Bhartiyans

Menu

स्वत:च्या गावाला वीज मिळवून देणाऱ्या सामान्य भारतीय स्त्रीचा झंझावाती प्रवास !

Date : 21 Jan 2017

Total View : 419

उत्तराखंडच्या बाचर गावाला वीज मिळवून देणारी व लाकूड माफियांचा बंदोबस्त करणारी धाडसी सरपंच कलावती देवी रावत.


सारांश

बाचर नावाच्या गावात एक सामान्य अशिक्षित स्त्री लग्न करून येते आणि अनेक वर्षांपासून वीज नसल्याने अंधारात खितपत पडलेल्या गावाला वीज मिळवून देते..! एवढंच नाही तर जंगलतोड वाचवते, अवैध धंदे बंद करते आणि पाहतापाहता गावाची सरपंच देखील होते....! कोण ही धाडसी महिला...? बघुया तरी !सविस्तर बातमी

बाचर नावाच्या गावात एक सामान्य अशिक्षित स्त्री लग्न करून येते आणि अनेक वर्षांपासून वीज नसल्याने अंधारात खितपत पडलेल्या गावाला वीज मिळवून देते..!

एवढंच नाही तर जंगलतोड वाचवते, अवैध धंदे बंद करते आणि पाहतापाहता गावाची सरपंच देखील होते....!

कोण ही धाडसी महिला...? बघुया तरी ! 
#Bharatiyans

१९८० मध्ये कलावती देवींच लग्न झालं आणि त्या उत्तराखंडच्या सीमेवर असलेल्या चामोली तालुक्यातील बाचर नावाच्या एका छोट्या गावात आल्या. डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेल्या या गावात त्यावेळेस वीज नव्हती. संपूर्ण गाव अंधाराच्या गर्तेत होतं.

वीजेचा अभाव आणि लाकूड तस्करी या दोन समस्यांनी बाचर गावाला वेढलेलं होतं. अंधारात राहणाऱ्या या लोकांचं कलावती देवींना खूप आश्चर्य वाटलं. अनेक वर्षांपासून ते असेच राहत होते.

कलावती देवींनी या लोकांना प्रकाशात आणण्याचं ठरवलं...!

गावाला वीज मिळावी म्हणून कलावती बाचरच्या सरपंचांबरोबर २५ किमी अंतरावर असलेल्या गोपेश्वरला चालत गेल्या. तिथे त्यांनी चंडी प्रसाद भट यांची भेट घेतली व त्यांच्या नेतृत्वाखाली तालुका अधिकाऱ्यांसमोर गावाची समस्या मांडली. कलावती देवी आणि बाचर ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आलं. थोड्याच दिवसांत बाचर गाव विद्युत ग्रीडच्या कक्षेत आलं.

कलादेवी म्हणतात, ‘या प्रसंगातून मी एक नवीन धडा शिकले तो म्हणजे, कधीही हार न मानणे व ध्येयाने प्रेरित होऊन, निर्धाराने तुमच्या उद्दिष्टाचा पाठपुरावा करणे.’

गावाला वीज मिळवून दिल्यानंतर कालावतींचे लक्ष्य होते गावातील जंगलतोड आणि लाकूड तस्करी थांबवणे. ‘चिपको’ आंदोलनाला त्या आपला आदर्श आणि प्रेरणा मानत.

उत्तराखंडमध्ये १९७० ला ‘चिपको’ आंदोलन झाले होते. या आंदोलनात झाडे वाचवण्यासाठी महिलांनी चक्क झाडांना मिठ्या मारल्या होत्या आणि ‘झाडांच्या आधी आमच्यावर कुऱ्हाड चालवा’, असं त्या शूर महिलांनी गर्जून सांगितलं होतं. परिणामी, प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि जंगलतोड थांबली होती. या ‘चिपको’ चळवळीचे प्रणेते चंडी प्रसाद भट यांना कलावती आपले प्रेरणास्थान मानतात.

याप्रमाणेच बाचरमध्ये होणारी जंगलतोड कशी थांबवता येईल, याचा विचार त्या करत असतानाच एक प्रसंग घडला. एके दिवशी गावातील काही महिलांसामावेत कलावती देवी गावापासून ५ किमी अंतरावर असलेल्या जंगलात चारा गोळा करण्यासाठी केल्या. तिथे त्यांना जे दृश्य दिसले ते पाहून प्रचंड दुःख तर झालेच पण रागही आला.

