Bhartiyans

Menu

निसर्गालाच देव मानून तब्बल एक कोटी वृक्ष लावणारे दरिपल्ली रमय्या..!

Date : 21 Jan 2017

Total View : 964

तेलंगणातील ६८ वर्षीय दरिपल्ली रमय्या यांनी आतापर्यंत १ कोटी वृक्षांची लागवड केली आहे. या कार्यासाठी मार्च 2015 मधे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांचा सत्कार केला.


सारांश

६८ वर्षीय दरिपल्ली रमय्या यांना तेलंगणातील लोक ‘चेट्ट्ला रमय्या’ म्हणून ओळखतात. ‘चेट्टू’ या शब्दाचा अर्थ होतो झाड..! बियांनी भरलेली पिशवी सायकलला लटकावून रमय्या निघतात आणि ओसाड माळरानावर जाऊन बिया पेरतात. रमय्यांनी लावलेल्या वृक्षांची संख्या आहे १ कोटी. त्यांच्या या कार्याची दखल खुद्द राष्ट्रपतींनी घेतली आणि मार्च 2015 मधे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.सविस्तर बातमी

‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे....’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा केवळ घोषणा आपण देतो.......शाळेत निबंध स्पर्धेपासून ते पुढे कंपनीतल्या एखाद्या इव्हेन्टपर्यंत अशी घोषवाक्ये वापरली जातात.....पण, पुढे काय..? 
स्पर्धा संपते, घोषणा संपतात.... दुर्दैवाने झाडांबद्दलची काळजी देखील संपते.

वृक्षारोपण उत्साहात करतो आपण; पण हा उत्साह त्या वृक्षारोपणाचे फोटो शेअर करेपर्यंतच टिकतो. नंतर त्या झाडाचं काय होतं ? 
हे पहायलासुद्धा कोणीच जात नाही.

हे वाचून काही जण म्हणतील, 
केलीये आम्ही वृक्षलागवड, लावलंये आम्ही झाड..! 
किती झाडे लावली आहेत तुम्ही? एक...दोन...शंभर...हजार..?

तेलंगणातील दरिपल्ली रमय्या यांनी एक कोटी झाडे लावलीयेत... 
होय! 
एक कोटी! 
दहा दशलक्ष!

“पृथ्वीवरच्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये केवळ मनुष्याकडेच बुद्धी आहे. तो विचार करू शकतो आणि त्यामुळेच अनेक उत्तम कार्ये केवळ त्याच्याच हातून घडू शकतात. निसर्गाने देखील अनंत हस्ते नैसर्गिक संपत्ती देऊन मानवाला आशीर्वादच दिला आहे. या निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे मानवाचे कर्तव्य आहे.’’

“एकीकडे जिवंत झाडे कापून दुसरीकडे निर्जीव दगडाची पूजा करणाऱ्या माणसांना मी मानत नाही. 
माझ्यासाठी निसर्ग हाच देव आणि देव हाच निसर्ग..!’’

हे विचार आहेत तेलंगणातील खम्मम येथे राहणाऱ्या ६८ वर्षीय दरिपल्ली रमय्या यांचे. 
त्यांना ‘चेट्ट्ला रमय्या’ म्हणून ओळखले जाते. 
‘चेट्टू’ या शब्दाचा अर्थ होतो झाड..!

रमय्या यांनी वृक्षलागवडीची आवड त्यांच्या आईकडून घेतली. रमय्यांची आई भोपळ्याच्या बिया जपून ठेवायची आणि पावसाळ्यात त्या पेरायची. त्यातून नवीन रोप जन्माला यायचं. याचा रमय्या यांच्या बालमनावर खोलवर परिणाम झाला.

ते म्हणतात, ‘मला तेव्हा कळलं, की ‘बीज’सुद्धा जिवंत असतं. ते नव्या पिढीला जन्म देऊन क्रांती घडवू शकतं. तुम्ही बीज मातीत पेरलं की त्यातून नवा जीव जन्माला येतो जो त्या बीजाचे अस्तित्व टिकवून ठेवतो.’’

रमय्या यांना वृक्षलागवडीचं वेड लागलं.

बियांनी भरलेली पिशवी सायकलला लटकवून ते घरातून निघत आणि ओसाड माळरानावर जाऊन त्या बिया पेरत. बेल, पिंपळ, कदंब, निद्रा गणेरु, कटुता, नीम, चंदन अशा विविध झाडांच्या बिया त्यांनी गोळा केल्या.

