Bhartiyans

Menu

समाजातील वंचित घटकांसाठी काम करणारी ‘फॅन्ड्री’..!

Date : 21 Jan 2017

Total View : 611

गाव सक्षमीकरण, रोजगार, शालेय साहित्य वाटप, महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रात फॅन्ड्री कार्यरत आहे. फॅन्ड्री फाउंडेशनसोबत कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या १५० च्या वर आहे.


सारांश

चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब असतात आणि समाज चित्रपटातून घडत असतो, ही दोन्ही विधाने शब्दश: खरी करून दाखवणारी अनेक उदाहरणे सापडतील. आज अशाच एका ‘फॅन्ड्री’ नावाच्या संस्थेला भेटूया जी ‘फॅन्ड्री’ चित्रपटाद्वारे निर्माण झाली..! ‘फॅन्ड्री’ चित्रपट बघून घरी परतत असताना आपण समाजातील वंचित घटकांसाठी काय करू शकतो? असा विचार रवी चाचे यांच्या मनात सुरु झाला आणि हीच ‘फॅन्ड्री फाउंडेशन’ची मुहूर्तमेढ ठरली.सविस्तर बातमी

चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब असतात आणि समाज चित्रपटातून घडत असतो, ही दोन्ही विधाने शब्दश: खरी करून दाखवणारी अनेक उदाहरणे सापडतील.

आज अशाच एका ‘फॅन्ड्री’ नावाच्या संस्थेला भेटूया जी ‘फॅन्ड्री’ चित्रपटाद्वारे निर्माण झाली..!

समाजातील वंचित घटकांसाठी काम करणारी ‘फॅन्ड्री’..!

‘विश्वास वह शक्ति है जिससे उजड़ी हुई दुनिया में प्रकाश लाया जा सकता है’ हे वाक्य आपल्या कृतीतून सिद्ध करणाऱ्या अशाच एका संस्थेची आज माहिती करून घेऊया. 
या संस्थेची मुहूर्तमेढ नाट्यमय पद्धतीने रोवली गेली.

‘फॅन्ड्री’ चित्रपट बघून घरी परतत असताना आपण समाजासाठी, समाजातील वंचित घटकांसाठी काय करू शकतो? सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला काय करता येईल, असा विचार रवी चाचे यांच्या मनात सुरु झाला.

याविषयी पुढील दोन तीन दिवस त्यांनी त्यांच्या पत्नीशी चर्चा केली आणि ही ‘फॅन्ड्री फाउंडेशन’ची मुहूर्तमेढ ठरली.

काही मित्रांनी नेहेमीप्रमाणे ‘आपल्यासारख्या मध्यम वर्गीय कुटुंबांना कसं झेपायचं हे सोंग?’ असा नकारार्थी सूर देखील लावला पण रवी थांबले नाहीत.

त्यांनी हळूहळू कुठल्या सामाजिक प्रश्नांमध्ये मनुष्य आणि वित्तबळाची जास्त आवश्यकता आहे हे शोधून काढलं.

आज फॅन्ड्री फाउंडेशन विविध गावांतील अनेक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं आहे. हा प्रवास एकट्याने करणं शक्यच नव्हतं. त्यासाठी असंख्य हातांची आवश्यकता होती.

याविषयी आपला अनुभव सांगताना रवी चाचे म्हणतात, की ‘परमेश्वराला जेव्हा आपल्या हातून एखादं कार्य करून घ्यायचं असतं त्यावेळेस तो तशी अनुकूल परिस्थिती निर्माण करतो. तुमच्या आसपास तेवढ्याच ताकदीचं मनुष्यबळ उभं करतो.

आज ‘फॅन्ड्री’सोबत कार्य करणाऱ्या केवळ मुंबईच्या उपनगरातील स्वयंसेवकांची संख्या १५० च्या वर आहे. संपूर्ण भारतात ‘फॅन्ड्री’साठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या खूप जास्त आहे.

