Bhartiyans

Menu

पहिली महिला रिक्षा चालक ते प्रवासी कंपनीची मालकीण शिला डावरे यांचा ‘विक्रमी’ प्रवास!

Date : 02 Feb 2017

Total View : 2178

१९८० मध्ये १८ वर्षाची शीला स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी परभणीहून पुण्याला आली. तिने रिक्षा चालवायचा निर्णय घेतला. तो कृतीत उतरवला आणि तिच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.


सारांश

१९८० मध्ये १८ वर्षांची शीला डावरे ड्रायव्हिंगचं वेड घेऊन परभणीहून पुण्याला आली. तिने रिक्षा चालवायचा निर्णय घेण्याचं धाडस त्या काळात दाखवलं. सुरवातीला शीलाच्या रिक्षात कोणी बसतच नसे. मात्र, हळूहळू परिस्थिती बदलली. पुढे स्वतःची रिक्षा घेण्याइतक्या त्या सक्षम झाल्या. शीलाचं नाव पहिली महिला रिक्षा चालक म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदलं गेलं. सध्या त्या एका online सर्व्हिसेस पुरवणाऱ्या एका रिक्षा कंपनीशी संलग्न आहेत.सविस्तर बातमी

आपला समाजात स्त्री-पुरूष समानता आली आहे, असं आपण कितीही म्हटलं. तरी आजही साधारणत: प्रत्येक क्षेत्राकडे आपण त्या क्षेत्रावर स्त्रियांचं वर्चस्व आहे की पुरूषांचं असा विचार करतोच करतो आणि त्यानुसार बोलतोसुद्धा. उदाहरणार्थ- भाजीवाली, पोळ्यांवाली, चहावाला, रिक्षावाला..... इत्यादी.

तात्पर्य, आपण आजही २१ व्या शतकात सुद्धा प्रत्येक क्षेत्राला ‘वाला’ किंवा ‘वाली’ यांच्याशी जोडलं आहे..!

जर आजही ही परिस्थिती असेल तर १९८०मध्ये एखाद्या ‘वाली’ने ‘वाल्यां’च्या क्षेत्रात प्रवेश करून काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिला कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं असेल?

‘ती’ला कोणत्या अडचणी आल्या असतील? याचं उत्तर तुम्हाला शीला डावरे देतील कारण हीच ‘ती’ जी झाली पहिली ‘रिक्षावाली’.....आणि ज्यासाठी जिच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.

पहिली महिला रिक्षा चालक ते प्रवासी कंपनीची मालकीण शीला डावरे यांचा ‘विक्रमी’ प्रवास!

१९८० मध्ये १८ वर्षाची शीला स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी परभणीहून पुण्याला आली.

महिला साधारण पुरुष मक्तेदारी असलेले क्षेत्र निवडताना आजही जरा विचार करतात; पण हा विचार आणि त्या विचारानुसार कृती करण्याचं धाडस शीलाने त्या काळात दाखवलं.

शीला डावरे यांनी रिक्षा चालवायचा निर्णय घेतला. त्यांनी या व्यवसायात स्वतःला झोकून दिलं. कारण, तिला कळून चुकलं होतं, की कष्टाशिवाय पर्याय नाही.

मुलीचं शिक्षण झालं, की लगेच तिचं लग्न लावलं जायचं, असा तो काळ होता. शिलाला ड्रायव्हिंगची आवड होती. याबद्दल घरून पाठिंबा मिळणं खूप अवघड होतं, म्हणून तिने परभणीहून सरळ पुणे गाठलं.

सुरवातीला शीलाच्या रिक्षात कोणी बसतच नसे. ही बाई आपल्याला नीट नेईल का? रस्ते माहीत असतील का? रिक्षा नीट चालवेल ना? असे अनेक प्रश्न गिऱ्हाईकांच्या मनात असायचे.

मग, शिल्पा एका महिला मदत गटाशी जोडली गेली. ज्यावेळेस पुरुष रिक्षा चालक नसतील, तेव्हा ते तिला रिक्षा चालवायला देत.

“यामुळे काही वर्षातच मी स्वतःची रिक्षा घेण्याइतकी सक्षम झाले आणि स्वतः ची रिक्षा घेऊन रस्त्यावर फिरू लागले.” शीला स्वतःचा अनुभव सांगते.

नंतर शिल्पा एका रिक्षा चालक संघटनेबरोबर जोडली गेली.

शीलाच्या या धाडसाची नोंद घेतली गेली आणि तिचं नाव पहिली महिला रिक्षा चालक म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदलं गेलं.

शीला म्हणतात, “रस्तावरून रिक्षा चालक म्हणून वावरताना अनेक अनुभव आले. चांगले आणि वाईटसुद्धा. काही पालक जेव्हा त्यांच्या आपल्या मुलांना पहिली रिक्षा चालक म्हणून माझी ओळख करून देतात. काही महिला माझा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रात येऊ इच्छित आहेत, हे पाहून खूप समाधान मिळतं. माझे सर्व रिक्षा चालक मित्र व सहकारी हे माझ्या मागे कायमच खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांनी माझ्यासाठी प्रसंगी जीवाला जीव दिला आहे.”

अशीच एक आठवण सांगताना त्यांनी सांगितलं, की एकदा एका पोलीस हवालदाराने माझ्यावर हात उगारला. त्यावेळेस माझ्या सर्व सहकारी मित्रांनी त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवून मला पाठिंबा दिला.

सध्याच्या महिलांविरुद्ध होत असलेल्या गुन्ह्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, की खरं तर आता महिला अधिक शिक्षित आणि आत्मविश्वासू होत आहेत. त्या एकट्या कधीही प्रवास करू शकतात. त्यांनी खंबीर व्हायला हवे.

एका शाळेची मालवाहू गाडी ते रिक्षा चालवण्याचा आपला प्रवास कसा झाला, हे शीला अतिशय सुंदर शब्दात वर्णन करून सांगतात. १९८८ ते २००१ या काळात शीला यांनी विविध वाहने चालवण्याचा अनुभव घेतला आहे. नंतर त्यांना पालकांचा देखील पूर्ण पाठिंबा मिळाला.

स्वतःच्या प्रकृतीच्या कारणामुळे कालांतराने शिला डावरे यांनी स्वतःची एक प्रवासी कंपनी काढली. सध्या त्या एका online सर्व्हिसेस पुरवणाऱ्या एका रिक्षा कंपनीशी संलग्न आहेत. अनेक महिलांना या क्षेत्रात येण्यासाठी त्या प्रोत्साहन देत असतात.

शीला डावरे यांच्या कर्तृत्वावरून हेच सिद्ध होतं, की आपण महिला सबलीकरणाच्या गप्पा करतो; पण महिलांच्या रोजगारीचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहतील कशा?
 

मात्र, हे असं झालं तर त्या नक्कीच सिद्ध करतील, की नारी ही एक महत्वाची ‘शक्ती’ आहे.

---------------------------------------------------

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

डीएनए इंडिया