Bhartiyans

Menu

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारा वैजनाथ..!

Date : 04 Feb 2017

Total View : 952

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ‘कृषी विकास मंचाची’ स्थापना करून जगण्याची नवसंजीवनी देणारा परळी तालुक्यातील वैजनाथ..!


सारांश

आज शेतकरी हा नावाचाच बळीराजा उरला आहे. कर्ज आणि सावकारांचा जाच यामुळे या राजाचा रोजच ‘बळी’ जातो आहे. मराठवाडा आणि विदर्भात हे प्रमाण खूपच जास्त आहे. पण, याच मराठवाड्यातील परळी तालुक्यातील वैजनाथ या शेतकऱ्याने परिस्थितीसमोर हात टेकले नाही तर हात उगारला! हाताची मजबूत वज्रमूठ केली त्याच्या इतर शेतकरी मित्रांनी आणि पुढे काय चमत्कार झाला..? वाचा..!सविस्तर बातमी

भारत हा कृषिप्रधान देश आहे, असं वाक्य अगदी प्राथमिक शाळेपासून आपण पाठ केलेलं असतं.
शेतकरी धान्य पिकवतो, ते विकतो आणि मग त्याला पैसे मिळतात. हा पुढचा तपशीलही अगदी तोंडपाठ असतो प्रत्येकाच्या...!
पण खरच आज असं होतं आहे का?

शेतकरी हा नावाचाच ‘बळीराजा’ उरला आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी पिकावर पडणारा रोग तर कधी १०-२०-५० हजार रुपयांचे कर्ज आणि सावकारांचा जाच यामुळे या राजाचा रोजच ‘बळी’ दिला जातो आहे. हे दुष्टचक्र थांबणार कधी...?

मराठवाडा आणि विदर्भात तर हे प्रमाण खूपच जास्त आहे. निसर्ग आणि आर्थिक परिस्थितीपुढे इथला शेतकरी हात टेकतो.

पण, याच मराठवाड्यातील परळी तालुक्यातील वैजनाथ या शेतकऱ्याने हात टेकला नाही, तर हात उगारला परिस्थितीवर, निसर्गावर...!
या हाताची वज्रमूठ केली, ती त्याच्या इतर शेतकरी मित्रांनी. मग, पुढे काय चमत्कार झाला..?
तुम्ही स्वत:च वाचा..!  

परळी तालुक्यातील वैजनाथला लहानपणापासूनच एक विचार अवस्थ करत होता, की पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याकडे ५ एकर शेती असली तरी तो सधन असतो; पण मराठवाड्यात ५० एकर असलेला शेतकरीसुद्धा कर्जबाजारीच असतो.

शेतकऱ्याची अशी वाईट अवस्था असल्यामुळे साधारण २० वर्षापूर्वी गावातील सगळे जण आपल्या मुलांना शहरात शिक्षण आणि नोकरीसाठी पाठवत होते. ‘शेती करू नका’ असाच सल्ला शेतकरी आपल्या मुलांना देत होते. तसाच सल्ला वैजनाथचे वडील सुभाषराव कराड यांनी देखील आपल्या दोन्ही मुलांना दिला.

पण वैजनाथच्या मनात मात्र काहीतरी वेगळच सुरू होतं. १२ वी झाल्यावर शेतीचं शिक्षण घेऊन शेती करण्याचा विचार त्याच्या मनात अधिकाधिक प्रबळ होत होता. घरच्यांचा विरोध झुगारून त्याने शेतीचं शिक्षण घेण्यास सुरवात केली.

घरची हलाखाची परिस्थिती, वडील कर्जबाजारी असे असताना प्राथमिक शिक्षण त्याच्या गावात म्हणजे मोह्यात झाल्यावर पुढील शिक्षणासाठी तो परळीत आला. शेती इतकी डोक्यात होती, की १२ वी नंतर दुसरा कुठलाही विचार न करता त्याने शेतीचे शिक्षण घेण्यास सुरवात केली.

