Bhartiyans

Menu

Bhopal - I Clean Team’ आपल्या शहराबद्दलचे प्रेम कृतीतून व्यक्त करणारी उत्तम ‘टीम’ !

Date : 21 Jan 2017

Total View : 469

भोपाळ शहर स्वच्छ व्हावे यासाठी ‘I Clean Bhopal Team- Spot Fixing Program’ हा उपक्रम राबवला जातो. यामार्फत आतापर्यंत भोपाळमधील सुमारे १९५ ठिकाणे स्वच्छ आणि सुशोभित झाली आहेत.


सारांश

भोपाळ हे शहर मूळ जसं आहे तसंच सुंदर दिसावं यासाठी काही नागरिक तीन वर्षापूर्वी एकत्र आले आणि त्यांनी ‘I Clean Bhopal Team- Spot Fixing Program’ ला सुरुवात केली. या उपक्रमाद्वारे दर रविवारी भोपाळमधील अस्वच्छ सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली जातात. गुलरेज रझा खान आणि कल्पना केंकरे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमातून आतापर्यंत सुमारे १९५ ठिकाणे स्वच्छ आणि सुशोभित झाली आहेत.सविस्तर बातमी

‘Bhopal - I Clean Team’ 
आपल्या शहराबद्दलचे प्रेम कृतीतून व्यक्त करणारी उत्तम ‘टीम’ !

भोपाळ शहर स्वच्छ व्हावे यासाठी ‘Bhopal - I Clean Team’ - Spot Fixing Program’ हा उपक्रम राबवला जातो. 
यामार्फत आतापर्यंत भोपाळमधील सुमारे १९५ ठिकाणे स्वच्छ आणि सुशोभित झाली आहेत.

भोपाळ हे शहर मूळ जसं आहे तसंच सुंदर दिसावं यासाठी काही नागरिक तीन वर्षापूर्वी एकत्र आले आणि त्यांनी ‘Bhopal - I Clean Team’ - Spot Fixing Program’ ला सुरुवात केली.

या उपक्रमाद्वारे दर रविवारी भोपाळमधील अस्वच्छ सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली जातात. गुलरेज रझा खान आणि कल्पना केंकरे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमातून आतापर्यंत सुमारे १९५ ठिकाणे स्वच्छ आणि सुशोभित झाली आहेत. 
____________________________________________________

रविवार किंवा कोणत्याही सुट्टीच्या दिवशी बहुतांश लोक जरा उशीराच उठतात. आठवडेभराच्या कामाचा थकवा काढण्यासाठी हा एकमेव दिवस मिळतो ना...!

आता याच दिवशी सकाळी उठून शहर स्वच्छ करण्याचे ‘समाजकार्य’ करायला येता का...? असं कोणी विचारलं तर.....! या विचारानेच कंटाळा आला की नाही? चिडचिडही झाली असेल..?

पण, अनेक भोपाळ वासियांचा रविवार सकाळी लवकर सुरू होतो. कारण ‘अपने शहर के प्रती प्यार और उसे स्वच्छ और सुंदर रखने का जज्बा होना चाहिये, फिर देखिये, गंदगी कहीं नजर नहीं आयेगीI’ असं म्हणणाऱ्या कल्पना केंकरे आणि त्यांचा ‘Bhopal - I Clean Team’ - Spot Fixing Program’ हा उपक्रम भोपाळवासीय पाहता आहेत. त्यांच्यापैकी अनेक जण या उपक्रमात सहभागी देखील झाले आहेत.

काय आहे हा उपक्रम ? चला, जाणून घेऊया !

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ...

एक अत्यंत सुंदर शहर. कलेचे माहेरघर, नैसर्गिक सौंदर्याचं वरदान लाभलेलं शहर. हे शहर असंच सुंदर दिसावं यासाठी भोपाळवर प्रेम करणारे काही नागरिक तीन वर्षापूर्वी एकत्र आले आणि त्यांनी एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाला सुरुवात केली.

भोपाळ शहरातील विविध चौक, भाजीबाजार, रहिवासी वसाहती, मैदानांच्या संरक्षक भिंती अशा ठिकाणी तुम्हाला सुंदर वारली चित्रे चितारलेली दिसतील. भोपाल नगर निगम देखील मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक वारशाची झलक दाखवणारी चित्रे मोक्याच्या ठिकाणी रंगवते.

