Bhartiyans

Menu

पहिली भारतीय महिला घोडेस्वार ‘रूपा सिंग’ !

Date : 21 Jan 2017

Total View : 404

चेन्नईमध्ये जन्मलेली ३४ वर्षीय रूपा सिंग या पहिल्या भारतीय महिला घोडेस्वारने आतापर्यंत ७२० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विजेतेपद आणि ७ चॅम्पिअनशिप पटकाविल्या आहेत.


सारांश

चेन्नईमध्ये जन्मलेली ३४ वर्षीय रूपा सिंग ही भारतातील पहिली महिला घोडेस्वार आहे. घोडेस्वारीचे प्राथमिक धडे तिने तिचे आजोबा उगमसिंग राठोड यांच्याकडून आत्मसात केले. घोडेस्वारी शिकण्यापासून पहिली महिला घोडेस्वार होण्यापर्यंतच्या प्रवासात एक महिला म्हणून रूपाला अनेक अडचणी आल्या. मात्र, तिने या सर्वांवर मात करत आतापर्यंत ७२० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विजेतेपद आणि ७ चॅम्पिअनशिप रूपाने पटकाविल्या आहेत.सविस्तर बातमी

‘वज्रादपि कठोरानि, म्रुदुनी कुसुमादापि’ हे ‘स्त्री’चं यथार्थ वर्णन आहे.

स्त्रीने एकदा ठरवलं तर ‘ती’ काहीही करू शकते. हे वेळोवेळी भारतीय स्त्रीने आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध केले आहे.

‘स्त्री-शक्ती’च्या अविष्कारातून कोणत्याही क्षेत्रातील असाध्यही साध्य केलं जाऊ शकतं. मग याला ‘घोडेस्वारी’ तरी कशी अपवाद ठरेल...?

मातृत्व, कोमलता, सोज्वळता हे अंगभूत गुण असलेली स्त्री प्रसंगी झाशीच्या राणीसारखी ‘रणरागिणी’ होऊ शकते आणि कल्पना चावलासारखी अवकाशाला गवसणीसुद्धा घालू शकते.

अशा अनेक ‘दुर्गा’, ‘कात्यायिनी’ आणि ‘सरस्वती’सुद्धा आपल्याला #bharatiyansच्या माध्यमातून भेटल्या आहेत.

आज भेटूया अशाच एका साहसी भारतीय दुर्गेला...पहिली भारतीय महिला घोडेस्वार रूपा सिंग हिला..!

पहिली भारतीय महिला घोडेस्वार ‘रूपा सिंग’ !

चेन्नईमध्ये जन्मलेली ३४ वर्षीय रूपा सिंग ही भारतातील पहिली महिला घोडेस्वार आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी रूपा पहिल्यांदा आपल्या आजोबांसोबत घोड्यावर बसली.

घोड्याची लगाम कशी खेचायची, मांड कशी ठोकायची असे घोडेस्वारीचे प्राथमिक धडे तिने तिचे आजोबा उगमसिंग राठोड यांच्याकडून आत्मसात केले. उगमासिंग ब्रिटीश घोड्यांना प्रशिक्षण द्यायचे.

रूपाचे वडील नरपत आणि भाऊ रवींद्र सिंग हे दोघेही उत्तम घोडेस्वार आहेत. त्यांनी देखील तिला वेळोवेळी मार्गदर्शन केलं.

रूपाच्या वडिलांचं स्वप्न होतं, की तिने घोडेस्वार व्हावं आणि चिकाटी व धाडसी रूपाने ते पूर्ण केलं. सुरुवातीला रूपाच्या आईला खूप काळजी वाटायची. काहीही झालं तरी ते मातृह्रदय ना..!

पण आईने रुपाला काळजीने बांधून टाकलं नाही. उलट तिला प्रोत्साहनच दिलं. १९७८ साली इटलीतून भारतात आल्या आणि नंतर पहिल्या व्यावसायिक महिला घोडेस्वार झालेल्या सिल्व्हा स्तोराई यांना रूपा आदर्श मानते.

घोडेस्वारी शिकण्यापासून पहिली महिला घोडेस्वार होण्यापर्यंतच्या प्रवासात रूपाला अनेक अडचणी आल्या.

सुरूवातीला तर केवळ एक महिला म्हणून रूपाला कोणी रेससाठी घोडाच देत नसे. रूपा याविषयी सांगते, की ‘घोडामालक आणि शर्यत लावणारे लोक यांना असंच वाटायचं, की एका स्त्रीची शाररीक शक्ती पुरूषांपेक्षा कमी पडेल त्यामुळे मला चांगले घोडे मिळत नसत.

