Bhartiyans

Menu

पोलीस निरीक्षक पदाची नोकरी सोडून अनेक अनाथ, गरीब, मनोरुग्णांसाठी कार्य करणारी ‘द रियल हिरो’!

Date : 21 Jan 2017

Total View : 177

वयाच्या २१ व्या वर्षी सरकारी नोकरीचा राजीनामा देणाऱ्या मुलीला तुम्ही काय म्हणाल?...कदाचित बेजाबदार किंवा लहरी म्हणाल. पण, समाज ‘ति’ला ‘हिरकणी’ आणि ‘द रियल हिरोज’ या पुरस्काराने सन्मानित करतो आहे.


सारांश

लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देत तिने नोंदणी पद्धतीने २७ डिसेंबर २०१६ ला लग्न केले. लग्नाच्याच दिवशी तिने व तिच्या जोडीदाराने आणि लग्नाला आलेल्या इतर मंडळीनी देखील रक्तदान केलं. लग्नाच्याच दिवशी नवीन जोडप्याने ५ अनाथ मुलींचे पालकत्व स्वीकारले. कोण ही ‘ती’? ही आहे गुंजन गोळे. तिचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया टीम भारतीयन्सच्या या खास मुलाखतीतून. तिच्या जन्मदिनी अर्थात १५ जानेवारीला..!सविस्तर बातमी

वयाच्या २१ व्या वर्षी सरकारी नोकरी, मानसन्मान, पैसाअडका असं सगळं स्वप्नवत असताना अचानक नोकरीचा राजीनामा देणाऱ्या मुलीला तुम्ही काय म्हणाल?...
कदाचित बेजाबदार किंवा लहरी म्हणाल. 
पण, समाज ‘ति’ला ‘हिरकणी’ म्हणतो आहे, ‘द रियल हिरोज’ या पुरस्काराने सन्मानित करतो आहे.

पोलीस निरीक्षक पदाची नोकरी सोडून अनेक अनाथ, गरीब, मनोरुग्णांसाठी कार्य करणारी ‘द रियल हिरो’!

टीम भारतीयन्सच्या या खास मुलाखतीतून जाणून घेऊया गुंजनचा प्रेरणादायी प्रवास. 
आज तिच्या जन्मदिनी अर्थात १५ जानेवारीला..!
#Bharatiyans

२७ डिसेंबर २०१६ ला ‘ती’ विवाहबंधनात अडकली. लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देत तिने नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नाच्या दिवशी तिने व तिच्या जोडीदाराने रक्तदान केले. एवढंच नाही, तर त्यांच्या लग्नाला आलेल्या इतर मंडळीनी देखील रक्तदान केलं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्याच दिवशी या नवीन जोडप्याने ५ अनाथ मुलींचे पालकत्व घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला.

कोण ही ती? ही आहे गुंजन गोळे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली ही मुलगी आज तिच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र गाजवते आहे. हो ! शब्दशः गाजवते आहे.

गुंजनने अमरावतीत गाविलगड़ येथे महिला ढोल पथक सुरु केले आणि राज्यातील पहिले महिला ढोल पथक सुरू करण्याचा मान तिला मिळाला. या पथकात आज १५० महिला आहेत.

तत्त्वज्ञानामध्ये एम.ए. केल्यानंतर गुंजनने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. प्रचंड कष्ट आणि मेहनतीने अभ्यास केला. युपीएससीमधील Combined Defence Services ची परीक्षा तिने दिली आणि ती उत्तीर्ण देखील झाली. त्यानंतर तिने पोलीस निरीक्षकपदासाठी परीक्षा दिली आणि तिने त्यातही यश मिळवलं.

लहानपणी गुंजनने पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. आईवडील आणि तिच्या स्वतःच्या कष्टाचं चीज झालं. 
गुंजन पोलीस निरीक्षक पदावर रुजू झाली.

दिवसरात्र मेहनत करून मिळवलेल्या नोकरीचा गुंजनने एक दिवस राजीनामा दिला...! आश्चर्य वाटलं ना?

पण, हा राजीनामा नोकरीचा कंटाळा आला, काम जमलंच नाही, वरिष्ठांचा दबाव आला म्हणून दिला नव्हता. राजीनामा देण्यामागे एक विचार होता. एक ध्येय होतं. वेगळ करून दाखवण्याची जिद्द होती. समाजसेवेची ओढ होती. हे सगळं करण्यासाठी गुंजनला प्रेरित करणारा प्रसंगही तसाच घडला होता.