त्याच्याकडे २० एकर शेती होती ; पण ती कसण्यासाठी पैसे नव्हते. वेगळ्यापद्धतीने काय करता येईल असा विचार तो करू लागला आणि यातूनच एक कल्पना आकारास आली.

१ मे २००७ रोजी ‘कृषी विकास मंचाची’ स्थापना त्याने केली. या संस्थेद्वारे गटांचं काम सुरु केलं. १६ शेतकऱ्यांनी गटात सहभाग घेतला. उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी बी-बियाणे, कीटक नाशके आणि यंत्रसामुग्रीचा खर्च एकत्रितपणे करण्याचा प्रयत्न सुरू केला.

भेंडीचे उत्पादन करून त्याला बाजारपेठ मिळवण्याचे काम वैजानाथाने आधीच करून ठेवले होते.

‘अपेंडा’ संस्थेने भेंडीची गुणवत्ता तपासून के.बी.एक्स्पर्टमार्फत भेंडी परदेशात पाठवण्यात आली. एकरी १ लाख ८० हजार इतकं उत्पन्न झालं. सर्व खर्च वगळून १ लाख १० हजार रुपये नफा झाला. वैजनाथच्या कष्टाला फळ आलं.

त्याच्या गटाला मिळणारं उत्पन्न आणि त्यांची शेती करण्याची पद्धत पाहून अनेक गट स्थापन झाले.

शेतकऱ्यांची संख्या १६ वरून ७० वर गेली. ८० एकर क्षेत्र गटात सामील झाले. मिरची, भेंडी, वांगी, कारले, दुधी भोपळा अशी पिके समूहपद्धतीने घेणं सुरू झालं. हैद्राबाद, मुंबई, दुबई येथे दुधी भोपळ्याला खूप मागणी आहे. वैजनाथचं उत्पादन तिथे मोठ्या प्रमाणावर निर्यात होऊ लागलं.

परळी आणि माजलगाव परिसरात वैजनाथ कृषी विकास मंचाचे आता ३० ते ३५ गट झाले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहते.

संस्थेतर्फे शेतकऱ्यांसाठी दर महिन्याला कार्यशाळेचं आयोजन केलं जातं. मार्केटिंगची माहिती दिली जाते. प्रतवारी आणि पॅकेजिंगचं प्रशिक्षण दिलं जातं. बियाणे, कीटकनाशके आणि यंत्रसामग्रीचा खर्च एकत्रित केला जातो. गटाकडे फवारणी यंत्र, ट्राक्टर, भरड धान्याचे उनीत आहे. मागेल त्याला ही साधने अतिशय अल्प दारात उपलब्ध करून दिली जातात. शेतकऱ्याला मोबदला दर आठवड्याला देता येतो. स्वतःची नर्सरी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भाजीपाल्याची रोपे दिली जातात. दशपर्णी अर्क, जीवामृत अशी नैसर्गिक पद्धतीनेच तयार केलेली कीटकनाशके दिली जातात. यापुढे कोल्ड स्टोरेजे, प्रोसिसिंग अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.

वैद्यनाथ कृषी विकास मंचात परळी आणि माजलगाव तालुक्यातील १८ ते २० गावातून १००० शेतकरी आणि ५००० एकर क्षेत्र सहभागी झालेले आहेत. बोधेगाव, कावळ्याची वाडी, नागीपिपारी, अस्वलआंबा, नागापूर, वांगी, सालेगाव, पतंगी गाव, पट्टी तांडा, जीवनापूर तांडा, सिर साला, पोहेनार, औरंगपुर, वाका, घनाल तांडा, तेल् समुख, हिवरा, वाघाला आदी गावांचा सहभाग आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यातील अनेक गावे संघटनेला जोडली जात आहेत.

महाराष्ट्राच्या गावागावात अशा संस्था निर्माण व्हायला हव्या, तरच शेतकऱ्याचा ‘बळी’ न जाता तो दिमाखात बळीराजा म्हणून जगू शकेल..!


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

अनिता घटणेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

लोकसत्ता