Bhartiyans

Menu

पडद्यावर स्त्री-पुरूष समानता दाखवणाऱ्या चित्रपट सृष्टीतील ‘असमानता’ कमी करण्यासाठी झटणारी ‘वैष्णवी सुंदर’!

Date : 21 Jan 2017

Total View : 221

स्त्री-पुरुष असमानता असलेली मोठी क्षेत्रे म्हणजे केवळ सिलिकॉन व्हॅली, आयटी नसून चित्रपटक्षेत्रसुद्धा आहे. हीच असमानता दूर करण्याचा प्रयत्न वैष्णवी सुंदरने केला स्वत: प्रवाहाविरुद्ध पोहून आणि तरीही प्रवाहात टिकून राहून..!


सारांश

‘म्हारी छोरीया छोरोसे कम है के?’ असं म्हणत स्त्री-पुरूष समानतेचा संदेश देत मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने बॉलीवूडमध्ये चांगलीच मोठी ‘दंगल’ केली. ‘दंगल’च्या आधी देखील स्त्री-पुरूष समानता हाताळणारे अनेक चित्रपट येऊन गेले. पण, पडद्यावर स्त्री-पुरूष समानतेचे ‘रील’ फिरवणाऱ्या चित्रपटसृष्टीत ‘रिअल’मध्ये असंच घडत नाही. म्हणूनच हीच असमानता दूर करण्याचा प्रयत्न वैष्णवी सुंदरने केला स्वत: प्रवाहाविरुद्ध पोहून आणि तरीही प्रवाहात टिकून राहून..!सविस्तर बातमी

‘म्हारी छोरीया छोरोसे कम है के?’
असं म्हणत स्त्री-पुरूष समानतेचा संदेश देत मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने बॉलीवूडमध्ये चांगलीच मोठी ‘दंगल’ केली.
आणि खरतरं ‘दंगल’च्या आधी देखील स्त्री-पुरूष समानता, स्त्री सक्षमीकरण असे विषय हाताळणारे अनेक चित्रपट येऊन गेले.

३ तासात ७० एमएम पडद्यावर स्त्री-पुरूष समानतेचे ‘रील’ फिरवणाऱ्या चित्रपटसृष्टीत ‘रिअल’मध्ये काय घडतंये..?
‘हिरॉईन’ किंवा इतर भूमिका करणाऱ्या स्त्री कलाकार वगळल्या तर बाकी चित्रपटनिर्मिर्तीमध्ये महिलांचे स्थान किती....?
पाच पुरूष दिग्दर्शकांची नावे सांगा म्हटलं, तर तुम्ही पटकन सांगाल.
पण, पाच महिला दिग्दर्शक, एडिटर, संवादलेखक, सिनेमेटोग्राफर, प्रकाशयोजना यांची नावे सांगा म्हटलं तर सांगू शकाल..?

कदाचित सांगालही..पण ‘पट्कन’ सांगू शकणार नाही, हे नक्की!
हाच भेद आहे, विरोधाभास आहे आणि हीच असमानता आहे.

चित्रपटक्षेत्रातील हीच असमानता दूर करण्याचा प्रयत्न वैष्णवी सुंदरने केला. स्वत: प्रवाहाविरुद्ध पोहून आणि तरीही प्रवाहात टिकून राहून..!

चित्रपटनिर्मिती क्षेत्रातील स्त्री-पुरूष असमानतेवर ‘The Indie Street’ या  ब्लॉगने प्रकाश टाकला. हा विषय हाताळताना त्यांना असं प्रकर्षाने जाणवलं, की चित्रपटांमधून स्त्रीला बऱ्याचदा सहनशीलतेची मूर्ती असेच दाखवतात; पण खरंतर आजची ‘स्त्री’ फक्त गृहिणीचा ‘रोल’ करत नाहीये.  

ती सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करतेय,  पुढे जातेय! मग स्त्रीला असं हतबल दाखवणाऱ्या दिग्दर्शकांची नेमकी मानसिकता काय असेल किंवा चित्रपट बनवणारे बहुतांशी पुरुषच असतात म्हणून हा भेद असेल का? अशीच मानसिकता पाश्चिमात्य चित्रपट सृष्टीतही असेल का?

या प्रश्नांची उत्तरे शोधताना The Indie Street च्या टिमने फिल्म फेस्टिवलची यादी तपासली आणि त्यात त्यांना कळालं, की बोटावर मोजण्या इतक्याच महिला सिनेमेटोग्राफर आणि इतर विभागात काम करताये. म्हणूनच पुरस्कारांच्या यादीत महिलांची नावे देखील कमीच असतात.

परंतु याला अपवाद ठरल्या ‘वूमेन मेकिंग फिल्मस’ (WMF) च्या संस्थापिका वैष्णवी सुंदर.

