरियाणामधील इस्रान गावातील शुभम आता गोल्फचा कनिष्ठ गटातील विश्वविजेता झाला आहे. आतापर्यंत १०० हून अधिक विजय त्याच्या नावावर जमा झाले आहेत. गोल्फमधील मातब्बर खेळाडूंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून एक दिवस स्वतःच इतरांची प्रेरणा होण्याची त्याची जिद्द आहे..!सविस्तर बातमी

बॉलीवूड आणि क्रिकेट हे भारतीयांचे शब्दश: जीव की प्राण, कर्म-धर्म, सर्वस्व आहेत, असे म्हणतात. कोट्यवधींची उलाढाल या दोन क्षेत्रात होते. याचा प्रभाव इतका आहे, की कोणत्याही लहान मुलाला तुम्ही पाहिलं तर त्याच्या हातात खेळणं म्हणून बॅट आणि बॉल हे तुम्हाला दिसेलच दिसेल.

पण, वयाच्या ६ व्या वर्षीच गोल्फची स्टिक हातात घेणारा गोल्फचा कनिष्ठ गटातील विश्वविजेता शुभम जगलान मात्र तुमचा हा समज खोडून काढतो..!

गोल्फ खेळण्यापासून ते त्याच्यातच करिअर करण्याचा निर्णय घेणं या संपूर्ण प्रवासात शुभमला आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय अशा विविध प्रकारच्या अडचणी आल्या. मात्र, त्यावर मात करून त्याने हे दाखवून दिलं, की एका दूधवाल्याचा आणि अवघ्या १२ वर्षांचा सामान्य कुटुंबातील मुलगा देखील गोल्फसारखा महागडा खेळ खेळू शकतो एव्हढंच नव्हे तर त्यात विश्वविजेतेपदसुद्धा पटकवू शकतो..!

शुभम जगलान : दुधवाल्याचा मुलगा झाला गोल्फचा विश्वविजेता...!

दुर्दैवाने आपल्या देशात अजूनही एकसुरी शिक्षणपद्धती आहे. पठडीबाहेर जाउन वेगळ्या क्षेत्रात करिअर करणं हे ‘समाज’ सहजं स्वीकारत नाही.

मुलांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं आणि खेळ खेळायचाच असेल तर क्रिकेटसारखा लोकप्रिय खेळ खेळावा कारण, त्यात ‘स्कोप’ आहे; अशी साधारण गणितं असतात.

पण, ही बंधने झुगारून देत शुभम जगलाने स्वत:चा मार्ग स्वत:च निवडला आणि त्यात तो यशस्वी झाला.

शुभमला खूप लहान वयातच कळलं होतं की त्याला नक्की काय करायचंय. नाहीतर एका दुधवाल्याचा मुलगा गोल्फसारखा महागडा खेळ खेळतो आणि त्यात अविश्वसनीय यश मिळवतो, हे कसं शक्य होतं..? बर, त्याच्या या प्रवासाची सुरुवातच नकारात्माकतेने झाली होती. वय लहान असल्यामुळे त्याला खेळ खेळणं नाकारलं गेलं होतं, पण, तो थांबला नाही, हरला नाही.
जिथे नाकारलं गेलं त्यातच तो विश्वविजेता झाला आणि याचं श्रेय त्याच्या पालकांना देखील आहे.

हरियाणा मधील एका छोट्या गावात राहणाऱ्या शुभमला, तो केवळ ६ वर्षाचा असताना त्याचे आजोबा पाहिल्यांदा गोल्फ खेळायला घेऊन गेले. त्यावेळी इस्रान या त्याच्या गावी एक नवीन गोल्फ अकादमी सुरु झाली होती. इथूनच त्याच्या गोल्फ करिअरची सुरवात झाली. पण अवघ्या २ महिन्यातच ती अकादमी बंद पडली. प्रशिक्षक, खेळाचं साहित्य सगळंच गेलं. पण, गोल्फची प्रचंड आवड असलेल्या शुभमने प्रयत्न सुरू ठेवले.

मग, त्याने इंटरनेटवरून माहिती घेतली. गोल्फचे व्हिडिओ पाहून तो त्याच्या घराजवळच्या मैदानावर सराव करू लागला. घराच्या छतावर असलेल्या वाळूमध्ये त्याने ‘बंकर शॉट्स’चा सराव केला.

या सगळ्यात, शुभम आणि त्याच्या वडिलांच्या कष्टाचे चीज करणारा एक दिवस उगवला. माजी गोल्फ खेळाडू नोनिता कुरेशी आणि अमित लूथरा यांच्या नजरेने शुभमला हेरलं. लूथरा यांनी १९८२ सालच्या आशियाई खेळांसाठी भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यांनी त्याला दिल्लीच्या गोल्फ क्लबमध्ये प्रवेश मिळवून दिला. तिथे खेळाबरोबरच त्याचा व्यायाम, आहार, आर्थिक बाबी, अभ्यास अशा सगळ्या गोष्टी सांभाळल्या जाऊ लागल्या.

सलग ६ वर्षे केलेया तपश्चर्येचे फळ त्याला आता मिळू लागलं. या सगळ्याच फलित म्हणून आतापर्यंत १०० हून अधिक विजय त्याच्या नावावर जमा झाले आहेत. ज्यामध्ये ‘US Kids Golf World Championship title in Boys 11 category’ आणि  ‘World Junior Championship title’ ही यशाची सुवर्णपाने आहेत.

शुभमची साधना अविरत सुरू आहे. सध्या तो केवळ खेळावर लक्ष केंद्रित करतोय. टायगर वूड्स, गेरी प्लेअर, अनिर्बन लहिरी या खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक दिवस स्वतःच इतरांची प्रेरणा होण्याची त्याची जिद्द आहे आणि तो तसा होईलसुद्धा, हे भविष्य त्याच्या आजच्या पाऊलखुणा वर्तवत आहेत..!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

 

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य