Bhartiyans

Menu

वंचितांना हक्काचे, ‘अक्षय’ घर देणारा भारतीय अवलिया..

Date : 01 Feb 2017

Total View : 1875

बंगळूरमधील नामांकित टाटा हॉटेल्समध्ये शेफची नोकरी करणारे नारायणन कृष्णन यांनी रस्त्याच्या कडेला एका भिकाऱ्याला स्वत:चीच विष्ठा खाताना पाहिलं आणि यातूनच त्यांनी नोकरी सोडून या भिकार्यांसाठी आपलं आयुष्य आणि सर्वस्व देऊ केलं.


सारांश

बंगळूरमधील नारायणन कृष्णन या नामांकित शेफने स्वतःची नोकरी सोडून या भिकार्यांना स्वत:चं हक्काचं घर मिळवून दिलं. त्यांनी स्वतःच्या बचतीमधून २००३ मध्ये मदुराई येथे ‘अक्षय ट्रस्ट’ची स्थापना केली. या ट्रस्टतर्फे गरीब, निराधार, मानसिकरुग्ण अशा सर्वांना जेवण दिलं जातं आणि महत्वाचं म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी दिली जाते. यातूनच २०१३ मध्ये ‘अक्षय घर’ निर्माण झाले. या घराला स्वतंत्र स्वयंपाक घर, जेवणाची खोली आणि रहाण्याची सोय आहे. सध्या येथे ४५० लोक रहातात.सविस्तर बातमी

आपण रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यांना नेहमीच बघतो. त्यांना बघून फार तर फार आपण थोडा वेळ हळहळतो आणि निघून जातो.

मात्र, यापुढे काही तरी करण्यासाठी लागते ती हिंमत, निर्धार आणि समाजसेवेची प्रेरणा.
बंगळूरमधील नारायणन कृष्णन या नामांकित टाटा हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध शेफने या भिकाऱ्यांना स्वतःची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्वत:चं घर मिळवून दिलं.
चला भारतीयांनो.....कसं, ते बघुया..!

वंचितांना हक्काचे, अक्षय देणारा अवलिया..!

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण होत आहेत. तरी आजही आपल्या देशात रोटी, कपडा और मकानच्या समस्या संपलेल्या नाहीत. भीक मागणारे हात अजूनही कमी झालेले नाहीत आणि याचं कारण समाज भिकाऱ्यांना उपकार केल्यासारखी भीक देतो किंवा त्यांना दूर लोटतो. दुर्दैवाने, आपला समाज ‘त्यांना’ स्वीकारत नाही.

बंगळूरमधील नामांकित टाटा हॉटेल्समध्ये शेफची नोकरी करणारे नारायणन कृष्णन. नुकतीच त्यांना स्वित्झर्लंडमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी आली होती आणि असे असताना २००२ मध्ये रस्त्याच्या कडेला एका भिकाऱ्याला त्यांनी पाहिलं. हा भिकारी स्वत:चीच विष्ठा खात होता....

ते हृदयद्रावक आणि डोकं सुन्न करणारं दृश्य पाहिल्यावर नारायणन यांचं आयुष्यचं बदलून गेलं.

सर्वप्रथम ते त्या भिकाऱ्याला एका जवळच्याच हॉटेलमध्ये घेऊन गेले.
तिथे तो भिकारी अक्षरश: अन्नावर तुटून पडला.

जेवून तृप्त झाल्यावर त्या भिकाऱ्याच्या डोळ्यात आलेलं पाणी ही नारायणन यांच्यासाठीची पावती होती.

तो क्षण ही नारायणन यांच्या पुढच्या आयुष्यासाठीची ‘किक’ ठरली.
त्यांनी स्वतःच्या बचतीमधून निराधार, गरीब आणि गरजू लोकांना जेवण देण्यास सुरवात केली.

२००३ मध्ये त्यांनी मदुराई येथे ‘अक्षय ट्रस्ट’ची स्थापना केली. या ट्रस्टतर्फे गरीब, निराधार, मानसिकरुग्ण अशा सर्वांना जेवण दिलं जातं आणि महत्वाचं म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी दिली जाते.

या कार्यासाठी अनेक लोक देणगी देतात. हा उपक्रम अजून मोठ्या प्रमाणावर करता यावा म्हणून २०१० मध्ये ‘अक्षय ‘ची स्थापना केली. त्यानंतर २०१३ मध्ये ‘अक्षय घर’ निर्माण झाले. या घराला स्वतंत्र स्वयंपाक घर, जेवणाची खोली आणि रहाण्याची सोय आहे.

सध्या येथे ४५० लोक रहातात. ‘घर’ स्थापन झाल्यावर पहिल्या सहा महिन्यातच जागा कमी पडायला लागली, म्हणून कृष्णन आणि त्यांची टीम आता दुसर्‍या घराच्या तयारीत आहे. अर्थातच, हे सगळ करायचं तर वेळ, मनुष्यबळ आणि पैसा लागतो.

नारायणन यांच्या कार्याची दखल सीएनएन, पेप्सिको, रोटरी यांसारख्या अनेक मोठ्या संस्थांनी घेतली आहे. तुम्हाला जर या कार्यात सहभागी व्हायचे असेल तर http://www.akshayatrust.org/getinvolved.php येथे भेट द्या. तुम्ही देणगी देऊ शकता, स्वयंसेवक म्हणून काम करू शकता किंवा निधी संकलनासाठी मदत करू शकता.

स्वामी विवेकानंद म्हणायचे, की भीक, उपकार हे शब्द चुकीचे आहेत. ‘सेवा’ हाच शब्द योग्य आहे.

कारण, एखाद्या गरिबाला तुम्ही मदत करता तेव्हा तो तुम्हाला त्याच्यातल्या नारायणाची ‘सेवा’ करण्याची संधी देत असतो...!

धन्यवाद !

-------------------------------------------------------------------------------

 

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’.

प्रचिती तलाठी-गांधी

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

India Imagine