Bhartiyans

Menu

भारताचे २५ बालवीर ‘शौर्य पुरस्काराने’ सन्मानित; ३ साहसी मुलींचाही समावेश

Date : 04 Feb 2017

Total View : 1140

भारत सरकारतर्फे दरवर्षी अतुलनीय साहस दाखवणाऱ्या ६ ते १८ या वयोगटातील मुलांना पंतप्रधानांच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार’ दिला जातो. नुकताच हा पुरस्कार २५ मुलांना दिला गेला. ज्यामध्ये ३ मुली आहेत.


सारांश

भारत सरकारतर्फे दरवर्षी अतुलनीय साहस दाखवणाऱ्या ६ ते १८ या वयोगटातील वीर मुलांना पंतप्रधानांच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार’ दिला जातो. ५० हजार रुपयांचा ‘भारत पुरस्कार’, ४० हजार रुपयांचा गीता आणि संजय चोपडा पुरस्कार, २४ हजार रुपयांचा बापू गायधनी पुरस्कार हे विशेष पुरस्कार देखील दिले जातात. नुकताच हा पुरस्कार २५ मुलांना दिला गेला. कोण आहेत हे छोटे वीर, पाहूयात..!सविस्तर बातमी

भारतीयांच्या रक्तातच शौर्य आहे, साहस आहे, धाडस आहे आणि अजिंक्य मनोबलसुद्धा आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणतात तसं, “यह तर्पण की भूमि है, यह अर्पण भूमि है!”

इथल्या अनेक नरवीरांनी हे वेळोवेळी सिद्ध केलं आहे.
मग, या शौर्याच्या यज्ञात येथील लहान मुले केवळ ते लहान आहेत म्हणून मागे राहतीलच कसे?

भारतात दरवर्षी अतुलनीय साहस दाखवणाऱ्या वीर बालकांचा सन्मान ‘शौर्य पुरस्कार’ पंतप्रधानांच्या हस्ते देऊन केला जातो. वय वर्ष ६ ते १८ या वयोगटातील मुलांना हा पुरस्कार दिला जातो. भारत पुरस्कारासाठी ज्यांची निवड झाली त्यांना रुपये ५० हजार, गीता आणि संजय चोपडा पुरस्कारासाठी रुपये ४० ह्जार, बापू गायधनी पुरस्कारासाठी रुपये २४ हजार आणि इतरांना रुपये २० हजार रोख व प्रशस्तिपत्रक दिलं जातं. याशिवाय मुलांना त्यांच्या आवडीचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली जाते.

२०१५ या वर्षासाठी हा पुरस्कार २५ मुलांना दिला गेला.
ज्यामध्ये ३ मुलींचाही समावेश आहे. कोण आहेत हे छोटे वीर, पाहूयात..!

अर्जुन सिंह : उत्तराखंड येथे राहणाऱ्या अर्जुनच्या घरात अचानक वाघ घुसला. अर्जुनची आई गुरांना चारा देत होती. तिच्यावर त्या वाघानं हल्ला केला. अर्जुनने न घाबरता, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आईचे प्राण वाचवण्यासाठी त्या वाघाशी मुकाबला केला. शेवटी, वाघाने तिथून पळ काढला. त्याच्या या बहादुरीसाठी त्याला ‘संजय चोपडा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

शिवमपेत रुचिता : गीता चोपडा पुरस्कार स्वीकारणारी रुचिता ही आतापर्यंतची सर्वात कमी वय असलेली व्यक्ती आहे. ती शाळेच्या बसने जात असताना त्यांच्या बस आणि ट्रेनचा अपघात झाला. प्रसंगावधान

राखून रुचिताने बसच्या खिडकीतून काही मुलांना धक्का देऊन बाहेर काढले आणि त्यांचे प्राण वाचवले. इतक्या कमी वयात एवढं साहस आणि प्रसंगावधान दाखवणं खरोखरच कौतुकास्पद आहे.

जोएना चक्रवर्ती : छत्तीसगड येथील जोएना आपल्या आई-वडिलांसमवेत दिल्लीमधील पहाडगंज परिसरातील एका हॉटेलमध्ये उतरली होती. हॉटेलबाहेर पडल्यावर काही चोरांनी तिच्या वडिलांचा मोबईल फोन हिसकावून घेतला. केवळ 10 वर्षांच्या जोएनाने त्या चोरांचा पाठलाग केला. त्यातील एका चोराचा पाय पकडून तिने त्याला खाली पाडलं. तिच्या या साहसामुळे पोलिसांना ते चोर पकडण्यात यश आलं.

चोंगथम कुबेर मेइती : मणिपूरचा १३ वर्षांचा चोंगथम फुटबॉल खेळत असताना त्याला बाजूच्या 10 फूट खोल असलेल्या खड्ड्यातून एका मुलीची किंचाळी ऐकू आली. ती मुलगी त्या खड्ड्यातील पाण्यात बुडत होती. मागचा पुढचा कसलाही विचार नं करता चोंगथमनं त्या खड्ड्यात उडी मारली आणि त्या मुलीचा जीव वाचवला.

गौरव सहस्त्रबुद्धे : नागपूरच्या गौरवने मित्रांचे प्राण वाचवताना तर स्वत:चे प्राणार्पण केले. जून २०१४ मध्ये एका तलावात गौरवचे ४ मित्र बुडत होते. गौरवने पाण्यात उडी मारली. त्यांना किनाऱ्या ओढत आणलं; पण या प्रयत्नात तो स्वतः मात्र पाण्यात बुडाला.

दिशांत मेहंदीरत्ता : पंचकूलाच्या १३ वर्षाच्या दिशांत मेहंदीरत्ताच्या घरात चोर आले होते. आईच्या मदतीने दिशांतने चोरांना पकडून दिलं.

भीमसेन : उत्तरप्रदेशच्या भीमसेन ऊर्फ सोनूने शरयू नदीत बुडणाऱ्या १४ लोकांना सुरक्षित किनाऱ्यावर आणलं. सोनू फक्त १२ वर्षांचा आहे. तो शेतात काम करत असताना त्यांना पाहिलं की ३० लोकांनी भरलेली एक नाव शरयू नदीत उलटी झाली. ताबडतोब त्याने नदीत उडी मारली आणि १४ लोकांचे प्राण वाचवले.

शिवांश : उत्तरप्रदेशच्या फैजाबाद जिल्ह्यात राहणारे शिवांश आणि त्याचे ५ मित्र, १७ जून २०१५ रोजी शरयू नदीत पोहत होते. त्यांच्यापैकी एक मुलगा नदीत बुडू लागला. शिवांशने त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण दुर्दैवाने ते दोघेही नदीत बुडाले. शिवांश जरी आज आपल्यात नसला. तरी, त्याच्या बहादुरीला शतशः नमन !

शौर्य पुरस्कार पटकावणारी इतर शूर मुले खालीलप्रमाणे -

महाराष्ट्र : निलेश भील, वैभव घंगारे आणि मोहित दळवी.

केरळ : नितीन मैथ्यू, बिथोवन, आनंदू दिलीप, मो. शमनाद आणि अभिजीत केवी.

तेलंगणा : साई कृष्णा आणि अखिल किलाम्बी.

मणिपूर : मॉरिस येंगखाम.

छत्तीसगड : सर्वांद सहा.

गुजरात : राकेशभाई पटेल व कशिश धनानी.

मेघालय : एंजेलिका टिनसांग.

ओरिसा : अविनाश मिश्रा.


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

सुमेधा देशपांडे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

दैनिक भास्कर