आपल्या करिअर आणि जीवनाबद्दल सांगताना वैष्णवी म्हणतात की, २०१३ मध्ये नोकरी सोडून स्वतःला पूर्णत: कला क्षेत्रात झोकून द्यायचं असं मी ठरवलं. मी त्यावेळेस नोकरी बरोबर रंगमंच, लेखन, अभिनयही करत होते; पण कुठेतरी आतून जाणवत होतं की आता एकच काहीतरी निवडण्याची वेळ आली आहे. माझ्या मित्र परिवाराने योग्य निवड करण्यात मला मदत केली. त्या सर्वांनाच माझं कविता करणं, लेख लिहिणं माहीत होतं.  त्यामुळे मी फिल्म मेकिंगमध्ये यावं असं सर्वांचंच मत होतं. त्यावेळेसच मी ‘पावा’ हा माझा पहिला चित्रपट तयार केला.

‘वूमन मेकिंग फिल्मस’बद्दल वैष्णवी सांगतात, की WMF ही संस्था चित्रपटनिर्मिती क्षेत्रात आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या महिलांसाठी आधारस्तंभ आहे. आम्ही महिलांना वेगवेगळे प्रोजेक्ट्स मिळवून देतो. त्यांना त्यांच्या आवडीनुसार दिग्दर्शन,  चित्रपट निर्मिती,  कला दिग्दर्शन,  प्रोडक्शन, डिझाईन अशा विविध विभागांतही काम देतो. या महिलांच्या कार्याची माहिती WMF दररोज सोशल मिडीयावर अपडेट करतं. त्यामुळे महिला निर्मात्यांनी बनविलेल्या फिल्मसला प्रसिद्धी मिळते. त्यांचं कौतुकही होतं.

या कार्यामागची प्रेरणा काय? असं विचारल्यावर वैष्णवी समाजाचं विदारक स्वरूप मांडताना म्हणतात, स्त्री-पुरुष असमानता प्रकर्षाने जाणवणाऱ्या घटना घडल्या नाहीत आणि त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या नाहीत, असा एकही दिवस जात नाही.

आश्चर्याची बाब म्हणजे ही विषमता फक्त आपल्या देशापुरतं मर्यादित नसून पाश्चिमात्य देशांतही आहे. हॉलीवूडमध्ये फक्त ५% महिला दिग्दर्शक आहेत आणि छायाचित्रकार,  एडिटर, ध्वनीमुद्रण व इतर विभागांत महिला वर्गाचे प्रमाण नगण्यच आहे. म्हणूनच WMF द्वारे मी होतकरू आणि हुशार महिला निर्मात्यांना जगापुढे आणू इच्छिते.

WMF ने आतापर्यंत खूप कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या पहिल्या १५ दिवसांच्या फिल्म फेस्टिवलमध्ये ७ देशांमधून आलेले तब्बल १५ चित्रपट भारतातील १२ प्रदेशांमध्ये दाखविण्यात आले होते. त्यांचा आंतरराष्ट्रीय महिला निर्मात्यांसाठीचा फिल्म फेस्टिवल गुवाहाटी येथे नुकताच पार पडला, ज्यात महिला दिग्दर्शकांचे ३० चित्रपट प्रदर्शित केले.

वैष्णवी लवकरच एका ब्लॉगवर काम सुरु करणार आहे ज्यात ती महिला निर्मात्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उभं करणार आहे.

या क्षेत्रात महिलांनी मोठ्या संख्येने यावं यासाठी काय करायला हवं, असं विचारल्यावर वैष्णवी पटकन म्हणाल्या, सर्वप्रथम मोकळं आणि निकोप स्पर्धेचं वातावरण निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. महिला चित्रपट निर्मात्या या पुरुष निर्मात्यांएवढीच उत्कृष्ट चित्रपटनिर्मिती करू शकतात, हे कटू असलं तरी सत्य आहे.

महिलांमधील कमतरता हा प्रॉब्लेम नाहीचये मुळी. तर समाजाचा अस्वीकार,  महिलांचं कौतुक न करण्याची आणि पुरुषांपेक्षा त्यांना कमी लेखण्याची वृत्ती  कमी व्हायला हवी. हेच आव्हान आहे. त्यामुळे महिलांना या क्षेत्रात आणण ही समस्या नसून त्यांना समाज किती स्वीकारतोय आणि किती पुढे जाऊ देतोय, हे जास्त महत्वाचं आहे.

वैष्णवीसारखाच विचार करणाऱ्या महिलांची आणि पुरूषांचीसुद्धा आज आपल्या देशाला गरज आहे. नाहीतर न जाणो एखादी ‘लेडी परफेक्शनिस्ट’ आपल्यातच असूनही ती पडद्यावर न येता कायम पडद्यामागेच राहील..!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

बातमी सौजन्य