पण, या वारली चित्रांनी रंगलेल्या भिंतींचे वैशिष्ट्य असे, की ही चित्रे हा सरकारी उपक्रम नसून ‘Bhopal - I Clean Team’ - Spot Fixing Program, हा भोपाळप्रेमी नागरिकांच्या स्वयंसेवी गटाने सुरू केलेला उपक्रम आहे.

फेसबुकवरून आपल्या शहराबद्दलच्या आत्मीयतेमुळे हे लोक एकमेकांशी जोडले गेले आणि या सुंदर उपक्रमाचा जन्म झाला.

‘Bhopal - I Clean Team’ च्या मुख्य आहेत श्रीमती कल्पना केंकरे.

टीम भारतीयन्सने त्यांच्याशी खास चर्चा केली. या चर्चेत त्यांनी हा ३ वर्षांचा अत्यंत रोचक प्रवास उलगडून सांगितला. सुरुवातीला ‘पहल’ नावाचा एक अशाच समाजसेवी उपक्रम चालवणाऱ्या नागरिकांचा ग्रुप होता. यातीलच काही सदस्य, आपणच आपले शहर स्वच्छ आणि सुंदर करूया या कल्पनेने पुढे आले आणि ‘Bhopal - I Clean’ हा उपक्रम सुरु झाला.

या उपक्रमाचे जनक गुलरेज रझा खान हे मूळचे भोपाळचे पण सध्या ते कुवेतला आहेत. त्यांनी आणि कल्पना केंकरे यांनी यासाठी टीम एकत्र करायला सुरुवात केली.

शहरातील मोक्याच्या अस्वच्छ जागा शोधून त्यांची माहिती घेणे, त्यासाठी आवश्यक परवानगी घेणे, स्वच्छता साहित्य जमा करणे, स्वयंसेवक गोळा करणे, रंगकामाचे साहित्य उपलब्ध करणे आणि रविवारी सकाळी ७ वाजता त्या स्थळी जाऊन काम सुरु करणे हे वाटते तेवढे सोपे नाही.

एक स्त्री असूनही कल्पना ही सर्व काम घर आणि व्यवसाय सांभाळून यशस्वीरित्या करतात. या त्यांच्या समाजकार्यामध्ये त्यांच्या घरातील सर्वच उत्साहाने सहभागी होतात.

कल्पना सांगतात, की डिसेंबर २०१३ मध्ये या कामासंबंधीची पहिली मीटिंग झाली आणि १२ जानेवारी २०१४ ला भोपाळ मधील बैरागड येथे आम्ही पहिल्यांदा हा उपक्रम केला.

या स्पॉटची माहिती तिथे राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने दिली होती. परंतु, या पहिल्याच कामात त्या जागेच्या मालकाने हस्तक्षेप करायला सुरुवात केली. माझी जागा घाण दिसली तरी चालेल, पण तुम्ही येथे काम करू नका.

तेव्हापासून आम्ही ठरवलं, की फक्त सार्वजनिक ठिकाणीच हा उपक्रम राबवायचा. त्यानंतर मात्र एकापाठोपाठ एक अशा अस्वच्छ जागा, भिंती शोधून तिथे स्वच्छता आणि रंगकाम आम्ही करत गेलो. हळूहळू शहराचा कायापालट होऊ लागला.

हा प्रवास असा वाचायला सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात तो तसा नव्हताच. अनेकदा, या कामात काही समाजविघातक लोकांनी अडथळे आणले. काही वेळा तर प्रकरण हातघाईवर देखील आलं.

पण, कल्पना केंकरे यांनी ही सर्व परिस्थिती धीराने हाताळली. विशेष म्हणजे, त्यांना सुरुवातीला विरोध करणारे काही जण आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. याचे श्रेय जाते ते त्यांच्या निस्वार्थीपणे काम करण्याच्या वृत्तीला...!

कौतुकाची बाब अशी की, गेल्या तीन वर्षात भोपाळला आलेल्या अनेक शासकीय अधिकाऱ्यानी या उपक्रमाची दखल घेऊन त्याला दाद दिली नाही, तर ते स्वतः यात सहभागी झाले. 
अनेकदा गर्दीच्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी वाहतुकीचे नियोजन करावे लागते, अतिक्रमण असेल तर ते उठवावे लागते, भिंती धुण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

अशा वेळी पोलीस यंत्रणा, फायरब्रिगेड, जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकारी मदत करतात. कल्पनाताईंनी स्वत:च्या मनमिळाऊ स्वभावामुळे अनेक लोक जोडली आहेत. त्यांनी आतापर्यंत एकही रविवार न चुकता जवळ जवळ १९५ स्पॉट सुशोभित केले आहेत.

