Bhartiyans

Menu

३५० मनोरुग्णांना मानसिक आजारातून बाहेर काढून नव्या उमेदीने जगण्यास मदत करणारे संजय शर्मा

Date : 30 Jan 2017

Total View : 1710

छत्तरपूरचे वकील संजय शर्मा यांनी ३५० मनोरुग्णांना योग्य उपचार मिळवून दिले आहेत. त्यांच्या मदतीमुळे ज्या कुटुंबांना आर्थिक कारणांमुळे त्यांच्या मानसिक रुग्णाला औषधोपचार करणं शक्य नव्हतं त्यांना मोठा दिलासा मिळाला.


सारांश

रस्त्याच्या कडेला, बस थांबा, रेल्वे स्थानक किंवा इतरत्र कुठेही घाणीने माखलेले, अर्धनग्न, केस विस्कटलेले, स्वतःशीच बडबडत असलेले, कधी आकाशात तर कधी जमिनीवर अशी शून्यात नजर लावून बसलेले, असे लोक आपल्याला दिसतात. त्यावेळी आपण मान वळवून निघून जातो..! पण, संजय शर्मा यांच्यासारखे समाजाविषयी तळमळ असणारे लोक असं करत नाहीत! ते पुढे येतात आणि या मनोरुग्णांना योग्य अश्या उपचारकर्त्यांच्या हाती सोपवतात, अश्या मनोरुग्णांसाठी शब्दशः देव ठरतात.सविस्तर बातमी

झापडं लावून जगताना अनेकदा आपल्याला आजूबाजूचं दुःख दिसतच नाही.
रस्त्याच्या कडेला, बस थांबा, रेल्वे स्थानक किंवा इतरत्र कुठेही घाणीने माखलेले, अर्धनग्न, केस विस्कटलेले, स्वतःशीच बडबडत असलेले, कधी आकाशात तर कधी जमिनीवर अशी शून्यात नजर लावून बसलेले, असे लोक आपल्याला दिसतात. 

त्यावेळी आपण काय करतो? कधी मान वळवून निघून जातो. तर, कधी कीव करून..!
पण, मध्य प्रदेशमधील संजय शर्मा यांच्यासारखे समाजाविषयी तळमळ असणारे लोक असं करत नाहीत!

३५० मनोरुग्णांना मानसिक आजारातून बाहेर काढून नव्या उमेदीने जगण्यास मदत करणारे संजय शर्मा !  
 

‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे’ ही उक्ती संजय शर्मा यांनी पुन्हा एकदा खरी करून दाखवली आहे. त्यांच्यामते अशा मानसिक आजाराने ग्रस्त असणार्या व्यक्तीला मदत करून बरे करणे हे अशक्य नाही तर शक्य आहे, 'पॉसिबल’ आहे.  
 

मानसिक रोग कोणी ओढवून घेत नाही. योग्य उपचार मिळाले तर तो बराही होऊ शकतो. पण, याबद्दल जागरुकता नसल्याने, आर्थिक परिस्थिती असल्याने अनेकदा अशा रुग्णांना सांभाळणे अवघड होतं. त्यांचे कुटुंबीयदेखील त्यांना वाऱ्यावर सोडून देतात आणि त्यांची अवस्था अजूनच दयनीय होत जाते.

 

रस्त्यावर बेवारशासारखे भटकण्याशिवाय, मिळेल ते खाण्याशिवाय आणि मिळतील ते कपडे घालण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. मृत्यू येत नाही म्हणून जगणं एवढच त्यांच्या हातात उरतं. 
अशा व्यक्तींना पाहून संजय शर्मा यांचं मन द्रवलं. ते व्यथित झाले आणि अशा लोकांच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं. 