४ जुलै २०१४ ला ‘फॅन्ड्री’चा पहिला उपक्रम ‘प्रोजेक्ट फँड्री’ सुरु झाला होता. शहरी मुलांप्रमाणेच खेड्यापाड्यातील मुलांना देखील शालेय साहित्य आणि अंगभर कपडे मिळावेत यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. पैशाचा अभाव, त्यातून मुलांना मिळणारं अपुरं शालेय साहित्य यामुळे अनेकदा मुलांचं शिक्षण बंद पडतं अशा मुलांसाठी हा उपक्रम घेतला गेला.

‘प्रोजेक्ट फँड्री’अंतर्गत पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळच्या कोटबी-खिंडपाडा गावांतील विद्यार्थ्यांना कपडे व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी तब्बल ४० दिवस स्वयंसेवक झटत होते.

सोशल मिडिया, फोन कॉल्स, मेसेजेस या माध्यमांतून नागरिकांशी संपर्क करून त्यांना या उपक्रमाची माहिती देणे, ‘फॅन्ड्री’विषयी सांगणे आणि लोकांचा विश्वास संपादन करणे ही सर्व कामे स्वयंसेवक त्यांचे व्यवसाय, नोकरी, घर सांभाळून करत होते.

केवळ ५ स्वयंसेवकांपासून सुरु केलेला हा प्रवास आज १५०च्याही पुढे जाउन पोहोचला आहे. पहिल्या उपक्रमाला लोकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. महत्त्वाचं म्हणजे ‘फॅन्ड्री’वर विश्वास दाखवला. त्यानंतर सर्वांनाच पुढील उपक्रमाची उत्सुकता लागली.

त्यानंतर मात्र ‘फॅन्ड्री’ने मागे वळून पाहिलेच नाही. ‘फॅन्ड्री’ फाउंडेशनने आतापर्यंत राबवलेले काही मुख्य उपक्रम खालील प्रमाणे –
· प्रोजेक्ट फॅन्ड्री – २ : ‘संवेदना सामाजिक बांधिलकीची’. विवेकानंद बालकाश्रम, येऊर, ठाणे येथे अंदाजे २० हजार च्यावर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. केवळ पैसे किंवा वस्तूंची मदत करून या मुलांची कळी खुलणार नव्हती. त्यांना प्रेमाची आणि मैत्रीची देखील गरज आहे हे ओळखून ‘फॅन्ड्री’च्या स्वयंसेवकांनी या मुलांसोबत वेळ घालवला. विविध खेळ, स्पर्धा, गप्पा-गोष्टी झाल्या.


· डहाणू येथील उपक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे इगतपुरी येथील कुरुंगवाडी गावातील शिक्षकांनी ‘फॅन्ड्री’शी संपर्क साधला. त्यांच्या गावातील समस्या मांडल्या. गावात मुलांसाठी शाळा आहे पण जवळजवळ १६० विद्यार्थ्यांकडे वह्याच नाहीत अशी परिस्थिती. शिक्षकांनी स्वतःच्या खिशातून पैसे जमा करून प्रत्येकी ४ वह्या मुलांना दिल्या पण तेवढ्याने प्रश्न सुटणारा नव्हता. मग ‘फॅन्ड्री’ने मदतीसाठी आवाहन केले व एका हाकेत ७०० वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य कुरुंगवाडीतील विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले.

या दरम्यानच विविध आश्रमांतून देखील ‘फॅन्ड्री’ला मदतीसाठी हाक येऊ लागली आणि ‘फॅन्ड्री’ त्यांना सर्वतोपरीने त्यांना मदत करत गेले. हा उपक्रम हळूहळू मोठा होऊ लागला आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्र व त्यात येणाऱ्या अडचणी हा फॅन्ड्री फाउंडेशनचा मुख्य हेतू बनला. ती ‘फॅन्ड्री’ची ओळख झाली.