खम्ममपासून 4 कि.मी. अंतरावर गावाबाहेरील रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्यांनी या कार्याची सुरुवात केली आणि आज रमय्यांनी लावलेल्या वृक्षांची संख्या आहे १ कोटी.

रमय्या एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी वृक्षलागवडीबद्दल लोकांचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली. वृक्षरोपणाची घोषवाक्ये तयार केली. फलक तयार केले. काही खेड्यांमध्ये जाऊन तेथील सार्वजनिक भिंतींवर झाडे लावण्याचा-जगवण्याचा संदेश लिहिला. ग्रंथालये, मंदिरे यांच्या आवारातसुद्धा त्यांनी झाडे लावली. जुने डबे, कपडे अशा टाकाऊ वस्तूंचा उपयोग त्यांनी घोषवाक्ये लिहिण्यासाठी केला.

‘वृक्षो रक्षति रक्षित:’ हे दरिपल्ली यांच्या वृक्षारोपण अभियानाचे प्रमुख घोषवाक्य आहे. याचा अर्थ असा, की वृक्षांचे रक्षण तुम्ही केले तर ते देखील तुमचे रक्षण करतात.

रमय्या यांनी हे घोषवाक्य लिहिलेला एक मुकुट तयार केला आहे. तो मुकुट डोक्यावर घालून ते फिरतात. ‘एखाद्या ‘मिस वर्ल्ड’ सारखा मी सुंदर नाही. पण हा मुकुट हीच माझी ओळख आहे, असं रमय्या म्हणतात.

रमय्यांनी वृक्षलागवाडीचा संदेश केवळ कपड्यांवर आणि भिंतींवर लिहिला असं नाही तर तो दगडांवर देखील कोरला. रमय्या स्वत: उत्तम शिल्पकार आहेत.

ते अपघाताने शिल्पकार झाले. एकदा सायकलवरून जात असताना त्यांचा अपघात झाला. पाय फ्रॅक्चर झाला. तेव्हा रमय्यांनी विचार केला, मी कुठे जाऊ शकत नाही; पण माझे हात काम करू शकतात ना?

आणि....
पुन्हा नवीन प्रयोग सुरू झाला. दिसेल त्या दगडावर वृक्षलागवडीचा संदेश ते लिहू लागले. पाने, फुले यांची शिल्पे कोरू लागले. उत्तम पर्यावरणवादी, अर्थतज्ञ, तत्त्वज्ञ, गणितज्ञ, समाजशास्त्रज्ञ असलेल्या दरिपल्ली रमय्या यांना ‘शिल्पकार’ ही एक नवीन ओळख मिळाली.

रमाय्यांच्या कार्याने भारावून गेलेल्या अनेकांनी त्यांना आर्थिक मदत देऊ केली. रमाय्यांनी त्या पैशाचा स्वीकार केला; पण अर्थात उपयोग मात्र फक्त झाडांसाठीच केला, स्वत: साठी कधीच नाही.

दरिपल्ली यांच्या कष्टांचं अखेर चीज झालं. हरित क्रांती घडवणाऱ्या या ध्येयवेड्याची दखल खुद्द राष्ट्रपतींनी घेतली आणि मार्च 2015 मधे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते रमाय्यांचा सत्कार करण्यात आला. निष्काम आणि निस्वार्थ सेवेचं फळ रमय्यांना मिळालं..!

यावरून माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या चरित्रातील एका प्रसंग आठवतो.

कलाम एका प्रकल्पावर काम करत होते. तेव्हा समोरच्या मैदानातील भले मोठे झाड तोडण्यासाठी काही लोक आले. कलामांना हे कळताच त्यांनी त्या लोकांना झाडाला धक्का न लावता झाडापासून १०० मीटर अंतरावर काम करण्याचा आदेश दिला.

त्यानंतर कलाम यांनी त्या झाडावर कविता देखील लिहिली.
कलाम त्या कवितेत म्हणतात,
मी जेव्हा जेव्हा त्या झाडाखालून जातो,
तेव्हा.. ते झाड माझ्यावर पुष्पवृष्टी करतं.
मला वाटतं... 
जणू काही ते माझ्याप्रती कृतज्ञताच व्यक्त करत असतं.. माझे आभार मानत असतं..!

कलामांच्या शब्दात सांगायचं तर रमय्या यांनी एक कोटी झाडांना अशी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली...!

आपण किमान दहा झाडांना तरी देऊया..

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

टीम भारतीयन्स

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

बेटर इंडिया