 

संजय शर्मा हे बुंदेलखंडमधील छत्तरपूर येथील वकील. त्यांनी आजवर अशा ३५० मानसिक रुग्णांना योग्य उपचार मिळवून दिले आहेत. हे सत्कर्म करताना त्यांनी आपल्या कायद्याच्या अभ्यासाचा योग्य उपयोग करून घेत, मेंटल हेल्थ एक्टमधील तरतुदींचा योग्य वापर करून अनेक मानसिक रुग्णांची सुटका देखील केली आहे. संजय यांच्या मदतीमुळे ज्या कुटुंबांना आर्थिक कारणांमुळे त्यांच्या मानसिक रुग्णाला औषधोपचार करणं शक्य नव्हतं त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
 

अनेक वर्ष सुरु असलेल्या या सामाजिक कार्यामुळे शर्मा यांना प्रसिद्धी मिळाली आणि इतकेच नव्हे तर प्रशासनाचे देखील लक्ष वेधले गेले. आता प्रशासकीय अधिकारीही मानसिकदृष्ट्या आजारी/अस्वस्थ व्यक्तींची सुटका करण्यासाठी संजय शर्मांची मदत घेतात.  
या कार्याची सुरुवात १९९८ साली झाली. शेरा नावाचा एक मानसिक रुग्ण, जो छत्तरपुरच्या रस्त्यांवर भटकायचा त्याला प्रथम मदत करून संजय शर्मा यांनी मदत केली आणि मग या कार्याचा त्यांनी जणू विडाच उचलला.  

हळूहळू बंदा, झांसी, महोबा, हमीरपुर आणि आजूबाजूच्या गावांमधून अगदी उत्तरप्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये जाऊन संजय यांनी काही मानसिक रुग्णांना योग्य औषधोपचार मिळवून दिले. छत्तरपूरचे जिल्हाधिकारी संजय यांच्या या निस्वार्थी कामाने अतिशय प्रभावित झाले. त्यांनी ‘पद्म’ पुरस्काराकरता सरकारकडे संजय यांच्या नावाची शिफारस केली आहे.  

शर्मा यांना अशी मानसिक रुग्ण आढळताच ते प्रथम स्थानिक पोलीस स्टेशनला कळवतात. कारण, कायद्यानुसार अशा व्यक्तीचा ताबा घेणे हे पोलिसांचे कर्तव्य असते. त्या मानसिक रुग्णाची आरोग्य तपासणी करून त्यांना चीफ ज्युडीशीअल मैजीस्ट्रेट यांच्या न्यायालयात  हजर करणे बंधनकारक असते, असे शर्मा यांनी सांगितले. ज्यांना अशा व्यक्तीची माहिती कळते ते शर्मा यांना कळवतात व शर्मा मदतीसाठी धाव घेतात. त्यानंतर पुढील कारवाई होते. 

शर्मा यांना या कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे, सुरुवातीला पोलिसांचे सहकार्य मिळवण्यासाठी, कोर्टात रुग्ण हजर करून त्याला औषधोपचार मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आता पोलिसच त्यांना फोन करून मानसिक रुग्ण कुठे आढळल्यास त्याची माहिती देतात. 

योग्य उपचार मिळवून दिलेल्या ३५० रुग्णांपैकी दहा टक्के अपवाद वगळता इतर सर्व रुग्णांना त्यांच्या आजारातून बाहेर काढण्यात शर्मा यांना यश आले आहे. ते सर्व रुग्ण आता सामान्य आयुष्य जगत आहेत.

 

शर्मा यांच्या मते योग्य औषधोपचार वेळेवर न होणं हा सर्वात  मोठा अडसर असतो. आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेकदा डॉक्टरकडे जाण आणि महागडी औषधे घेण देखील परवडत नाही. अशा कुटुंबातील मानसिक रुग्ण व्यक्तींना अनेकदा घरचे लोक वाऱ्यावर सोडून देतात.

पण, ज्याला कोणी नसतं त्याच्यासाठी देव संजय शर्मा या भारतीयाच्या रुपात मदत पाठवतो, हे नक्की..!
 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

मृणाल काशीकर- खडक्कर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य