यातच जन्म झाला ‘प्रोजेक्ट होप’ चा! आघाडीच्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून मदतीचा हात पुढे येऊ लागला. त्यात नवनीत प्रकाशन अग्रेसर होते. इगतपुरी, डहाणू, कोल्हापूर, आणि रत्नागिरी मधील १७ आदिवासी गावांतील शाळांमध्ये फॅन्ड्री फाउंडेशनने इ-लर्निंग शिक्षणपद्धती पोचवली. ज्यात संगणकाचा वापर आणि इतर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यासाठी लागणारे सर्व साहित्य व पुस्तके नवनीत प्रकाशनने पुरविली.

शहरांतील मुले शिकून पुढे जात आहेत, भारताबाहेर आपली ओळख निर्माण करत आहेत. अशा वेळेस खेड्यातील हुषार मुले देखील पुढे गेलीच पाहिजे, या ध्येयाने लोकांनी ‘फॅन्ड्री’च्या उपक्रमाला सढळ हस्ते मदत केली. बरेचसे दाते या गावांमधून शाळांची नवीन व्यवस्था पाहून आले. त्यांचा ‘फॅन्ड्री’वर विश्वास बसला आणि ते देखील कार्यकर्ते झाले.

· यानंतर ‘फॅन्ड्री’ने ‘एक करंजी मोलाची’ हा अत्यंत हृदयस्पर्शी उपक्रम राबवला. दिवाळीमध्ये आपण विविध प्रकारचा फराळ घरी बनवतो. स्वादिष्ट मिठाई आणतो. परंतु अशी कित्येक कुटुंबे आहेत, ज्यांतील लहान मुलांना फराळ, दिवाळी, फटाके या गोष्टी माहीतच नाहीत ! अशा कुटुंबांसाठी हा उपक्रम ‘फॅन्ड्री’ने मुंबई, कोल्हापूर, चिपळूणमधील आदिवासी पाड्यांमध्ये राबवला. लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल यांसारख्या शहरांतील स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन फराळ, जुने पण चांगले कपडे गोळा केले. हे साहित्य खेड्यापाड्यांत जाऊन गरजूंना वाटले व आपली दिवाळी साजरी केली.

रवी सांगतात, की त्या मुलांना कारंजी, लाडू पहिल्यांदाच खाताना बघून सर्व स्वयंसेवकांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले. त्या मुलांना प्रेमाने खाऊ घालताना आम्हाला त्या फराळाचं महत्व कित्येक पटीने जाणवलं.

· ‘फॅन्ड्री’ने नंतर आपला आवाका वाढवायचे ठरविले. गाव सक्षमीकरण हा मुद्दा त्यांनी उचलुन धरला. गावातील तरुणांनी शहरांकडे न वळवता, गावातच राहून त्यांना रोजगार कसा करता येईल व त्यांच्या कार्याने गाव कसे स्वावलंबी बनू शकेल, असे अनेक महत्वाचे मुद्दे या उपक्रमाअंतर्गत हाताळण्यात आले. कुरुंगवाडी, इगतपुरी येथे २२५ हून अधिक जांभळाची कलमे १ एकर परिसरात ‘ग्राफ्टिंग’ पद्धतीने लावण्यात आली. कलामांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी बांधण्यात आली, ज्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गावकऱ्यांना गावातच पाणी मिळू लागले. त्याचप्रमाणे शेवग्याच्या शेंगांची कलमे डहाणूमधील बुजाडपडा व खिंडपाडा गावांत लावण्यात आली. जैविक खते वापरून ही कलमे कशी वाढवायाची याचे शिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले.

· पंतप्रधान मोदींच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाची सुरुवात कुरुंगवाडी गावात २ जैविक विघटक शौचालये बांधून करण्यात आली. या २ शौचालयांसाठी १.८ लाख इतका खर्च ‘फॅन्ड्री’ने वाळकेश्वर लायन्स क्लबच्या सहकार्याने उचलला. अधिक शौचालये उभी करण्यासाठी ‘फॅन्ड्री’ची धडपड सुरू आहे.