एके दिवशी रात्री ड्युटी आटोपून घरी परतत असताना गुंजनला एक मनोरुग्ण महिला अर्धानग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला दिसली. त्या महिलेच्या अंगावर जेमतेम कपडे होते. केस सुटलेले, अनेक दिवस अंघोळ न केल्याने ती विचित्र दिसत होती. त्यातच ती गरोदर आहे हे गुंजनच्या लक्षात आलं. नक्कीच कोणीतरी नराधमाने तिला आपल्या वासनेचं शिकार केलं असणार!

ते दृश्य बघून गुंजनला खूप रडू आलं. किळस वाटली. स्वत:ला माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटायला लागली. गुंजनने सगळा धीर एकवटला. ती गाडीतून उतरली. त्या महिलेला घेऊन तिची योग्य ती सोय लावण्याचा तिने ठाम विचार केला आणि अजून एक विचार केला, तो म्हणजे अशा महिलांसाठी कार्य करण्याचा!

तिचा विचार पक्का झाला आणि अतिशय कष्टाने मिळवलेल्या नोकरीचा गुंजनने राजीनामा दिला. आधीची पोलीस निरीक्षक गुंजन आता रस्त्यांवरील मनोरुग्ण, वयस्क, अनाथ आजी-आजोबा, मुले यांचा आधार झाली.

आता गुंजनचा दिवस पहाटे केव्हा सुरू होतो आणि केव्हा संपतो हे तिला देखील कळत नाही. ती अमरावती परिसरातील गरीब-गरजू मुलांना सैनिक भरतीचे प्रशिक्षण देते. स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेते. ढोल पथकाचा सराव घेते. महिला व मुलींना स्वरक्षणाचे धडे देते. साहसी खेळ जसे लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा हे शिकवण्याच्या कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करते. विशेष म्हणजे, या सगळ्यातून मिळणारे पैसे ती समाजकार्यात वापरते.

संध्याकाळी आपल्या दुचाकीवर बसून बिस्किटाचे पुडे, पाण्याच्या बाटल्या, छोटे हातरुमाल अशा विविध साहित्याने भरलेली बॅग घेऊन रस्त्यांवर कोणी उपाशी झोपले आहे का, थंडीत कुडकुडते आहे का? याचा ती शोध घेते आणि गरजुंना ते साहित्य देते.

आजवर कित्येक नवजात बालकांना तिने मृत्यूच्या जबड्यातून वाचवले आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या आणि रस्त्यावर फेकून दिलेल्या अनेक नवजात शिशुंना तिने जीवदान दिले आहे. तिच्या पुढाकाराने अनेक मनोरुग्ण, कृष्टरोगी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गुंजन एक उत्तम गिर्यारोहक देखील आहे! दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ती कळसूबाईचे शिखर सर करते आणि कळसूबाईवर तिरंगा फडकावते. आतापर्यंत १४ वेळा तिने हे शिखर सर केले आहे.

गुंजनशी बोलताना तिचा बिनधास्त स्वभाव, समाजासाठी वाटणारी तळमळ शब्दाशब्दातून जाणवते. या 
मुलाखतीत तिने एकदाही स्वतःला मिळालेल्या कोणत्याही सन्मानांचा किंवा पुरस्कारांचा उच्चार देखील केला नाही.

ज्याप्रमाणे पाच मुली दत्तक घेतल्या तशाच ५०० मुली दत्तक घेण्याचा गुंजनचा मानस आहे. महाराष्ट्रात एकही मनोरुग्ण, अनाथ, वयोवृद्ध रस्तावर बेवारस अवस्थेत राहू नये. असं तिला मनापासून वाटतं. पैशाअभावी किंवा वेळीच उपचार न मिळाल्याने जेव्हा एखादा माणूस दगावतो तेव्हा ती स्वतःला फार असहाय्य समजते.

या सर्वाची दखल समाज कुठेतरी घेत होता. ८ जानेवारीला तिला ‘द रियल हिरोज’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तिच्यावर लिहिलेल्या ‘काही देणं लागतो’ या डॉ. सुभाष गवई यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पुण्यभूमी तपोवन येथे पार पडला. तिला ‘हिरकणी’ पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.

गुंजनने आतापर्यंत २ वेळा राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. २६ जानेवारीच्या परेडमध्ये देखील तिला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

एकाच वेळी घर, समाज आणि राष्ट्र अशा तीनही आघाड्यांवर आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळी मुद्रा उमटवणाऱ्या गुंजनला टीम भारतीयन्सकडून मन:पूर्वक शुभेच्छा !

गुंजन गोळे हिच्याशी संपर्क साधायचा असल्यास तिच्या फेसबुक पेजला भेट द्या.
https://www.facebook.com/gunjan.gole1?fref=ts

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

वैशाली सागर - देवकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य