साधारण ५० रेस जिंकल्यावर माझ्यावर लोकांचा विश्वास बसला आणि मला उत्तम घोडे मिळू लागले.’

पुरुषांपेक्षा महिला कमी नसतात, हे दाखवायची जिद्द रूपाच्या मनात होती. पहाटे ५:३० ते ९:३० या वेळेत ती सराव करायची. आजपर्यंत भारतातल्या अनेक उत्तमोत्तम घोड्यांवर स्वार होण्याचा मान रूपाला मिळाला आहे.

८० रेस जिंकल्यावर रूपाला दिवंगत डॉ. रामा स्वामी यांच्या तबेल्यात कामाची संधी मिळाली. तिथे तिला सुप्रसिद्ध घोडेस्वार रोबर्ट फोली यांचं मार्गदर्शन लाभलं.

रूपाला आजही तिची पहिली ‘रेस’ आठवते. ती सांगते, ‘पहिल्या शर्यतींच्या वेळी एकदम लोकांसमोर जाताना मला ओशाळल्यासारखं झालं होतं. नैराश्य देखील आलं होतं.

पण मी आत्मविश्वासाने आणि खंबीरपणे लढले. १८ घोड्यांच्या शर्यतीत माझा चौथा क्रमांक आला होता. रेस संपली आणि अचानक माझा ‘पावर पोइन्ट’ नावाचा घोडा गरकन वळला. मी धाडकन खाली कोसळले. तेव्हा लक्षात आलं, की ‘रेस’ वाटते तेवढी सोपी अजिबात नसते...!

आज मागे वळून पाहताना रूपा जेव्हा आपाला प्रवास आठवते, तेव्हा ती अतिशय मार्मिक आणि यथार्थ शब्दात त्या प्रवासाचे वर्णन करते. ती म्हणते, ‘घोडेस्वारीत माझे अनेकदा अपघात झाले. फ्रेक्चर देखील झाले.

त्यामुळे कंटाळून घोडेस्वारी सोडून द्यावी असं अनेकदा वाटलं. पण माझ्या रक्तात असलेल्या घोडेस्वारीच्या ओढीने, आवडीने मला तसं करू दिलं नाही.’

आतापर्यंत ७२० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घोडेस्वारी स्पर्धेचे विजेतेपद आणि ७ चॅम्पिअनशिप पटकावणारी रूपा म्हणते की, अजूनही प्रत्येक ‘रेस’च्या आधी नैराश्य येतंच. ‘अनिश्चितता’ ही प्रत्येक रेसमध्ये असते. कारण, तुम्हीही कितीही प्रयत्न केले तरी तुमचा घोडा कसा ‘परफोर्म’ करेल हे तुम्ही सांगू शकत नाही.

अनेक परदेशी रेसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे रूपा स्वत:ला भाग्यवान समजते. पोलंडमध्ये झालेल्या विश्व महिला घोडेस्वारीचे विजेतेपद देखील तिने पटकावले आहे.

महिला असून घोडेस्वारीमध्ये अद्वितीय यश मिळवणाऱ्या रूपाला एका गोष्टीची मात्र खंत आहे. ती अशी, की घोडेस्वारीमध्ये जोखीम असल्याने आजही अनेक पालक आपल्या मुलींना या क्षेत्रात पाठवत नाही. त्यांना रूपा आवाहन करते आहे, की तुम्ही स्वत:ला पुरूषांपेक्षा कमी समजू नका. तुम्ही त्यांच्यापेक्षा उत्तम लढू शकतात. कारण ‘शर्यत’ ही केवळ शरीरबळावर नाही तर मनोबलावर लढायची असते.

रूपाने आपल्या यशाचे गुपित सांगितले आहे ते भारतीय स्त्रियांनी अवलंबलं तर त्या गगनाला गवसणी घालतील.

"सर्वप्रथम तुम्ही ‘स्त्री’ आहात हे डोक्यातून काढून टाका आणि पुरूषांपेक्षा तुम्ही कुठेही कमी नाही, हे दाखवून द्या." हे रूपाचे बोल प्रत्येक भारतीय स्त्रीने कायम लक्षात ठेवावे असे आहेत. 
नक्कीच आहेत.....

धन्यवाद..!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

राखी कुलकर्णी

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य