Bhartiyans

Menu

अशिक्षित पप्पूने पेटवली गावात शिक्षणाची ज्ञानज्योत..!

Date : 21 Jan 2017

Total View : 440

स्वतःकडे नसलेली एखादी गोष्ट आपण इतरांना देऊ शकतो, यावर विश्वास ठेवाल? नाही ना ! पण, राजस्थानातल्या पप्पू काठट याने स्वत:चे शिक्षण नसताना देखील गावातील अनेक मुलींना शिकण्यास प्रवृत्त केलं..!


सारांश

स्वतःकडे नसलेली गोष्ट आपण इतरांना देऊ शकतो, यावर तुम्ही विश्वास ठेवाल? नाही ना..! पण, पप्पू काठट याने हा चमत्कार केला. राजस्थानमधील लासारीया गावाचा पप्पू हा सामान्य मुलगा. परिस्थितीमुळे त्याला शिक्षण सोडून १३व्या वर्षी कामासाठी दिल्लीला जावे लागले. दिल्लीमध्ये फुटपाथवर राहताना पप्पूने अनेक अनुभव घेतले. २००५ मध्ये तो गावाचा सरपंच झाला आणि त्याच्या प्रयत्नातून आजूबाजूच्या सहा गावातील मुलींचे भवितव्य बदलले.सविस्तर बातमी

तुमच्याकडे नसलेली एखादी गोष्ट तुम्ही इतरांना देऊ शकतो, नाही ना..? 
जे आपल्याचकडे नाही ते इतरांना कसे देणार?

पण, राजस्थानातल्या पप्पू काठट याने हा चमत्कार करून दाखवला.

त्याने असं काय इतरांना दिलं जे त्याच्याचकडे नव्हतं, पाहुया तरी.!

अशिक्षित पप्पूने पेटवली गावात शिक्षणाची ज्ञानज्योत..! 
#Bharatiyans

राजस्थान. 
जिथे आजही मुलीचा जन्म झाल्यास कोणाला आनंद होत नाही. 
अनेक ठिकाणी तर मुलीला आईच्या गर्भातच किंवा जन्मल्यावर लगेचच मारून टाकतात, असे ठिकाण.

अशा राजस्थानमधल्या एका छोट्या गावातील ही अत्यंत प्रेरणादायी सत्यकथा.

राजस्थानमधील लासारीया गावाचा पप्पू हा अत्यंत सामान्य मुलगा.

घरच्या परिस्थितीमुळे त्याला शिक्षण सोडून वयाच्या १३व्या वर्षी पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीला जावे लागले. त्याचे वय रिक्षा सायकल चालवण्याचे नक्कीच नव्हते. पण वडील अहमद हे एकटे १० जणांचे कुटुंब कसे पोसणार? त्यामुळे पप्पूला त्यांना मदत करणे गरजेचे होते.

दिल्लीमध्ये फुटपाथवर राहताना त्याला महिला सबलीकरणासाठी नावाजलेला एक प्रेरणास्त्रोत अर्थात किरण बेदी यांच्याबद्दल माहिती कळली.

आयुष्यात काही अभूतपूर्व करायचे असेल तर एक छोटी ठिणगीसुद्धा खूप महत्वाचे काम करते. तसचं झालं!

ही एक छोटी ठिणगी पप्पूच्याच गावचे नाही तर आजूबाजूच्या सहा गावातील मुलींचे भवितव्य बदलण्यास कारणीभूत ठरली.

दिल्लीच्या वास्तव्यात त्याला अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की ‘एक मुलगी शिकली तर केवळ घराचीच नाही; आजूबाजूच्या समाजाचीसुद्धा प्रगती होते.”

त्याने सुशीलाला, त्याच्या बहिणीला, पाचवी नंतर शिक्षण सोडू दिले नाही. तिला दहावीपर्यंत अंधेरी देओरी या गावात शिक्षण पूर्ण करू दिले आणि त्यानंतर पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बेईवार या गावात त्याने तिला बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी पाठवलं.

येव्हढ करूनच तो थांबला नाही तर दुसरी बहीण किरण हिला त्याने पुढे बेईवारमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवले.

पप्पू २००५ मध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाला आणि त्याच्या या ध्येयाला एक दिशा मिळाली. देल्वारा गावच्या आखत्यारीत अजून सहा गावे येतात. पप्पू सरपंच झाल्यावर तिथे शिक्षणविषयक सुधारणा झपाट्याने होवू लागल्या.