· फॅन्ड्रीच्या रत्नागिरीच्या टीमने गोकुळ अनाथालयासाठी किराणा सामान, शैक्षणिक साहित्य, मिठाई इ. वाटप केले. तेथील रेणुका माता महिला वसतिगृहातील मुलींसोबत पणत्या, फराळ वाटून पारंपारिक दिवाळी साजरी केली. या निमित्ताने तेथील मुलींना ‘स्वयंस्वच्छता’ या विषयावर मार्गदर्शन केले.

· कोल्हापूर, सोलापूर या शहरांमधूनही त्यांच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन फॅन्ड्रीच्या स्वयंसेवकांनी मदत पुरविली. आज ‘फॅन्ड्री’चा हात धरून काही मोठ्या संस्था मदतीचे कार्य करत आहेत. नवनीत प्रकाशन, विस्कॉम कम्युनिकेशन, माधवबाग हॉस्पिटल इ. संस्था कार्य करत आहेत.

‘ज्योत से ज्योत जलाते चलो’ या उक्तीनुसार रवी चाचेंनी ५ स्वयंसेवकांना घेऊन रोवलेलं हे फॅन्ड्री फाउंडेशनचं रोपट आज अनेक गरजूंना सावली देणारे वटवृक्ष बनले आहे. या प्रवासात त्यांच्यासोबत अगदी सुरुवातीपासून झोकून देऊन काम करणारे काही कार्यकर्ते आहेत ज्यांचा उल्लेख रवी माझे कुटुंबीय असाच करतात. या सर्व सामाजिक कार्यात रवी दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी त्यांची सहधर्मचारिणी, सौ. रुचा चाचे! एमएससी फार्मा झालेले रवी नोकरी करून ही सामाजिक बांधिलकी जपतात. माझ्या निवृत्तीनंतरच्या कार्याची मुहूर्तमेढ मी आधीच रोवून ठेवलीये असे अगदी हसत हसत सांगून जातात.

तारेवरची कसरत करत समाजकार्यात अगदी वयाच्या बावीस-तेवीस वर्षापासून फॅन्ड्रीसोबत काम करणाऱ्या काही निवडक सदस्यांची नावे मुद्दामहून नमूद करावीशी वाटतात. प्रथमेश दिवेकर, दत्ताराम वालवणकर (उपक्रम विस्तारक), विपुल पोरे (वेबसाईट डिजायनिंग), वैशाली चव्हाण, प्रणय म्हात्रे, शिल्पा शिंदे, सुपर्णा शास्त्री (सोशल मिडिया), रेश्मा भोवर (कॉर्पोरेट डोनर्स डाटाबेस), संचिता धनावडे, विद्या पिकले, ह्रीतिका केळसकर, मयुरेश झोरे (अकाउंटिंग), दीपक पवार, सेजल खताते, दिपेश कांबळे आणि असे असंख्य स्वयंसेवक!

२०१७ मध्ये वीज नसलेल्या गावांमध्ये ‘१० किलोबाईट चा सोलार प्रोजेक्ट’ राबविणे हे फॅन्ड्रीचे या वर्षाचे ध्येय आहे. आपण सर्वांनीच आपापल्या परीने त्यांना हे ध्येय गाठण्यासाठी मदत करूया! फॅन्ड्रीच्या संपूर्ण टीमला व त्यांच्या उत्तुंग कार्याला टीम भारतियन्सच्या शुभेच्छा !!

तुमच्या आजूबाजूला एखाद्या खेड्याला अशा प्रकारच्या मदतीची आवश्यकता असेल आणि तुम्ही पुढाकार घेऊन काही मदत करू इच्छित असाल किंवा ‘फॅन्ड्री’ फाउंडेशनच्या कार्यात जर तुम्हाला सहभागी व्हायचे असेल, त्यांच्या उपक्रमांना काही मदत करायची असेल तर फॅन्ड्री फाउंडेशनशी तुम्ही खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता.

फॅन्ड्री फाउंडेशन +91 97690 88052

Email – projectfandry@gmail.com

Facebook Page - https://www.facebook.com/fandryfoundation

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

बातमी सौजन्य