Bhartiyans

Menu

१५ वर्षांच्या रोहिणीच्या पुढाकाराने नांदगावातील घराघरात झाली शौचालये!

Date : 07 Feb 2017

Total View : 704

कर्जतजवळील नांदगाव या केवळ १०० कुटुंबे असलेल्या छोट्याशा गावातील रोहिणी कारळेच्या पुढाकारामुळे गावातील ३० टक्के घरांमध्ये शौचालये झाली आहेत. तिच्यामुळे गावातील बहुतांश महिलांचा एक नाजूक प्रश्न मार्गी लागला आहे.


सारांश

कर्जत जवळच्या नांदगावमध्ये एकाही घरात शौचालय नाही. शिक्षणाच्या अभावामुळे लोकांना उघड्यावर शौचास जाण्यात काहीही गैर वाटत नाही. याकडे १५ वर्षांची रोहिणी बारकाईने बघत होती. तिने बदलाची सुरुवात स्वत:च्या घरापासून केली. गावचे सरपंच असलेल्या तिच्या आजोबांना हट्टाने घरात शौचालय बांधायला लावलं. रोहिणीकडे पाहून गावातील १५ मुलींनी आपआपल्या घरात शौचालय बांधलं. आज रोहिणी कारळेच्या पुढाकारामुळे नांदगावातील ३० टक्के घरांत शौचालय आहे.सविस्तर बातमी

तुम्ही १५ वर्षांचे असताना शौचास कुठे जावे असा प्रश्न तुम्हाला भेडसावला होता का? कदाचित नसेल.

त्यामुळे, हा असा काय प्रश्न? या काही बोलायच्या गोष्टी आहेत का? किंवा छे, काहीतरीच काय..! असं

तुम्हाला वाटू शकतं. कारण आपल्यापैकी अनेकांवर तशी वेळ आलीच नाहीये.

पण, कर्जतजवळील नांदगाव या छोट्याशा गावात राहणाऱ्या रोहिणी कारळेवर ही वेळ आली. तेव्हा ती

हातपाय गाळून बसली नाही. खचली नाही. घाबरली नाही आणि हा विषय चारचौघात काढायला

लाजलीसुद्धा नाही. तिच्या पुढाकारामुळे आज तिच्या गावातील ३० टक्के घरांमध्ये शौचालये झाली आहेत.

कर्जत जवळच्या नांदगावमध्ये साधारणपणे १०० कुटुंबे राहतात.

आश्चर्य म्हणजे, या गावातील एकाही घरात शौचालय नाही आणि अत्यंत खेदजनक बाब म्हणजे येथील

लोकांना उघड्यावर शौचास जाणं यात काहीही गैर वाटत नाही. याचं कारण तिथे न पोहोचलेलं शिक्षण!

गावात शाळा आहे; पण इतर मुलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे कित्येक मुलींचं शिक्षण अर्धवट राहतं.

उद्योगाच्या फारशा सुविधा आणि तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने गावकऱ्यांची जेमतेम कमाई ही अन्न,

वस्त्र, निवारा अशा मूलभूत गरजांवरच खर्च होते.

त्यामुळे शौचालय बांधण किंवा मलनिस्सारण व्यवस्था या बाबी त्यांना आजपावेतो गरजेच्या वाटत

नव्हत्या.

याकडे १५ वर्षांची रोहिणी बारकाईने बघत होती. शाळेत मिळणाऱ्या स्वच्छतेच्या धड्यांना तिच्या

आयुष्यात, वास्तवात उतरवण्याचे स्वप्न पहात होती. याची सुरुवात तिने स्वत:च्या घरापासून केली. तिने

तिच्या आजोबांना स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं. हट्टाने त्यांना घरात शौचालय बांधण्यासाठी भाग पाडलं.

आजोबा सरपंच असल्याने तिने गावातील स्त्रियांना या गोष्टीचा कसा सामना करावा लागतो, हेही पटवून

दिलं.

आजोबांना रोहिणीचं म्हणणं पटलं. त्यांनी Habitat for Humanity India या स्वयंसेवी संस्थेमार्फत

स्वतःच्या घरात शौचालय बांधून घेतलं.

आश्चर्य म्हणजे, रोहिणीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तिच्या बरोबरीने गावातील इतर १५ मुलींनी पुढाकार

घेऊन आपआपल्या घरात शौचालय बांधून घेतलं.

आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगताना रोहिणी म्हणते की, “मी अगदी लहान होते; तेव्हा उघड्यावर

शौचास जाण्यास मला काहीच वाटत नसे. कारण घरातील कोणीतरी सोबत असायचं; पण जसजशी मी ८-

९ वर्षांची झाली, तशी मला उघड्यावर शौचास जायची लाज वाटू लागली. मग कुठेतरी गर्द झाडी शोधा,

माळरानात जा किंवा कितीतरी वेळा अंधार पडण्याची वाट बघा, असं होऊ लागलं.

मासिक पाळी सुरु असताना तर खूपच हाल व्हायचे. शाळेची स्वच्छतागृहेसुद्धा बंद असायची. कारण

एकतर त्यांची पडझड झालेली असायची किंवा न वापरल्यामुळे त्यांच्यात घाण साठलेली असायची. ही

परिस्थिती बदलायचं असं मी ठरवलं. आता घरात शौचालय झाल्यामुळे मला खूप बरं वाटतंय. आमच्या

आजूबाजूच्या लोकांनाही याचं महत्व पटू लागलंय, यातच आनंद आहे.”

रोहिणीच्या आई, सुनंदा कारळे यासुद्धा आपल्या मुलीच्या धाडसाचे कौतुक करतात व तिच्यामुळे आता

३०% गावकऱ्यांनी घरीच शौचालय वापरण्यास सुरुवात केली आहे, असं अभिमानाने सांगतात.

रोहिणीला या कार्यात मदत करणारे Habitat for Humanity India चे सदस्य, संतोष डांगरे सांगतात की,

“शाळांमध्ये पूर्वी शौचालये होती; परंतु वापरायची सवय नसल्याने विद्यार्थी किंवा शिक्षक तिकडे फिरकतच

नसत. शौचालयांची अवस्था वापर नसल्याने अतिशय वाईट झाली होती. आम्ही अशी सर्व शौचालये दुरुस्त

करून पुन्हा एकदा व्यवस्थित केली आहेत. येत्या काळात आम्ही आणखी काही शौचालये बांधणार

आहोत.”

आज रोहिणीमुळे गावातील बहुतांश महिलांचा एक नाजूक प्रश्न मार्गी लागला. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी

यांनी सुरु केलेली ‘स्वच्छ भारत’ मोहीम रोहिणीने खऱ्या अर्थाने आपल्या गावात राबवली. गावागावात

अशाच रोहिणी निर्माण झाल्या, तर भारत स्वच्छ, स्वस्थ आणि समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही !


 

बातमी सौजन्य

DNAINDIA