‘Bhopal - I Clean Team’ मध्ये सर्व वयोगटातील व्यक्ती आहेत. या टीम मध्ये खोजी टीम (जे असे अस्वच्छ स्पॉट शोधतात), डिझाइनर टीम (जे डिझाईन ठरवतात) आणि इम्प्लीमेंटर टीम (जे साफ सफाई, रंगकाम, इ. करतात) अशा सब-टीम्स आहेत. अर्थात, सगळेजण हातात कुदळ फावडे घेऊन तुम्हाला साफ-सफाई करताना दिसतील.

खबरदारी म्हणून कल्पनाताईंनी सर्वाना मास्क, हातमोजे, एप्रन, इ. उपलब्ध करून दिले आहे. तरीही, स्वतः धुळीने माखून ही टीम भोपाळ सुंदर करताना मग्न झालेली दिसते.

हे साहित्य सुरुवातीला ऐच्छिक वर्गणीतून जमवले गेले आणि आता प्रत्येक सदस्य ५० रुपये प्रतिरविवार (हे देखील ऐच्छिक आहे) अशी वर्गणी देतो किंवा आपल्या आणि ओळखीच्या घरांमधून रद्दी जमा करून ती ‘भंगारवाला.कॉम’ या वेबसाईटद्वारे विकून त्यातून या कामासाठी पैसा उभा केला जातो.

अनेक लोक स्वेच्छेने या सत्कार्याला मदत म्हणून आपल्या घरातील रद्दी मोफत आणून देतात.

या रकमेतून रंगकामाचे साहित्य विकत घेतले जाते. जागेचे क्षेत्रफळ, कार्यकर्त्यांची संख्या, इ. बाबी लक्षात घेऊन डिझायनर टीम त्या स्पॉटचे डिझाईन ठरवते. अशा प्रकारे दर रविवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत शक्यतो हे काम पार पाडले जाते. काम जास्त असेल तर दुपारचे २ देखील वाजतात.

पण, कल्पनाताई आपल्या सर्व स्वयंसेवकांची आईप्रमाणे काळजी घेतात. सर्वांना वेळेवर चहा-नाश्ता दिला जातो.

येणारे जाणारे नागरिक अत्यंत कौतुकाने या टीमचे काम पाहत असतात. ज्यांना सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांची फेसबुक पेजच्या माध्यमातून नोंदणी केली जाते व त्यांना पुढील उपक्रमात सहभागी करून घेतले जाते.

या उपक्रमाची दखल मीडिया आणि सरकारने देखील अनेक वेळा घेतली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते तसेच मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंट, दिल्ली यांच्या तर्फे ‘Bhopal - I Clean Team’ ला गौरवले गेले आहे.

या उपक्रमाचे रोपटे आता हळूहळू मोठे होते आहे. भोपाळमध्ये शिकायला असताना या टीममध्ये काम केलेली काही तरुण मंडळी नंतर आपआपल्या शहरांमध्ये परत गेली आणि तिथे त्यांनी हा उपक्रम सुरु केला.

आज भिंड, बडवानी, रीवा तसेच इतर राज्यातील नागपूर, हैदराबाद, जयपूर, या शहरांमध्ये ‘Bhopal - I Clean Team’ हा उपक्रम सुरु आहे.

‘ज्योत से ज्योत जलाते चलो..!’ म्हणतात ते यालाच..!

कल्पनाताई ज्यांना कोणाला असा उपक्रम आपल्या शहरात सुरु करायचा आहे, त्यांना मार्गदर्शन करण्यास तत्परतेने पुढे येतात. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, “अपने शहर के प्रती प्यार और उसे स्वच्छ और सुंदर रखने का जज्बा होना चाहिये, फिर देखिये, गंदगी कहीं नजर नहीं आयेगीI”

तीन वर्षं अव्याहतपणे आपले शहर सुंदर राखणाऱ्या आणि नव्यापिढीला एक आगळावेगळा संदेश देणाऱ्या या ‘Bhopal - I Clean Team’ ला टीम भारतीयन्सतर्फे खूप शुभेच्छा...!

उद्या १२ जानेवारी २०१७ ला त्यांच्या उपक्रमाचा वर्धापनदिन आहे त्यानिमित्त सर्व भारतीयांच्या वतीने हा उपक्रम देशातील प्रत्येक शहरात सुरू होवो आणि ‘स्वच्छ भारताचे’ या माध्यमातून साकार होवो, हीच सदिच्छा...!!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

मृणाल काशीकर- खडक्कर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य