Bhartiyans

Menu

झोपडपट्टीतील १०० मुलांना स्वखर्चाने शिकवणारा गरीब ‘चहावाला’ पण श्रीमंत शिक्षक..!

Date : 21 Jan 2017

Total View : 351

दहा वर्षांपूर्वी चहाच्या टपरीवर असताना राव यांना जाणवलं, की आजूबाजूच्या झोपडपट्टीतील मुले शिक्षणाभावी वाईट मार्गाला लागत आहेत. म्हणून त्यांनी स्वत:च्या झोपडीत २००० साली या मुलांसाठी शाळा सुरु केली.


सारांश

ज्याचे ४ जणांचे कुटुंब चहाच्या टपरीवर अवलंबून आहे, असा चहावाला झोपडपट्टीतल्या मुलांसाठी शाळा चालवतो आणि त्यांना पिण्यासाठी स्वखर्चाने रोज चक्क ५० लीटर दुध उपलब्ध करून देतो. विश्वास ठेवाल तुम्ही यावर? तुम्हाला ठेवावाच लागेल. कारण, ओडीसामधील डी. प्रकाश राव हा चहावाला हे कार्य करतो आहे...! आज राव यांच्या शाळेत पाचवीपर्यंतची सुमारे १०० मुले शिक्षण घेत आहेत.सविस्तर बातमी

ज्याचे ४ जणांचे कुटुंब चहाच्या टपरीवर अवलंबून आहे, असा चहावाला झोपडपट्टीतल्या मुलांसाठी शाळा चालवतो आणि त्यांना पिण्यासाठी स्वखर्चाने रोज चक्क ५० लीटर दुध उपलब्ध करून देतो. 
विश्वास ठेवाल तुम्ही यावर?

तुम्हाला ठेवावाच लागेल. कारण, डी. प्रकाश राव हा चहावाला हे कार्य करतो आहे...!

केवळ झोपडपट्टीतील मुलांनी शिकावं आणि चांगलं आयुष्य जगावं ही त्याच्या मनातली तळमळ व जबरदस्त इच्छाशक्ती या भांडवलावर!

झोपडपट्टीतील १०० मुलांना स्वखर्चाने शिकवणारा गरीब ‘चहावाला’ पण श्रीमंत शिक्षक..!
#Bharatiyans

हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत मस्तपैकी एखाद्या टपरीवर उभं राहून गरम... वाफाळता चहा पिण्याची मजा काही वेगळीच असते नाही? अशा वेळी आपलं लक्ष कोणाहीकडे जात नाही, अगदी त्या चहावाल्याकडेसुद्धा!

पण, डी. प्रकाश राव या चहावाल्याची प्रेरणादायी गाथा वाचल्यावर तुम्हाला प्रत्येक चहावाल्याकडे पाहिल्यावर राव यांची आठवण येईल, हे नक्की!

ओडिसामधील कटक गावात एका फूटपाथवर डी. रमेश राव यांची चहाची टपरी आहे. ही टपरी आणि जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द हे सर्व प्रकाशराव यांना त्यांच्या स्वातंत्र्यसैनिक असलेल्या वडिलांकडून मिळालं. त्यांचे वडील दुसऱ्या महायुद्धात सैनिक होते. त्यांनी ही टपरी १९६० साली बक्षी बाजार येथे सुरू केली. तेव्हापासून ती तिथेच आहे.

प्रकाश राव त्यांच्या लहानपणी वडिलांना मदत करत. वडिलांनंतर टपरीच त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन बनले. १९७६ साली प्रकाश यांना पाठीच्या मणक्यात झालेल्या गाठीमुळे पॅरालिसिसचा झटका आला आणि त्यांचे कमरेच्या खालचे शरीर लुळं पडलं.

सहा महिने आजाराशी झुंज दिल्यानंतर प्रकाश राव हॉस्पिटलमधून घरी परतले व पुन्हा त्यांनी नव्या जोमाने आयुष्याला सुरुवात केली. ते सहा महिने त्यांच्या आयुष्यातील अत्यंत अवघड आणि परीक्षा पाहणारे ठरले; पण या सहा महिन्यात त्यांना वेगवेगळे अनुभव आले.

या सहा महिन्यात राव यांच्यासाठी अनेकांनी रक्तदान केले होते. ही गोष्ट राव यांना ते बरे झाल्यावर कळाली. तेव्हापासून आजतागायत राव स्वत: रक्तदान करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आज रक्तदान करणारी एक टीम तयार झाली आहे. ही टीम २४ तास रक्तदान करायला सज्ज असते. आतापर्यंत राव यांनी १९० पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलं आहे.

दहा वर्षांपूर्वी टपरीवर असताना राव यांना जाणवलं, की आजूबाजूच्या झोपडपट्टीतील मुले शिक्षणाभावी वाईट मार्गाला लागत आहेत. त्यांचं भवितव्य धोक्यात आहे. राव यांनी या मुलांना शिक्षण देण्याचे ठरवले. त्यांनी स्वत:च्या झोपडीत २००० साली या मुलांसाठी शाळा सुरु केली.

प्रकाश राव यांचा दिनक्रम पहाटे ४ वाजता सुरु होतो. घरची कामे आवरून टपरीवर जायचे तिथे सकाळचे गिऱ्हाईक झाल्यावर दिवसभर मुलांना शिकवायचं.

इतकंच नाही तर ते मुलांना रोज दूध प्यायला देतात. या मुलांसाठीच्या ५० लीटर दुधाचा खर्च राव स्वत: करतात.

आज त्यांच्या शाळेत पाचवीपर्यंतची सुमारे १०० मुले शिक्षण घेत आहेत. पाचवीनंतर राव स्वतः त्या मुलांना सरकारी शाळेत दाखल करतात.

राव म्हणतात, "उपाशी पोटी ब्रह्मज्ञान सांगत बसू नये. उपाशी मुलांना शिक्षणाचे महत्व कळत नाही. काय शिकवलं ते कळत नाही. पोट भरलेलं असलं, तरच त्यांचं लक्ष अभ्यासात लागतं. मग आपोआपच ते वाईट सवयींपासून लांब राहतात.”

मुलांची शाळेविषयीची गोडी वाढावी म्हणून राव शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम व खेळ देखील घेतात. राव यांचं ५० % उत्पन्न मुलांवर खर्च होतं. त्यांचं हे कार्य बघून मुलं आता त्यांना त्यांच्या कामात मदत करत आहेत. अनेक संस्था त्यांना मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. शाळेतील शिक्षकांचा पगार व इतर आवश्यक वस्तू यांचा खर्च काही सामाजिक संस्था करतात.

राव यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. रक्तदानासाठी त्यांना बंगळूर येथे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आज राव यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्या परिसरातील अनेक मुले मोठी होत आहेत आणि मोठी झालेली मुले राव यांच्या कार्यात त्यांना मदत करत आहेत. समाजसेवेचा हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अशा पद्धतीने जाणं यातच राव यांच्या कार्याचे आणि कष्टाचे चीज झालं असं म्हणता येईल, नाही का..?

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

वैशाली सागर - देवकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य