पप्पू सरपंच झाला त्यावेळी लासारला आणि देल्वारा या ठिकाणी प्रत्येकी एक शाळा होती. त्या शाळासुद्धा आठवीपर्यंतच. २००८ मध्ये पप्पूच्या प्रयत्नाने देल्वारा गावातील शाळा दहावीपर्यंत सुरु झाली.

२०१० मध्ये देल्वारा पंचायत निवडूक स्त्रियांसाठी राखीव झाली. त्याने पत्नी उमरा हिला निवडणुकीत उभं राहण्यास प्रवूत्त केलं. पप्पूने आजवर केलेल्या कामाचे फळ उमराला मिळालं.

ती निवडणूकीत सर्वाधिक मतांनी विजयी झाली. तिच्या कारकि‍र्दीत देल्वाराची आणि लासारची शाळा बारावीपर्यंत सुरू झाली.

२०१५ मध्ये सरकारने सरपंच पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता लागू केली. त्यावेळी गावकऱ्यांनी किरणकडे आशेचा ‘किरण’ म्हणून पाहिलं.

पप्पूच्या घरातील मुलींनी गावात एक नवीन आदर्श घालून दिला. चौदाव्या वर्षी लग्न करण्याची मागणी जोर धरू लागल्यावर, सुशीलाने हा बाल-विवाह धुडकावून लावला. इतकंच नाही तर सुशीला १२ लाखांच्या काठट मुस्लीम समाजातून सरकारी नोकरी मिळवणारी पहिली महिला आहे.

लवकरच ती राजस्थान पोलीस दलामध्ये सब-इन्स्पेक्टर या पदावर रुजू होणार आहे. संगीता आणि किरण या तिच्या दोन बहिणी देखील शिक्षक व सरपंच आणि संगणक अभियंता म्हणून काम करत आहेत.

त्यांची बहिण जीनाचे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न झाले आणि २०१२ साली तिचा घटस्फोट झाला. तिने तिचे शिक्षण परत चालू केले. आता ती कॉलेजच्या पहिल्या वर्षाला आहे. बेईवारमधील कॉलेज जणू काही देल्वाराच्या मुलींनी व्यापले आहे.

माल्मून्नेषा अन्सारी, ही एक विद्यार्थिनी आपला अनुभव सांगताना म्हणते, ‘शिक्षण व्यक्तीला समाजातील वाईट गोष्टींची जाणीव करून देतं. उदा. स्त्री-भ्रूणहत्या, बालविवाह, घरगुती हिंसा, इ. आणि या विरोधात आवाज उठवण्याची ताकद देतं. किरण आणि तिच्या बहिणी या आमच्या आदर्श आहेत.”

किरणने ‘जोधपुर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नोलॉजी’ येथून ‘माहिती तंत्रज्ञान’ या विषयात बी. टेक. केले आहे.

सध्या ती सरपंच म्हणून तर काम करत आहेच पण ती श्री सिमेंट या कंपनीमध्ये वेब आणि app डेव्हल्पर म्हणून देखील काम करते.

गेल्या वर्षी पंचायत निवडणूक जिंकल्यावर तिने ७०% पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या मुलांना सायकल देण्याचे कबुल केले होते. १५ ऑगस्ट २०१५ ला तिने लासारलामधील दहावीच्या परीक्षेत तशा २ मुलांना सायकली दिल्या.

त्याच दिवशी अजमेरच्या जिल्हाधिकाऱ्यानी जावाजा पंचायत समितीमध्ये किरणचा सत्कार केला, कारण तिने देल्वारामधून उघड्यावर शौच करायची पद्धत पूर्णपणे बंद केली.

एकीकडे किरण, पप्पूने दाखवलेल्या रत्यावर चालत आहे तर पप्पूने परत शाळेत जायला सुरवात केली आहे. ‘मी प्रामाणिकपणे पुन्हा शाळेत जाण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी मी बाहेरून दहावीची परीक्षा दिली, पण गणितात नापास झालो. मात्र, यावेळी पास होण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करत आहे.’ असे पप्पूने सांगितले.

एका पप्पुच्या प्रयत्नांमुळे कित्येक मुलीना शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. भारतातील अनेक गावे आजही अशा पप्पूंच्या प्रतीक्षेत आहेत...!

आपण त्यांपैकी एक होऊ शकू का..?

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

प्रचिती तलाठी-गांधी

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य