तिथे जंगल अधिकारी हजारो झाडांवर खुणा करत होते. यातून ही झाडे काही क्षणातच कापली जाणार याची जाणीव महिलांना झाली. त्या घाबरल्या कारण ही झाडे त्यांना अनंत हस्ते देत होती.

कलावती देवी हा प्रसंग सांगताना म्हणतात, ‘आम्हाला तिथून पळवून लावण्यासाठी त्या वनाधिकाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. अगदी जिवे मारण्याची धमकी देखील दिली पण आम्ही मागे हटलो नाही. आम्ही एक चळवळ उभारण्याचे ठरवले.

लगेचच दुसऱ्या दिवशी आम्ही मोठ्या संख्येने गोपेश्वरला आमचा मोर्चा नेला. ‘चिपको आंदोलन झिंदाबाद’, ‘पेड लागावो, देश बचावो’ अशी नारेबाजी करत आम्ही तालुक्याच्या गावी पोहोचलो.

१२ तासांच्या धरणे आंदोलनानंतर प्रशासनाने आमच्या मागण्यांना मान्यता दिली. तालुका दंडाधिकाऱ्यांनी फर्मान काढले, की यानंतर जंगलातील एकही झाड तोडले जाणार नाही. हे युध्द आम्ही जिंकले होते.’

एका लहानशा गावात जन्मलेल्या आणि फारसे शिक्षण झालेले नसताना देखील ही समाजसेवेची प्रेरणा, जिद्द कलादेवींमध्ये कुठून आली असा प्रश्न पडतो. याबाबत कलावती देवींना विचारल्यावर त्यांनी आपल्यातील नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द व खुल्या मनाने विचार करण्याची क्षमता या दोन गुणांचा उल्लेख केला.

वीज, जंगलतोड यापुढील गहन प्रश्न होता, जंगल माफिया आणि बाचरमधील दारुडे व अवैध धंदे करणाऱ्या साखळीचा! या सर्वाचा महिलांना त्रास होतंच होता. यावर आणि यासारख्या अनेक समस्यांवर एकच तोडगा होता, तो म्हणजे ग्रामपंचायतीवर ताबा मिळवणे. निवडणूक लढवून गावाचे सरपंच होणे.

कलावती देवींनी निवडणुकीत उभे राहू नये यासाठी उप विभागीय अधिकाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, कलावती देवी यांनी महिलांना देखील पंचायत निवडणूक लढण्याचा अधिकार सरकारनेच दिलाय हे सांगितल्यावर त्या विभागीय अधिकाऱ्याचं तोंडच बंद झालं.

हे सांगताना कलावती देवी ७३ आणि ७४ क्रमांकाच्या घटनात्मक सुधारणांबद्दल बोलत होत्या, ज्या सुधारणा १९९० सालच्या सुरुवातीलाच आखण्यात आल्या. बराच काळ पुरुषी अहंकाराला लढा देणाऱ्या बाचरच्या महिला अखेर वन पंचायत निवडणुका दिमाखात जिंकल्या.

तेव्हा पासून आजतागायत स्थानिक संस्थांवर या महिलांची मजबूत पकड आहे. सत्ता आणि बळ हातात आल्याने गावातील दारुडे, माफिया आणि इतर अवैध धंदे करणारे यांना घाबरून राहू लागले.

सुरुवातीला दारूचे गुत्ते उद्धवस्त करणाऱ्या या महिला आता हातात अधिकार आल्यानंतर नराधमांना प्रसंगी ‘चौदावे रत्न’ दाखवू लागल्या.

कलावती देवी गेली तीन दशके ‘महिला मंगल दलाच्या’ अध्यक्ष आहेत. अत्यंत अभिमानाने त्या सांगतात की, आज त्यांच्या गावातील दारुड्यांच प्रमाण अतिशय कमी झाले आहे व लाकूड तस्कर, माफिया तर येथे फिरकत देखील नाहीत.

कलावती देवींच्या या झंझावाती प्रवासावरून हेच लक्षात येतं की, गरज आहे भारतातल्या प्रत्येक गावाला कलावती देवींसारखा विचार करणाऱ्या महिलेची आणि गरज आहे प्रत्येक महिलेने ‘कलावती देवी’ होण्याची..!

धन्यवाद..!

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .